भैय्या ये तो जीन्स है … !!!
फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेमींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.
पूर्वी पावसाळ्यात जीन्स कपाटात ठेवली जायची मात्र आता पावसाळ्यातही ऑल टाइम फेव्हरिट जीन्सचं आहे. यात हॉट पॅन्टस, थ्री फोथ्र्स, शॉर्ट पॅन्टस, स्कर्टस ही उपलब्ध आहेत. यामुळे येणारा फंकी, ट्रेंडी लूकही तरुणाईच्या पसंतीस पडत आहे. डेनिम, कार्गो, लुझर्स ली, लिवाईस, स्पायकर यासारख्या कित्येक ब्रँडसच्या जीन्सची मागणी जास्त आहे. तरुणांसाठी जीन्स हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. जीन्समध्ये कोणता प्रकार घ्यायचा हे ऑकेजनप्रमाणे ठरते. कॉलेजमध्ये वापरण्यासाठी स्पायकर, डेनिम तर प्रवासासाठी कार्गो, सिक्स पॉकेट. ब्रँडेड जीन्सची qकमत जास्त असली तरी ती टिकण्यास चांगली असते. जीन्स कधीही, कुठेही, कुठल्याही प्रसंगासाठी वापरण्यायोग्य असल्याने पसंती मि ळते. प्रत्येकजण हिला अगदी कितीही दिवस (कधी घट्ट, कधी थोडी सैलसर तर कधी अगदीच अघळपघळ) कवटाळून असतो. जन्माची सखी असल्यासारखी. ज्या कुणी हिला जन्म दिलाय त्याचा समस्त तरुणवर्ग शतजन्माचा ऋणी राहील.
इटलीच्या जेनो गावच्या खलाशांपासून सुरु झालेला हिचा प्रवास पुढे गुलाम खाणकामगारांना दिलेले कपडे लवकर फाटतात म्हणून मालकांनी मोठ्या प्रमाणात हिला वापरायला सुरुवात केली. त्यात हवे तसे बदल लिओब स्ट्रॉस नावाच्या व्यक्तीने करुन दिले (त्यानेच नंतर लेव्ही असे नाव बदलले). पुढील काळात काऊबॉयजनी आणि प्रस्थापितांविरोधी चळवळीने या हिला (टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे) लोकप्रिय केले. मग तिचा मूळचा रंग जाऊन अधिक रंग आले. आणि ती गरिबांची हे लेबल सोडून एक फॅशन स्टेटमेंट झाली आणि मग तो एक ब्रँड बनला. ती म्हणजेच जीन्स. काय गुण नाहीत तिच्यात? किलर लूक्स देते, गबाळेपण देते, हॉट दिसते, टिकाऊ आहे, धुण्याची आणि इस्त्रीची कटकट नाही. अगदी लहान असल्यापासून डेनिमचे आकर्षण असते. जीन्सच्या चड्डीपासून लहान मुलांच्या जॅकेट्स आणि शूजपर्यंत सारे काही आजकाल मिळते. आणि बच्चे कंपनीलाही ते आवडते.
खरेतर जाडेभरडे निळे (किंवा अन्य) कापड, सहसा पिवळी शिलाई, मागे कसलातरी लेदर किंवा तत्सम पॅच, ठोकलेली रिवेट्स असा विचित्र अवतार. पण खरेच या जीन्सने आम्हांला किती तरी आधार दिला असेल. जेवढी जास्त मळकी तेवढी उठून दिसते. धुवायची गरज नाही. एखादे वेळी उदार मनाने धुतलीच तरी इस्त्रीची गरज नाही. गादीखाली एक रात्र अंथरुन ठेवली की दुसऱ्या दिवशी घालायला तयार. कितीही रंग गेला तरी छानच दिसणार. कुठे फाटली तरी पॅच मारला की अजून स्टाईल. विटलेली जीन्स अजून भारी दिसते. त्यावर बॉलपेनाने काहीतरी जहाजाचा नांगर, समुराई तलवार, विंचू असली चित्रं काढली की अजून फॅशनेबल (आता यांचे इथे काय काम असे खवचटसारखे विचारु नका).
महिलावर्ग पण आजकाल बरीच काही कलाकुसर करतात म्हणे तिच्यावर. एम्ब्रॉयडरी, कुंदन वर्क, भरतकाम, रंगकाम असलं काय काय असतं. त्या कांटा लगा गाण्यामधली कलाकुसरीची जीन्स तर कुणी तरी विसरेल का? प्रकार तरी किती नानाविध: रंगउडी (फेडेड), ठिगळी (पॅच्ड), दगडधुलाई, माकडधुलाई (स्टोनवॉश आणि मंकीवॉश), फाटकी (श्रेडेड) असे तर कापडाचेच प्रकार आहेत. पॅटर्नध्ये पण विविधता: लूज फिट, कम्फर्ट फिट, स्ट्रेट फिट, स्किन फिट, लो वेस्ट, बॅगी, बेलबॉटम, बूटकट, एक्स्ट्रा लूज वगैरे. वापरुन वापरुन फाटली तर चित्रविचित्र ठिगळ लावा. रंग उडाला तरी छान दिसेल (अगदीच हवा असेल तर डाय करुन पण मिळते). खालून विरली तर धागे निघालेली रस्ता झाडत चालली तरी कुणी नावे न ठेवता कौतुकानेच पाहील. अगदीच वाईट अवस्था झाली तरी बाह्या कापून फॅशनेबल हाफ पँट होईल. आजकाल तर वयाच्या सगळ्या सीमा पार करुन जीन्स ज्येष्ठांध्येही लोकप्रिय झाली. ऑफिसला कालपरवापर्यंत काळी किंवा फार तर ग्रे पँट घालणारे काका आता जीन्समध्ये दिसू लागलेत. खरेच त्या खाणकामगारांना वाटले असेल का हे ताडपत्रीसारख्या कापडाचा हा असला प्रकार भविष्यात एवढा हिट होईल.