देव आनंद © मुकुंद कुलकर्णी

सदाबहार चॉकलेट हिरो देव आनंदचा जन्म दि.26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील शक्करगढ येथे झाला.धरमदेव पिशोरीमल आनंद हे त्याचं नाव . पण चित्रपटसृष्टी आणि चित्ररसिक त्याला ‘ देव आनंद ‘ म्हणूनच ओळखतात . त्याचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूरच्या जिल्हा न्यायालयात नावाजलेले वकील होते . देव साहेबांचं बाळपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं . पाच भावंडांमधला देव आनंद तिसरा . मनमोहन आनंद आणि चेतन आनंद हे मोठे भाऊ . विजय आनंद हा लहान भाऊ तर शीलकांता कपूर ही लहान बहीण . सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हा तिचा मुलगा . देव साहेबांचे शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट स्कूल डलहौसी येथे झाले . पदवीच्या अभ्यासक्रमासाठी लाहोरला जाण्याआधी देवसाब काही दिवस धरमशाला येथे होते . इंग्रजी साहित्यात बीएची डिग्री त्यांनी ब्रिटिश इंडियातील गव्हर्मेंट कॉलेज लाहोर येथून प्राप्त केली .
     
 
पदवी प्राप्त केल्यानंतर देवसाब चित्रपट क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी इ.स.1940 च्या दशकाच्या सुरूवातीला मायानगरी मुंबईत दाखल झाले . सुरूवातीला काही काळ चरितार्थासाठी देवसाब चर्चगेट येथील मिल्ट्री सेन्सर च्या कार्यालयात महिना 165 रुपयांच्या वेतनावर कामास होते . काही दिवस त्यांनी 85 रुपये पगारावर एका अकाऊंट फर्ममध्ये कारकूनीसुद्धा केली . देव आनंद यांचे प्रेरणास्थान होते अशोक कुमार . अछूत कन्या , किस्मत चित्रपटातील अशोककुमार यांच्या भूमिकेने प्रभावित होऊन देव साहेबांनी एक चांगला अभिनेता , परफॉर्मर होण्याचा निश्चय केला . मोठे बंधू चेतन आनंद यांच्या समवेत त्यांनी ईप्टा जॉईन केलं .प्रभातचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिली संधी दिली . इ.स.1946 च्या ‘ हम एक है ‘ या चित्रपटामधून . हिंदू मुस्लिम ऐक्यावर हा सिनेमा होता . त्यात कमला कोटणीस त्याची नायिका होती . देव आनंदने हिंदू मुलाचा रोल केला होता . या मिळालेल्या पहिल्या संधी बद्दल देवसाब एका ईंटरव्ह्यू मध्ये म्हणतात , ” I remember when I gate crashed into the office of the man who gave me the first break , he kept looking at me . — Baburao Pai of Prabhat film studios . At the time when he made up his mind that this boy deserves the break and later mentioned to his people that this boy struck me because of his smile and beautiful eyes and his tremendous confidence . “
देव आनंद – सुरैया
पुण्यात ह्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना देवसाब गुरुदत्त यांच्या संपर्कात आले . दोघांची गाढ मैत्री झाली . दोघेही होतकरू स्ट्रगलर होते . त्या दोघांमध्ये त्यांनी एक करार केला . चित्रपट क्षेत्रात ज्याला यश मिळेल त्याने दुसऱ्याला यशस्वी होण्यात मदत करायची . देव आनंद जेंव्हा निर्माता बनला तेंव्हा त्याने गुरुदत्तला दिग्दर्शनाची संधी दिली आणि गुरुदत्त दिग्दर्शनात स्थिरावल्यावर त्याने देव आनंदला नायकाची भूमिका दिली . इ.स.1949 साली देव आनंद यांनी आपले बंधू चेतन आनंद यांच्या समवेत ‘ नवकेतन फिल्म्स ‘ ची स्थापना केली .
चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात गायिका अभिनेत्री सुरैया बरोबर देव आनंदला काही प्रमुख भूमिका मिळाल्या . या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान देवसाब आणि सुरैया यांची प्रेमकहाणी रंगायला लागली . दोघांनी मिळून एकूण सात चित्रपट केले . विद्या ( इ.स.1948 ) , जीत , शायर ( इ.स.1949 ) , अफसर , निली ( इ.स.1950 ) , दो सितारे आणि सनम ( इ.स.1951 ) हे ते चित्रपट . हे सर्व चित्रपट बॉक्स अॉफिसवर सुपर हिट ठरले . त्या काळात सुरैया एक स्थिरावलेली प्रख्यात अभिनेत्री , मोठी स्टार होती , तर देव आनंद एक होतकरू , उदयोन्मुख कलाकार होता . प्रेक्षकांना त्यांचा अॉन स्क्रीन रोमान्ससुद्धा खूप भावला होता . ‘ किनारे किनारे चले जायेंगे ‘ ह्या विद्या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंग दरम्यान ज्या बोटीत त्यांचे चित्रीकरण चालू होते , ती बोट उलटली आणि देव आनंदने सुरैयाला बुडताना वाचवले . चित्रपटात शोभून दिसणाऱ्या या प्रसंगामुळे दोघे आणखीन जवळ आले . इ.स.1948 ते इ.स.1951 या दरम्यान देव सुरैया यांची प्रेमकहाणी बहरली होती . जीत चित्रपटाच्या सेटवर देव सुरैया यांच्या विवाहाची तयारी झाली होती . दुर्गा खोटे , कामिनी कौशल यांनी देव सुरैया जोडीची मदत केली . इ.स.1950 च्या अफसर या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान देव आनंदने सुरैयाला हिऱ्याची अंगठी देऊन मागणी घातली . सुरैयाच्या आजीने या गोष्टीला कडाडून विरोध केला . सुरैया तो विरोध मोडू शकली नाही . आणि या प्रेमकहाणीचा शेवट सुखांत झाला नाही . पण सुरैया शेवटपर्यंत अविवाहित राहिली . देव आनंद बरोबर चित्रपटात काम करण्याचीही तिच्यावर बंदी घालण्यात आली . ‘ दो सितारे ‘ ( इ.स.1951 ) हा या जोडीचा शेवटचा चित्रपट . दि.31 जानेवारी 2004 रोजी सुरैयाचे निधन झाले . तिच्या अंत्ययात्रेस देव आनंद उपस्थित होता . आपल्या ‘ रोमान्सिंग विथ लाईफ ‘ या मनमोकळ्या आत्मचरित्रात देव आनंदने सुरैया बरोबरच्या प्रेमकहाणीचा हळूवार उल्लेख केला आहे .
इ.स.1954 साली देव आनंद सहअभिनेत्री कल्पना कार्तिक बरोबर विवाहबद्ध झाला .
देव आनंद – कल्पना कार्तिक
‘टॅक्सी ड्रायव्हर ‘ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरच दोघे विवाहाच्या बंधनात बांधले गेले . सुनील आनंद हा मुलगा आणि मुलगी देवीना अशी दोन अपत्ये त्यांना झाली . लग्नानंतर कल्पना कार्तिकने चित्रपट संन्यास घेतला .
देवसाब यांना पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला . स्टुडिओबाहेर घुटमळणाऱ्या या राजबिंड्या युवकाला दादामुनींनी बरोबर पारखले . इ.स.1948 चा बाँबे टॉकीजचा ‘ जिद्दी ‘ हा नायक म्हणून हिट झालेला देव आनंदचा पहिला चित्रपट . या चित्रपटात कामिनी कौशल त्याची नायिका होती . या चित्रपटातील किशोर लता यांनी गायलेले ‘ ये कौन आया करके ये सोला सिंगार ‘ हे किशोर लता यांचं पहिल युगलगीत . या गाण्यापासून किशोर , लता , देव ही भागीदारी पुढे जवळजवळ चाळीस वर्षे टिकली . याच सिनेमात किशोरकुमार ‘ मरनेकी दुवाए क्यूं मांगू ‘ हे आपले पहिले सोलो गीत गायला .
नवकेतन फिल्म्सच्या बॅनरखाली इ.स.1951 च्या ‘ बाजी ‘ या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चित्रपटासाठी देव आनंदने गुरुदत्तला दिग्दर्शनाची संधी दिली . देव आनंद , गीता बाली व कल्पना कार्तिक हे कलाकार या चित्रपटात होते . नायिका म्हणून कल्पना कार्तिकचा आणि दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तचा हा पहिला चित्रपट . बॉक्स अॉफिसवर हा चित्रपट खूप यशस्वी ठरला . त्यानंतर या जोडीला बऱ्याच ऑफर्स मिळत गेल्या . आँधीया ( इ.स.1952 ) टॅक्सी ड्रायव्हर ( इ.स.1954 ) , मकान नं 44 ( इ.स. 1955 ) , नौ दो ग्यारह ( इ.स.1957 ) हे या जोडीचे तुफान गाजलेले चित्रपट . लग्नानंतर कल्पना कार्तिकने चित्रपट क्षेत्राला अलविदा केला . ‘ नौ दो ग्यारह’ हा या जोडीचा अखेरचा चित्रपट .
विशिष्ट लकबीत मान हलवत रॅपिड फायर स्टाईलची देवसाब यांची डायलॉग डिलिव्हरीची पद्धत , ही खास देव आनंद
‘ स्टाईल ‘ होती . हाऊस नं 44 ( इ.स.1955 ) , पॉकेटमार ( इ.स.1956 ) , मुनीमजी ( इ.स.1955 ) , फंटूश , सीआयडी ( इ.स.1956 ) , पेईंग गेस्ट ( इ.स.1957 ) हे त्याचे जबरदस्त गाजलेले चित्रपट . इ.स.1950 च्या दशकात थोडीशी रहस्याची झालर असलेले त्याचे लाईट कॉमैडी + लव्ह स्टोरी असे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले .
इ.स.1950 च्या दशकातल्या उत्तरार्धात देव आनंद ची जोडी पदार्पण करणाऱ्या वहिदा रेहमान बरोबर जमली . सीआयडी ( इ.स.1956 ) , सोलवा साल ( इ.स.1958 ) , काला बाजार ( इ.स.1960 ), बात एक रातकी ( इ.स. 1962 ) , रूप की रानी चोरोंका राजा (इ.स.1961 ) , गाईड ( इ.स. 1965 ) , प्रेमपुजारी ( इ.स.1970 ) हे या जोडीचे प्रचंड गाजलेले चित्रपट . आर.के.नारायण यांच्या गाईड या कथेवर आधारित गाईड हा चित्रपट देव आनंदची सर्वश्रेष्ठ कलाकृती . इ.स.1958 च्या ‘ काला पानी ‘ या चित्रपटासाठी देव आनंदला फिल्म फेअरचा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार सर्वप्रथम प्राप्त झाला .
 
 
सुरैया , कल्पना कार्तिक याशिवाय नूतन आणि वहिदा रेहमान या नायिकांबरोबर देव आनंदची जोडी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली . पन्नास आणि साठचे दशक हिंदी चित्रपटसृष्टीवर दिलीप , राज , देव या त्रयीचे अधिराज्य होते .
साठच्या दशकात रोमँटिक चॉकलेट हिरो अशी देवसाब यांची प्रतिमा प्रस्थापित झाली . नूतन बरोबर मंझील, तेरे घरके सामने , मीनाकुमारी सोबत किनारेकिनारे , माला सिन्हा बरोबर माया , लव्ह मॅरेज , साधना बरोबर असली नकली , साधना नंदा बरोबर हम दोनो , आशा पारेखसह जब प्यार किसीसे होता है , महल , तसेच कल्पना , सिमी व नंदा या तिघींबरोबर तीन देवियाँ हे त्याचे अत्यंत लोकप्रिय , लाईट मूडचे रोमँटिक चित्रपट .
वहिदा रेहमान सोबत ‘ गाईड ‘ हा देवसाब यांचा पहिला रंगीत चित्रपट . मालगुडी डेज या अजरामर कथासंग्रहाचे लेखक आर.के.नारायण यांच्या ‘ द गाईड ‘ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा ‘ द गाईड ‘ हा देव साहेबांचा महत्वाकांक्षी चित्रपट . या कादंबरीवर चित्रपट बनवण्याची प्रेरणा देव आनंद यांचीच . आर.के.नारायण यांना स्वतः भेटून त्यांनी या प्रकल्पासाठी संमती मिळवली . हॉलिवूडमधल्या आपल्या मित्रांना हाताशी धरून देव आनंद यांनी हा चित्रपट ‘ इंडो युएस् को प्रॉडक्शन असा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषात एकत्रितपणे चित्रित केला . इ.स.1965 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला . भाऊ विजय आनंद याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला जगभरातल्या रसिक प्रेक्षकांची दाद मिळाली . काळाच्या पुढचे कथानक असलेला हा चित्रपट निःसंशय देव आनंदच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक होता .
 
विजय आनंद सोबत देव साहेबांनी ज्वेल थीफ आणि नंतर जॉनी मेरा नाम हे थ्रिलरकडे झुकणारे चित्रपट दिले . ज्वेल थीफमध्ये त्यांच्याबरोबर वैजयंतीमाला , तनुजा , अंजू महेंद्रू तर जॉनी मेरा नाम मध्ये त्याची नायिका होती हेमा मालिनी . या चित्रपटाने हेमा मालिनीला स्टार बनवले .
दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रेमपुजारी फारसा यशस्वी ठरला नाही . पण इ.स.1971 चा ‘ हरे रामा हरे कृष्णा ‘ हा चित्रपट प्रचंड गाजला . या चित्रपटातून झीनत अमान ही बोल्ड नटी हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरली . त्याच वर्षी ए.जे.क्रॉनिन यांच्या ‘ द सिटाडेल ‘ या कादंबरीवर आधारित ‘ तेरे मेरे सपने ‘ हा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटात नायिका होती मुमताज . त्यानंतर देव साहेबांचा करिश्मा हळूहळू कमी होत गेला .
इ.स.1970 च्या दशकात राज कपूर पडद्यावर बापाच्या भूमिकेत दिसायला लागला . दिलीपकुमारसुद्धा बॉक्स अॉफिसवर अयशस्वी होत होता . त्या काळात सदाबहार देव आनंद हेमा मालिनी , झीनत अमान , शर्मिला टागोर , राखी , परवीन बाबी अशा नव्या जमान्याच्या नायिकांबरोबर रुपेरी पडदा गाजवत होता .
आणीबाणीच्या काळात देव आनंद राजकारणात सक्रिय होता . पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाविरुद्ध तो रस्त्यावर उतरला . ‘ नॕशनल पार्टी अॉफ इंडिया ‘ या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना देवसाबनी केली होती .
हॉलीवूडचा जबरदस्त अभिनेता ग्रेगरी पेक याच्याबरोबर देव आनंदची नेहमी तुलना होत असे . ही तुलना देवसाबना फारशी आवडत नसे , ” When you are at an impressionable age you make idols , but when you grow out of the phase , you develope your own persona . I don’t want to be known as India’s Gregory Peck , I am Dev Anand . ” देव आनंद आणि ग्रेगरी पेक यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते .
इतर अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबत देवसाबना इ.स.2002 साली चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ दादासाहेब फाळके ‘ हा पुरस्कार मिळाला होता . भारत सरकारने इ.स.2001 साली ‘ पद्मभूषण ‘ या पुरस्काराने देव साहेबांना गौरवले होते .
वयाच्या 88व्या वर्षी दि.3 डिसेंबर 2011 रोजी चिरतरुण देव आनंदने इहलोकीची यात्रा संपवली . लंडन येथे मेडिकल चेक अप साठी गेले असता वॉशिंग्टन मेफेअर हॉटेल लंडन मधील आपल्या रूममध्ये कार्डिॲक अरेस्टने त्यांचे निधन झाले .
पाच दशकांपेक्षा जास्त प्रदीर्घ कारकीर्द असणारा देखणा , सदाबहार , चिरतरुण नायक देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीत एकमेवाद्वितीय होता . त्यांच्या स्मृतीदिनी देवसाबना भावपूर्ण श्रद्धांजली !
मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu