बैल आणि आंघोळ © डॉ. मिलिंद न. जोशी
चाळीसएक वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. दापोलीहून आंजरल्याला एसटी बसने सकाळी पावणेनऊला पोहोचलो. समोर लहानसा पाण्याचा पट्टा दिसत होता. पलीकडे आंजर्ले गाव. पलीकडे जाण्यासाठी ‘तर’ होती. त्या लहानशा बोटीला ‘तर’ म्हणतात हे तेव्हाच समजलं आणि ज्ञानवृद्धी झाली. तशा बऱ्याच गोष्टी नवीन समजत होत्या आणि बरेच नवीन शब्दप्रयोग देखील कळत होते. तर त्या तरत्या तरीतून तरत पैलतीरी गेलो. पैलतीरावर आमच्यासाठी गाड्या तयार असतील अशी आमच्यातील एका ग्रूप लीडर काकांनी सांगितलेली माहिती प्रत्यक्षात उतरलेली दिसेना. इथे गाड्या म्हणजे बैलगाड्या असा अर्थ अभिप्रेत असल्याचं वडीलधाऱ्यांच्या बोलण्यातून उमगलं. लांबवर एक बैलगाडी आमच्या दिशेने येताना दिसल्यावर हायसं वाटलं. ग्रुप लीडर काका लगेच पुढे सरसावले. अजून एक बैलगाडी येणं अपेक्षित होतं. बैलगाडी जवळ आल्यावर त्यातून गवताचे ‘भारे’ खाली उतरले गेले. त्यानंतर बैलगाडीवाला जेव्हा गाडीचे बैल सोडू लागला तेव्हा काकांना शंका आली आणि त्यांनी त्या गाडीवाल्याशी आम्हाला घेऊन निघण्याबद्दल व दुसरी गाडी येण्याबद्दल विचारणा केली तेव्हा गाडीवाल्यास ‘अचंबा जाहला’. त्याला आम्हाला नेण्यासाठी पाठवलं नसल्याचं समजल्यावर, आमच्या पुढील भवितव्याविषयी आपसात चर्चा सुरू झाली आणि दुसरं कुठलंही साधन दृष्टीपथात नसल्याने त्याच बैलगाडीवाल्याला विचारणा करण्याचं विचारांती ठरलं. एव्हाना त्या सोडलेल्या बैलांचा कडबा खाऊन झाला होता. बैलगाडीवाल्याने मग थोडे ‘आढेवेढे’ घेतले आणि त्याच्या बैलगाडी ‘ट्रान्सपोर्ट’ची किंमत वाढवून घेतली. आता एव्हढया नऊ-दहा जणांना सामानासकट बैलगाडीत बसण्यास जागा उपलब्ध नव्हती आणि तसं केल्यास रस्त्यात बैलच खाली बसण्याची शक्यता बैलगाडीवाल्याने वर्तवली. त्यावर तोडगा म्हणून गाडीवान व महिलावर्ग सामानासह बैलगाडीत बसून आणि पुरूष मंडळींनी बैलगाडीच्या बाजूने चालत मुक्कामी पोहोचायचं असं ठरलं. अंतराचा अंदाज नसल्याने पुरुषवर्गाकडून होकार मिळाला. मुद्दा फक्त अंतराचाच नसून ज्या मार्गाने जावं लागणार होतं त्याचाही होता, हे मार्गक्रमणा सुरू झाल्यावर लक्षात आलं.
प्रवास सुरु झाला. सुरुवातीचा रस्त्याचा थोडा डांबरीवजा टप्पा पार पडल्यावर, बैल लाल मातीतून चालू लागले आणि गाडीवान दादांच्या, खरंतर बैलांसाठी असलेल्या ओरडण्याने अधूनमधून आम्हीही दचकू लागलो. आम्ही बैलगाडीमागून चालत होतो. नंतर लालमातीचा कच्चा रस्ता संपला आणि उबडखाबड रस्ता सुरू झाला. प्रवासाला खडखडाटाचं पार्श्वसंगीत लाभलं. ते अचानक थांबलं आणि एकंदरच प्रवासाचा वेग मंदावला. पुढचा प्रवास पुळणीतून सुरू झाला. ‘पुळण’ हा शब्द देखील माझ्यासाठी नवीन होता. ‘पुळणीतून चालताना वेळ लागणारंच’, हे वाक्य गाडीवानासकट बहुजनांनी म्हटल्यावर पुळण म्हणजे वाळू असा अर्थबोध झाला. एव्हाना साडेअकरा झाले होते. खाली तापलेली कोरडी पुळण, डोक्यावर तप्त सूर्यनारायण असा रखरखीत प्रवास सुरु होता. अर्धा-पाऊण तास झाल्यावर गाडीचे बैलही दमले असावेत. कारण काहीवेळा आमचा चालण्याचा वेग जास्त असे तर काहीवेळा बैलांचा. मजल दरमजल करत मुक्कामी पोहोचलो.
मुक्कामाच्या घराची रचना थोडी वेगळी होती. साधारणतः गुरांचा गोठा मागील दारी असतो. ह्याठिकाणी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला दोन बैल बांधलेले होते आणि उजव्या बाजूस भिंत. त्या दोन्हींच्या मध्ये एखादया खिंडीसारखी चिंचोळी ,चार-पाच फूट रुंदीची पट्टी तयार झाली होती. इथे आमचं स्वागत अगदीच वेगळ्या प्रकारे झालं. आत शिरताना त्या डावीकडच्या बैलांची कल्पना नसल्याने, प्रथम आत शिरलेल्या एक मावशी एकदम दचकून माघारी परतल्या. कशामुळे ‘असं’ झालं ते समजेना. धक्का ओसरल्यावर त्यांनी डाव्या बाजूला बैल असल्याचं व ते बैल मारकुटे वाटत असल्याचं सांगितलं. तिथपर्यंत आम्ही बाहेरच अंगाखांद्यावर सामान बाळगत उभे होतो. चिक्कार दमलो होतो. ‘घरात शिरणं’ हे कौशल्याचं काम असल्याचं लक्षात आलं. मग एकेक करून, भिंतीच्या लगत, सरकत-सरकत आत घुसलो. आत माणूस शिरलेला पाहिल्यावर बैल मानेला जोरदार हिसडा देत आपला राग व्यक्त करत. बैलांच्या स्वागतानंतर घरमालकांच्या स्वागताचा सामना करावा लागेल ह्याची कल्पनाही केली नव्हती. ते त्या बैलांचे मालक म्हणून शोभत होते. अगदी किरकोळ अंगकाठीच्या ह्या गृहस्थांचा राग अनावर झाला होता. आम्हाला बसा वगैरे काहीही न म्हणता, त्यांच्या नात्यातल्या आणि संपर्कातल्या आमच्या ग्रुप लीडर काकांवर हे वसकन ओरडले; ‘होतात कुठे? काल संध्याकाळी गाड्या पाठवल्या होत्या आंजरल्यास, तुम्हाला आणायला. तुम्ही नव्हतात. माझं भाडं फुकट गेलं.’ काकांना ऐकू येण्याची समस्या असल्याने त्यांना घरमालक त्यांची व प्रवासासंबंधी चौकशी करत असल्याचं वाटलं. ‘ठीक आहे तब्येत. मुंबईला सगळं ठीक.’ असं त्यांनी उत्तर दिल्यावर घरमालक अधिकच खवळले. ‘तुम्ही ठीक आहात ते माहित्ये. उशीर का झाला? ते विचारतोय.’ तरी काकांना ते समजेना. मग बरोबरच्या दुसऱ्या काकांनी थोडक्यात माहिती दिली आणि घरमालकांस शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हढ्यात पाणी आलं. मागोमाग चहा देखील आला. आता परिस्थिती निवळत्ये असं वाटत असतानाच घरमालकांनी एकदम गर्जना केली, ‘बैल लावलेले आहेत, आंघोळी करून घ्या.’ आमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा अर्थबोधच होईना. बैलांचा आणि आंघोळीचा परस्पर संबंध समजेना. ‘बैल गेला आणि झोपा केला.’ ह्या म्हणीत अर्थाने नसला तरी बैल आणि झोपेचा (खरंतर ‘झोपा’ म्हणजे गोठयाचा कच्चा दरवाजा) उगीचच संबंध दिसत होता. बैल आणि आंघोळ, हे शब्द एकत्रित आलेली एखादी म्हणही लक्षात येईना. तो आंघोळीबद्दलचा ‘घोळ’ काही समजेना. आम्ही बुचकळ्यात पडल्याचं आमचे चेहेरे सांगून गेले असावेत. ‘अहो, बैल म्हणजे रहाटाचे बैल; रहाट सुरू केलाय, असं सांगतोय मी.’ घरमालकांनी त्यांच्या दरड्या आवाजात आणि करड्या नजरेनं स्पष्टीकरण दिलं. त्याने ते रागीट बैलही दचकल्याचं आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसलं आणि आम्ही त्या बैलांच्या नजरेखाली पण त्यांच्यापासून चांगलं चार ‘बैलां’चं अंतर ठेवून, उघड्यावरच्या आंघोळीचा अनुभव घेतला. आमच्या आंघोळीनंतर बैलांनी गेल्यागेल्या ‘झोपा’ केला की नाही ते माहीत नाही; आम्ही मात्र जेवल्यावर बराच वेळ ‘झोपा’ केला.
Thinkmarathi.com Podcast
डॉ. मिलिंद न. जोशी
Email : [email protected]