आली दिवाळी….
दिवाळीतील लखलखाट देणारी वस्तू म्हणजे पणत्या. दिवाळीतील खरेदी करतानाची महत्वाची वस्तू यात सध्या सेंटेड मेणबत्यांनीही भर घातली आहे. सध्या बाजारात मेहंदी-भगवा, पिवळा-लाल अशा विविध रंगसंगतीच्या पणत्या, मेणाचे दिवे, विविध आकारातील लामण दिवे, कुंदन, खडे, टिकल्या, चमक्या अशा अनेक विविध कलाकुसरिने घडवलेल्या पणत्या सहज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या पणत्यांच्या जोडीला विविध रंगाच्या सुगंधी मेणबत्या आपण खरेदी करू शकता. विविध सुवासात आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या या मेणबत्या अनेक दिवस जळू शकतात. अशा या पणत्या व मेणबत्या ५० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
• कंदील:-
दिवाळीत घर सजवण्या विविध वस्तूमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे “कंदील”. पूर्वी घरोघरी कंदील बनवले जात असे. बांबू, काड्या इत्यादी गोष्टीपासून हे कंदील बनवले जात असे. हल्ली पर्यावरणपूरक कंदीलही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हे कंदील १६०-४०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, सध्या रेडिमेड कंदिलाची मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने फोल्डिंगचे रंगीबेरंगी कंदील, प्रिंटेड, लोटस कंदील तसेच कापडापासून आणि बांबूपासून तयार केलेले कंदील, काचेचे कंदील छोटे छोटे प्लॅस्टिक कंदील, कलश, देवदितांचे फोटो असलेले कंदील या सर्व प्रकारांचा समावेश आहे. हे रंगीबेरंगी कंदील २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. घरच्या घरी कंदील कसा बनवावा याचे बरेच व्हिडीओज नेट वर उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींच्या लिंक्स येथे दिल्या आहेत.
• तोरणे:-
सण कोणताही असो गणपती वा दिवाळी दारावर तोरणे ही हमखास बांधली जातात. पूर्वी, झेंडू-डहाळीची तोरणे दरवाजावर लटकवली जायची. परंतु, सध्या याची जागा नकली तोरणांनी घेतली आहे. काच, कुंदन आणि गोंडे ची शैली असलेली राजस्थानी तोरणेही बाजारात उपलब्ध आहे. सध्या विविध रंगांचा लख्ख प्रकाश देणारे एलईडी तोरण बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध रेडीमेड फुलांची तोरणे ही उपलब्ध आहेत. घराला सुशोभित करणाऱ्या घटकांमधले सगळ्यात महत्वाचे म्हणजे तोरण.
• फटाके:-
दिवाळीत सर्वात महत्वाची गोष्ट फटाके. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांची फटाके फोडण्यास पसंती असते. कोरडे वातावरण असलेल्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील जळगावात आणि तामिळनाडू येथील शिवकाशी येथे बारमाही फटाके तयार केले जातात. फुलबाजा, लवंग, लक्ष्मीबार, भुईचक्र, ताजमहाल, रॉकेटस अशा फटाक्याबरोबर छोट्या दोस्तांसाठी टिकल्या, रोल आपटी बॉम्ब,पेन्सिल्स इ. फटाके नेहमीच वेगळे आकर्षण ठरतत . पण या वर्षी महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे फटाके फोडण्यास मनाई आहे. त्यामुळे बाजारात फटाक्यांची उपलब्धतापण दुर्मिळ असणार आहे.

• फराळ:-
दिवाळी सण लखलखटाबरोबर गोडाचा. दिवाळीत फराळाला महत्वाचे स्थान आहे. दिवाळीत पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून फराळाचा समाचार घेतला जातो. पूर्वी घराघरातून फराळ तयार केला जायचा. परंतु, सध्या नोकरी निमित्त गृहिणी घराबाहेर पडू लागल्या आहेत म्हणून हल्ली रेडीमेड फराळाची जास्त मागणी आहे. घराची चव असणाऱ्या या रेडीमेड फराळ प्रत्येक दुकानात दिसत आहे. त्याचबरोबर मधुमेह आणि हल्लीच्या तरुण वर्गासाठी बाजारात सुगर फ्री आणि डाएट फराळ बाजारात उपलब्ध झाला आहे. डाएट फराळात पदार्थ तळण्याऐवजी बेक केले जातात. सध्या बाजारात बेक करंज्या व शंकरपाळ्या, ऑईल फ्री चकल्या, शुगर फ्री लाडू, डाएट चिवडा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर या सर्व डाएट फराळाचे बॉक्सही बाजारात आले आहेत.डाएट फराळ महाग असला तरी तो खरेदी करणाऱ्यांचा कल जास्त दिसून येत आहे.
• उटणे:-
दिवाळी म्हटली कि अभ्यंगस्नान आलेच. या स्नानात सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे उटण्याचे. बाजारात विविध उत्पादनाची उटणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. मधुकर, बेडेकर, कुबल, मांगल्य यांनी तयार केलेली उटणे बाजारात पाह्यला मिळत आहेत. विशिष्ट सुवासिक पदार्थांपासून तयार केलेल्या लेपात चंदन, आंबेहळद, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, मुलतानी माती इत्यादी घटकांचा वापर केला जातो. हल्ली बाजारात तसेच विविध दुकानामध्ये सुगंधी उटणे, सुगंधी तेल, साबण हे सर्व वस्तू असणारे किट उपलब्ध आहेत. हे किट २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच उटण्याची पाकिटे २०-२५ रुपयांना मिळत आहे.