तिचं वर्तुळ … त्याचं वर्तुळ ..

तिचं वर्तुळ … त्याचं वर्तुळ ..
(Respect Everyone’s space  )
 
सकाळ व्हायला तासभर अवकाश असतो…
भारती उठते…
 आता सवय झाली आहे, अलार्म लावण्याची ही गरज पडत नाही…
मुले अंघोळ करून तयार होण्याआधी त्यांना ब्रेकफास्ट, मधल्या सुट्टीत खायला टिफीन तयार करण्याच्या तयारीला लागते…
मुलं शाळेत जातात…
मुलांच्या मागोमाग शरद ( भारतीचा नवरा ) ही तयार होऊन नाश्ता करायला येतो…
त्याची ९ वाजताची शिफ्ट असते..
शरदचा नाश्ता होईपर्यंत ती त्याचा ही लंचचा टिफीन भरते…
शरद ड्युटीला जातो…
थोडी उसंत मिळाते…
भारती ब्रेकफास्ट करून सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवते… टेबल आवरते….
हे सगळं होता होता सकाळचे ९.३० वाजलेले असतात… झाडूपोछा,भांडी करणारी कामवाली येते…
भारती मग मुलांच्या बेडरूम कडे वळते…
मुलांची बेडरूम, आपली बेडरूम आवरून येईपर्यंत १०.३० झालेले असतात…
कामवाली बाई जाते…
अंघोळ पाणी उरकून भारती मग वाॅशिंग मशीन लावते…
११.३० -१२ होत आलेले…
२ वाजता दोन्ही मुले शाळेतून येणार असतात म्हणून त्यांच्या साठी स्वयंपाक…
२ वाजता मुलं येतात…
सगळ्यांची जेवणं…
मुलं आपापला गृहपाठ, अभ्यास वगैरे करण्यात मश्गुल होऊन जातात.. 
सगळी आवराआवर करून भारती थोडा वेळ विसावते…
सकाळीच येऊन पडलेलं आणि एव्हाना शिळं झालेलं वर्तमानपत्र थोडा वेळ चाळते, थोडा वेळ दुपारच्या टिव्ही वरच्या डेली सोप बघते, मधुनच आलेले नातेवाईक नाही तर मैत्रीणीचे फोन घेता घेता कधी डुलकी लागते हे ही समजत नाही…..
 सायंकाळी ५ – ५.३०ला मुलं काॅलनीत खेळायला जातात…
६ – ६.१५ पर्यंत नवरा कामावरून परत आलेला असतो…त्याच चहापाणी वगैरे संपता संपता रात्रीच्या जेवणाची तयारी…
स्वयंपाक, रात्रीचे जेवण … थोडावेळ टिव्ही , थोडावेळ गप्पा आणि दुसऱ्या दिवशीच्या उर्जेसाठी झोप…
आठ पंधरा दिवसांनी कधी सिनेमा, नाटक …
नातेवाईकांच्या लग्न कार्याच्या साठी कधी प्रवास, त्या व्यतिरीक्त नवऱ्याला सुट्टी मिळालीच तर  कधी कधी एखादी शाॅर्ट टूर…
लग्नानंतरची १२- १५ वर्षे कमी अधिक फरकाने भारतीचा हाच दिनक्रम सुरू होता…
भारतीला ही त्यात कसलीही तक्रार नव्हती …
नवरा, मुले ह्यांचे आपापले एक विश्व होते…प्रत्येकाची आपापली स्पेस होती… प्रत्येकाचं आपापलं वर्तुळ होतं…
तसं म्हणावं तर भारतीचं कुठलं ही असं वर्तुळ नव्हतं पण ही सगळी वर्तुळं ज्यामध्ये सामावलेली होती…
त्या वर्तुळाचं नाव भारती….
* * * * * *
पुढची ८-१० वर्षे ….
मुलं मोठी झाली आहेत…
त्यांचे काॅलेजचे शिक्षण , नौकरी , लग्न …
मुलगी रश्मी आपल्या नवऱ्याच्या सोबत बंगलोरला असते…
मुलगा रजत आणि सुन आॅस्ट्रेलियाला ….
उडत्या तबकड्या होऊन मुलं दूर गेली…
शरदचे ही मॅनेजर म्हणून प्रमोशन…
तो…त्याचे करीअर…त्यातले sleepless nights देणारे चढ उतार…..आणि त्यांचं आपलं सर्कल…
गेली ८-१० वर्षे सगळच सुरळीत झाले असे काही नाही…
उच्चशिक्षित मुलीचं लग्न जमवता जमवता नाकी नऊ आलेले.. शेवटी दूर कर्नाटकात लग्न जमलं…
रजतने ही इंटरकास्ट लग्न केलं..
त्यावेळी ही कुटुंबात कित्येक दिवस तणाव होता…
 शरद जरी नव्या विचाराचा असला तरीही त्याचे भाऊ – भावकी यांच्या मताला ही किंमत देणे भाग होते… शेवटी कसं तरी निभावलं…
अशाच कारणांमुळे मला नाही इथं इंडियात जाॅब करायचा असं म्हणत रजत दूर देशी Australia ला गेला…
Distance is not a problem today असं म्हणतात पण आपण पडलो महाराष्ट्रीयन… Homesick .. 
आपल्याला तर नागपूर, भंडारा खूप लांब वाटते..
एका दृष्टीने ते ही बरंच झालं म्हणायचं… नातेवाईकांच्या चर्चा आपोआपच कमी झाल्या…
सगळ्यांची काळजी करता करता दिवस कसे निघून गेले समजलेच नाही..
काही ही असो भारतीला म्हणावं तशी उसंत काही मिळाली नव्हती…
* * * * * *
गेली ५ वर्ष…
मागच्या पाच वर्षांत मात्र थोडं स्थैर्य आल्यासारखं वाटलं…
मुलं आपापल्या विश्वात रमली होती…
शरद  कंपनीचा जनरल मॅनेजर झाला आहे, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत..त्याला उसंत नाही.. क्लाएंटस् , टार्गेटस् , प्रवास, पार्ट्या, मिटींग्ज… त्याचं धावणं सुरूच आहे…
भारतीकडे मात्र आता वेळच वेळ होता…
वेळ जाणे आणि वेळ घालवणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत…
गेल्या काही वर्षांत भारती आपले छंद, आपल्या आवडीनिवडी पार विसरूनच गेली होती…
आता तिला एक एक आठवू लागले….
आपल्याला गुलशन नंदाच्या हिंदी नाॅव्हेल किती आवडायच्या – तिने शहादरा दिल्ली वरून गुलशन नंदाच्या कांदबऱ्या पोस्टाने मागवून घेतल्या…
५००० हिंदी गाणी असलेला Saregama Caravan विकत आणला…
सोबतीला इंटरनेटवर YouTube, नेटफ्लीक्स वगैरे ही होतेच..
जुन्या मैत्रीणीचे contacts शोधून काढले…
वेगवेगळ्या लेडीज्  भीसीचे ग्रुप जॉईन केले…ह्या ग्रुप मधून दर महिन्याला एक दोन दिवसांच्या प्रेक्षणीय स्थळे वगैरेंच्या short tour करु लागली..
 कित्येक वर्षांनी आता भारतीचं स्वत:चं  एक वर्तुळ बनलं होतं…
* * * * * *
शरद रिटायर झाला…
कंपनीचा send off झाला…
पुढचे आठ दहा दिवस काही किरकोळ कामे उरकली… काही get together झाले…
बऱ्याच दिवसांत कुठे बाहेर जाणं झालं नव्हतं म्हणून शरद भारती बेंगलोरला रश्मीकडे गेले…
पंधरा दिवस म्हैसूर, उटी आणि कोडई कॅनाल करून आपल्या घरी परत आले…
” आता भारतात काय करता माझ्या कडे आॅस्ट्रेलियालाच रहायला या…” असं म्हणत रजत ही बोलावत होता…
तीन महिन्यांसाठी म्हणुन दोघे ही आॅस्ट्रेलियाला गेले खरे पण करमत नाही म्हणून महिनाभरात भारतात परत आले…
शेवटी आपली मुळं – आपली Roots ईथेच आहेत ना !!
* * *
आता रूटीन सुरू झाले…
शरद सकाळी मार्निंग वाॅकला जातो…त्यात त्याचा तास दिड तास जातो…
घरी आल्यावर चहा पाणी, नंतर मराठी इंग्रजी २-४ वर्तमानपत्रे वाचणे..
अंघोळपाणी, जेवण उरकता उरकता बारा साडेबारा होतात..
दुपारी एक ते पाच हा वेळ मात्र शरदला जाता जात नाही…
इंडस्ट्रियल लाईफ म्हणजे फक्त काम-काम-काम आणि पैसा-पैसा- पैसा… माणूस नुसता धावत असतो…ना कुठला छंद जोपासला जातो…ना विरंगुळा म्हणून काही हटके कृती…
वाचनाची आवड नाही…
टिव्ही तरी किती वेळ पहाणार ?..
फोन तरी कोणाला आणि किती वेळा करणार?…
कामामुळे कित्येक वर्षे वामकुक्षी घेण्याची सवय नाही… एक दोनदा प्रयत्न केला पण मग रात्री एक दिड वाजेपर्यंत झोप लागत नाही आणि मग दुसरा दिवस एकदम आळसात जातो.. खराब जातो…
* * *
भारतीचे गेल्या पाच वर्षांचे जे रूटीन ठरलेले आहे, त्यात शरदच्या घरी असण्याने काही बदल झालेला नाही…
ती आपल्या सर्कल मध्ये छान रमलीय्…
* * *
संध्याकाळी ६ वाजता शरद आणि भारती दोघे ही evening walk ला जातात…
फिरून आल्यावर थोडं मेडिटेशन , नंतर टिव्ही वरच्या बातम्या…जेवण …
आणि ११ वाजता झोपणं…
* * *
शरदला एक दोनदा Saregama Caravan वर गाणे ऐकायला बरं वाटलं पण नंतर मात्र कंटाळा यायला लागला…
गुलशन नंदा, व.पु. ची पुस्तके पडलेली असायची पण त्यात ही इंटरेस्ट असा येत नसे…
भारती मात्र त्यात रमून जात असे तेंव्हा तो तिला म्हणायचा, -” हे काय वाचत असते गं.. लहान पोरांसारखं ..”
भारती म्हणे ,-” मग तुम्ही सत्संगाची पुस्तके वाचा.. म्हातारपण आल्या सारखं …”
थोडी शाब्दिक चकमक होई अन् विषय संपायचा…
पण दोन तीन घटना अशा घडल्या की शरदला गंभीरपणे विचार करावासा  वाटला….
* * *
घटना – १…
भारती म्हणाली ,-” अहो, उद्या दुपारी माझ्या कडे भीसी आहे.. बऱ्याच मैत्रीणी येतील.. तेंव्हा दुपारी तुम्ही कसं करता ? वर बेडरूम मध्ये बसता की बाहेर कुठे मित्राकडे वगैरे जाता ?”
 अशी ही वेळ येऊ शकते ह्याचा कधी विचारच शरदने केला नव्हता…
बरं आपण घरी बसावं तर सगळ्यांनाच अवघडल्यासारखं – ackward होणार…
सगळे मित्र तर ड्युटीवर असणार मग जाणार कोणाकडे ?
मॅटीनी matinee सिनेमा पहायला जायचे तर तो ३.३० ला सुरू होतो, मग एक दिड तास घालवायचा कुठे ?
शरदने शेवटी विचार केला की चला त्या पेक्षा बार मध्ये वेळ घालवणे काय वाईट?..
दुपारी थंडगार बियर पीता पीता शरदला प्रश्र्न पडला की यार  एवढी वर्षे भारती कसं करत असेल ? – हा विचार तर आपण कधीच केला नाही….
* * *
घटना – २
त्या दिवशी भारती शरदला म्हणाली ,- ” अहो, आज आमच्या  लेडीज ग्रुपने मॅटीनीला अजय देवगणचा ‘ दृश्यम ‘ बघायचं ठरवलं आहे.. त्यामुळे तुम्ही आराम करा.. मी जाऊन येते ..”
शरद बोलला, -” दृश्यम तर मला ही बघायचा आहे…तु त्यांना नाही म्हणून सांग… आपण जाऊ second show ला…”
भारती – ” अहो, नेहमीचा ग्रुप आहे, नेहमीचा प्रोग्राम आहे.. नाही कसं म्हणू…”
शरद थोड्याशा नाराजीनेच ‘ ठिक आहे..जा ” म्हणाला …
भारती ही थोडीसी खट्टू झाली पण सिनेमाला गेली….
दुपारी बसल्या बसल्या शरदला आठवलं , -” यार, आपण तर सरळ मी आज पार्टीला जाणार आहे, तेंव्हा तुझं तू जेऊन घे असं सांगून मोकळे व्हायचो…”
* * *
घटना – ३
भारती म्हणाली , -” आमच्या भीसीच्या  ग्रुपचा दोन दिवस हंपीला जायचा प्लॅन होतो आहे पुढच्या आठवड्यात … मी जाऊ का ?”
शरद – ” अगं आपलं हंपी झाले आहे ना …मग पुन्हा पुन्हा तेच काय बघायचं ?”
भारती – ” तसं नाही हो… हे जाणं म्हणजे एक सहल असल्या सारखं असतं… थोडं रिलॅक्स … बाकी काही नाही …”
” ठिक आहे…ये जाऊन ” – शरद म्हणाला…
* * *
भारतीचे एक वर्तुळ तयार झाले होते आणि शरदचे असे काही वर्तुळच उरले नव्हते…
शरदचा कुठल्याही प्रकारचा त्या वर्तुळात शिरकाव म्हणजे भारतीला डिस्टर्ब करण्यासारखे होते… शरदला ही जाणीव होती..
आपण स्वत:ला कुठे तरी गुंतवले पाहिजे हा विचार करू लागला…
भारती आपल्या मैत्रीणीच्या ग्रुप बरोबर हंपीला गेली…
शरद ही चार दिवस  गावी भावाकडे, बहीणीकडे जाऊन आला…
* * *
एक दिवस शरद भारतीला म्हणाला, -” घरात बसून बोअर होतं, तेंव्हा मला वाटतं की कुठेतरी consultant वगैरे म्हणून join करावं … तुला काय वाटतं ?..”
भारती म्हणाली, -“खरंच तसलं काही करण्याची गरज आहे का ?३०-३५ वर्षे कष्ट केले की… आता पुन्हा तेच कशासाठी करायचं ? वेळ मिळाला आहे तर आता थोडं स्वत: साठी जगता आलं पाहिजे..”
भारतीचे म्हणणं शरदला पटत होतं…
भारती पुढे म्हणाली -” दुसरं म्हणजे तुम्ही ज्या पदावरून निवृत्त झाले… तिथं मिळत असलेला मान आणि नवीन ठिकाणी मिळणारी treatment हा फरक एखाद्या वेळी तुम्हाला पचणार नाही…तेंव्हा मला वाटतं की हा विचार तितकासा चांगला नाही …”
* * *
दिवस जात होते…
एका दिवशी शरद morning walk वरून परत आला..तो थोडासा उत्साहातच…
” अगं ईकडं ये.. ऐक जरा… तुला ते माझे जुने मित्र कदम साहेब आठवतात का ? ते आज भेटले होते.. त्यांना रिटायर होऊन ५ वर्षे झाली आहेत…बोलता बोलता विषय निघाला तर ते मला म्हणाले की दिवसभर घरात बसून काय करता ?- हेडगेवार रुग्णालयात या… दोन चार तास सेवा द्या… वेळ ही जाईल आणि स्वार्थाबरोबर परमार्थ ही होईल.. ते स्वत: गेले ४ वर्ष हे काम करत आहेत… तुला काय वाटतं ?”
भारती म्हणाली ,- ” हेडगेवार रुग्णालयात सेवा देण्याबाबत मी मैत्रीणीकडून ऐकले आहे.. हे  ठिक वाटते…जावून या..‌समजुन घ्या आणि जमत असेल – आवडलं तरच करा, उगीच जुलमाचा रामराम नको …”
* * *
शरद आता हेडगेवार रूग्णालयात सेवाभावी स्वंयसेवक म्हणुन जातो आहे…
त्याच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता…
रुग्णालयात येणाऱ्या लोकांना नि:स्वार्थपणे मदत करताना एक वेगळेच समाधान मिळते…
रुग्णालयात सेवा देण्यासाठी कधी काळी वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठ्या पदांवर असलेली जेष्ठ मंडळी येतात…
शरदचे इथे एक छान सर्कल तयार झाले आहे..
आता शरदचा दिनक्रम निश्चित झाला आहे…
सकाळी माॅर्निंग वाॅक आणि इतर routine …
दुपारी सेवा देणे…
संध्याकाळ मात्र पुर्ण भारतीसाठी राखीव …
खरंच वेळ जाणे, वेळ घालवणे आणि वेळ सत्कारणी लावणे ह्या फार वेगळ्या गोष्टी आहेत…
भारतीचे वर्तुळ आणि शरदचे वर्तूळ …कुठे ही एकमेकांना छेदत नाहीत…
 They respect each other’s space….
हां … ही वर्तुळे कधी कधी एकमेकांना स्पर्शून मात्र जातात…
त्यात ही एक वेगळाच आनंद असतो….
———————————————————-
©️ शरणप्पा नागठाणे
औरंगाबाद
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu