राक्षसाचा प्राण
————————————————————
( काही घटनांवर आधारित कथा विस्तार..)
————————————————————–
” …… आणि राजकुमाराने दहा वेळा ठार मारल्या नंतर ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होई , कारण राक्षसाचे प्राण पोपटात होते आणि पोपट पिंजऱ्यात बंदिस्त होता ….”
आजीबाई सांगत असलेली राजकुमार आणि राक्षस यांची गोष्ट ऐकता ऐकता दोन्ही नातवंडं झोपी गेली ……..
* * * * * *
पीरखेडा पोलिस ठाण्यात जसपाल सोधी ठाणेदार साहेबांना माझी कम्फलेंट लिहून घ्या अशी विनंती करत होता….
सोधी सांगत होता, -” त्याचे शेजारी बिरोबा खोत यांच्या घरात सकाळ, दुपार, संध्याकाळ सदैव सासरा, सुन आणि मुलगा हे नेहमी जोरजोरात एकमेकांशी भांडत असतात.. कधी कधी मध्यरात्री ही आदळ आपट ऐकू येते आणि इतका कर्कश आवाज येत असतो की कानाचे पडदे फाटतील की काय अशी शंका येते… ह्या लोकांच्या मोठमोठ्याने भांडणाच्या आवाजामुळे ना रात्री झोप लागते – ना दुपारी वामकुक्षी घेता येते… शेवटी कंटाळून माझे भाडेकरू घर सोडून निघून जातात, भाडेकरू टिकतच नाहीत, एक भाडेकरू मिळेल तर शप्पथ !!…..मी महिन्याला दहा हजार रुपयांचे नुकसान सोसतो आहे… कंटाळून शेवटी घर विकायचे ठरवले पण हे घर विकत घेण्यासाठी ही लोक कचरायला लागले आहेत… अहो साहेब, एकाने तर सौदा झाल्यावर दिलेला अडव्हांस ही ह्या लोकांच्या भांडणाची ख्याती ऐकून परत घेतला.. आता तुम्हीच सांगा ठाणेदार साहेब मी पोलिस कम्फलेंट करू नको तर काय करू ?…”
ठाणेदार म्हणाले, -” अहो, एखाद्याच्या घरात भांडणं होताहेत त्यात पोलिस काय करणार ? आमच्या ही घरात भांडणं होतात… हां, जर त्याच्या सुनेने मारहाण होते, छळ करतात अशी तक्रार केली तर आम्हाला काही करता येईल…त्या पेक्षा तुम्हीच खोत यांनी तुम्हाला मारहाण केली अशी तक्रार द्या..मग आम्हाला अॅक्शन घ्यायला बरं..”
सोधी म्हणाला, -” अहो, खोटी तक्रार कशी देणार ?”
एवढ्यात बाजूला उभा असलेला पोलिस म्हणाला,-” मग मारामारी करा… आणि नंतर तक्रार द्या, ते ही चालेल..”
सोधी – ” असला कसला सल्ला देताय तुम्ही ?..”
ठाणेदार – ” हे बघा सरदारजी, दोन माणसं अगदी पोलिस ठाण्याच्या समोर जरी भांडत असतील ना तरी आम्ही त्यांच्या वर कोणतीही कारवाई करणार नाही…परवा बिहारच्या विधानसभेतलंच प्रकरण घ्या, जो पर्यंत आमदारांत शाब्दिक चकमक होत होती तोपर्यंत सेक्यूरीटीने काही केले का ? – नाही… जेंव्हा मारामारी सुरू झाली तेंव्हाच सेक्यूरीटीने त्यांना ताब्यात घेतले…तर असा मामला असतो .. कायदा काय आहे हे लक्षात घ्या…”
ठाणेदार पुढे समजावून सांगावे अशा सुरांत म्हणाला, -” एक सोपं सांगतो तुम्ही ते खोत का कोण त्यांच्याशी डायरेक्ट बोला आणि आपसात चर्चा करून काही मार्ग निघतो का बघा…”
सोधी म्हणाला ,-” साहेब, तो थेरडा खोत दारू पिऊन नेहमी नशेत तsर्र असतो… पोरगं डोक्यावर परिणाम झालेलं आहे, पागल आहे… डॉक्टर कादरी कडे त्याची ट्रिटमेंट सुरू आहे… आता बोलावं कसं आणि कोणाशी …?”
* * * * * *
” उत्तर कैलास ” सोसायटी मध्ये सोधीचे रो-हाऊस आहे..त्याच्या बरोबर मागच्या रो-हाऊस मध्ये बिरोबा खोत यांचें कुटुंब रहात आहे…खोत यांनी गेल्या दिड वर्षांपूर्वी मुंबईतील आपले घर विकून नांदेड मध्ये आले होते आणि इथे हे घर विकत घेतले होते… त्यांच्या कुटुंबात रिटायर्ड म्हातारे खोत, त्यांची रिटायर्ड पत्नि, तरूण वेडा मुलगा बंटी, बंटीची बायको सरिता आणि दोन ५-६ वर्ष वयाची लहान लहान नातवंडं आहेत…
खोत मुंबईत कुठल्यातरी कंपनीत लेबर आॅफीसर होते, त्यामुळे ते नेहमीच आरडाओरड करत उंच आवाजात बोलण्याची सवय असावी…old habits die Hard अशी म्हण आहे, ती खोताच्या बाबतीत तंतोतंत लागू होते….
डोक्यावर परिणाम झालेला बंटी, त्याला तर धिंगाणा घालायला कसलं ही कारण चालतं आणि सुन सरिता बंटीच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याला शिव्या देत असते …
म्हणते की , -” थेरड्या, तु मला फसवलं, आपलं पागल पोरगं माझ्या गळ्यात बांधलं.. माझं आयुष्य बरबाद केलं…”
खोताच्या घरात न बोलणारी व्यक्ती म्हणजे खोतांची पत्नि सुशिलाताई…ही बिचारी भांडण लागले की मध्ये पडून सगळ्यांना गप्प करायचा प्रयत्न करते, भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न करते, पण ही समजावायला लागली की दोन्ही बाजूंना अजून चेव चढतो …
दोन चार वेळा तर असं झालं की ह्या बापलेकांची हातघाईवर वेळ आली, सुशिलाताई मध्ये पडल्या आणि दोन सांडाच्या टकरीत जखमी झाल्या … दोन दिवस हलता येईना ….
सगळ्यांत जास्त टेन्शन ह्या बिचारीला…
खोत यांना दोन मुले…
मोठा संदीप..
प्रत्येक गोष्टीत आपला बाप अति प्रमाणात हस्तक्षेप करतो, जगणं मुश्कील झालं तेंव्हा तो बापाशी भांडला…’ मला तुमची दमडी ही नको ‘ म्हणत ७-८ वर्षांपूर्वी बायको पोरं घराबाहेर पडला, तो पुण्यात रहातो…
आजपर्यंत त्याचे आपल्या बापा बरोबर ताणलेलेच संबंध आहेत…
लहाना बंटी…
छोटेसे मुंबईत हाँटेल चालवत असे…
बाप नोकरीत होता तो पर्यंत ठिक चाललं होतं.. पण बाप रिटायर झाला, वेळ घालवण्यासाठी म्हणुन हाँटेलमध्ये येऊन बसू लागला आणि सगळं बिघडले.. बापाचा भांडकुदळ स्वभाव… कस्टमर तुटायला लागले… बरं बापाला काही बोलावं तर ” मला नको शहाणपण शिकवू..मी तुझा बाप आहे.. हे हाँटेल माझ्या पैशांवर चालू आहे… मी हजारो लेबर हॅण्डल केले आहेत, तेंव्हा धंदा कसा करायचा हे मला जास्त कळतं ” – असं म्हणून बंटीला चूप करत…
शेवटी व्हायचे तेच झाले..
धंदा बसला आणि बंटीला ही घरी बसावे लागले…
खोत यांच्या गाठीशी पैसा होता पण स्वभाव हेकट,अति कद्रू… सुशिला ताईची सिनियर नर्स म्हणून हाॅस्पीटलची नोकरी सुरू होती, त्यामुळे घरात काही कमी पडत नव्हते..
काम नाही, धंदा नाही त्यामुळेच की काय बंटी आतल्या आत कुढत असावा, तो एका कोपऱ्यात गप्प गप्प बसून रहायचा…घराबाहेर पडायचा नाही…
सुशिलाताई सकाळी नोकरी वर जात असत, घरात खोत – बाप आणि बंटी हे दोघेच.. खोत पिऊन तर्र असायचे आणि बंटी कोपऱ्यात कुठे तरी पडून राही…
संध्याकाळी सुशिलाताई कामावरून आल्या रे आल्या की दोघांना ही भांडणाची हुक्की यायची आणि ही मंडळी मग घर डोक्यावर घ्यायचे…
एक दिवस ड्युटीवर असताना सुशिलाताईंना फोन आला..बंटी वेडाचे झटके आल्यासारखे करतो आहे…
धावत पळत त्या घरी आल्या, खोत बंटीला घेऊन मेंटल हॉस्पिटल मध्ये गेले होते…
तपासणी झाली.. गोळ्या,औषधे घेतली…
डॉक्टरांनी खोत – सुशिलाताईना दोघांना बाजूला घेतले आणि म्हणाले – ” ह्याचे लग्न करून टाका, आमचा अनुभव आहे – बऱ्याच वेळा असं घडलं आहे, लग्न झाले की नवीन जोडीदाराच्या संगतीत मुलं डिप्रेशन मधून लवकर बाहेर येतात…”
लग्नाचा विषय निघाला आणि बंटी बरा वागू लागला..
सहा महिने मुली पहाण्यात गेले आणि गगनबावड्याच्या एका परीतक्त्या मुलीशी – सरिताशी बंटीचे लग्न झाले…
दिवस बरे चालले होते…
सुशिलाताई रिटायर झाल्या… आणि काही दिवसांत बंटी पून्हा वेड्यासारखा करु लागला…
अशातच सुनेला दिवस गेले…
बघता बघता एक म्हणता दोन मुले झाली…
मुंबईतील लहान घर.. मेंटल हॉस्पिटलचा खर्च … नातवंडं मोठी होत होती, त्यांच्या शिक्षणाचा खर्च व ईतर सगळे खर्च… हा सगळा हिशोब बघता खोत यांनी नांदेड हे छोटे शहर शोधले…
उत्तर कैलास सोसायटीत घर विकत घेतले…
नांदेडला डॉ.कादरी यांचा वेड्यांचा दवाखाना ही होता, छोटे शहर असल्याने शाळा, प्रवास वगैरे खर्च ही कमी होते…
शहर बदलले पण घरातलं भांडण काही कमी झाले नाही….
परिणाम ….
जसपाल सोधी पोलिस ठाण्यात कम्फलेंट करायला आला होता…
* * * * * *
ठाणेदार सहजासहजी आपल्याला दाद देणार नाही हे सोधी जाणुन होता, त्यामुळे तो तयारीनेच आला होता…
सोधीने बसल्या बसल्या एक मिसकाॅल मारला आणि दुसऱ्या क्षणी ठाणेदार यांच्या टेबलावरचा फोन घणघणला…
फोनवर उपमहापौर सरदार साहेब होते ..
” ठाणेदारजी, वो आपके पास मैंने सोधी नामका हमारा रिश्तेदार भेजा था …वो आया है क्या ?”
ठाणेदार – ” हां जी , आया है..बात चल रही हैं.. लेकीन साब मामला जुबानी झगडे का हैं और वो भी किसी और के घर का..तो क्या कम्फलेंट लिखे और क्या कारवाई करें ?? समझ में नहीं आता …”
सरदारजी हसले…
सरदार – ” ठाणेदारजी, आप टेन्शन क्यों लेते हो? आप को किसी को अंदर थोडे ही डालना हैं??.. मीडल क्लास लोग बडे डरपोक होते हैं.. अपनी इज्जत को बहुत डरते हैं.. उनके घर पर खाली किसी का पता पूछने भी पुलिस आती हैं ना तो इनके पसीने छूटते हैं…तो आप एक छोटासा काम करो.. सायरन बजाते बजाते पुलिस की गाडी उस के घर भेजो..थोडी भीड इकठ्ठा हो जायेगी… आधा काम हो गया समझो..फिर उस आदमी को थोडी नसिहत दे दो…थोडा धमकाव…बस्स… बाकी कुछ भी करने की जरुरत नहीं पडेगी ..”
ठाणेदार बोलला, – ” जी, करता हूं आप बेफिक्र रहीये…”
उपमहापौर सरदार साहेबांचा फोन ठेवला आणि ठाणेदार सोधीकडे वळून म्हणाला, – ” तुम तो बडी पहुंची हुई चीज हो यार.. डायरेक्टर उपमहापौर …”
सोधी म्हणाला, – ” मेरे मौसेरे भाई के फुफा हैं वो…”
ठाणेदार – ” फिर तो काम करना ही पडेगा भैय्या…”
* * * * * *
रविवार ….
वेळ – सकाळी १० वाजून १० मिनिटे…..
दुरदर्शनवरची पौराणिक सिरीयल नुकतीच संपली होती… लोक मोकळे झाले होते, तोच सायरन वाजवत पोलिसांची जीप ‘ उत्तर कैलास ‘ सोसायटीच्या आवारात शिरली..
गेट वरच त्यांनी सेक्युरीटीला बिरोबा खोत यांच्या रो-हाऊसचा पत्ता विचारून घेतला, त्यामुळे आपोआपच संपूर्ण सोसायटी मध्ये बातमी पसरली…
सायरन वाजवत जीप खोत यांच्या घरासमोर थांबली..जीप मधून सिनियर पोलिस हवालदार घुले उतरले …
सायरनचा आवाज ऐकून सुशिलाताई बाहेर आल्या…
घुले यांनी विचारलं, – ”खोत इथंच रहातात का ?”
काॅलनीतील लोक जमायला सुरुवात झाली होती…
सुशिलाताईनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून घुले यांना घरात बोलावले आणि दार बंद केले…
खोत समोरच खुर्चीवर बसले होते..
बंटी दिसत नव्हता, आंत मध्ये कुठे तरी असावा..
घुले यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या समोर बसले..
घुले – ” मी वरीष्ठ हवालदार घुले.. तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे की तुमच्या घरात होत असलेल्या भांडणाच्या आवाजामुळे शेजारी त्रस्त झाले आहेत…”
खोत – ” कुण्या हरामखोरांने केली तक्रार ? आमचं कोणाशी ही ना भांडण आहे ना दुष्मनी…मग ?”
बोलत असताना खोत यांच्या तोंडातून दारूचा भपका येत होता, बहुतेक रात्री जास्त घेतली असावी….
‘ हरामखोर ‘ शब्द ऐकताच घुलेना खात्री पटली की ही असामी खरंच ” टेढी खीर हैं ”
घुले – ” तुमची कोणाशी दुष्मनी नाही हे खरं मानलं…पण रात्री अपरात्री तुमच्या घरातून जर जोरजोरात भांडण्याचे आवाज येत असतील तर शेजारच्या लोकांना झोप येणार कशी ?..”
खोत – ” आम्ही आमच्या घरात काही ही करो.. लोकांना काय देणं घेणं?.. आता बाजूला नॅशनल हायवे आहे… रात्रभर ट्रकचे आवाज, हाॅर्न वाजतात..मग ? तुम्ही काय हायवे बंद करणार आहात का ?”
खोताचा वितंडवाद बघून घुलेचं डोकं सटकलं…
घुलेच्या चेहऱ्यावरील भाव पाहून सुशिलाताई खोत यांना म्हणाल्या ,-” अहो, जरा ऐकून तर घ्या हवालदार साहेब काय म्हणतायत ते..”
ह्यावर खोत भडकले, -” तू गप्प बस.. मध्ये मध्ये नाक खुपसू नको.. मी असे छप्पन हवालदार बघितले आहेत… कायदा मला ही समजतो…”
राग आला होता पण समोर बायका पोरं आहेत हे बघून घुले यांनी तो आवरला…
घुले – ” हे बघा बाबा, तुमच्या वयाचा लिहाज करून मी गप्प बसलो आहे.. मी तुम्हाला पोलिसाच्या भाषेत नाही तर माणुसकीच्या नात्याने समजावून सांगतो… घरात ही शांतता ठेवा आणि लोकांना त्रास होणार नाही असं वागा…आमचा पोलिसी खाक्या तुम्हाला सहन होणार नाही…आई समजावा ह्यांना.. म्हणावं म्हातारपणी कशाला लाॅकअपची हवा खाता … पोलिसांनी खरं तर ‘जातो मी’ असं म्हटलं पाहिजे पण ह्या बाबाची अक्कड बघून नाईलाजाने म्हणावे लागतेय् – येतो मी …”
आणि हवालदार घुले बाहेर पडले…
बाहेर जमलेल्या लोकांची गर्दी पाहीली..
लोकांच्या नजरेतले प्रश्र्न पाहून सुशिलाताईना शिसारी आल्या सारखे झाले…
* * * * * *
सुशिलाताईनी दार बंद केले आणि घरात आल्या..
बिरोबा खोत यांची बडबड सुरुच होती…
आई आंत आलेली पाहून दाराच्या आड लपलेला बंटी बाहेर आला आणि बापावर उखडला..
” घ्या..ह्या माणसांमुळे आज पोलिस पण घरी आले.. जसं काही आम्ही चोर मवाली आहोत..”
बंटीचे बोलणं ऐकलं आणि ताईंनी बाजूला पडलेली चप्पल उचलली आणि बंटी वर फेकत ओरडल्या, – ” चूप भडव्या , चूप्प.. तु काय कमी गुणाचा आहेस ? “
मग त्या बिरोबा खोत यांच्या कडे वळल्या , -” थेरड्या, झाला का जीव शांत तुझा ? झाला ? ..उठ की सुठ तोंडाची टकळी सुरू.. तो हवालदार चांगले सांगतो आहे.. त्याचं ऐकणं दिलं सोडून आणि लागला त्याला शहाणपणा शिकवायला… “
बंटी, त्याची बायको आणि खोत यांना सुशिलाताईचा असा चिडलेला अवतार नवा होता..
ताई कडाडल्या , -” आज तुम्हा लोकांच्या मुळे पोलिस घरी आले.. तुम्ही लोकांनी काॅलनीत तोंड काढायला जागा ठेवली नाही..हा थेरडा.. हा वेडा आणि ही सटवी सुन …दिवस बघत नाही – रात्र बघत नाही – सण बघत नाही- वार बघत नाही … नुसते कुत्र्यासारखं भांडत असतात.. कुत्रे बरे..हाड् म्हटलं की गप्प तरी बसतात..पण हे -“
सुन बोलली, -” मी काय केलं ? मला का बोलता ?”
ताई – ” मी काय केलं ? आगीत तेल तर तुच घालते.. उठलं की सुटलं म्हणते ‘हा वेडा माझ्या गळ्यात बांधला ‘ – वेडा आहे ना, मग पोरं बरी काढली दोन दोन ?.. तेंव्हा तो वेडा नव्हता?..अग, तुला तर टाकुन दिलेलं होतं.. तुला तर काळं कुत्रं ही विचारत नव्हतं…आम्ही उपकार केले तुझ्यावर… कुठल्या गोष्टीची कमी आहे तुला ? ..”
सुशिलाताईंचा संताप एवढा अनावर झाला की त्या थरथर कापू लागल्या.. बोलता बोलता त्यांना चक्कर आली..त्या कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या…
घाईघाईने हाॅस्पिटल मध्ये नेण्यात आले…
ब्लड प्रेशर २४० पर्यंत वाढलं होतं..
डॉक्टरांनी ताबडतोब आय.सी.यु. मध्ये दाखल केलं…
* * * * * *
आईला ICU मध्ये admit केलेलं समजले आणि मोठा मुलगा संदीप ताबडतोब पुण्याहून आला..
दोन दिवसांनी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला..
औषधं,पथ्य, पाणी समजावून सांगितले..
सुशिलाताईना घरी घेऊन आले.. घरात एकदम शांतता होती..
५-६ वर्ष वयाची, नेहमी आजीच्या जवळ असणारी नातवंडं देखील अगदी शहाण्यासारखी एका ठिकाणी शांत बसून होती, अजिबात दंगा मस्ती करत नव्हती..
तिसऱ्या दिवशी संदीप सुशिला ताईंना म्हणाला, – “माझ्या कडे रहायला ये म्हणून किती वेळा बोलावलं पण तु माझं कधीच ऐकले नाही…ह्या वेळी मी तुझं अजीबात ऐकणार नाही..ही बांदरं तुला शांतपणे जगू देणार नाहीत.. ह्यावेळी मात्र तुला पुण्याला आलंच पाहिजे..”
संदीपचा बापाशी तसा आबोलाच होता म्हणून त्यांने एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला सांगावं तसं एकदम कोरडेपणाने सांगितले, – ”मी आईला पुण्याला घेऊन जात आहे, जो पर्यंत तिला वाटेल तेवढे दिवस ती माझ्या कडे राहील.. मला वाटतं कोणाची हरकत नसावी…”
दुसऱ्या दिवशी टॅक्सी करून संदीप सुशिलाताईंना पुण्याला घेऊन गेला…
* * * * * *
१५-२० दिवस गेले…
एक दिवस नांदेडहून बंटीचा फोन आला..
” बाबा घरात अजिबात लक्ष देत नाही.. दिवस-रात्र पिऊन असतो.. घरात एक पैसा नाही.. आम्ही कोणाकडे हात पसरायचे?… आईला पाठवून दे…तिची पेन्शन ही जमा झाली आहे..” – बंटी.
संदीपचे डोकं ठणकलं..
बिरोबा खोत यांच्या कडे फिक्स डिपाॅझीट मध्ये चांगला पैसा होता, एफ् डी चे दर महिन्याला व्याज ही येत असे, पण खोत एक रूपया घरात देत नसत.. सगळा घरखर्च सुशिलाताईच्या पेन्शन वर चालत असे…
आता ताई पुण्यात आहेत, तेंव्हा घरात पैशाची चणचण भासत असेल…
संदीप रागाने म्हणाला ,-” थेरडा काय पैशे मढ्यावर बांधून नेणार आहे काय ? त्याला म्हणावं आईचं चेकबुक घेऊन ये आणि वर्षभराचे बारा चेक्स सही करून घेऊन जा…आई येणार नाही…”
पण तसं काही झालं नाही…
संदीपचा वन रूम किचनचा लहानसा फ्लॅट..
चार चार माणसं रहाणार म्हणजे अडचणच होती… तेंव्हा ताईंनी संदीपची समजूत काढली आणि दोन दिवसांनी नांदेडला जाणाऱ्या एस् टी मध्ये बसल्या…
* * * * * *
नांदेडला घरी परत येऊन ताईंना ८-१० दिवस झाले होते..
घरात शांतता होती…
ताई काॅलनीत फिरताना किंवा सोसायटीच्या बागेत नातवांना खेळायला घेऊन जात, तेंव्हा बायका सहज म्हणून तब्येत बरी आहे ना ? – अशी चौकशी करत असत…
ताई ही हसून ‘बरी आहे’ असं उत्तर देत.. पण बायकांच्या चेहऱ्यावरचं प्रश्र्नार्थक चिन्ह – ‘ तुमच्या घरी पोलिस का आले होते हो ?’ – हे काही ताईच्या नजरेसमोरून हलत नव्हते…
काॅलनीतील बायकाच काय पण घरकाम करणाऱ्या मोलकरीण बायका ही आपसात कुजबुजत, ते ही ताईंच्या कानावर येत असे पण ४० वर्षे नोकरी केल्यानंतर काय सिरीयसली घ्यावं आणि कुठं कानाडोळा करावा हे ताई अनुभवाने शिकल्या होत्या…
काही असो पण परिस्थिती थोडी फार बरी झाली आहे असे ताईंना वाटू लागले…
* * * * * *
एका दुपारी काही तरी शुल्लक कारणावरून बंटी आणि खोत यांच्यात जुंपली …
” झालं का सुरू ? गप्प रहा की रे बाबांनो.. तुम्हाला शांतता टोचते की काय? उगीच का बरं भांडताय कारण नसताना…” – ताई एवढं बोलल्या आणि दोघं ही गुपचूप निघून गेले…
संध्याकाळी ताई नातवांना घेऊन गार्डनमध्ये गेल्या…दोन्ही नातू खेळत होते.. काय झाले कुणास ठाऊक पण खेळता खेळता ती मुलं सुशिलाताईंच्या जवळ आली आणि मोठा नातू ताईंना म्हणाला, -” आज्जी, तु परत कशाला आलीस बरं ? तू नव्हतीस तेंव्हा घरात अजिबात भांडाभांडी होत नव्हती… सगळं असं शांत आणि छान होतं..तू आलीस आणि पून्हा भांडणं सुरू झाली बघ …”
नातवाचे बोलणं ऐकून ताई एकदम चमकल्या…
इतक्यात छोटा नातू बोलला, -” आजी, आजी..बंटी बाबाला सगळे वेडा वेडा म्हणतात ना.. तो वेडा नाही…त्या दिवशी आजोबा बाहेर गेले होते ना… तेंव्हा बंटी बाबा माझ्या मम्मीला सांगत होता की मी वेडा नाही…ह्या थेरड्यामुळं मला वेडा असल्याचे नाटक करावं लागतं.. तू काळजी करू नकोस, एकदाचा हा थेरडा खपला की आपलंच राज्य…”
सुशिलाताईंना हा शाॅक जबरदस्त होता …
अरे बापरे !! , हे सगळं आपल्या लक्षात कसं आलं नाही ?
काही काही माणसं नात्यात इतकी गुरफटून जातात की काही ही होवो, कोण चूक – कोण बरोबर नंतर बघू.. आपलं पहिलं कर्तव्य आहे की कुटुंबातील व्यक्तींना सांभाळून घेणे… घराला एकत्र बांधून ठेवता ठेवता त्यांच्या लक्षात येत नाही की आपण आपली आपली म्हणतो तीच लोक आपल्या सद्गुणांचा गैरफायदा घेत आहेत..
ताईंच्या बाबतीत ही हेच होत होतं , बाप-लेक-सुन तिघे ही ताईंना गृहीत धरून चालले होते आणि ताईंच्या नशीबी होता मनस्ताप ….
* * * * * *
रात्री नातवांना राजकुमार आणि राक्षसाची गोष्ट सांगता सांगता सुशिलाताईंना डॉ. सत्पथी साहेबांचे त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीचे बोलणे आठवले…
ताईंनी डॉ. सत्पथींना विचारले , -” सर, रिटायरमेंट नंतर तुम्ही मुलाकडे अमेरिकेत जाणार की मुलीकडे इंग्लंडला ?”
डॉ.सत्पथी म्हणाले, – ” ताई, आपली मुळं – आपले रूट्स इथं रूजलेली आहेत …भारतात… आता आपल्या सारखे जीर्ण वृक्ष दुसऱ्या देशात मुळं धरू शकणार नाहीत…माझी बायको ६ वर्षांपूर्वी गेली आणि तेंव्हा पासून कळत नकळत मुलं ही मनानं दूर दूर जात राहिली.. शेवटी प्रत्येकाला आपलं लाईफ आहे…जो पर्यंत त्यांना आपली आवश्यकता होती तोपर्यंत आपण केलं … ठिक… जबाबदारी समजून केलं.. आता आपण उगाच त्यांच्यात लुडबुड करण्यात अर्थ नाही… त्यांना आपली गरज असो वा नसो, आपण आपल्या मार्गाने जाणं योग्य …म्हणून रिटायरमेंट झाली की मी आता माऊंट अबूला जातोय… सगळे पाश तोडून.. तिथे जमेल तेवढी सेवा देऊ.. डोळे मिटे पर्यंत ..बस्स !!”
डॉक्टर सत्पथींचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते…
ताईंना रात्रभर झोप लागली नाही…
* * * * * *
सकाळी मार्निंग वाॅक वरून बिरोबा खोत आले…
सुशिलाताईचा वावर दिसला नाही म्हणून ते त्यांच्या खोलीत गेले..
ताईचा मोबाईल, मंगळसूत्र , बांगड्या वगैरे स्टुलावर ठेवलेल्या होत्या…त्या खाली एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती…
” पोपट मुक्त झाला आहे… शोधण्याचा अजीबात प्रयत्न करू नये ..हाती काहीही लागणार नाही…”
माऊंट अबू – राजस्थानला जाणाऱ्या गाडीत ताई बसल्या होत्या…
खिडकीतून गार वारा येत होता, ताईंचा डोळा लागला होता…
———————————————————–