पूजेचे ताट – गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य

भाद्रपद महिना जवळ आला की घरोघरी गणपतीची तयारी सुरू होते. लॉकरमध्ये ठेवलेली चांदीची भांडी बाहेर निघतात.  तांब्या,  पितळेची भांडी घासून लख्ख केली जातात. गणपतीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी लगबग सुरू होते. बाजारातही उत्साह ओसंडून वाहत असतो.

चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे सकाळीच वाजत गाजत आगमन झाल्यावर गणपतीची शोडषोपचार पूजा करण्यासाठी पळी, पंचपात्री, तांब्या, भांडे ,ताम्हण अशी सर्व तयारी करायची असते.

पूजेच्या ताटात हळदी ,कुंकू, गुलाल, शेंदूर, अष्टगंध या महत्त्वाच्या गोष्टी असायला हव्यात. शेंदूर हा तेलात मिसळून लावतात तर गुलाल आणि अष्टगंध पाण्यात मिसळून लावले जाते.

या पूजेच्या ताटात बुक्का आणि अक्षता ही एका वाटीत ठेवाव्यात आणि गणपतीला घालायचे दागिने जसे चांदीचे हार, मुकुट हेही ताटात ठेवावेत.

गणपतीला स्नान घालण्यासाठी लागणारे दूध ,पंचामृत इत्यादी ताटात ठेवावे त्याचबरोबर विड्याची पाने, हळकुंड ,बदाम, पाच नाणी ,पाच खारका ,गूळ खोबऱ्याची वाटी, हळदी, कुंकू, जास्वंद ,एकवीस दुर्वांची जुडी ,लाल फुले,एकवीस प्रकारची पत्री इत्यादी गोष्टी पूजेच्या ताटात नक्की असाव्यात.
गणपतीला मंत्रोच्चाराच्या घोषात स्नान घातले जाते त्यासाठी दूध आणि पंचामृत लागते त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून बाप्पाच्या आवडते जास्वंदीचे फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी आणि पत्री वाहिली जाते.
त्यानंतर गणपतीला जानवे आणि कापसाचे वस्त्र घातले जाते त्यामुळे पूजेच्या ताटात जानवी  झोड, एकवीस मणांचे  कापसाचे वस्त्र ही ठेवावे.
त्याला हळदीकुंकू  लावावे तसेच पूजा झाल्यावर गणपतीची आरती करण्यासाठी तूपाचे निरांजन, समयी, वाती, कापूर ,कापराचे निरांजन, उदबत्ती धूप ,अत्तर  अशा गोष्टीही ताटात असाव्यात.

देवाच्या शेजारी समयी अखंड तेवत ठेवण्याची प्रथा आहे.  तसेच वातावरण सुगंधी प्रसन्न करण्यासाठी धूप अगरबत्ती लावली जाते.

गणपतीसमोर पाच फळे ,विडा, सुपारी आणि नारळ ठेवतात .फुले आणि दुर्वांसाठी  एक वेगळे ताट अथवा परडी ठेवावी.   अशाप्रकारे छान ताट सजवून गणपतीच्या पूजेची तयारी करावी आणि साग्रसंगीत पूजा करून गणपतीला  नैवेद्य दाखवावा.  गणपतीच्या नैवेद्यात वरण, भात ,भाजी ,पोळी ,मोदक चटणी ,कोशिंबीर असे सर्व प्रकारचे पदार्थ असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu