“वृद्धाश्रमातील लग्न” ©️ उज्ज्वला लुकतुके
निलीमाला बघून पार्वती काकू आज खुश होत्या. नीलिमा चक्क पुढे पुढे करून नाश्ता करत होती. स्वतः गवती चहा शोधून तिने चहा केला तो सगळ्यांना नेऊन दिला. म्हातारे आश्रमवासी नीलिमा वर खुश होते.
नीलिमा पन्नाशीला पोहोचली होती पण देशपांडे पती-पत्नीनी निलीमाला मदतनीस म्हणून या वृद्धाश्रमात घेतलं तेव्हा पार्वती काकूंची काळजीच मिटली. त्यांना संजूच्या डोक्यावर निलीमाचा भार ठेवायचा नव्हता.
संजू किती करील? तारुण्याचा त्याने कधी उपभोगच घेतला नाही. त्याच्या कळत्या वयातच बापाचं छत्र हरवलं. शंकरराव काळाधीन झाले. पार्वती काकू तिन्ही मुलांना घरातील पुंजी वरच वाढवत होत्या. नीलिमा नंतर केतकीला मार्कांवर पोस्टात नोकरी लागली. संजीव एम टेक होईपर्यंत तिने लग्न केले नव्हते. नंतर मात्र सगळ्यांनीच केतकीला गळ घातली, “असं ठरलेलं लग्न मोडू नकोस.”
सून माधुरी गोडच आहे. तिचं आणि संजूचं पटतं. दोघं आपली चांगली काळजी घेतात. माझं मन मी रिझवत असे. पण निलिमाचं काय? ती काही संजूकडे राहायला तयार नसे. तसे बघितले तर माधुरीलाही ती नको होती.
मग गावाकडील घरात निलीमाची रवानगी पार्वती काकूंना पसंत नव्हती. संजूच्या डोक्यावर 2-2 घराचा खर्च कशाला? शिवाय निलीमाला खुट्ट झालं की बिचारा कासावीस होई. लगेच गावाला हजर होई. नाही म्हटले तरी माधुरी कातावे. हे सगळं पार्वती काकू पहात होत्या.
त्यामुळे त्यानी घट्ट धरला, “आम्ही दोघी एकत्र राहतो!” देशपांडे यांचा मुलगा संजीवचा बॉस असला तरी मित्र होता, त्यांच्याकडून संजूला या आश्रमाची माहिती कळली. सध्या 20 जण आश्रमात असतात. पार्वती काकूनी तर हट्टच धरला. “मी आश्रमात जाते” म्हणून. कारण त्यांनी गुपचूप फोन करून निलीमाला तिथे राहता येईल का याची चौकशी केली होती. देशपांडेना मदतनीस हवी होती. आणि काय आश्चर्य? नीलिमा चक्क तयार झाली. तिने संजूला पटवले “मी तिथली गार्डनर आणि अर्धवेळ मेन कुक असणार आहे. आपला नील नाही का हॉटेल मॅनेजमेंट करत आहे! माझ्या अनुभवावर मला ही नोकरी मिळाली आहे.”
मग सगळ्यांनी समजावल्यावर संजीव तयार झाला. तरी पार्वती काकूंसाठी त्याने थोडे पैसे देऊ केले. सुरवातीला दर आठवड्याला संजू -माधुरी येत, खाऊही आणत पण पार्वती काकूनी मनाई केली. “इतर वृद्धांना वाईट वाटतं, त्यांना कोणीही बघायला येत नाही. शिवाय संजूचा खाऊ मध्ये किती तरी खर्च होत असेल. आम्हीच कधीतरी येऊन भेटत जाऊ आणि फोन तर होतातच ना आपले!” त्या म्हणाल्या. संजूला मानावं लागलं.
इतकी लाडाची असलेली पहिली मुलगी नीलिमा पार्वती काकूं सारख्या सहृदय आईची नावडती का झाली होती?
खरंतर नीलिमा सगळ्यांचं ऐके. आवाज मंजुळ! घरकामाची आवड, अंगण, परसदार एकदम स्वच्छ आणि रंगीबेरंगी दिसे! तिला आतूनच आवड होती, कोणीही न शिकवता तिने वर्षभर बाग फुललेली दिसली पाहिजे अशी योजना केली होती. जेव्हा फुले नसत तेव्हा तिथे रंगीत पानांची झाडे तरी दिसत. फ्रेश पोपटी, वेगवेगळी अळवा सारखी झाडं, क्रोटॉन ही फुलांची जागा भरत. पावसाळी- उन्हाळी लिली, निरनिराळे झेंडू , जास्वंद, बारमाही फुलणारी गुलाबे, बोगनवेल, सदाफुली, गुलबक्षी ऑफिस टाईम फुलं, केशरी, गुलाबी, पांढर्या फुलांच्या वेली झाडांवर सोडलेल्या… खरोखर त्यांचं घर एक प्रेक्षणीय स्थळ होतं! इतकी विविध रंगी फुलं.. घरात दर दोन दिवसांनी ‘इकेबाना’ बने. समोर कवड्या काचांची रांगोळी! हे नीलिमाचे वैशिष्ट्य! महिनाभराने नवीन रांगोळी! झाडांच्या मुळांची माती, ती कवड्या, रंगीत दगड गोटे यांनी भरून टाके. हे सगळं ती एक हाती करत असे.
पण कॉलेजमधल्या मराठी वांङमय मंडळात ती गेली काय आणि नरेश जाधवशी तिची मैत्री झाली काय! आपल्यापेक्षा खालच्या कुळातील नरेशशी अशी मैत्री पार्वती काकू आणि शंकररावांना रुचली नाही. त्यांना कुणकुण लागली तसं त्यांनी थोडे दिवस नीलिमाचं कॉलेज बंद केलं.
नीलिमावर हा पहिलाच आघात होता. आत्ता पर्यंत ती सगळ्यांची लाडकी होती. पण नरेशही तिला हळूहळू टाळू लागला. निलीमाला तिचं काय चुकलं हे लक्षात येत नव्हतं. ती निराश झाली. एकदा तिला दम्याचा अटॅक आला, सगळे घाबरून गेले. निलिमाने तर धसकाच घेतला. कशीबशी बी. ए. झाली पण कोमेजलेली कळी कधी फुललीच नाही. लग्न न करण्याच्या तिच्या निश्चयाने पार्वती काकू हादरल्या. नोकरी नाही. नाजूक मन, नाजूक शरीर. तेवढ्यात शंकररावांचे निधन…
पार्वती काकू नकळत तिच्यावर राग काढत.
मधलीने नोकरी मिळवली, धाकटा संजू अभ्यासात हुशार होता, शिकत होता त्याचं निलिमाताईवर कोण प्रेम! त्याला हे काही कळण्याचं वय नव्हतं. आई नीलिमा ताईवर का रागावते? असे त्याला वाटे.
नंतर नोकरीनिमित्त संजीव पुण्याला आला. आई गावाकडे निलिमा बरोबर रहात असे. पण तरी दोघींची कुरकुर चालूच असे. निलीमाला वरचेवर दम्याचे अटॅक येत.
त्यांचाच भाडेकरू निलिमाला कधी पुस्तक आणून दे, एखादी गाण्याची कॅसेट आणून दे.. असं करत असे. पार्वती काकूही त्यांना कधी पोहे, कधी पुरणपोळी असे आपलेपणाने देत.
पण एकदा त्यांनी निलीमाची आणि त्या भाडेकरूची लगट पहिली. तो नीलिमापेक्षा लहान पण त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होत होता. नीलिमानेच त्यांचा हात घट्ट धरला होता. पार्वती काकूना हे सहनच झाले नाही. त्या भाडेकरूचं लग्न ठरत होतं, आणि नीलिमाचे हे भलते चाळे!
त्यां निलिमाला घेऊन संजूच्या घरी आल्या. पण तेही त्यांना रुचेना. शेवटी वृद्धाश्रमाचा हा मार्ग त्यांनी खुशीने स्वीकारला. पण नीलिमा येथे रमली. यावर मात्र त्या देवापाशी रोज कृतज्ञता व्यक्त करीत.
मुळची सालस असलेली नीलिमा आपले पाकशास्त्रातील आणि माळ्याचे कसब इथे पणाला लावत होती. त्याला तसे फळही मिळाले. बाग बहरली. परसातूनच काकड्या, तोंडली, केळी, सुरण, कारली, भोपळे.. मिळू लागले. आश्रमवासी फुलांची आरास, रांगोळी काढून रोज मंदिरात उत्सव करू लागले. पार्वती काकू तर हरत-हेच्या माळा, वेण्या बनवत. त्यांची भजनाची हौसही भागत होती. संजूला त्रास नको म्हणून त्या इथे आल्या पण “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!” असे त्यांचे झाले होते. नीलिमा वरचा त्यांचा राग गेला होता. त्यांची पूर्वीची नीलिमा त्यांना मिळाली होती.
आणि एक दिवस सकाळीच तो आला. बायकोच्या स्मृती दिनाच्या दिवशी तो सगळ्यांना एक दिवसाचं जेवण, थोडा खाऊ देत असे. हे तिसरे वर्ष होते. त्याच्याबरोबर त्याची मुलगी- जावई पण होते. देशपांडे पती-पत्नीनी या वर्षी त्यांना कळविले होते, “विकतचे जेवण नका आणू तुम्ही. इथेच जेवायला या.” देणगी मात्र त्या स्वीकारणार होत्या.
सकाळी सकाळी, निलीमाने सगळ्यांसाठी गोडाचा सांजा, कैरीचं लोणचं केलं होतं. गवती चहा.आलं घालून केलेला चहा स्वतः निलिमा आग्रहाने द्यायला गेली आणि आलेले पाहुणे आणि ती एकमेकांकडे पहातच राहिले!
शेवटी सावरून पाहुण्यानीच विचारलं, “तुम्ही नीलिमा भागवत ना? इथे कशा?” देशपांडे काकूनी विचारलं, “तुम्ही ओळखता का यांना? अलीकडेच आश्रमात आल्या, आणि आश्रमाचं नंदनवन झालं!”
“अहो कॉलेजपासून आमची ओळख आहे. या उत्तम कवयित्री आहेत!” नरेश जाधव म्हणाले.
“हो का? हा गुण मात्र यांनी आमच्यापासून लपवून ठेवला!” देशपांडे म्हणाल्या.
त्या दिवसापासून पुन्हा नीलिमा बेचैन झाली. पार्वती काकूंच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानी देशपांडे काकूंना सर्व सांगून त्या पाहुण्यांना म्हणजेच नरेश जाधवला स्वतःहून फोन केला, संजीव, देशपांडे आणि पार्वती काकू नरेश आणि त्यांच्या मुलीला भेटून निलीमाची कर्म कहाणी ऐकवली. आणि विनंती केली.
“तेव्हा तुझी हलाखीची परिस्थिती आणि जातीतील फरक म्हणून आम्हीच निलीमाला रोखले. पण त्याची शिक्षा आम्ही भोगतोय आतापर्यंत. नीलिमा आत्ता कुठे या आश्रमात प्रथमच सावरली होती. पण तुम्हाला पाहून पुन्हा चलबिचल झाली आहे. तिचा स्वीकार तुम्ही कराल का? माझ्या एका पापातून मला मोकळे करा! ”
नरेशनी मुलीकडे पहिले, मुलगी म्हणाली “बाबा! मला आई म्हणून नीला मावशी पसंत आहे.”
निलीमापर्यंत ही आनंदाची वार्ता पोचली, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एवढा आनंद तिने कधीच अपेक्षिला नव्हता.
सगळ्या वृद्धाश्रमात ही एकच चर्चा! त्याना लळा लावणा-या निलिमाचे अशाप्रकारे शुभमंगल होणार होते!
शेवटी देशपांडे पती- पत्नीनी नीलिमा -नरेशचे लग्न वृध्दाश्रमातच लावून दिले.
संजू तर देशपांडे यांचे परत परत आभार मानत राहिला. नीलिमाने आश्रमात माळ्याचा सल्लागार म्हणून येण्याचे ठरवले. नरेशनी दुसरा मदतनीस देशपांडेना दिला. त्याचा पगार तोच मोजणार होता.
पार्वतीकाकू संजूकडे राहायला गेल्या पण एका अटीवर, आठवड्यातून एकदा त्या इथे भजनाला येणार होत्या.
©️®️📒🖋️उज्ज्वला लुकतुके. डोंबिवली.
मो क्र 9819388415


