ओळख पारंपरिक दागिन्यांची…
पारंपरिक दागिने आणि नवीन ट्रेनिंग दागिने यांची ओळख खास तुमच्यासाठी…..
प्रत्येक महिलेच्या हृदयाच्या जवळची वस्तू म्हणजे सोन्याचा दागिना आणि प्रत्येक पुरुषाच्या इन्वेस्टमेंट पोर्टफोलिओ मधला महत्त्वाचा घटक म्हणजे सोन्यातली गुंतवणूक ! इतका महत्त्वाचा असताना भाव कितीही वाढला म्हणून आरडाओरड झाली तरी त्याची मागणी कमी थोडीच होणार आहे. घरातले आजी-आजोबांना बरेचदा म्हणतात आमच्या वेळी सोनं शंभर रुपये तोळं होतं आणि आता भाव गगनाला भिडले पण सोने हि अशी गोष्ट आहे कि भाव कितीही गगनाला भिडले तरी त्याची मागणी कमी होणे थोडे कठीणच. मग इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणूनच घेतोय म्हणा वा आता मुलीचं लग्न करायचंय थोडी सोय करायला हवी ना असं म्हणा सोन विकत घेणं आलच ! तर मंडळी तुमचीही दिवाळीसाठी, लग्नकार्यासाठी खरेदी सुरू होईल म्हणूनच नवीन -जुने- नवीन अशा चक्रात फिरणारी सोन्याच्या दागिन्यांची फॅशन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत थिंक मराठी डॉट कॉम च्या या दिवाळी विशेष या अंकात. तर मग ओळख करून घ्या पारंपरिक दागिन्यांची आणि पहा सांगड घालता येते पारंपरिक दागिने आणि आत्ता ट्रेंडिंग असलेल्या नवीन दागिन्यांची !
पारंपरिक दागिने
गळ्यातले दागिने :
सरी : सोनेरी वर्तुळाकृती नळी किंवा दोन तारा मिळून केलेली साखळी म्हणजे सरी. टोकाला मळसूत्री नागमोड आणि आकडा असतो.सरी चांगली ताठ असून गळ्यालागतच घालतात.
मोहनमाळ – मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ म्हणजे मोहन माळ. मोहन माळेच्या जुन्या नमुन्यात अनेक प्रकारच्या नक्षीचे मणी सापडतात.
गाठले आणि पुतळी माळ – सोन्याच्या नाण्यांची माळ म्हणजे गाठले. गाठलेल्या नाण्यांवर मोहर किंवा लिखाण असते तर पुतळी मळ्यातल्या पुतळा थोड्या जड असून त्यांच्यावर स्त्रीची प्रतिकृती असते.
चंद्रहार : एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ म्हणजे चंद्रहार. त्यात एकात एक अडकवलेल्या चपट्या वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असू शकतात. जुन्या काळी अशा वळ्याच्या एका सरालाही चंद्रहार असं म्हणत.
कोल्हापुरी साज : हा गळ्याभोवती पण जरा सैलसर बसतो आणि या चंद्र कमळ मासा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्र्याचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. पूर्वी हार फक्त सवाष्ण बायका घालीत असत पण आता सरसकट सगळ्या बायका वापरतात.
गोफ : सुरेख विणीचा सोन्याच्या नाजूक तारांचा दोर म्हणजे गोफ.
बोरमाळ – लहान बोरांच्या आकाराची माळ म्हणजे बोरमाळ. सहसा बोरमाळ बनवायला खूप जास्त सोन लागत नाही. सोन्याच्या पातळ पत्र्यांचे मणी बनवून त्यात लाख भरूनही ती बनवली जाते. त्यामुळे कमी सोन्यातही मजबूत दागिना तयार होतो. बोरमाळ २ पदरी, ३ पदरी ही बनवतात.
ठुशी – छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला दागिना. मण्यांच्या आकारामुळे नाजूक दिसतो, समारंभात लहान मुलींनाही शोभून दिसतो.
इतर हार – चाफेकळी हार, लक्ष्मी हार , मोहन माळ ,चोकर , पुतळी हार , बकुळी हार , राणी हार , पोहे हार , वज्रटीक, सूर्यहार , आंबे हार ,चिंचपेटी , जवचा हार , चटई हार इत्यादी.
पूर्वीच्या काळी चिंचपेटी चांदीत बनावट असत , हल्ली २२ कॅरेट सोन्यात बनवतात. चिंचपेटी गादीवर बांधली जात असल्याने ती गळ्याला टोचत नाही.
हातातले दागिने :
तोडे :
तोडे : शिंदेशाही तोडे : प्युअर सोन्यात बनणारा म्हणजे २४ कॅरेट मध्ये बनणार हा एकमेव दागिना आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणूनही हा दागिना बनवतात. हा तोडा कमीत कमी १०० ग्राम मध्ये एक तोडा बनतो.
पाटल्या : सोन्याची वर्तुळाकार असलेली नळी.
जाळीच्या बांगड्या : कोरीव अथवा जाळीचे काम असलेल्या बांगड्या यांच्या वरच्या किनारीस नक्षी असते आणि या सर्वात वर कोपराच्या सर्वात जवळ घालतात.
मनगटातले इतर दागिने=कंकण, कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, पाटली, पिछोडी, पो(व)ची, बांगड्या, बिलवर, इत्यादी.
कानातले दागिने –
झुंबरे ,तोंगल, भोकरं छोट्या-छोट्या झुंबरांसारखे सोन्याचे मोत्याची झालर लावलेले डूल.
काप : अर्धवर्तुळाकृती लाल किंवा हिरवे खडे आणि त्यांच्याभोवती मोत्यांची किनार, केसांपर्यंत संबंध कानाची बाहेरची बाजू झाकणाऱ्या दागिन्याला काप असं म्हणतात.
बुगडी : कानाच्या वरच्या कोपऱ्यात घालतात आणि एका भोकात बुगडी असली तर शेजारी दुसऱ्या भोकात बाळी घालतात.
नाकातला दागिना –
नथ: महाराष्ट्रीयन स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण म्हणजे नथ. नथ मोत्याची असते ,खड्यांची व हिऱ्याची असते. तिथे दोन प्रकार असतात एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते.
याच बरोबर अनेक विविध पराकारचे बाजूबंद , केसांवर माळ्याची फुले, अग्रफूले, कानातील साखळ्या , चेन , अंगठ्या असे बरेच दागिने वर्षानु वर्षे महिलांचे मन मोहून टाकत आहेत.
महाराष्ट्रीयांच्या पोशाखात विशेषतः गेल्या काही पिढ्यांमध्ये पारंपारिक सौंदर्यदृष्टीला प्राधान्य देण्यात आलेले आढळते दागिन्यांच्या जडणघडणीत व कलाकुसरीत सर्वत्र पारंपारिक नमुने आढळतात. या दागिन्यांमध्ये मोती, जवाहिर, सोने यांचा उपयोग अधिक केलेला आढळतो. महाराष्ट्रभर लोक दागिने घडवायला सोनेच वापरणे पसंत करतात. सोन्याचे पारंपारिक दागिने पूर्वीपासून कोण कसे घालायचे हे जाणून घेऊया.
देशावरचे लोक सोन्याची एक पट्टी गळ्याभोवती घालतात चिंचपेटी सारखी तिलाच चितक म्हणतात. कोल्हापुरी साज आणि पुतळी माळ महाराष्ट्रात सर्वत्र घातली जाते तरी पूर्वी फक्त मराठ्यांमध्ये घालत असत. ब्राह्मणांच्या बायका विशेषत: देशावरच्या जास्त करून चिंचपेटी घालत तसेच त्यांच्या हातातले दागीने ही साधारण असे असत – मनगटाजवळ आधी शिंदेशाही तोडे नंतर बांगड्या, गोठ आणि पाटल्या अशा क्रमाने दागिनेही कोपरापर्यंत घालीत.
आजकाल बायका ऑफिसला जायला लागल्या , साड्या जाऊन कुर्ते , जीन्स , पंजाबी ड्रेस घालायला लागल्या तरीही सणावाराला पारंपरिक पोशाख घातल्यावर अशा दागिन्यांना घालून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते हे मात्र नक्की.
पुढील लेखात सध्या ट्रेंडिंग असलेले दागिने आणि पारंपरिक दागिन्यांचे फ्युजन या बद्दल वाचायला विसरू नका !
pc:google ,pinterest