संपादकीय

नवीन वर्ष .. नवीन संकल्प … नवीन उत्साह… या सर्वांनी  भरूभरूनच थिन्कमराठी.कॉम चा अंक वेबसाईटप्रमाणेच पीडीफच्या स्वरूपात सुद्धा आणण्याचे ठरविले. जेणेकरून आता अंक ऑनलाईन वाचता येईल आणि ऑफलाईनही! 

www.thinkmarathi.com सुरू करण्यामागील आमचा असा उद्देश होता की एक असा प्लॅटफॉर्म तयार करणे, जो मराठी लेखकांना आणि वाचकांना एकत्र आणेल. प्रिंट मिडियामधील जागेचे किंवा लाईट, कॅमेरा, ऍक्शन यांसारख्या वेळेच्या बंधनांशिवाय, एक अशी जागा जेथे साहित्य, विचार आणि अनुभव मोकळ्या वातावरणात फुलतील.ऑनलाईन आणि पिडीएफ अशा दोन प्रकारांमधून अंक सादर करताना खरंच खूप छान वाटत आहे. हा नवा उपक्रम वाचकांना साहित्याच्या उत्तम शिदोरीचा अनुभव देईल, याचा आम्हांला पूर्ण विश्वास आहे.

जानेवारी २०२५  या नव्या अंकात वाचकांसाठी काही खास आकर्षणे ठेवली आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील मान्यवरांचे लेख, रोचक मुलाखती आणि दर्जेदार साहित्याचा खजिना वाचकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय, या अंकातून काही नवी सदरे सुरू करत आहोत, जी वाचकांना नक्कीच आवडतील:

नीला बर्वे यांचे “सांगण्यासारखे काहीतरी” हे सदर, त्यांच्या विचारशील लेखनाचा आनंद देईल.

प्रसाद केळकर यांचे अर्थविषयक सदर, जे गुंतवणूक, पैशाचे व्यवस्थापन आणि त्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन करेल.गौरवी तेली यांच्या उद्योजकांच्या मुलाखती, ज्या नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरतील.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यावर गृहिणींना वेध लागतात ते मकरसंक्रांतीचे! बाजारात तयार तिळगूळ उपलब्ध असले तरी स्वतः करून वाटण्याचा आनंद वेगळा. आपल्या वाचक भगिनी त्यात कुशल आहेतच पण नवीन संसार थाटलेल्या तरुणींसाठी तिळगूळ आणि गुळाच्या पोळ्यांची पाककृती दिली आहे सुग्रण रश्मी मावळंकर यांनी.तेव्हा भरपूर तिळगूळ करा, आस्वाद घ्या आणि वाटासुद्धा !

याशिवाय आरोग्य, आहार, घरकुल, मनोरंजन, तंत्रज्ञान, पर्यटन, विवाह, शिक्षण अशा विविध विषयांवरील लेख वाचकांना समृद्ध अनुभव देतील. या सर्व विषयांमुळे थिंकमराठी.कॉम चे जानेवारी २०२५ पासूनचे अंक वाचकांसाठी खास असतील.

२०२४  हे वर्ष जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेले होते. युक्रेन-रशिया संघर्ष, हवामान बदलाचे तीव्र परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती, आणि भारताच्या ‘G20 ‘ अध्यक्षपदाचे यश या प्रमुख घटनांनी वर्षभर चर्चेत राहिले. याशिवाय कोविड-19 च्या प्रभावात घट, आर्थिक अस्थिरता, आणि खेळजगत तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीही या वर्षात अनुभवायला मिळाली. या घटनांमुळे जगाच्या पुढील वाटचालीसाठी नवी दिशा तयार झाली आहे. 

थिंकमराठी.कॉमने आजवर आपल्या वाचकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी लोकांसाठी ही वेबसाईट आनंदाचा स्रोत ठरली आहे. नव्या उपक्रमामुळे ही अभिवृद्धी नक्कीच पुढे जाईल.सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या उत्साहपूर्ण पाठिंब्यामुळेच हा प्रवास अधिक सुंदर होत आहे. २०२५  या वर्षातही आपले सहकार्य असेच लाभेल, याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद!

चंदा विनीत मंत्री

संपादक

थिंकमराठी मासिक 

www.thinkmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu