ब्रह्मदेवांना डॉक्टरेट ?

स्वर्ग लोकातील समस्त देवगणांची  एक महासभा महामंत्री इंद्रदेवाच्या दरबारात आयोजित करण्यात आली होती. आयोजक होते स्वर्ग -मृत्यू- पाताळ या तिन्ही  लोकांतून येरझाऱ्या घालणारे  देवगणांचे दूत  देवर्षी नारद .विश्वनिर्माते  दस्तुरखुद्द ब्रह्मदेवांनी सभेचे अध्यक्षपद भूषविले होते .

नारदमुनींच्या  प्रस्ताविकाने  सभेला आरंभ झाला.  नारदमुनी म्हणाले “स्वर्गवासी उपस्थित देवगणहो, आजच्या सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत.  सर्वप्रथम जाहीर करतो की सभा आयोजित करण्यामागे स्वर्ग लोकांवर कुठल्याही संकटाचे सावट नाही,  देवगणांमधील हेवेदावे नाहीत,  अप्सरा मधील तू- तू- मैं- मैं- नाही किंवा आपले मुख्य शत्रू असूर  यांच्याकडूनही उपद्रवाचे संकेत नाहीत. 
“आजच्या सभेचा मुख्य विषय आहे ,पृथ्वीवरील मानवजात आणि त्यांच्या उपद्रवी कारवाया.  देवगणहो  पृथ्वीवरील प्राणीमात्रांनी  स्वर्ग लोकांच्या अनभिषिक्त वर्चस्वाला हादरे देण्याचा खोडसाळपणा आरंभला आहे   देवगणहो   आजच्या सभेचे अध्यक्ष देवराया ब्रह्मदेव यांच्या कर्तृत्वाबद्दल मी काय बोलावे?  ज्यांनी  ब्रह्मांड निर्मिले , अखिल विश्वाची निर्मिती केली,चराचर अस्तित्त्वात आणले , पृथ्वीवरील  अवघे स्थावर जंगम उदा.  भूभाग, अवकाश मार्ग, महासरोवरे , नद्या-  नाले , रमणीय सृष्टी त्यांमधील वृक्षराजी एवढेच नाही तर  मनुष्य प्राण्यांसह अनेक सस्तन  प्राणी , पशु, पक्षी ही सारी  ब्रह्मदेवाची किमया आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 

“दुर्दैवाची गोष्ट अशी की पृथ्वीवरील महाभाग आपल्या उपकारकर्त्याला साफ विसरले . पृथ्वीतलावर वास करणारे अनेक ज्येष्ठ – श्रेष्ठ विद्वान,  समाजसुधारक ,संशोधक , शास्त्रज्ञ , राजकारणी ,गुन्हेगार एवढेच काय महान साधु संत , स्वतःला ईश्वरी अवतार म्हणवणारे भोंदूबाबा सर्वासर्वांनी देवादिकांकडे  कानाडोळा केल्यामुळे देवदेवतांचे अस्तित्व धोक्यात देऊ पाहतेय”. 

“एक काळ असा होता की पृथ्वीतलावर जन्म घेताच प्रत्येक जण ईश्वराच्या आधीन  होऊन त्याचे ऋण  फेडायचा .  स्वतःच्या हितासाठी , कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी , द्रव्य प्राप्तीसाठी ,शत्रूपीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी अक्षरश: देवापुढे नाक रडायचा,  व्रतवैकल्ये,  नवससायास करायचा,  पूजापाठ , जप – जाप्य अशा अनेक मार्गांनी प्रसंगी लाचलुचपतीचा  अवलंब करून देवाला खूश ठेवायचा.”

 आज पृथ्वीतलावरील चित्र भयानक आहे . ईश्वर तत्त्वाचा मानवजातीला विसर पडत चाललाय.   ईश्वरभक्ती लोप पावण्याची चिन्हे दिसू लागलीत.   देवपुजा, नामस्मरण, भजन – कीर्तन या गोष्टी भकास मंदिरे  किंवा देवळापुरत्याच उरल्या  आहेत.  प्रसंगी देवादिकांना अडगळीत टाकण्याचा संकल्प जोर धरू लागला . पृथ्वीवर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ राबवणाऱ्या संस्थानी  तर धुमाकूळ माजवलाय. “
“कोण देव?  ईश्वर भक्ती म्हणजे काय ?  त्याची भक्ती कशासाठी ?  भगवंताला कुणी पाहिलय ?  कुणाला प्रसन्न  झालाय ? कुणाचं भलं बुर केलाय ?  कुणाला अमरत्व दिलयं ? निदान  गंभीर आजारातून उठवलंय? कोणाला श्रीमंती बहाल केलिय ?  गरिबांची पाठराखण केलीय ? अरे , मग त्याचा उद्योग उद्धव कशासाठी? देवाची स्थापना, त्याची पूजा- अर्चा ,जप-जाप्य, उपास तापास अशा फालतू गोष्टींसाठी वेळ  आहे कुणाला? 

“देवगणहो , मानवजातीत प्रचंड उलथापालत झाली आहे.  जो तो स्वतःच्या उत्कर्षासाठी ,अधिकाधिक प्रगतीसाठी, विकासासाठी झपाट्याने प्रयत्न करतोय.   नवयुगातील नवनवीन यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान , नवनवीन शोध यांच्या आकर्षणामुळे मानव बुद्धिवादी प्रयत्नशील आणि ध्येयवेडा बनलाय. उच्चं शिक्षणाचा लाभ आणि विद्वानांचा सहवास यामुळे प्रगतिशील बनला आहे.   झपाटल्यासारखा नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करताना भूभाग, जलाशय आणि अवकाशज्ञान या तीनही क्षेत्रात मानवाने प्रगती करताना आज त्याला गगन ठेंगणे झाले आहे .मानवाने गगनाला गवसणी घातलीय.   सूर्य, चंद्र ,नक्षत्र ,तारकांशी  हितगुज सुरू केले आहे.  अनेक ग्रहांची संपर्क साधलाय.   ऋतुऋतूंमध्ये बदल घडवले आहेत . अनेक रहस्य अनेक चमत्कार उजेडात आणलेत  .
 
“पृथ्वीतील संशोधन पर्वामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अफाट शोध निर्मितीमुळे स्वर्गलोकात पेच निर्माण होऊन अवघे देवगण  अस्वस्थ झाले आहेत.  स्वर्गातील अमृताचे घोट घेत चिरतारुण्य प्राप्त झालेल्या देव लोकांना अप्सरांच्या सहवासात कालक्रमणा करताना पृथ्वीवरील घडामोडींचा विसर पडला.  विचार करा,  नवनवीन संशोधनात व्यग्र असलेले पृथ्वीवरील संशोधक,  शास्त्रज्ञ न जाणो संशोधनाच्या भरात उद्या जिवंतपणीच स्वर्गात घेऊन टपकले तर देवलोकात केवढा हाहाकार माजेल? ” 
 
“आज पृथ्वीवरील अनेक दिग्गजांना, विचारवंतांना ,विद्वानांना त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याचे चीज म्हणून  खास गौरविण्यात येते.  अनेक महान शास्त्रज्ञांना त्यांच्या महान शोध कार्याची दखल घेत सन्मान , पुरस्कार दिले जातात.  वेगवेगळ्या  गहन विषयांवर सादर होणाऱ्या प्रबंधांचे महत्त्व  लक्षात घेऊन संशोधकांना,  शास्त्रज्ञांना डॉक्टरेट बहाल करण्यात येते.” 

“स्वर्गातील आम्ही देवलोक मात्र मुळातच कर्मदरिद्री ! आमची कोण दखल घेणार?  आजच्या सभेचे अध्यक्ष ब्रह्मदेवांनी हजारो ,लाखो ,कोट्यवधी वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती करून विश्वात अजरामर काम करून ठेवले ; पण संकुचित मानवाने त्यांच्या महान कार्याची दखल घेतली का ? आजवर ते  दुर्लक्षित राहिले.  आहो , डॉक्टरेट तर राहो ; पण साधे दोन ओळींचे सर्टिफिकेट देखील  भगवंतांच्या नावे आजवर पृथ्वीतलावरील मानवाने पाठवलेले नाही.  केवढा हा दैवदुर्विलास ! अखिल देवगणांचे  केवढे हे अवमूल्यन ! ” 

“पृथ्वीतलावरील मानवाने देवांची मांडलेली विटंबना  तर पाहावत नाही . आजमितीस पृथ्वीवरील चित्रपट निर्माते अनेक देवदेवतांवर सवंग चित्रपट निर्मिती करत आहेत.  कुणी  भगवान शंकर, ब्रह्मा- विष्णू- महेश, कुणी  इंद्र , कुणी साक्षात कृष्ण देवाचा अवतार घेतलाय.   पृथ्वीतलावरील पार्वती, सीता, द्रोपदी, राधा यांनी तर इतक्या  झकास भूमिका केल्या आहेत की,  प्रसंगी त्या आपल्या अप्सरांच्या थोबाडीत मारतील .  अनेक जण खुद्द  माझाच म्हणजे  महर्षी नारदांच्या अवतार  धारण करून विणा  वाजवीत  नारायण- नारायण  असा टाहो फोडित  पृथ्वीवर धुमाकूळ  घालताहेत. रामायणातील श्रीरामांचे तर  धिंडवडे बघवत नाहीत.   काय करायचे या  मानवजातीचे ? तुम्हीच सांगा .”
कपाळावरील घाम पुसत नारदांनी  आपले प्रास्ताविक संपवले आणि हाशहुश करीत ते  आसनावर स्थिरावले.  दुसऱ्याच क्षणी सभागृहातील चिडलेल्या देवगणांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली. ” पृथ्वीवरील मानव जातीचा धिक्कार असो !  कृतघ्न  मनुष्य प्राण्याचा आम्ही निषेध करतो !  स्वर्गवासी देवांच्या हक्कांवर गदा आणणारे देवगणांना  कलंक  चालवणारे कोण हे उपटसुंभे ?  त्यांचा निपात करा !”
देव लोकांचा गोंगाट वाढतो हे पाहून इंद्रादी वरिष्ठ देव अस्वस्थ होऊन चुळबुळ  करू लागताच  नारदमुनी  पुन्हा उठून बोलू लागले,
“देवगणहो , तुमचा निषेध, तुमचा राग, मानवाविषयी  तुमची प्रतिक्रिया समजते ;पण या  सभागृहात ते दाखवून काय उपयोग ? त्यापेक्षा तेहतीस  कोटी देवांनी  एक निषेध खलिता तयार करावा आणि तो पृथ्वीवर मानव जातीकडे पाठवून द्यावा , म्हणजे मानवाला त्यांच्या कृत्याची शरम वाटेल.  निषेध खलित्यावर  पूर्ण तेहतीस कोटी देवगणांच्या सह्या मात्र हव्यात . आता गोंगाट थांबवा  आणि ज्या देवगणांना  आपले विचार मांडायचे त्यांनी व्यासपीठावर येऊन मांडावेत. 
त्यासरशी व्यासपीठाभोवती देवगणांनी गर्दी केली .भाषणांना सुरुवात झाली एकजण म्हणाले, “विश्वनिर्मिती करताना भगवान महादेवांनी नको तितकी अक्कल मनुष्याला बहाल केल्यामुळे मानव उन्मत्त  झाला अन नको ते चाळे करू लागला.  त्याची ती मजल गेली की ,तो  स्वर्गाला भारी ठरू करू लागला.  देवगणांशी  पंगा घेऊ लागला.  त्याला एकच उपाय , मनुष्यप्राण्याच्या डोक्यातील अक्कल गोठवून  त्याला निर्बुद्ध  बनवणे.” 
दुसरे  एकजण म्हणाले,  “पृथ्वीवरील  निरोद्योगी लोकांनी पृथ्वीवर लोकसंख्या अतोनात वाढवाली.   त्यातूनच अनेक यातूनच अनेक रिकामटेकड्या लोकांतून अधिकाधिक प्रगल्भ ,बुद्धिमान आणि आक्रमक प्रजा निर्माण  झाली.  मग कोणी  विचारवंत बनले ,कोणी समाजसुधारक  बनले,  कुणी राजकारणी बनले आणि बरेच संशोधक, शास्त्रज्ञ बनले त्यांनी पृथ्वी व्यापली आणि आता ते स्वर्गारोहणाची  स्वप्ने बघत आहेत.  त्याला एकच उपाय.  मानवजातीचे खच्चीकरण करणे.  त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवणे.  मी या सभागृहाला विनंती करतो की त्यांनी कृपया  यमराजांशी  संपर्क  साधावा . यमराजांनी चित्रगुप्ताच्या मदतीने त्यांच्या वहीत  फेरफार करून पृथ्वीतलावरील  मानवाचा  मृत्यूपूर्व संहार घडवून आणावा.   मानवांची  संख्या कमी करावी,  प्रसंगी पृथ्वीवर चतुष्पाद प्राण्यांची संख्या वाढली वाढली तरी चालेल परंतु मनुष्य प्राण्याचे खच्चीकरण झालेच  पाहिजे.  उगाच चोराच्या हाती जमादारखान्याच्या  किल्ल्या नकोत.”
त्यानंतर एक देवगण बोलावयास उठले .  ते म्हणाले “मला एक जालीम उपाय सुचला आहे. भगवंतांनी आपल्या प्रभावाने पृथ्वीवरील माणसामाणसांमध्ये पराकोटीचा वैरभाव निर्माण करावा,  द्वेषभाव अहंकार , कपट – कारस्थाने,  परस्परातील मत्सर या विकारांनी लिप्त झालेला माणूस एकमेकांचा जीव घेण्यास प्रवृत्त होईल , पर्यायाने एकमेकांचा  संहार करीत आपापसात लढून मनुष्यप्राणी मृत्युमुखी  पडतील आणि सुंठी वाचून खोकला जाईल.”
नारदमुनी उठून म्हणाले ,” एकेकाळी पृथ्वीतलावरील मनुष्य प्राण्याचे सरासरी वयोमान साठ ते बासष्ट वर्षे इतके मर्यादित होते पण मानवाने त्यावर देखील मात केली .नवनवीन औषधे शोधली.  आधुनिक उपचार पद्धती निर्माण केल्या अनेक गंभीर आजार आटोक्यात आणले. पर्यायाने आज मनुष्य प्राण्याचे सरासरी वयोमान ८५-९०  वर्षांपर्यंत वाढले.  केवढी ही प्रगती !  हा स्वर्गलोकातील यमराजाचा सपशेल पराभव आहे.  चित्रगुप्ताने  आपली वही रद्दीत  टाकायला हवी.  देवगणांना तर याचे काहीच घेणे देणे नाही. 
 नारदमुनींच्या उद्गारांनी सभागृहातील देवगणांमध्ये  कुजबुज सुरु झाली. ” खरोखर आपण इतके निर्बुद्ध आहोत का ? ना आपण कसली प्रगती केली.ना काही भव्य दिव्य घडवले.  आपली सारी फुशारकी  पृथ्वीवरील भक्तगणांवरच.  त्यांच्या भक्तीने आळवणीने, जपजाप्याने  उपवास तपासाने , वेळी अवेळी प्रसन्न होऊन भक्तांवर वरदानाचा वर्षाव करणे , त्यांचा उदोउदो करणे एवढेच  आपले काम उरले .  आपण सज्जनांची वाट लावली,  दुर्जनांची पाठ थोपटली ,संधी -साधूना  भरभरून दिले आणि महान साधू संतांची झोळी रिकामीच ठेवली.  आपण आपल्याच मस्तीत राहिलो.  सोम रसाच्या तारेत  स्वर्गातील अप्सरांशी  दंगा मस्तीत रममाण होऊन पृथ्वीतलावरील मानवाच्या रोषास पात्र ठरलो.  मानवांने  आपल्याला सरळ अडगळीचा रस्ता दाखवला.  ‘ना घर का ना घाटका’ अशी आपली स्थिती झाली.  ‘देवाची करणी अन नारळात  पाणी’  असं असं म्हणताना मानवाने आमच्यावर करणी केली आणि नारळ पाण्याच पार सुक खोबर  करून टाकलं.”
 जसे सभेचे वातावरण गंभीर बनू  लागले तसे खुद्द इंद्राने बोलावयास  उठले .,  त्यांनी सुरुवात केली,”  मंडळी परिस्थिती खरोखरच गंभीर आणि आणीबाणीची आहे,  पृथ्वीतलावरील मानवांनी देवांच्या सार्वभौमत्वाबद्दल आव्हान दिले आहे.  तेहतीस कोटी देवांची परिस्थिती कधी नव्हे ती नाजूक बनली आहे . त्यातून मुक्तता हवी असेल तर अखिल देवलोकांनी झपाट्याने कामाला लागायला हवे, महर्षी नारदांनी  सांगितल्याप्रमाणे देवांनी  मानव जातीविरुद्ध त्वरित निषेध खलिता तयार करावा.  त्यावर सहय़ांची मोहीम राबवावी.  खलिता  तयार झाल्यावर माझ्याकडे पाठवावा .  पुढचे मी बघतो. 
” अखिल विश्वाची निर्मिती करून मानवाचा उद्धार करणार्या भगवान ब्रह्मदेवांचा  बायोडेटा तयार करण्याचे काम मी स्वतः करणार आहे.  विश्वनिर्मिती केल्यापासूनचे  सारे दुवे ,  भगवंतांचे संशोधन त्यांची चळवळ , विचारधारा सारे सारे  एकत्र करून एक प्रबंध तयार करणार आहे. ‘ अखिल विश्वाची निर्मिती’ हा  भगवंतांच्या संशोधनाचा विषय असेल.  तर या क्षणापासून  आपण सारे कामाला लागू या सर्वांना शुभेच्छा देऊन याची सभा बरखास्त करतो.”
 
अशा रीतीने इंद्रदेवानी  सभा गुंडाळली. 
 त्यानंतर ‘विश्वनिर्मिती’ हा भगवान ब्रह्मदेवांचा  प्रबंध साकारू लागला.  ब्रह्मदेवांनी  स्वतःचा अनुभव पणास लावला.  स्वर्ग, मृत्यू ,पाताळ या  तीनही लोकांतून अनेक बारीक सारीक तपशील गोळा केले.नारदांची  मदत घेतली.  अनेक महान ऋषीमुनींची सल्लामसलत केली.  मानव जातीचे  विश्लेषण केले. 
कुठल्याही परिस्थितीत पृथ्वीतलावरील मानव शास्त्रज्ञांकडून डॉक्टरेट मिळवायचीच , हा ब्रह्मदेवाचा संकेत होता .इंद्र देवाने त्यांना बहुमोल मदत केली भगवंतांचा प्रबंध त्यांनी  काळजीपूर्वक तपासला.  हव्या त्या  दुरुस्त्या केल्या.  प्रबंधांची छाननी केली.  त्यानंतर देवर्षी नारदांना  पाचारण करण्यात आले .त्यांना स्वतःचे पुण्य वापरण्यास सांगण्यात आले आणि देवांचे खास दूत म्हणून नारदांच्या हस्ते भगवान ब्रह्मदेवांचे प्रबंध पृथ्वीवरील शास्त्रज्ञांकडे पाठवण्यात आला.  शास्त्रज्ञांनी त्याला दिलेली पोचपावती घेऊन मोठय़ा उत्साहाने  नारदमुनी स्वर्गलोकात परतले. 
 आणि मग सुरु झाली  भगवंतांच्या नावे प्राप्त होणारी पृथ्वीतलावरील डॉक्टरेटची प्रतीक्षा!  ब्रह्मदेवांची  अविस्मरणीय कामगिरी व त्यांचा  अद्वितीय प्रबंध यामुळे त्यांना डॉक्टरेट खचित मिळणार त्याबद्दल स्वर्गीय लोकांची खात्री होतीच.  जसजसा वेळ जाऊ लागला , तसतसे सारे उतावीळ होऊ लागले.  भगवान ब्रह्मदेवाने अनुष्ठान मांडले.  यज्ञयाग  करण्याकरता तिन्ही लोकातील 
ऋषीमुनींना  सन्मानाने पाचारण करण्यात आले.  मेनका, रंभा, उर्वशी आदी  अप्सरांनी उपास -तापास सुरू केले.  इंद्रदेवाने तर  अखिल मानवजातीलाच  साकडे घातले. 
 
अखेर तो दिवस उजाडला.  निमित्त होते पृथ्वी तलावरील एका  महान शास्त्रज्ञाचे वृद्धापकाळामुळे झालेले निधन.  निधनानंतर स्वर्गारोहण केलेल्या शास्त्रज्ञांच्या हातात पृथ्वीतलावरून पाठवलेला लखोटा होतो.  तो लखोटा म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या प्रबंधांचा  निर्णय होता.  स्वर्गातील अखिल देवगण  आतुरतेने प्रतीक्षा करीत असतानाच इंद्रदेवाने उत्सुकतेने लखोटा उघडला.  ब्रह्मदेवासह सारेच जण लखोटा वाचू लागले. 
पृथ्वीतलावरील समस्त शास्त्रज्ञांनी ब्रह्मदेवाचा प्रबंध नाकारला होता.  संशोधनात्मक प्रबंध नाकारण्याची कारणे अशी होती – 
१. आपण विश्वाची निर्मिती हा विषय घेऊन संशोधन प्रबंध पाठवला आहे पण त्यानंतर अब्जावधी वर्षे उलटून गेल्यामुळे हा विषय पूर्ण विस्मृतीत गेला.  आपल्या संशोधनाला पुष्टी कोण देणार?  संशोधनाकरिता घेतलेल्या आपल्या प्रमाणांची सत्यता कोण पटवणार?  अनंत काळाच्या विस्मृतीत केलेल्या संशोधनाला आज महत्त्व देता येणार नाही .
२. आपल्या संशोधनात्मक प्रबंध सादर करण्यामागे आपले मार्गदर्शक (गाइड) कोण ?  त्यांचे नामनिर्देशन असणे आवश्यक आहे.  मार्गदर्शनाअभावी प्रबंध स्वीकारता येणार नाही .
३. आपलं संशोधन विख्यात संशोधनाच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले कुठेही आढळून येत नाही.  तो फक्त ठरावीक पुस्तकांतून पुराण, बायबल,  कुराण आदी पुस्तकातून त्रोटकपणे आढळतो अशा पुस्तकी प्रकाशनाला संशोधन क्षेत्रात किंमत नसते. 
४. विज्ञानात कुठलेही प्रयोग प्रथम शास्त्रज्ञाने केल्यानंतर दुसऱयाला  त्याची पुनरावृत्ती करता आली पाहिजे.  आपले पुरातन संशोधन आजपावेतो दुसऱ्या कुणालाच करून दाखवता आलेले नाही .
या कारणास्तव आपले संशोधन विश्वसनीय ठरत नाही.  
वरील ढोबळ कारणास्तव आपला संशोधन प्रबंध स्वीकारता येत नाही.  कळावे. 
 पृथ्वीवरील शास्त्रज्ञांनी प्रबंध नाकारण्याची कारणे वाचून ब्रह्मदेवांनी चक्क कपाळावर हात मारून घेतला .
क्षणभरात इंद्रादी  देवगणांच्या दरबारात सन्नाटा पसरला. 
प्रबंधाच्या लखोट्या बरोबरच देवगणांनी पाठविलेल्या  निषेध खलित्याचे  पाकीट देखील ‘अस्वीकृत’ असा शिक्का मारलेले मानव जातीकडून परत आले होते. 
 
तर अशी ही ब्रह्मदेवांच्या डॉक्टरेटची शोकांतिका  !
अरुण सावळेकर
१३६, नारायण पेठ, सीताफळ बाग कॉलनी,
पुणे – ४११ ०३०.भ्रमणध्वनी : ९८२२४ ७०७२२  PC:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu