“संवादिनी”©️स्नेहा भाटवडेकर

सन १८६७ साली ब्रिटिशांनी सुरु केलेली मुंबईमधील लोकल  सेवा ही मुंबईची  “LIFELINE” झाली आणि त्यानंतर थोड्याच काळांत सुरु झालेली पोस्ट आणि  टेलिकम्युनिकेशन ची टेलेफोन सेवा हि मुंबईकरांची “HELPLINE” झाली.

दळणवळणाची हि दोन महत्वाची साधने मुंबईत उपलब्ध असल्यामुळे मुंबईची प्रगती सर्वच स्तरांवर झपाट्याने होत होती.अनेक लोकांना ही महानगरी आकर्षित करीत होती.उद्योग व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढत होते.

एकेकाळी मुंबई महानगरीवर अधिराज्य गाजविणारी हि ” संवादिनी ” आज मात्र मुकी झाली आहे.अगदी मरणासन्न अवस्थेत आहे.

२०२० जानेवारी ….CRS Sc.( Compulsory Retirement ) आली आणि बघता बघता सगळ्या इमारती निर्मनुष्य झाल्या.सगळे कर्मचारी विखुरले गेले.ग्राहकांना तोंड देण्यासाठी उरली ती २/३ माणसे.पहिल्यासारखे ग्राहक तरी आहेत कुठे आता ? सगळंच मंदावलंय.
आमची महानगर टेलेफोन निगम ली.मुंबई , ( MTNL , Mumbai ) आता अगदी क्षीण झाली आहे. ह्या मायानगरीवर जिची पूर्ण मक्तेदारी होती ती कंपनी , आता पुढे काय , ह्याचा विचार करीत आहे.

१९८६ मध्ये स्थापन झालेली हि कंपनी BSNL ची subsidiary Co. त्याआधी १८८२ साली स्थापन झालेली आणि केंद्रीय दूरसंचारचा विभाग असलेली Bombay Telephones. भारतातले पहिले युनिट. इंग्रजांना त्यावेळी मुंबई बंदराचे महत्व व्यापार उदीमाचे दृष्टीने खूपच पटलेले होते म्हणूनच कदाचित दिल्लीच्याही आधी बॉम्बे टेलेफ़ोन्सची स्थापना झाली. अशा ह्या संस्थेची घोडदौड सुरु झाली ती अलेक्झांडर ग्रॅहम बेल  ह्याने लावलेल्या फोनच्या शोधामुळे. त्याआधी ‘पत्र’ टपाल सेवा जनसंपर्काचे एकमेव माध्यम होते. पण टेलीफोनमुळे हा जनसपंर्क खूपच व्यापक झाला.

टेलिफोन,एक भन्नाट यंत्र .एका जागेवर बसून बोलायचे (त्यावेळी तो landline होता मोबाईल नव्हता). टेलिफोनच्या mouth मधून जाणारे शब्द,कुठल्या कुठल्या माध्यमातून वाहत,तरंगत,दुसऱ्या टेलिफोनच्या स्पीकर मधून पलीकडे दूर अंतरावर असणाऱ्यांच्या कानात  स्पष्ट ऐकू येत. कालांतराने Trunk call नंतर ISD च्या माध्यमातून देश विदेशात एकमेकांशी संवाद साधणे सोपे होत गेले. दळणवळणात हि एक खूप मोठी क्रांती होती. अनेक कामे हेलपाटे घालावी न लागता सहज सोयीस्करपणे एका फोनवर होत होती.त्यामुळे मुंबईच्या विकासाचा वेगही वाढत होता.

सुरवातीला हि यंत्रे खूप बोजड होती. जुन्या चित्रपटांमध्ये आपण हि फोनची दृश्ये बघितली असतील. त्यावेळी बोटाने फिरवून फोननंबर डायल करावा लागत असे. हवा तो नंबर लागणे ,खरखर न येता दुसऱ्याशी थेट संवाद साधता येणे, ह्यासारखी आनंदाची गोष्ट नसेल.

एकेकाळी टेलिफोन घरात असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. त्यावेळी बऱ्याच प्रमाणात पब्लिक टेलिफोन बूथ ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.त्याचा फायदा अगदी तळागाळातल्या लोकांनाही झाला.१/-रु. चे कॉइन टाकून मर्यादित वेळेतच बोलावे लागत असे.पण त्यावेळी त्याचेही कोण अप्रूप वाटे.अनेक अपंग व्यक्तींना ह्यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. आज हे बूथ बंद झालेत.

हळहळू MTNL च्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली, तसा अनेक सेवांचाही विस्तार झाला . टेलिफोन exchanges ची संख्या वाढली. कर्मचारी वर्ग वाढला. त्यावेळी  सर्व कामे manually होत असत. ह्या सर्व exchange मध्ये ऑपरेटर ची कामे ही महिलांची मक्तेदारी  होती. तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागत असे. एखाद्या कुटुंबाप्रमाणे सगळ्या महिला एकमेकांशी जोडल्या गेल्या होत्या. त्यातूनच गप्पा टप्पा, प्रापंचिक सुखदुःखे ,सणवार, खरेदी, मनोरंजन, सहल ह्या माध्यमातून त्यांनी एकमेकींशी जवळीक साधली होती.

लाईन्सच्या देखभालीसाठी linesman हे बहुतांशी उत्तर भारतातून आलेले तर उच्च पदाधिकारी दक्षिण भारतातून आलेले. काळानुरुप एकंदरच सेवा सुविधांची व्याप्ती वाढत होती. परिवर्तन होत होते  कामातली efficiency वाढत होती.असे असूनही नवीन टेलिफोन कनेक्शन मिळायला जवळ जवळ सहा/ सात वर्षे लागत. एव्हढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आपला नंबर लागला कि केवढा तरी आनंद होत असे.

Y2K चे आगमन झाले आणि जगभरातच नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला. मोबाइल/ इंटरनेट चे वर्चस्व एवढे वाढले कि त्यामुळे landline चे महत्व घटले. MTNL च्या ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. मोबाइल फोनची उपयुक्तता सर्वच दृष्टीने अधिक होती. विविध मोबाइल कंपन्यांच्या स्पर्धेची जागा आता war ने घेतली. MTNLला आस्थापन  चालवणे आता अवघड झाले, कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा पगार वेळेवर देणे कठीण होऊ लागले त्यातूनच compulsory retirement scheme घोषित झाली.

अनेक कुटुंबाना पोसणारी  MTNL आज “कुणाला फोन हवा का फोन” असा आर्त सवाल करतीये. भारतीय अर्थव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या निम सरकारी कंपन्यांपैकी ही एक आघाडीची कंपनी होती. अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपकी एक MTNL. आज मात्र स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत आहे.

विविध स्तरांवर चाललेल्या प्रयत्नांना यश येऊन हा संघर्ष लवकरच संपेल आणि नव्या जोमाने ही टेलिफोन सेवा परत एकदा उर्जितावस्थेला येईल ही आशा मनात पल्लवित होते.

स्नेहा भाटवडेकर
[email protected]
शब्दस्नेह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu