“डस्टबीनवाला व्हॉटसॅप कॉल ”

“डस्टबीनवाला व्हॉटसॅप कॉल ”

बाल्कनीतून वाकवाकून दूरवर नजर टाकून काहिशा निराश मनाने मेधाताई पुन:श्च हाॅलमध्ये येऊन बसल्या.

गेल्या तासभरातली बाल्कनीतली ही आठवी फेरी असेल त्यांची. त्यांच्या लेकीची-ऊर्मीची मोठ्या आतुरतेने वाट पहात होत्या मेधाताई.

‘संध्याकाळी ७ वाजेपर्यंत येते’ असं कालच फोनवर सांगितलं होतं तिनं. वेळ पाळण्यात एकदम पक्की असल्यामुळे आता मात्र अंमळ काळजी वाटू लागली मेधाताईंना !

कालच्या सगळ्या संवादाची परत एकदा उजळणी करता करता नकळत सोफ्यावर मागे रेलून बसल्या मेधाताई.

“आई, एक चांगली बातमी आहे . शार्दूल हैद्राबादवरून आता मुंबईतच शिफ्ट व्हायचं म्हणतोय.

एका भारी जाॅबचं फायनल होतच आलंय. सेकण्ड इंटरव्ह्यूही थ्रू झाला आहे. उद्याच कळेल बहुतेक निर्णय. उद्या बाहेर पडणारच आहे मी तेव्हा कामं आटपून संध्याकाळी सातपर्यंत येईन तुझ्याकडे .”

शार्दूल -मेधाताईंचा नातू, त्याच्याबद्दल ही बातमी देण्यासाठी एकदम उत्साहात फोन लावला होतान् काल ऊर्मीनं !

‘किती बोलू नि किती नको’ असं झालं होतं तिला.

हे मात्र ,नाही म्हटलं तरी ऊर्मीच्या स्वभावाला साजेसं नव्हतंच ! मोजकंच बोलणं नि त्यातही अनेकदा ‘मी’पणा भरलेला असे.

ऊर्मी कर्तृत्ववान तर खरीच पण *त्यामुळेच हम करेसो कायदा* ह्या कॅटेगरीतली.

*शार्दूल* त्याची बायको *सारा* नि मुख्य म्हणजे २ वर्षांचा त्यांचा *लेक- व्योम* ,हे सगळे आता जवळ येणार रहायला ह्याचा आनंद भरून राहिला होता ऊर्मीच्या स्वरात !

‘व्योमला व्हिडिओ काॅल लावून बघता येतं गं, पण व्हर्ट्युअल ते शेवटी व्हर्ट्युअलच , ह्या मताची आहे मी आई ‘

किंवा

‘आजी-आजोबा नि नातवंडं हे नातं वेगळंच असतं, नि सहवासानेच त्याची गोडी चाखता येते हं आई’

गेल्या काही दिवसातली ऊर्मीची तिच्या

*ठाम मतांनी युक्त* अशी ही वक्तव्यं मेधाताईंच्या पचनी पडायला जरा जडच जात होतं.

ऊर्मीचा जोडीदार शोधण्याच्या काळातल्या तिच्या विचारांशी ही वक्तव्य जर्राही मॅच होत नव्हती.

*ठाम विचारांच्या* उर्मीतला हा बदल मेधाताईंसाठी अगदीच अविश्वसनीय होता.

ऊर्मीची हुशारी नि स्वभाव हे दोन्ही तिनं बाबांकडून घेतलं होतं.

४ वर्षांची असतानाच उर्मीनं बाबांना गमावलं होतं. ध्यानीमनी नसतांना अचानक मॅसिव्ह हार्टॲटकनं मेधाताईंच्या जोडीदाराचा हात सुटला होता.

‘एकल पालकत्वा’च्या काही त्रुटींचा अनुभव मेधाताईंनाही आलाच. बाबांचे हट्टी आणि मनमानी गुण ऊर्मीमध्ये उतरू नये म्हणून मेधाताईंनी केलेले प्रयत्न *रक्त दोषांतक ठरण्याइतके* परिणामकारक झाले नाहीत ह्याची खंत आजही वाटे त्यांना .

परिक्षेत अव्वल नंबर कधीच सोडला नाही ऊर्मीनं ते अभिमानास्पद होतंच, पण….

“इतकं घास घासून अभ्यास करतात त्या दोघी पण मला हरवून पुढे जाणं त्यांना शक्य झालेलं नाहिये म्हटलं”

रिझल्टनंतर मैत्रिणींबाबत बोलतानाची ऊर्मीची ही गुर्मी *आई* म्हणून जास्त खटकत असे मेधाताईंना !

“ऊर्मी, इतका ताठा चांगला नाही.

अशाने *एकटी* पडत जाशील गं!

*मैत्रीचं नातंही अव्वल नंबरचं* हवं गं !

परिक्षेतला नंबर जरा मागे गेला म्हणजे काही

लगेच इंटेलिजन्स कमी होत नसतो. “

मेधाताईंनी पदोपदी समजावूनही उपयोग शून्य.

मेधाताईंच्या मिळतं-जुळतं घेण्याच्या स्वभावानुसार, आधी नवरयाची अन् नंतर उर्मीची मनमानी झेलत गेल्या मेधाताई.

ऊर्मीचं लग्न ठरायच्या वेळचे संवाद आठवले मेधाताईंना.

“ तुझ्या मनात कोणी नाहिये म्हणतेयस तर मी विवाह संस्थेत तुझं नाव नोंदवीन म्हणतेय.”

“आई, माझ्या मतांशी तडजोड करून कुणाशी पटवून घेणं, नात्यांचे घोळ सांभाळणं वगैरे करायला मला जमणार नाही , आणि आवडणारही नाही.

त्यामुळे माझी मुख्य अट म्हणजे *आई-वडिल हयात नसलेला* मुलगा मला हवा आहे”

मेधाताईंच्या प्रस्तावावर उर्मीची ताडकन् आलेली प्रतिक्रिया ऐकून त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या तेव्हा. पस्तीसेक वर्षांपूर्वी एखाद्या उपवर मुलीचे असे विचार असावेत हे अनपेक्षितच !

‘ज्यांच्यामुळे मुलाला अस्तित्व मिळालंय त्यांनाच नाकारायचं? पण का ??’

‘ एकमेकांना एकमेकांचा आधार असतो.’

‘ पुढच्या पिढीला हवंहवंसं वाटणारं आजी-आजोबांचं नातं का म्हणून नाकारायचं ?’

ऊर्मीला समजावण्यासाठी म्हणून मेधाताईंनी व्यक्त केलेली कोणतीच मतं स्विकारायला ऊर्मीची तयारी नव्हती. तिच्या हट्टीपणाने तर कळस गाठला होता त्यावेळेस.

‘काळजी अन् तक्रार तरी कशी नि कोणाकडे व्यक्त करणार ?

*आपलेच दात आपलेच ओठ*’ असं होऊन गेलं होतं मेधाताईंना !

पण लग्नाचा योग इतका जबरदस्त की, नोंदणी केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच, उर्मीची मुख्य अट पूर्ण होईल असं स्थळ मिळालं आणि नंतरच्या दोन महिन्यात लग्न झालं देखिल.

समीर-मेधाताईंचा जावई- अतिशय समंजस. नेमकं त्यामुळे देखिल ऊर्मीचा हेकेखोर स्वभाव अधिक गडद होत गेला.

शार्दूलचं सगळं वाढणं *एकमतानं* झालं, अर्थातच ऊर्मीच्या ! मेघाताईंना अनेक गोष्टी खटकत असत. लेकीच्या संसारात ढवळाढवळ करणं योग्य वाटत नसल्यानेच केवळ त्या गप्प रहात असत.

‘कधी ना कधी तरी ऊर्मी ला धडा शिकवणारं, शेरास सव्वा शेर असं कोणीतरी भेटायला हवं ‘असं अनेकदा मनात येत असे मेधाताईंच्या !

परंतु आजतागायत असं कधी घडलं नव्हतं .

पण मग …

आता अचानक ऊर्मीची *ठाम मतं* बदलायचं काय कारण असावं ? की आता स्वत: आज्जीच्या भूमिकेत शिरल्यामुळे हे मतपरिवर्तन ??

ह्या कोड्यात पडलेल्या मेधाताई जोरजोरात वाजणारया डोअर बेलच्या आवाजाने भानावर आल्या.

“काल उत्साहात असलेला मुलगा आज इतका दुसरया टोकाचा निर्णय घेऊच कसा शकतो ? मला काय दुधखुळी समजते की काय *सारा* ! इतकी आतल्या गाठीची निघेलसं वाटलं नव्हतं. म्हणजे इतक्या दिवसाचं वागणं ही ‘शुगरकोटेड’ काॅर्पोरेट स्ट्रॅटेजी होती म्हणायची. श्शीss! नातेसंबंधामध्ये ही चाल ? तेही प्रत्यक्ष नवरयाच्या आईशी ??”

मेधाताईंनी उघडलेल्या दरवाजातून संतापलेली ऊर्मी घरात शिरली ती बडबड करतच !! तडतडणारया पाॅपकाॅर्नसारखी !!!

“ अग्गं, झालंय तरी काय असं एव्वढं ? नीट बस नि सांग पाहू!”

बोलता बोलता आतून पाण्याचा ग्लास भरून आणून मेधाताईंनी उर्मीच्या हातात दिला.

“ संध्याकाळी *शार्दूलचा* मेसेज आला, पावणेसात नंतर ! ‘तो नविन ॲाफर घेत नाहिये’ असा ! निर्णय इतक्या शेवटच्या टप्प्यावर बदलूच कसा शकतो ? शिवाय, ह्याबाबत आता पुढे काहीच बोलायचं नाहीये मला असंही सांगून मोकळा झाला आहे.”

“ऊर्मी, अगं तांत्रिक कारणही असू शकतं.

एखाद दोन दिवसांनंतर सांगेल तो सगळं “

“आई, कारण पर्सनल आहे नि व्हाॅटसॲपच्या तंत्रामुळे मला थोडा आधी सिग्नल मिळालादेखिल

पण शार्दूल असा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं”

“ऊर्मी, आता ह्या ऐंशी पार केलेल्या माझ्या वयाला ही सगळी तांत्रिक कोडी समजणारेत का? नीट समजाऊन सांग बाई ! उगीच चिडचिड नकोय तुझी”

आधीच वाट पाहून हैराण झालेल्या मेधाताईंचाही सूर अंमळ चढा लागला.

“ आई, संध्याकाळी एक तांत्रिक धक्का बसला.

‘शार्दूल, see ! तुझ्या आई -बाबांसोबत एकत्र असं only 15 days मी राहू शकते. Not more !

आपलं लग्नाआधीही बोलणं झालं होतं. आपण मुंबईला सेपरेट राहिलो तरी frequently जज तर करणारच आई ! You mark my words n मला नाही चालणार ते. आपल्याला आपली स्पेस जपायलाच हवी.

मला ‘डस्टबीन्स घरात तर नकोच पण एका गावातही नकोत. And that’s final ! ‘

हे सगळं सारा बोलत असतांना मी प्रत्यक्ष

ऐकलंय आई संध्याकाळी !”

“ऊर्मी, हैद्राबादेतलं हे असं सगळं बोलणं तू मुंबैत बसून ऐकलंस? कसं शक्य आहे ?”

“ लवकरच सगळे एकत्र भेटू शकणार ह्या आनंदाच्या भरात मी साराला पाठवलेला व्हाॅटसॅप

मेसेज तिन संध्याकाळी पाहून बाजूला ठेवताना तिचा व्हाॅटसॅप काॅल लागला मला. बहुधा चुकून !

कारण मी रिसिव्ह केल्यावर माझ्याशी बोललीच नाही ती ! त्याऐवजी त्यांचं भांडण माझ्या कानावर पडून साराची खरी मतं कळली. नि पाठोपाठ अर्ध्या तासात आला शार्दूलचा मेसेज,

साराची मतं अधोरेखित करणारा.

नंदीबैल झालाय नुस्ता ! ‘ स्व’ म्हणून काही असतं…..”

ऊर्मी चं तोंड संतापाने सुटलं होतं नुसतं.

मेधाताईंना संदर्भाने *डस्टबीन* चा अर्थही लागला आणि आजच्या युगातल्या नातसूनेच्या नव्या स्ट्रॅटेजीचीही चुणूक मिळाली.

पण….

साराची ही ‘डस्टबीनची’ संकल्पना

*शेरास सव्वा शेर * असल्याचं लक्षात आल्याने,

नातू-नातसूनेच्या संसारातला ऊर्मीच्या डाॅमिनन्सचा

धोका टळलाय हे ‘धूळ-रहित’ चित्र मेघाताईंच्या

नजरेसमोर आलं.

मेधाताईंनी नकळत मनाच्या एका कोपरयातून त्या ‘मिस्ड व्हाॅटसॅप’ काॅलला धन्यवाद दिले.

अनुजा बर्वे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu