परिमळ ….. © मुकुंद कुलकर्णी

वाहत ये झुळझुळ वारा 
दरवळला परिमळ सारा…..

सुगंध , चित्तवृत्ती उल्हसित करणारा सुगंध . परमेश्वराने मानवाला दिलेली अद्भुत देणगी . वेगवेगळे सुगंध आपल्याला आनंद देऊन जातात. त्याचबरोबर काही गंधांशी आपल्या आठवणीही जोडल्या गेलेल्या असतात . सुगंध म्हटलं की , डोळ्यासमोर येतात ती टवटवीत फुलं . प्रत्येक फुलाचा वास वेगळा , रुबाब वेगळा . वनस्पती त्यांची पानं , फुलं , फळं इतकच काय पण , खोड आणि मुळंसुद्धा आपला वेगवेगळा सुगंध जपून असतात . फुला फळांबरोबरच खाद्यपदार्थांचे सुगंधही आपल्याला मोहवून टाकतात आणि जठराग्नी प्रदीप्त करतात . एवढेच काय काही मानवनिर्मित गोष्टींचा वासही सुखावतो . मला पेट्रोल , ऑईलपेंट आणि सिगरेटचा वासही आवडतो ! शाळेत असताना नव्या कोऱ्या पुस्तकाचा वास घेतला नाही , असं कुणाच्या बाबतीत घडलं असेल असं वाटत नाही .

लहानपणी , सोलापूरात आम्ही अगदी मध्यवर्ती उत्तर कसब्यात रहायला होतो . तेंव्हा वाडा संस्कृतीच होती . आमच्या समोरच्या वाड्यात बकुळीचा मोठा डेरेदार वृक्ष होता . बकुळीच्या सुकुमार नाजूक फुलांचा मादक वास आज कुठेही आला तरी तो मागे बालपणात घेऊन जातो . नाजूक असली तरी ही फुलं बरेच दिवस टिकतात आणि त्यांचा वासही टिकून राहतो . रात्री गच्चीवर झोपलो असता त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याबरोबर येणारा तो बकुळीचा मंद सुगंध आजही आठवतो .

तसाच स्वर्गीय वास पारिजातकाचा . समुद्रमंथनातून निघालेल्या या अद्भुत वृक्षाच्या फुलांचा वास स्वर्गीय असणार यात काय संशय ! पण अतिशय नाजूक आणि अल्पायुषी फुलं प्राजक्ताची . घरच्या अंगणातला प्राजक्त तर कल्पवृक्षच वाटतो . पहाटे दरवाजा उघडल्या बरोबर पारिजातकाचा सुगंध दरवळतो . पारिजातकाचा मंद , सात्विक सुवास दीर्घ श्वासाने छातीत भरून घेतल्यावर दिवसाची सुरुवात प्रसन्न होते .

पारिजातक

मॉर्निंग वॉकला जाताना ताज्या हवेबरोबरच , निरनिराळ्या फुलांचा , वनस्पतींचा वास आकर्षित करतो . वाहनांची रहदारी सुरू झालेली नसते . प्रदूषणाने वातावरणाचा ताबा अजून घेतलेला नसतो . या वेळात हे सुगंध आनंद देऊन जातात . लहानपणी आम्ही वाड्यातील मुलं तांबडं फुटायच्या आधी वाड्यातील सिनियर मंडळींबरोबर पार्क मैदानावर मॉर्निंग वॉकला जात असू . तेंव्हा पार्क मैदानात बुचाच्या फुलांची झाडं होती . गालिचा अंथरल्यासारखा फुलांचा सडा झाडाखाली पडलेला असे . लांब देठाची ही पांढरी शुभ्र फुलं आपल्या सौम्य सुगंधाने वातावरण भारून टाकत . आजही बुचाच्या फुलांचा वास आला की , लहानपणीचा पहाटेचा मॉर्निंग वॉक आठवतो . 

बुचाची फुले 

नंतर विजापूर रोडकडे रहायला आल्यानंतर हा अनुभव आणखीनच समृद्ध झाला . एकतर , मोकळं अंगण असल्याने झाडं लावायची , वाढताना पहायचा आनंद घ्यायचा आणि , आणि त्याच्या सुगंधाची अनुभूती घ्यायची हे शक्य झालं . तिकडे मॉर्निंग वॉकला जाताना , गोविंदश्री मंगल कार्यालया जवळच्या परिसरात एक शिरिषाचा डौलदार वृक्ष आहे . शिरिषाच्या फुलांचा सिझन , सारा वर्षभरात महिना पंधरा दिवसांचाच ,  पण त्या काळात सुगंधाच्या दुनियेत शिरिषाचं साम्राज्य असतं . सावरीच्या कापसासारखी शिरिषाची फुलं अतिशय नाजूक . सावरीच्या कापसाची फुलं , म्हातारी म्हणतात त्यांना , इतकी नाजूक आणि हलकी असतात की , हवेवर बराच वेळ तरंगत रहातात . शिरिषाचं फुलही खूप नाजूक , चवरी सारखच दिसतं . लांब देठ , चारी बाजूंनी पसरलेल्या केसांपेक्षा थोड्या जाड पाकळ्या , की ते केसरच . झाडावर लटकलेल्या शिरिषाचे गुच्छ फारच मोहक दिसतात . आणि सगळा आसमंत आपल्या मंद सुवासाने दरवळून टाकतात . त्यातही फिकट पोपटी रंगाच्या फुलाना सुवास असतो , गुलाबी रंगाच्या फुलांना सुवास नसतो . वनस्पतींमध्ये मला स्वतःला शिरिषाच्या फुलांचा सौम्य सुगंध फार आवडतो .

 सोलापूरात जो व्हिआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो , पांजरापोळ ते सात रस्ता , या रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी अलिकडेच सप्तपर्णीच्या झाडांचे वृक्षारोपण केले आहे .थंडीच्या दिवसात , नोव्हेंबर नंतर या रस्त्यावरून जाताना त्याचा मंद गोडसर वास नाकाभोवती रुंजी घालतो . गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीचे काही अंश सप्तपर्णीखाली लिहिले .

सप्तपर्णी

गुलाब हा तर फुलांचा राजाच . गुलाबामध्ये रंगांच जेवढं वैविध्य आहे , तेवढच त्याच्या सुगंधामध्येही आहे . लाल , गुलाबी , केशरी , पिवळा , पांढरा , मोतिया एवढच काय काळासुद्धा . खरं तर लाल , मरून , जांभळ्या रंगाच्या गुलाबाची अतिगडद छटा म्हणजे काळा गुलाब . प्रत्येक गुलाबाच्या सुगंधाची जातकुळी वेगळी . गावठी गुलाब जास्त करून गुलाबी , फिकट पिवळा , मोतिया , किंचित लाल रंगावर असतात . याचा सुवास अतिशय सौम्य असतो . ही सहजासहजी रुजतात , याला फुलं ही भरपूर लागतात भरपूर पाकळ्या असलेली डेरेदार फुलं असतात ही , पण कलमी गुलाबांसारखी ही फार काळ टिकत नाहीत . पाकळ्या गळायला सुरुवात होते . पण यांचा सुगंधही मोहवून टाकणारा असतो . कलमी गुलाबांमध्ये अगणित रंग आहेत . कलमी गुलाबात लाल , गुलाबी , पांढऱ्या , मोतिया रंगावरच्या गुलाबांचा टिपिकल ‘ गुलाब ‘ वास , पिवळ्या केशरी आणि उष्ण रंगसंगतीच्या गुलाबांचा किंचित तिखटसा वास . हे सर्व गुलाब आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण सुगंधाचा वारसा जपून आहेत .

गुलाब

रातराणीचा मादक सुवास अक्षरशः धुंद करून सोडतो . सूर्यास्तानंतर उमलायला सुरू होणारी रातराणी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या पूर्ण भरात असते . सगळा आसमंत रातराणी आपल्या आक्रमक सुवासाने जादूई करून सोडते . असा समज प्रचलित आहे की , रातराणी , केवडा व हिरवा चाफा यांच्या उन्मत्त सुगंधाने बेधुंद होऊन नाग , सर्प त्याकडे आकृष्ट होतात .

रातराणी

सुरंगीचे मादक वासाचे फूल सहसा किनारपट्टीवर आढळते . गोवा , कोकण , कारवार परिसरात सुरंगी मुबलक . सुरंगीचे सुगंधी वळेसर कोकणात महिलांना अतिप्रिय आहेत .
निशिगंध , मोहक सुवास असलेले हे पांढरेशुभ्र फुल आपल्या आपल्या सुगंधाबरोबरच आपल्या शिडशिडीत बांध्यानेही मोहवून टाकते . फ्लॉवरपॉटमधील निशिगंधाच्या काड्या आख्ख्या घराला सुगंधीत करून सोडतात . आणि रोज नवीन कळ्या उमलत जातात आणि घर सुगंधीत ठेवतात . अमोल पालेकर , विद्या सिन्हा यांच्या अभिनयाने नटलेल्या रजनीगंधा चित्रपटात हे फूल मध्यवर्ती भूमिकेत होतं असं म्हणायला हरकत नाही ! 

निशिगंध 

सुगंधाच्या दुनियेतील राजस , सुकुमार , राजबिंडा राजकुमार म्हणजे मोगरा . उन्हाळ्याच्या गरम हवेमध्ये मोगऱ्याच्या झुडपावरून येणारी मंद वाऱ्याची झुळूक म्हणजे स्वर्गीय सुगंधाची अनुभूतीच . लहानपणी घरोघरी पाण्याचे माठ असायचे . फ्रीज वगैरे तेंव्हा चैनीची आणि मध्यमवर्गीयांना न परवडणारी गोष्ट . माठातील थंडगार पाण्यात टाकलेली चार मोगऱ्याची फुलं पाण्याला सुगंधित तर करायचीच पण , पिणाऱ्याचा सगळा शिणवठा दूर करायची . त्याकाळी मोगऱ्याचा गजरा म्हणजे प्रेमीजनांचा वीक पॉईंट होता . बायकोचा रुसवा काढण्याचं ते एक साधन होतं ! मदनबाण किंवा वेली मोगरा , आकाराने थोड्या मोठ्या पाकळ्या असलेली ही फुलंसुद्धा आपल्या सुगंधाने मोहवून टाकतात .गुच्छामध्ये वाढणारा बटमोगरा किंवा हजारी मोगराही आपला वेगळा सुगंध मिरवतो . मागे निव्हियाची क्रिम मिळायची त्याला बटमोगऱ्याच्या फुलांसारखा वास असायचा . उन्हाळा सरतासरता जेंव्हा मोगऱ्याचा बहर हळूहळू कमी व्हायला लागतो तेंव्हा ती जागा भरून काढते नाजूकशी सायली . अतिशय सुकोमल आणि तेवढाच नाजूक सुगंध असलेल्या सायलीचं मग काही दिवस राज्य चालतं . 

मोगरा

जाई , जुई या तर सौरभ स्वर्गातील पऱ्याच .

 ” पुढे असावा बाग बगीचा .   

   वेल मंडपी जाई जुईचा

   आम्रतरुवर मधुमासाचा

   फुलावा मोहर पानोपान . ”               

हे भावगीत म्हणजे प्रत्येक गृहिणीचं स्वप्नच . जुईचा मंद सुगंध आणि आणि जाईचा थोडासा उग्र , उग्र नाही म्हणता येणार पण थोडासा ठळक सुगंध मोहवतो . जाई ,जुई किंवा लाल पांढऱ्या मधुमालतीच्या मांडवाखालून घरात होणारा सुगंधी प्रवेश कुणाला नाही आवडणार ? घराभोवतालच्या बागेला जाईजुई शिवाय पूर्णत्व नाही 

या मातबर मंडळींशिवाय कण्हेर , अनंत आदी सुगंधाचे शिलेदारही सुगंधाच्या साम्राज्यात आपले महत्त्व राखून आहेत . 

चाफ्याच्या उल्लेखाशिवाय सुगंधयात्रा अपूर्णच . देवचाफा , पांढरा चाफा , सोनचाफा , पिवळा चाफा , कवठी चाफा , नाग चाफा , तांबडा चाफा , भुई चाफा आणि हिरवा चाफा या चाफ्याच्या वेगवेगळ्या जाती आपापल्या वैशिष्ट्यांसह मशहूर आहेत . उष्ण हवामानाच्या प्रदेशात जास्त करून आढळणाऱ्या चाफ्याच्या सर्व प्रकारच्या फुलांना खूपच चांगला सुगंध असतो . त्यातल्या त्यात सुवर्ण चंपक म्हणजेच सोनचाफा आणि हिरवा चाफा हे मानकरी . कवी बी यांची लतादीदींनी अजरामर केलेली काव्यरचना ” चाफा बोलेना ” सर्वश्रुत आहे . ” लपविलास तू हिरवा चाफा.” हे गदिमांचे गीत हिरव्या चाफ्याची गंधमोहिनी सांगून जाते . हिरव्या पानाआड दडलेला हिरवा चाफा ओळखूही येत नाही . तो हिरव्या रंगावर असताना त्याला वास येत नाही पण तो जसजसा पक्व व्हायला लागतो तसतसा त्याचा सुगंध दरवळायला लागतो . पूर्ण पक्व झाल्यावर हिरव्या चाफ्याचे फुल पिवळ्या रंगाकडे झुकायला लागते . 

 चाफा

झाडांना येणारा मोहोर हा सुगंधाच्या विश्वातला आणखीन एक चमत्कार आहे . भर उन्हाळ्यात कडुनिंबाच्या झाडाला येणारा मोहराचा वास हा नैसर्गिक सुगंधाचा केवळ अलौकिक नमुना आहे . आंब्याच्या मोहरालाही एक प्रकारचा मंद सुवास असतो . जांभळाच्या झाडालाही उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो . मंद सुवास असतो त्याला . जांभळाची पानेही मंद सुगंधीत असतात . लिंबाचे पान चुरडले तर त्याला लिंबाचा सुगंध येतो . चहा करताना चहापत्ती उकळत असता त्यात लिंबाची कोवळी पाने टाकली , तर त्याला लिंबाचा सुंदर अरोमा येतो . जंगलात उंच वाढलेली सरळसोट सागाची झाडं जेंव्हा मोहराने लगडतात तेंव्हा अतिशय मोहक दिसतात . तसा तर सर्वच झाडांचा मोहर हा सुगंधित असतो . आजही उन्हाळ्याच्या दिवसात कडूनिंबाच्या मोहराचा वास शालेय जीवनातील परिक्षेच्या दिवसांची आठवण करून देतो . 

पहिल्या पावसाच्या धारा जेंव्हा धरतीवर बरसतात तेंव्हा मातीचा येणारा वास ‘ मृद्गंध ‘ हा तर निसर्गाचा अलौकिक चमत्कारच आहे . त्याची सर दुसऱ्या कशालाही नाही . 

नक्षत्रांचे देणे लाभलेल्या खानोलकरांना मृत्यूशय्येवर देखील स्फुरले हे अद्भुत काव्य

” अखेरच्या वळणावर यावा

   मंद सुगंधी असा फुलोरा

   थकले पाऊल सहज पडावे

   आणि सरावा प्रवास सारा . ” 

निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेली ही सुगंधयात्रा !

  • मुकुंद कुलकर्णी © 
Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu