सर्वे सन्तु निरामयाः||

सर्वे सन्तु निरामयाः||

सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

आपल्या ऋषीमुनींनी,पूर्वजांनी सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतानाच सगळ्यांना निरामय म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवन लाभावे याचाही उल्लेख केलेला आहे.आरोग्य म्हणजे धनसंपत्ती. प्रत्येक जण आयुष्यात संपदा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
पण हीच जर संपदा आरोग्याच्या स्वरूपात प्रत्येकाला मिळाली तर मात्र सोने पे सुहागाच होईल.
उत्तम आरोग्य या शब्दांमध्ये केवळ शारीरिक आरोग्य अभिप्रेत नाही. तर शारीरिक,मानसिक आरोग्य आणि सत्संगती या त्रिगुणांचा सुरेख संगम यात दडलेला आहे.
प्रत्येकाने आपले शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या जीवनात शिस्तपालन, नियमितपणा आणि वक्तशीरपणा हे दिनचर्येचा अविभाज्य भाग झाले पाहिजेत.आरोग्य चांगले राखण्यासाठी माझ्यामते प्रत्येकाला आपल्या शरीराचं ढोबळ ज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे. शरीरामधील अवयवांचे कार्य कसं चालतं? स्नायू म्हणजे काय? त्यांचे शारीरिक हालचालीत कोणते महत्त्व आहे? हाडे किती आहेत व ती कशी बनतात?अन्नपचन म्हणजे काय ?ते कुठे आणि कसं होतं? त्यात कुठले पाचकरस कुठे मिसळले जातात? पेशींचे कार्य कोणते? डोळ्यांचे काम कसे चालते? रक्तवाहिन्या व केशवाहिन्यांचे सुसंगतीकरण कसे आहे ?हृदयआणि फुप्फुसे शरीरात अत्यंत महत्त्वाचे का मानले जातात?मेंदू आपल्या पूर्ण शरीरावर कसे नियंत्रण ठेवतो? ग्रंथी आकाराने लहान असल्या तरी त्यांचे शरीराच्या संपूर्ण रचनेमध्ये किती अनन्यसाधारण महत्त्व आहे? दात आणि नखे काय काम करतात? या अशा शरीरातील प्रत्येक अवयवाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या परस्पर समन्वयाचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की विधात्याने आपले हे सुंदर शरीर कलात्मकरित्या निर्माण करताना खूप मेहनत घेतली आहे.

आपले शरीर म्हणजे एक चमत्कारच आहे.कोट्यावधी पेशी आपल्या शरीरात असतात. त्यांचा ऱ्हास होतो, नवनिर्मिती होते. आणि हे चक्र अव्याहतपणे चालू असते.त्यांचा एकमेकांशी समन्वय एखाद्या विद्वान शास्त्रज्ञालाही  अचंबित करेल असाच असतो.असे आपले शरीर आपल्याला होणाऱ्या रोगांची पूर्वसूचना वेळोवेळी त्याच्या बिघडलेल्या कार्यातून देत असते. ते आपल्याला सावध करत असते. पण आपण मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि रोगाने आपल्यावर झडप घातली की पश्चाताप करतो.

शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार आणि विहाराची खूप आवश्यकता आहे.आपले रोजचे जेवण परिपूर्ण व संतुलित असावे. कुठेतरी काहीतरी वाचून, ऐकून चुकीचा आहार घेऊन रोगाला निमंत्रण देऊ नये. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण आणि त्याला लागणाऱ्या अन्नघटकांची गरज भिन्न आहे आणि म्हणूनच एकाच प्रकारचे अन्न सर्वांनाच योग्य ठरेल असे नाही .रात्री उशिरा भरपूर जेवू नये. आहारात योग्य तेवढ्या पाण्याचाही समावेश असावा.

आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सर्व माहितीचा आपल्यावर भडिमार चालू असतो. आणि त्या सर्व माहिती परस्पर विरोधी असतात.या माहितीच्या कोलाहलात सर्वसामान्य माणसाचा नेहमीच गोंधळ उडतो.आपण आजपर्यंत जे अन्नसेवन करत आलो ते बरोबर की चूक हा संभ्रम त्याला पडतो.काही सोशल मीडियावर तर आपल्याला स्वतःच स्वतःचे डॉक्टर बना असाही सल्ला देतात जो सर्वस्वी अयोग्य आहे.

सुदृढ शरीर राखण्यासाठी व्यायामालाही खूप महत्त्व आहे.प्रत्येकाने रोज ठराविक वेळी काहीतरी शारीरिक हालचालींचा व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम वयानुसार आणि आपल्याला झेपेल तेवढाच करावा .सर्वसाधारणपणे चालण्याचा व्यायाम सर्व प्रकारच्या वयोमानाला योग्य ठरतो. व्यायामातही नियमितता असावी.योग्य व नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. मन आनंदी राहते. स्नायू बळकट होतात. आणि शरीराला आकर्षक आकार येऊन व्यक्तिमत्व उमदे बनते. प्रतिकारशक्तीही वाढते आणि त्यामुळे एकंदरच शरीरयष्टीला वेगळाच तजेला प्राप्त होतो.

शारीरिक आरोग्यात वैयक्तिक,शारीरिक स्वच्छता, घराची आणि परिसराची स्वच्छताही समाविष्ट आहे. आहार व्यायामाबरोबरच आवश्यक विश्रांतीही गरजेचे आहे. नेहमीच शांत गाढ सहा-सात तासांची झोप शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते. शांत झोपेमुळे मेंदू अधिक कार्यक्षम बनतो.

योग्य आहार, विहार,स्वच्छता आणि विश्रांती घेऊनही जर आपले मन आनंदी नसेल तर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.आपले मन हे अगम्य आहे.अदृश्यपणे ते आपल्या शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असते.शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच मन सुदृढ ठेवणे हेही अत्यंत गरजेचे आहे. बर्हिमन आणि अंतर्मन हे मनाचे दोन भाग असून बर्हिमनाचे काम निर्णय घेणे आणि अंतर्मनाचे काम आज्ञांचे तंतोतंत पालन करणे हे असते. नेहमी सकारात्मक विचार करावा. चांगले विचार केल्यामुळे त्याचा अंतर्मनावर खूप योग्य परिणाम होतो आणि त्यामुळे आपले मन निरोगी राहण्यास मदत होते.हल्लीच्या शास्त्रीय संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की ७०% आजार हे मानसिक असतात.म्हणूनच मानसिक आरोग्य प्रत्येकाने सांभाळणे गरजेचे आहे.

निरोगी मन राखण्यासाठी मन शांत असणे जरुरी आहे.मन शांत ठेवण्यासाठी सामान्य माणसाने खालील गोष्टी अमलात आणाव्यात…

  • सुख मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा पण सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावू नये.
  • विकारांचे नियमन करावे. प्रेम करणे हे विकारांवर काबू राखण्याचे उत्तम साधन आहे.  प्रेमाप्रमाणेच सद्सद्विवेकबुद्धी विकारांवर नियमन     करण्यास मदत करते.
  • ध्यानधारणा करावी.ध्यान करतांना मन एकाग्र करून श्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करावे.
  • स्वतःवर प्रेम करावे.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करावा.दिवसातील एक तास तरी स्वतःसाठी राखून ठेवावा आणि त्यावेळी फक्त आपले स्वतःचे छंद जोपासावेत.त्यामुळे आपले मन शांत होऊन आनंदी रहाते.
  • फक्त आजचा विचार करावा.भूतकाळातील घटनांचा उहापोह आणि भविष्याची नाहक चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नये.

वर निर्देशित केलेल्या गोष्टींच्या सरावामुळे आपले मन निरोगी राहण्यास आणि आपल्या निरामय जीवनाची वाटचाल सुकर होण्यास नक्कीच मदत होईल. निरामय जीवनासाठी सत्संगतीचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. चांगल्या माणसांची संगत, चांगल्या ग्रंथांचे वाचन, चांगले संगीत ऐकणे, उत्तम स्थलदर्शन आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध बनवते. उत्तम आरोग्यासाठी सुदृढ शरीर, निरोगी मन, नियमित माफक व्यायाम ,स्वच्छता आणि सत्संगती या पंचकाची आवश्यकता आहे.कारण आपल्याला माहित आहेच .
“सर सलामत तो पगडी पचास.”

  • सौ.संध्या प्रकाश यादवाडकर
    मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu