हिंदू धर्मातील सोळा संस्कार 

हिंदू धर्मात पूर्वापार १६ संस्कार सांगितलेले आहेत. याशिवायही काही संस्कार केले जातात ते परंपरेने केले जातात. मूळ सोळा संस्कारात ते समाविष्ट नाहीत. जसे षष्ठी पूजन, प्रथम वाढदिवस, प्रथम केशखंड (जावळ), विद्यारंभ वगैरे. 
सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे.  

गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :
गर्भाधान
पुंसवन
अनवलोभन
सीमंतोन्नयन
जातकर्म
नामकरण
सूर्यावलोकन
निष्क्रमण
अन्नप्राशन
वर्धापन
चूडाकर्म
अक्षरारंभ
उपनयन
समावर्तन
विवाह
अंत्येष्टी
 
गर्भाधान संस्कार : 
गर्भाधान संस्काराला ऋतुशांती संस्कार असेही म्हणतात.  गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होऊन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे.
हा संस्कार करताना प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात.  हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे. 

१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जाते. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाते.

२. भगवंताच्या सृष्टीचक्राला गतीमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व आहे. सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणार्‍या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पुंसवन संस्कार :

गर्भधारणा झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी हा संस्कार केला जातो. गर्भ आहे हे कळल्यावर लगेचच अथवा तिसऱ्या महिन्यात शु. एकादशीपासून वद्य पंचमीपर्यंत रिक्त तिथी सोडून कोणत्याही तिथीला हा संस्कार करावा. पुष्य किंवा श्रवण नक्षत्राला सोमवार , बुधवार , गुरुवार , शुक्रवारी हा संस्कार करावा. 

अनवलोभन संस्कार – दुर्वांचा रस मुलीच्या उजव्या नाकपुडीत पिळणे.   
यामध्ये मुलीच्या हाताने दुर्वा सहाणेवर वाटून त्याची गोळी करतात , गर्भवती स्त्रीला पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवितात. तिच्या पाठीमागे होऊन पटीने स्वछ वस्त्रात दुर्वांची गोळी ठेवून तिचे मुख वर उचलून उजव्या नाकपुडीत दुर्वांचा रस पिळला जातो. उजवी नाकपुडी पिंगळानाडीची आहे. बहुतेक कार्ये यशस्वी होण्यासाठी पिंगळानाडी कार्यरत असणे पूरक ठरते. अश्वगंधा किंवा दूर्वा यांच्या रसाने ती नाडी कार्यरत होते.
सुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण संततीच्या जन्मासाठी म्हणून हा संस्कार केला जातो.
 
सीमंतोन्नयन संस्कार – 
या संस्कारात पतीने स्त्रीचे पश्चिम बाजूस पूर्वेकडे मुख करून उभे राहावे व कच्च्या उंबराचे सॅम संख्यात्मक घोस, साळीजनावराचे काटे आणि कावळे तीन दर्भ घेऊन स्त्रीचे मस्तकापासून भंगापर्यंत चार वेळा केस विंचरून बांधावे. नंतर काही ठिकाणी उंबराची माळ स्त्रीच्या गळ्यात घालतात.   
पुंसवन ,  अनवलोभन , सीमंतोन्नयन  हे संस्कार एकेच दिवशी केले तरी चालतात.   
 
नामकरण संस्कार – बारसे 
जन्म झाल्यापासून मुलाला बारावे दिवशी व मुलीला तेराव्या दिवशी प्रथम पाळण्यात ठेवावे. याच दिवशी मुलाचे व मुलीचे व्यावहारिक नाव ठेवले जाते . याकरता इतर शुभ दिवस पाहण्याची गरज नसते. याच दिवशी सोनाराला बोलावून कां टोचून घेतले जातात. किंवा कां सोळाव्या दिवशी टोचले तरी चालतात. सवडीने बारसे करायचे असल्यास नक्षत्र , तिथी , वर असे शुभ दिवस बघून दिवस ठरवावा. अपरान्हकाळी म्हणजे दुपारी १२ ते २ व रात्री नामकर्म संस्कार करू नये. 
संकल्प , गणपतीपूजन , स्वस्ति पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध करून  काशाच्या ताटात किंवा चांदीच्या ताटात तांदूळ पसरून सोन्याच्या काडीने नाव लिहावे. नंतर होम करून आप्तेष्टांसह मिष्टान्न भोजन करावे. 
 
 
संदर्भ
सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
सोळा संस्कार -डॉ.स्वाती कर्वे,पुणे
भारतीय संस्कृती कोश खंड २
संस्कार आणि कुलाचार – पं. वसंत माधव खाडिलकर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu