उन्हाळ्यातील स्वागत – माठातील पाणी..
उन्हाळ्याने सुरुवातीलाच उच्च पातळी ओलांडली आहे. तापमापकातील पारा चढू लागला की आपल्या शरीराची पाण्याची गरज वाढू लागते. आपल्या सर्व गरजा भागविण्याच्या पूर्वीच्या पद्धती या पर्यावरणस्नेही होत्या. माणसे बाहेर उन्हामध्ये वावरताना , सुती कापडाच्या अनेक वेढ्यांचे पागोटे, मुंडासे बांधत असत. छत्री,पगडी, टोपी सुद्धा वापरायचे. स्त्रिया डोक्यावरून पदर घेऊन डोके आणि कानांचे रक्षण करीत असत. बाहेरून घरी आलेला माणूस घराबाहेरच आधी हात पाय आणि तोंड धुवून घरात येत असे. तेथेच आपल्या body cooling ला सुरुवात होत असे. अनेक घरांमध्ये झोपाळे असायचे. त्यावर बसल्यावर आपोआप वारा घेतला जायचा. हाताने वारा घेण्यासाठी वाळ्याचे किंवा ताडपत्रांचे हातपंखे देखील असायचे. त्यानंतर पाहुण्याला तांब्याभांड्यातून पाणी आणि त्यासोबत गूळ दिला जात असे. तांब्याभांडे साधारणतः तांबे किंवा कांसे ( नंतर पितळेचे ) या धातूचे असायचे. हे पाणी फारसे थंड नसायचे. पण गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी प्यायले की समाधान वाटायचे. गूळ हा पूर्वी सेंद्रिय पद्धतीनेच तयार व्हायचा. गूळ सेवनामुळे, घामाद्वारे शरीरातून निघून गेलेले अनेक घटक, पटकन भरून येत असत, कंठशोष कमी होत असे. सतत पाणी पित राहावे असे वाटणे, कितीही पाणी प्यायले तरी समाधान न होणे या गोष्टी टळत असत. गुळामध्ये व्हिटॅमिन बी ६, बी १२,आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खनिजांचा खजिनाच भरलेला असतो. पाणीही खूप थंड नसल्याने, तापलेल्या शरीराचे तापमान झटकन खाली न येता, सावकाश कमी होते. उष्माघातासारख्या प्रकारांची शक्यता खूप कमी होते.

तेव्हा पाणी अधिक थंड करण्याचा प्रकार नव्हता. पण नंतर मात्र यासाठी मातीच्या मडक्याचा म्हणजे माठाचा उपयोग सुरु झाला. माठाला असलेल्या सूक्ष्म छिद्रांमधून आतील पाणी अल्प प्रमाणात बाहेर झिरपते. बाहेरील हवा आणि उष्णतेमुळे त्याचे बाष्पीभवन होताना, माठातील पाण्यातूनही उष्णता खेचली जाते. ही प्रक्रिया सतत सुरु असल्याने आतील पाण्याचे तापमान कमी होत राहते. माठ जर हवेशीर जागेवर ठेवला किंवा त्याला ओले फडके गुंडाळून ठेवले तर ही प्रक्रिया अधिक परिणामकारक होते. या माठाच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये आतील पाण्यामधील धुळीचे कण अडकतात किंवा बाहेरच्या बाजूला धूळ किंवा ओलसरपणामुळे शेवाळं साचते. परिणामी छिद्रे बुजतात. त्यासाठी हा माठ चुलीवर खूप तापविला जात असे. परिणामी छिद्रे मोकळी होऊन माठ पुन्हा उत्तम काम करू लागत असे. यामुळे ठराविक कालावधीत तरी तो निर्जंतुकही होत असे.

माठ हा खास प्रकारच्या मातीपासून बनविला जातो. मातीमधील खनिजद्रव्ये आणि चुंबकीय ऊर्जा असते. या दोन्ही गोष्टी आतील पाण्यात, अल्पप्रमाणात मिसळल्याने ते पाणी आरोग्यवर्धक होते. माती ही अल्कधर्मी ( Alkaline ) असते आणि आपले शरीर आम्लधर्मी ! माठातील पाण्यात अल्कधर्मी खनिजे विरघळलेली असल्याने ती शरीरातील आम्लता कमी करते. शरीराची हैड्रोजन अणूंची तीव्रता ( pH level ) योग्य पातळीवर ठेवण्यास मोलाची मदत करते. मातीचे महत्व आपल्या लक्षात येते. ज्या प्राण्यांच्या कातडीवर नैसर्गिक केसांचे आवरण कमी असते असे अनेक प्राणी, उन्हाळ्यामध्ये नुसत्या पाण्यात डुंबण्याऐवजी चिखलामध्ये जाऊन बसलेले पाहायला मिळतात. हे एक प्रकारचे मड पॅकींग म्हणायला हवे. पूर्वी माठातील पाण्यामध्ये वाळा, मोगऱ्याची फुले, बकुळीची फुले टाकलेली असत. त्याचा पाण्याला येणार सुगंध हा माणसाच्या तृषाशांतीबरोबरच मनालाही टवटवीत करीत असे.
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्या धार्मिक संकल्पना खूप प्रगत होत्या. पाणी हे भारले जाऊ शकते, त्याला स्मृती असते असे मानले जाते. आपल्या अनेक धार्मिक विधींमध्ये, मंत्र म्हणतांना पाणी शिंपडले ( प्रोक्षण ) जाते. पंचमहाभुतांपैकी पाणी हे वीजवाहक आहे. विजेचा जमिनीशी संपर्क आला तर earthing होते, विजेचा प्रभाव कमी किंवा नाहीसा होतो. त्यामुळे पूर्वी प्यायला पाणी दिल्यावर ते भांडे ( फुलपात्र, पेला, तांब्या ) खाली टेकून मग प्यायले जायचे. पाणी सावकाश प्यायल्यामुळे शरीराची गरज भागतेच पण त्याबरोबरच मनही तृप्त होते. या उलट आपण जर straw ने पाणी प्यायलो तर ते थेट घशात जाते. शरीराला पाणी मिळते पण मन तृप्त होत नाही. हेच शीतपेये पितांनाही होते. पूर्वी बाहेरून आल्यावर भराभर पाणी पिणाऱ्याला घरातील ज्येष्ठ माणसे, ” ढसाढसा पाणी पिऊ नकोस ” असा दम भरत असत. भारतात पाण्याला खूप पवित्र मानतात. पाणी पिण्यासाठी हंड्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये भरून ठेवले जाते, त्याला फूल वाहून नमस्कार करण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी पाळली जाते.
फ्रिजमधील किंवा बर्फ घातलेले पाणी प्यायल्यावर पुन्हा लवकर तहान लागते. खूप उकाड्यामध्ये इतके थंड पाणी प्यायल्याने घशाला त्रास होतो. अनेकदा बर्फ बनवितांना दूषित पाणी वापरले जाते. त्याचाही त्रास होऊ शकतो. पण माठातील थंड पाणी प्यायल्यावर या सर्व गोष्टी टळू शकतात. आता तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी हा एक राक्षसच आपण निर्माण केला आहे.
जलदान, जलकुंभ दान, पाणपोई या सर्व कल्पना, धार्मिक रूढी आपण मोडीत काढून पाणी विकायला काढले. जगभरात फेकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या कोट्यवधी रिकाम्या बाटल्या या पर्यावरणाचा नाश करीत आहेत. या शिवाय या बाटल्यांमधील पाण्यामध्ये, प्लॅस्टीकमधील कांही रसायने विरघळतात. त्यामुळे हे पाणी पिण्याच्या दृष्टीने धोकादायक होते. अशी रसायनेयुक्त प्लॅस्टिकचा लहान मुलांच्या बाटल्यांमध्ये वापर करण्यास बंदी आहे.


