छोटीसी बात ©मुकुंद कुलकर्णी

बासू चटर्जी यांच्या सदाबहार चित्रपटांच्या यादीतला  एक चित्रपट ‘ छोटीसी बात ‘ रजनीगंधा आणि छोटीसी बात जणू एका नाण्याच्या दोन बाजूच . अमोल , विद्या , बासूदा , सलिल चौधरी , योगेश कलाकार ‘ नेहमीचेच यशस्वी ‘ त्यात अशोककुमार आणि असरानी ही सन्माननीय भर . हे दोन्ही चित्रपट म्हणजे वपुंच्या कथांचा माहौल . सुशिक्षित , सुसंस्कृत , मध्यमवर्गीय चाकरमान्यांच्या कथा . सर्वसामान्यांना आपल्याशा वाटणाऱ्या . कुठेतरी आपले प्रतिबिंब डोकावते आहे असा आभास निर्माण करणाऱ्या . प्रेमाचा त्रिकोण , पण निष्कपट , सहसा प्रेमाचा त्रिकोण गुन्हेगारीला जन्म देतो पण बासूदांचे प्रेम त्रिकोण निखळ करमणूकीला जन्म देतात . या आकृतीला तर कर्नल नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंह हा खणखणीत चौथा कोन आहे . जो बाकीचे तीनही कोन आपल्या मर्जीप्रमाणे वळवतो . एका नितांतसुंदर प्रेमकथेची अनुभूति देतो हा चित्रपट .

सत्तरच्या दशकातील सुंदर मुंबईचं अप्रतिम दर्शन घडवतो हा चित्रपट . सत्तरच्या दशकातील देखणी मुंबई पहायला मिळते या सिनेमात . मंझिल चित्रपटातील अमिताभ मौसमी वर चित्रित केलेले
‘ रिमझिम गिरे सावन ‘ या गाण्यातही तेंव्हाच्या स्वप्नवत मुंबईचे दर्शन घडते . छोटीसी बात हा संपूर्ण चित्रपट आणि मंझिल मधील हे गाणे त्या लाडक्या आवडत्या मुंबईशी कायमसाठी जोडले गेले आहेत . या चित्रपटाची पाळमुळं जर हुडकायची झाली तर , 1960 च्या स्कूल ऑफ स्काउंड्रल्स या ब्रिटीश कॉमेडीशी दूरान्वयाने जोडला जाईल हा चित्रपट .

अरुण आणि प्रभा या जोडीची ही रोमँटिक कॉमेडी आहे . अरुण हा शाय , आत्मविश्वासाचा अभाव असलेला सालस तरुण प्रभावर लट्टू असतो पण , नागेश शास्त्री हा तगडा प्रतिस्पर्धी त्याची वाट अडवून उभा असतो .कर्नलच्या मदतीने अरुणची नैया कशी पार लागते याचा सुंदर अविष्कार म्हणजे ‘ छोटीसी बात ‘

बी आर फिल्म्स बॕनरचा हा चित्रपट आपल्याला एका रोमँटिक कॉमेडीचा निखळ आनंद देऊन जातो . जॕक्सन तोलाराम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुंबईस्थित कॉर्पोरेट ऑफिसच्या नेपथ्यावर या सिनेमाची सुरुवात होते . कर्मचाऱ्यांची ओळख करून घेता घेता आपल्यासमोर येतो अरुण प्रदीप आपला नायक . नऊ पाचच्या 86 नंबरच्या बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रभा नारायणला अरुण दिल दे के बैठा है . अजून ही गोष्ट प्रभाच्या मात्र गावीही नाही . बेस्ट बस स्टॉपवर आपल्या प्रेम कहाणीच्या प्रेमपात्रांचे आगमन होते .या बसमधून दोघेही आपापल्या ऑफिसकडे कूच करत असतात . लांब कॉलरचे फुल शर्ट , बेलबॉटम पँटमधला आपला सीधासाधा हिरो , दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या प्रिंटेड साडी आणि पाठीवर रुळणारा शेपटा असलेल्या आपल्या सालस गोड नायिकेच्या पाठीपाठी असतो . प्रभा ओळख देत नाही , पण हा आपल्या पाठी आहे आणि ऑफिसच्या लिफ्टपर्यंत तो होता , ही गोष्ट तिच्या नजरेतून सुटत नाही .

ग्रेड टू मधे प्रमोट झालेला बिचारा अरुण ऑफिसमध्ये कुणाच्या खिजगणतीतही नसतो . ऑफिस सुटल्यावरही परत जाताना अरुण आपल्या पाठलागावर आहे , हे प्रभाच्या लक्षात येतं . प्रभा बरोबर सुरू असलेल्या आपल्या अफेअरची दिवास्वप्नं अरुणला पडायला लागतात . तिच्या नकळत प्रभाही बसस्टॉपवर त्याची वाट पहायला लागते . पण तिच्याशी बोलण्याचं धाडस काही अरुण गोळा करू शकत नाही . या सगळ्या गमती खट्याळ प्रभा आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करत असते . साधाभोळा अरुणही प्रभाला आवडायला लागतो त्याला छेडण्यात तिलाही गंमत वाटायला लागते . बेस्टचा बस स्टॉप आणि 86 नंबरची बस यामधे हळूहळू ही मुग्ध प्रेमकहाणी बहरायला लागते . लांब कॉलरचे फुल शर्ट आणि बेलबॉटम मधला अरुण आणि प्रिंटेड साडीतील प्रभा पाहताना आज खूप गंमत वाटते .

अरुणच्या ऑफिसात कामानिमित्त आलेली प्रभा जेंव्हा जनरल मॕनेजरच्या केबिनमध्ये जाते , तेंव्हा घाबरगुंडी उडालेला अरुण अमोलने मस्त दाखवलाय . इथे या जोडीची ऑफिशियल ओळख होते . जानेमन जानेमन तेरे दो नयन हे गाणं या सिच्युएशनला अगदी फिट बसतं . पडद्यातल्या पडद्यावर हे गाणं धर्मेंद्र हेमा या जोडीने गायलं आहे . अरुणला अर्थातच त्यांच्या ठिकाणी अरुण आणि प्रभा दिसायला लागतात . या गाण्याचं चित्रिकरण लाजवाब झालं आहे .

हळूहळू ही प्रेमकहाणी आकार घ्यायला लागते . अरुणची दिवास्वप्नं वाढायला लागतात . गुड मॉर्निंगची देवाणघेवाण , इरॉस मधल्या पिक्चरची चौकशी इथपर्यंत अरुणची मजल जाते . सगळं काही सुरळीत चाललेलं आहे असं वाटत असतानाच बस स्टॉपवर स्कूटरवरून अवतरतो तेवढ्या खलप्रवृत्तीचा नसलेला खलनायक  , प्रभाचा ऑफिस सहकारी नागेश शास्त्री .नागेश सोबत स्कूटरवरून प्रभा भुर्रकन् उडून जाते . बिचारा आपला अरुण हताश होऊन प्रभाला लंच टाईममधे जवळच्या रेस्तराँ मधे लंचचे आमंत्रण देतो . प्रभाही आमंत्रण स्विकारते पण , मधे येतो मीठाचा खडा नागेश . चेस , टेबल टेनिस मधे एक्स्पर्ट असलेला नागेश ओव्हरस्मार्ट असतो . पुढील आठवड्यात होणाऱ्या टेबल टेनिसच्या इंटर ऑफिस टूर्नामेंटबद्दल फुशारकी मारून बिचाऱ्या अरुणची तो बोलती बंद करतो . मिक्स्ड डबलसाठी प्रभाची साथ त्याला हवी असते . स्पोर्ट्समन , कॉन्फिडंट नागेश अरुणच्या लंच प्लॅनचं खोबरं करतो . बिल द्यायची वेळ आल्यावर प्रभाला बरोबर घेऊन सटकतो . आधीच आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या अरुणचा आत्मविश्वास डळमळू लागतो . ही रेस हरण्याची त्याला भिती वाटायला लागते .

बस स्टॉपवर वाट पाहणाऱ्या अरुण समोर नागेश प्रभाला स्कूटरवर घेऊन जातो , वर त्याला स्कूटरवर तिसऱ्या सीटला जागा नाही म्हणून खिजवतो . अरुण नवी नाही जमली तर सेकंड हँड तरी स्कुटर विकत घ्यायचा निश्चय करतो . बिचाऱ्या अरुणला एक बेरकी गॕरेजवाला हातोहात गंडवतो . एक भंगार मोटरसायकल तो तीन हजार रुपयात अरुणच्या गळ्यात मारतो . बाईकवर प्रभासोबतच्या राईडच्या दिवास्वप्नात अरुण रंगून जातो . बाईकवर प्रभाला सोबत घेऊन अरुण ऑफिसकडे निघतो . कंबख्त बाईक धोका देते , धापा टाकत बंद पडते . नागेश पुन्हा एकदा प्रभाला स्कूटरवर घेऊन भुर्र होतो . बाईकच्या व्यवहारात आपण पुरते फसवले गेलो हे बिचाऱ्या अरुणच्या ध्यानात येतो .अरुण ठरवतो एक आणि घडत जातं भलतच . आता ही रेस अरुण जिंकणार की , नागेश हा प्रश्न प्रेक्षकांना पडायला लागतो . भोंदूबाबा , हस्तसामुद्रिक , पोपटवाला , वशीकरण , गंडेदोरे , ताईत सर्व प्रकार अरुण आजमावतो .

शहरातील गर्दीगोंधळापासून दूर खंडाळ्यातील रिटायर्ड आर्मी कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंह हे नाव अरुणच्या कानावर येतं . खूप वर्षांचा अनुभव गाठीशी असणारे कर्नल अरुण सारख्या अडल्या नडल्यांना मार्गदर्शन करत असतात . अरुण त्यांना शरण जायचं ठरवतो . अगदी जॕक्सन तोलाराम कंपनीच्या जनरल मॕनेजर बाटलीवालांची लग्नगाठही कर्नलच्या मदतीनेच बांधली गेली असते . बघूया आपल्या अरुणचं काय होतय . कर्नलच्या बंगल्याची बिकट वाट तुडवत एकदाचा अरुण कर्नलच्या बंगल्यावर पोचतो . इथे कर्नलची एंट्री होते . पाईप ओढणाऱ्या अपटूडेट रुबाबदार कर्नलचा रोल दादामुनीनी मोठ्या दिमाखात निभावलाय . ब्रिटिश कालीन प्रशस्त बंगल्याच्या बिलियर्ड्स रुममध्ये अरुण कर्नलला भेटतो . मधेच कर्नलचा सल्ला घ्यायला अवतरतो महानायक , येस अमिताभ बच्चन , क्षणार्धात कर्नलचा सल्ला घेऊन तो निघूनही जातो . कर्नल अरुणची समस्या जाणून घेतो . सीध्यासाध्या अरुणचा मुकाबला नागेश सारख्या ओव्हरस्मार्ट तगड्या प्रतिस्पर्ध्याशी आहे हे कर्नल ओळखतो . प्रेमकहाणीची आतापर्यंतची वाटचाल समजून घेतो . डिफिकल्टी इन व्हर्बल कम्युनिकेशन समस्या नंबर एक , अनस्टेबल सेल्फ इव्हेझिवनेस समस्या नंबर दोन .ट्रिपल एल् केस , लव्ह्ज लेबर्स लॉस्ट ( शेक्सपिरियन कॉमेडी ) , अनस्टेबल पॕरॉनॉईडिकल फ्रस्ट्रेशन , आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव . कर्नल केसचं डायग्नॉसिस असं करतो . आता यावर उपाय काय ? स्पेशल कोर्टशिप ट्रेनिंग ! वीस दिवसांचा कोर्स गेस्ट हाऊहमधील वास्तव्यासह , ही उपाययोजना ठरते . धडा पहिला हँडशेक कडकपणे करणे मिळमिळीत नाही . या धड्यापासून सुरू होते अरुणची शिकवणी . पुढील धडा कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज . जेते आणि पराभूत हे दोनच प्रकार असतात माणसांचे जिंदगीके क्रिकेटमे ड्रॉ नहीं होता , या तो जीत होती है या हार . Bottom is always crowded , but there is always room at the top . प्रतिस्पर्ध्यावर मात करायची असेल तर , टॉपवरच पोचलं पाहिजे . त्यासाठी वागणूकीला पूर्ण टर्न द्यायला हवा . वेगवेगळे नुस्खे शिकवून कर्नल अरुणचा कायापालट घडवतो . अरुण आता टेबल टेनिस , चेस , टेबर मॕनर्स स्टिकने चायनीज खाणे इत्यादी कलांमधे निपुण झालेला असतो . टेबल टेनिस खेळताना प्रतिस्पर्ध्याचे चित्त विचलित कसे करायचे , कसेही करून कुठलीही स्पर्धा जिंकायचीच कशी यात अरुण तयार होतो . All is fair in love and war . प्रेमाच्या खेळात डरपोक होऊन माघार घ्यायची नाही , ही जिद्द अरुणमध्ये निर्माण होते .बावळट अरुण स्मार्ट अरुणमधे बदललेला असतो . थोडक्यात कर्नल अरुणला पोरगी पटवायला शिकवतो .

दरम्यान बस स्टॉपवर अरुण दिसेनासा होतो . प्रभाला काळजी वाटायला लागते , त्याची आठवण यायला लागते . या सिच्युएशनवर आहे अप्रतिम गाणं ‘ न जाने क्यूँ होता है ये जिंदगीके साथ , अचानक ये मन , किसीके जानेके बाद करे फिर उसकी याद , छोटी छोटीसी बात ….. प्रभा अरुणची वाट पहायला लागते . उदास होते .

आता ट्रेनिंग संपवून वेळ असते प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीची . संपूर्ण कायापालट झालेला अरुण सुटाबुटात बस स्टॉपवर अवतरतो प्रभा नागेश सोबत स्कूटरवरून येते . नागेश बरोबर पहिली चकमक झडते . वाट पहाणाऱ्या नागेशला सोडून प्रभा अरुणशी बोलण्यात मश्गुल होते . अरुण त्याला जाणूनबुजून तिष्ठत ठेवतो . वाट पहाणाऱ्या नागेशच्या मागे तोच स्कूटरवर बसतो . अरुणने केलेली नागेशची फजिती प्रभा एंजॉय करते . ऑफिसमध्येही त्याचा वावर बदलतो सब ऑर्डिनेट्सना प्रसंगी धारेवर धरायला तो शिकतो . झिरो अरुण आता हिरो झालाय . शिष्याची प्रगती बघून कर्नल खूष . गॕरेजवाल्याचा मामा करून तीच बाईक अरुण परत त्याच्या गळ्यात मारतो हा प्रसंग बघण्यासारखा आहे . आता पाळी नागेशची त्याचेही हिशेब चुकते करायचे असतात . अरुण नागेशला प्रभासोबत लंचचे आमंत्रण देतो . या सर्व प्रसंगात कर्नल साक्षीला असतोच . जहांगीर आर्ट गॕलरीमधे कर्नल आणि प्रभाची पहिली मुलाखत होते . प्रभाला बघून कर्नलला आपला भूतकाळ आणि त्याची प्रभा आठवते . अरुण प्रभा दोघांचे एकमेकावर प्रेम आहे याची कर्नल खात्री करून घेतो . या दोघांचे मीलन व्हायला हवे असे त्याला मनोमन वाटते . इकडे रेस्टॉरंटमध्ये अस्वस्थ नागेश टेबलवर चुळबूळ करत अरुण प्रभाची वाट बघत बसलेला असतो . नागेश दोघांवर डाफरायचा प्रयत्न करतो . त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत हसून अरुण आगीत तेल ओततो . अरुण नागेशला मुद्दाम चायनीज रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो . अरुण प्रभा एकमेकांशी गप्पा मारताना नागेशकडे पूर्ण दुर्लक्ष करतात . नागेशसाठी हे सर्व नवीन असतं . दाल मे कुछ काला है ही शंका त्याला यायला लागते . तयार अरुण सराईतपणे स्टीक वापरून खायला सुरू करतो . इकडे स्टीक हातात कशी पकडायची इथपासून नागेशची तयारी . पुरती फजिती होते नागेशची . सुरुवातीच्या अपमानाची सव्याज परतफेड करतो अरुण . अरुण कर्नलची शाबासकी मिळवतो . या सगळ्यामागे कर्नल आहे अशी खात्री नागेशला पटायला लागते .

आता पाळी टेबल टेनिसची , तिथेही कर्नलने शिकवलेल्या युक्त्या वापरून , नागेशचे लक्ष विचलित करून अरुण बाजी मारतो . सोनेजैसी हर सुबह आणि गुलालसे भरी हर सांज व्हायला लागते अरुणची . चेसमधेही तीच गत . नागेश पुरता गोंधळून जातो . नागेश कर्नलला पाहतो त्याला कर्नलचा संशय येतच असतो . अरुणच्या यशाची खात्री पटून कर्नल दुसऱ्या कामासाठी निघतो . नागेश त्याच्या मागावरच असतो . अरुणच्या कायापालटाचे रहस्य तो ओळखतो . नागेश लंच टाईममधे प्रभाचे कान फुंकण्याचा प्रयत्न करतो . कर्नलने शिकवलेल्या वेगवेगळ्या युक्त्या वापरून अरुण तुला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतोय , त्याचे तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे . घरी बोलावून एका पुस्तकात सांगितल्या प्रमाणे तो तुला इंप्रेस करायचा प्रयत्न करणार हे तिच्या मनावर तो बिंबवतो . या सगळ्या घडामोडींचा कर्नलला अंदाज येतो . कारण नसताना हा प्रयोग करायला जाऊन अरुण रंगाचा बेरंग करणार ही शंका कर्नलला येते . हे थोपवण्यासाठी कर्नल अरुणच्या घराकडे निघतो . हा क्लायमॕक्सचा प्रसंग आहे . जय्यत तयार अरुण प्रभाची वाट पहात असतो ठरल्याप्रमाणे प्रभा येते . तिला नागेशने व्यक्त केलेली शंका खरी वाटायला लागते . प्रभाचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून पापभिरू अरुण भानावर येतो . पुस्तकात वर्णन केलेली ट्रिक अरुण डोक्यातून काढून टाकतो . हॉलमधील पडदे पूर्ण उघडतो मोकळी हवा घरात येते . प्रभाच्या शंका कुशंका पळून जातात . बेल वाजते दरवाज्यावर कर्नल आणि नागेश दोघेही येऊन धडकतात . पण त्यांना जे वाटत असतं असं काहीच आतमधे घडलेलं नसतं . अरुण प्रभाची दिलजमाई झालेली असते . दोघे कायमसाठी एकमेकांच्या जवळ आलेले असतात . हम दोनोने शादी करनेका फैसला किया है . प्रभाच्या या हॕपी नोटवर अरुण प्रभा प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण होते .

प्रेमाच्या त्रिकोणाची ही संयमित प्रेमकहाणी पुन्हा एंजॉय करण्याचा निखळ आनंद देऊन हा चित्रपट संपतो .

आणि हो , प्रत्यक्ष आयुष्यात असा कुणी कर्नल भेटत नसतो . आपल्यासाठी कर्नल आपल्यालाच व्हावे लागते !

©मुकुंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu