कथा, काव्य आणि लेख या स्पर्धेच्या निमित्ताने ….
थिन्कमराठी.कॉम आयोजित कथा, काव्य आणि लेख या स्पर्धेच्या निमित्ताने ….
असं म्हणतात एक चित्र हजार शब्दांचं काम करतं. आपल्याला हवा तो निरोप / आशय समोरच्यापर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवायचा असेल तर एका उत्तम चित्राचा पर्याय नक्कीच योग्य ठरतो.
पण खरं म्हटलं तर शब्दांत जी जादू आहे तिचं महत्व काही आगळंच! शब्दांत मांडलेली एखादी गोष्ट अगदी मनाला भिडते,मग ती चार ओळींची कविता असो वा हजार शब्दांचा लेख. वाचता वाचता माणूस त्या लेखात, कथेत, कवितेत रमून गेला तर समजायचं ते साहित्य नक्कीच त्याच्या काळजाला भिडलं आहे.
आपल्याकडे भाषा कोसा कोसावर बदलते असं म्हटलं जातं, त्याचा प्रत्यय आला थिन्कमराठी.कॉम ने आयोजित केलेल्या कथा, काव्य आणि लेख स्पर्धेचे साहित्य वाचतांना.
थिन्कमराठी.कॉम ने मराठी भाषादिन २०२१ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कथा, काव्य आणि लेख स्पर्धेला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, गोवा , बँगलोर इ. ठिकाणांहूनही भरभरून प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेला विषयाचे बंधन नसल्याने विविध प्रकारचे आणि दर्जेदार साहित्य वाचायला मिळाले. त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन .
थिन्कमराठी.कॉम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने लेखकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आणि हौशी साहित्यिकांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिला.
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कुणाला जास्त , कुणाला कमी असे गुण मिळून त्यातल्या काहीजणांनाच बक्षिसे मिळाली असली तरीही इतरांचे साहित्यही उत्तम दर्जाचे होते यात वादच नाही. फक्त स्पर्धा म्हटल्यावर हार-जीत तर होणारच पण तुमच्या लेखणीतून जन्माला आलेल्या साहित्याने आमचे रसिक वाचक नक्कीच सुखावतील हे पक्के ! स्पर्धा आयोजित करताना सांगितल्याप्रमाणे विजेत्यांचे साहित्य मार्च महिन्याच्या कथा काव्य आणि लेख स्पर्धा विशेषांकात प्रसिद्ध केले आहे. आणि इतर निवडक साहित्याला थिन्कमराठी.कॉम च्या पुढील महिन्यांच्या मासिकांत क्रमश: प्रसिद्धी दिली जाईल.
परत एकदा आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद ! आणि या स्पर्धेचे परीक्षण ज्या परीक्षकांनी केले त्यांचेही मनापासून आभार !
परीक्षकांनीही आपले अनुभव आम्हांला कळविले आहेत. परीक्षकांचा थोडक्यात परिचय आणि त्यांनी सांगितलेले अनुभवही येथे देत आहोत.
स्पर्धेचे परीक्षण डॉ.मिलिंद न. जोशी , नीला बर्वे आणि रश्मी मावळंकर या तीन परीक्षकांनी केले. ते तिघेही आपापल्या क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावत असतांनाच आपली लेखनाची आवड उत्तम प्रकारे जोपासत आहेत.
डॉ. मिलिंद. न जोशी हे एका प्रतिष्ठित महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग प्रमुख आहेत . ३३ वर्षांपेक्षा जास्त काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रवासाची आणि लिखाणाची आवड आहे. त्यांची प्रवासरंग , रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार ( १९०१ ते २०१८) , कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर , यांगोनयात्रा (इ – पुस्तक) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
गेले वर्षभर ते थिन्कमराठी.कॉम मधून आगळं वेगळं हे सदर दर महिन्याला लिहीत आहेत.
त्यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाच्या अनुभवाबद्दल सांगितले,”या वर्षीच्या मराठी भाषादिना निमित्त,’थिंक मराठी’.com तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लेख,कविता व कथा’लेखन स्पर्धेमध्ये मला आयोजकांनी ‘परीक्षक’ ह्या नात्याने सहभागी होण्याची संधी दिली;त्याबद्दल त्यांचे आभार.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचं मनःपूर्वक अभिनंदन.बऱ्याचशा साहित्यकृती ह्या दर्जेदार होत्या व त्यामधून उत्कृष्ट लेख,कविता व कथा ह्यांची निवड करणं आव्हानात्मक होतं. विषय व त्यानुसार आशय, मांडणी,अभिव्यक्ती, लिखाणातील ओघवतेपणा या निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आलं. चांगल्या कथा,कविता आणि उत्तम लेख त्या निमित्ताने वाचनात आले. एक समृद्ध अनुभव मला स्पर्धेनिमित्त मिळाला. धन्यवाद.”
– डॉ.मिलिंद न. जोशी.
नीला बर्वे या स्टेट बँक, मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यावर सध्या सिंगापूर येथे स्थित आहेत. त्यांनाही लिखाणाची व कविता लिहिण्याची भरपूर आवड आहे, त्यांचा रानफुले हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.तसेच त्यांच्या कथा ,कविता मासिकांमध्ये प्रकाशित होत आहेत. पणजी (गोवा), दूरदर्शन , आकाशवाणी वरून त्यांच्या कविता, लेख प्रसारित झाले आहेत. विविध कविसंमेलनात त्यांच्या सहभाग असतो.
त्यांना त्यांच्या स्पर्धेच्या अनुभवाबद्दल विचारले असता परीक्षक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानून त्या म्हणतात , विषयाचे बंधन नसलेल्या या स्पर्धेमुळे विविध विषयांवरील उत्तम साहित्य वाचण्याची संधी मिळाली. पुष्कळशा कविता उत्कृष्ट होत्याच पण अत्यंत सकस, विचारपूर्वक लिहिलेले लेख आणि विविध प्रश्न हाताळलेल्या, कांही fantacy (कल्पनारम्य) , अशा कथांमध्ये क्रमवारी लावतांना कस पणाला लागला. नाईलाजाने , नियम म्हणून निवड करणे क्रमप्राप्त म्हणून नाहीतर सर्व लेख मननीय आणि कथा सुंदर. या स्पर्धेच्या निमित्ताने इतके सुंदर साहित्य मराठी भाषेत लिहून काव्य,ललितलेख आणि कथा या प्रांतात लीलया संचार करणाऱ्या या माझ्या साहित्यप्रेमी बंधू-भगिनींचा अभिमान वाटल्यावाचून राहिला नाही. सर्व लेखकांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल थिन्कमराठी.कॉमचे अभिनंदन आणि “छान लिहीत आहांत , लिहीत रहा , दिसामाजी दोन ओळी तरी.”…..सांगणे इतुकेच सर्व स्पर्धकांस.
रश्मी मावळंकर याही आपल्या लेखनाची आवड उत्तम रीतीने जोपासतात , जाहिरात लेखन – मराठी कॉपीराइटिंग , कन्टेन्ट रायटिंग अशा वेगवेगळ्या लिखाणांबरोबरच त्या एका नावाजलेल्या मासिकात त्या संपादकीय सहाय्यही करतात.
त्यांना या अनुभवाविषयी विचारले असता त्यांनीही असे सांगितले की असं म्हणतात की प्रत्येक माणसात एक लहान मूल दडलेलं असतं पण प्रत्येक माणसात एक उत्तम लेखक ,लेखिका , कवी, कवयित्री देखील दडलेले असू शकतात. या गोष्टीचा एक अविस्मरणीय अनुभव घडवून आणल्याबद्दल थिंक मराठी डॉट कॉमचे आणि विशेषतः तुम्हा सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन .
प्रसिद्ध व्यक्तींचे साहित्य आपण नेहमीच वाचतो .पण प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातदेखील इतक्या उत्कृष्ठ साहित्याचा इतका प्रचंड साठा असू शकतो की बक्षीस कोणाला द्यावे असा प्रश्न निर्माण व्हावा ही खरं तर खूप आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट आहे .प्रत्येक कथा ,कविता व लेखाने माणसाने आपल्या आयुष्यात कोणते चांगले बदल घडवायला हवेत आपले , प्लस व मायनस पॉइंट्स कोणते आपले सुंदर आयुष्य अधिकच सुंदर सोपे सहज, कसे करावे हे तर शिकवलेच पण वाचकाला कधी भावनाप्रधान केले तर कधी प्रेमाच्या गावा नेले, तर कधी कल्पनेच्या जगात रममाण केले. एकूणच परीक्षणाचा हा अनुभव अत्यंत अविस्मरणीय होता.
अगदी लहान गावापासून ते मोठय़ा शहरापर्यंतच्या लेखनाच्या, वाचनाच्या व त्यांच्या परीक्षणांच्या सुंदर सफरीत आम्हाला सहभागी केल्याबद्दल थिंक मराठी.कॉमचे मन पूर्वक आभार आणि माझ्या स्पर्धक मित्र – मैत्रिणींनो असेच उत्तमोत्तम साहित्य तुमच्याकडून वरचेवर लिहीले जाओ आणि त्यांना प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा .तुमच्या पुढील लेखन वाटचालीस शुभेच्छा.
आपल्या या मराठी भाषादिन २०२१ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कथा, काव्य आणि लेख स्पर्धेला साहित्यप्रेमी संकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि जे.एम. एस. कन्सल्टंट्स हे प्रायोजक म्हणून लाभले. साहित्याबद्दलच्या आपुलकीने अत्यंत आत्मीयतेने त्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत करण्याचे मान्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे मन: पूर्वक आभार मानतो.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे , बक्षिसे आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे लवकरच पाठविण्यात येतील.
एकूणच हा अनुभव आयोजक , परीक्षक आणि स्पर्धक या सर्वांसाठी नक्कीच आनंददायी ठरला असेल अशी आशा करते आणि भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे उत्साहित झालेली आमची टीम आपल्यासाठी नवनवीन उपक्रम लवकरच घेऊन येतील. त्याची माहिती मिळण्यासाठी, स्पर्धेतील आणि नेहमीची उत्तम सदरे वाचण्यासाठी थिन्कमराठी.कॉम चे जरूर सभासद व्हा.
वाचनीय, मननीय साहित्यासाठी वाहून घेतलेले , प्रसिद्ध लेखकांचे साहित्य उपलब्ध करून देणे आणि नवीन लेखकांना उत्तेजन देणे , (सर्व साहित्य ई माध्यमाद्वारे कुठेही सहज उपलब्ध)यासाठी कटिबद्ध असणारी आपलीच थिन्कमराठी.कॉम टीम !
थिन्कमराठी.कॉम


