टाळकुटे – देश कुठे ?

सर्वप्रथम तर आपण एक गोष्ट स्वतःसोबत (तरी) स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपण हा देश ‘चालवण्यास’ खऱ्या अर्थाने लायक आहोत का? स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर असा कटू सवाल कदाचित काहींना पचणार नाही. पण औषध कडू असते, आणि त्यामुळे ती मात्रा लागू पडते. वास्तविक पाहता अशावेळी आपला देश किती प्रगती करतोय, विविध क्षेत्रात आपण कसे पुढाकार घेत आहोत. देश कसा विकसनशील आहे वगैरे गमजा मारण्यात काही मजा नाही. कारण ‘विकसनशील’ वगैरे असे काही असत नाही. एक तर तुम्ही विकसित असता किया अविकसीत ‘विक्सनशील’ हा शब्दच्छल आहे. आणि स्वातंत्र्यापासून देश फक्त या आणि अशाच शब्दाच्छलावर चालत आहे.

भौतिक प्रगती म्हणजे विकसीतपणा असे म्हणणे सुद्धा आततायीपणाचे ठरेल, पण भौतिक सुखाकडे पाठ फिरवणे देखील मुर्खपणाचेच नाही का होणार? अन् हा देश (पक्षी आपण) याच प्रायसिस’ मध्ये अडकून पडला आहे. आपल्याला अजून ठरवता नाही आलेले की नेमके काय मिळवले की आपण समाधानी होऊ शकतो. (‘सुखी होऊ’ असे नाही म्हणत, कारण व्यक्तिपरत्वे सुखाची संकल्पना बदलू शकते.) सामाजिक दरी दिवसागणिक रुदावत आहे. धर्म-जातीच्या भिती पुढची अनेक शतके अबाधित राहतील याची तजवीज आजदेखील केली आहे. शिक्षणाच्या नावाने जो काही सावळा गोंधळ इतकी वर्षे अव्याहतपणे सुरु आहे, त्याबद्दल अधिक काही सांगणे नलगे. त्यामुळे गेल्या अनेक पिढयातून फक्त कारकुनांची संख्या आपण वाढविली. या शिक्षणाने आपण साक्षर झालो. सुसंस्कृत नाही.

कारण शिक्षणाची खरी ताकद आपण ओळखली आहे असे आजही ठामपणे नाही सांगता येत. अजूनही आपण चमत्कारांनाच नमस्कार करताना दिसतो. त्यामुळे भोंदू बाबा, बुवा, अम्मा, दिदी यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते आहे. ‘ज्ञानेश्वरी’तील एक ही ओवी माहित नाही, मात्र रेडयापासून ते भितीपर्यंतचे सगळे चमत्कार पाठ असलेल्यांना एक्च सांगावेसे वाटते की ज्या काळात तुम्ही भिंती चालवण्याच्या चमत्काराला नमस्कार करत होता तेव्हा मितीपलीकडील देशांत गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलविज्ञानात महत्वाचे संशोधन सुरु होते. ऑक्सफर्ड विद्यापिठात शास्त्रज्ञ, तत्वज्ञ विविध विषयावर मौलिक वाद घालत होते. अन् आपण मात्र चमत्काराप्रती टाळ वाजवत, गुणगान करत तथाकथित धर्म जातीने मान्य अमान्य केलेला आपापला कोपरा भरुन काढण्याचे काम इमानेइतबारे करत होतो.

तसेही आपल्याकडे टाळकुटयांचीच संख्या अधिक आहे. स्वतंत्रपणे विचार करण्यास संपूर्णपणे नालायक ठरतील असे थोर अनुयायी बनविण्याकडे आपला भर राजकिय नेत्यांच्या मागे पुढे झुलणारे हे ‘झुलवे’ जेव्हा मतदारांच्या ‘काळ्या’ केलेल्या बोटाचा आधार घेत संवैधानिक पद प्राप्त करतात तेव्हा ही जगातील सर्वात मोठी लोकशाही ‘पांढरे निशाण’ फडकवताना दिसते. आणि आम्ही मात्र सांगत असतो, “भारत बडा शांतीप्रिय देश है!”

– किशोर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu