परत फिरताना, घराकडे आपल्या © डॉ. मिलिंद न. जोशी
माझ्या ‘टीन एज’ दिवसातला एक अनुभव आठवला.
आठ दिवसांचा मुक्काम झाला, ‘अजून किती दिवस दुसऱ्याच्या घरी राहायचं?’, हा प्रश्न मनात येऊ लागला. ज्या काकांबरोबर आमचा कोकण प्रवास घडत होता, ते अगदी रमले होते. निघायचं नावंच काढत नव्हते. अर्थात ते त्यांचंच घर असल्याने ते साहजिकच म्हणता येईल पण आम्हा इतरांना त्या घरात अजून पाहुणचार घेत राहणं प्रशस्त वाटेना. शेवटी निघण्याबाबत दुसऱ्या काकांनी विषय काढला. आत्तापर्यंतच्या कोकणप्रवासातल्या अनुभवावरून आरक्षणाशिवाय एसटी बसने प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून दापोलीच्या एसटी डेपोत जाऊन दापोली-मुंबई बसचं आरक्षण करणं गरजेचं होतं.
दोन दिवसांनंतरच्या एसटी बसचं आरक्षण मिळालं. बस सकाळी पाचाची होती. बाकी सर्व गाड्यांचं आरक्षण आठवडाभरासाठी ‘फुल’ होतं. तरी आरक्षण मिळालं ह्या आनंदात परतलो. मग दोन दिवस सामानाची बांधाबांध, निरोपाची कवनं, परत भेटीच्या आणाभाका ह्यात मजेत गेले.
आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी पाचाची बस पकडायला कुठलंही वाहन नसल्याने, आदल्या दिवशी संध्याकाळीच दापोली गाठणं क्रमप्राप्त होतं. दापोलीला जाण्यासाठीची बस दुपारी साडेतीनची होती. यानंतर सार्वजनिक वाहतूक नव्हती. त्यामुळे दुपारची जेवणं झाल्यावर लगेचच घराबाहेर पडलो. एसटी बसचा थांबा म्हणजे घराजवळचा, रस्त्यावरचा मोठा पिंपळवृक्ष आहे हे तेव्हा लक्षात आलं. तिथे सामानासाहित उभे राहिलो. बराच वेळ झाला, बस काही येईना. घरमालक घरच्याच कपड्यांत आम्हाला सोडायला जातीने हजर होते. ते धीर देत होते. अंगाखांद्यांवर लगडलेल्या सामानातील एकेक डाग हळूहळू जमिनीवर विसावू लागला. शेवटी त्या विसावलेल्या सामानावर एकेक जण विसावू लागला. पण बस काही येईना. साडेपाच झाले तसा सगळ्यांचाच धीर सुटत चालला. संध्याकाळच्या आत खरंतर दापोलीला पोहोचणं क्रमप्राप्त होतं. आजूबाजूला चौकशी करायला देखील कोणी नव्हतं. मग घरमालकांनी घोषणा केली, की आजची बस रद्द झाली असावी. आता दापोलीपर्यंत जाण्यासाठीच्या इतर पर्यायांची चाचपणी सुरू झाली. आठ-दहा जणांना नेण्यासाठी एखादी जीप सदृश्य गाडी उपलब्ध होण्याची शक्यताही अजमावण्यात आली. पण त्यावेळी त्या गावात एकही वाहन उपलब्ध होईना. त्यात एक तास गेला आणि सूर्यनारायण त्यांच्या वेळेनुसार समोरच्या डोंगरामागे अंतर्धान पावले. तेव्हढ्यात एक टेम्पो बाजूने जाताना दिसला आणि तो दापोलीच्या दिशेनेच चालला होता. त्याला हात करकरून, मिनतवारीने थांबवण्यात यश आलं. टेम्पो मागच्या सामान ठेवायच्या बाजूस रिकामा होता. टेम्पो चालकाकडे आम्हा आठ-दहा जणांना दापोलीला सोडण्याबद्दल विचारणा करण्यात आली. ‘एव्हढी माणसं टेम्पोत बसणार कशी?’, ह्या माझ्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर टेम्पो चालकाशी चाललेल्या वाटाघाटींतून मिळालं. टेम्पो चालकाने मग उगीचच ‘आढीयाबाजी’ करत त्याच्या त्या ‘टेम्पो ट्रास्पोर्ट’चा दर वाढवला. खरंतर तो रिकामाच चालला होता. पण ‘अडला हरी….’ म्हणीप्रमाणे टेम्पो चालकाच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागत होत्या. आमच्यातील ‘हरी’ नावाचेच एक काका त्या वाटाघाटी करत असल्याने म्हण खरी ठरताना दिसत होती. सामान ठेवण्याच्या जागेत आम्हाला बसायचं किंवा उभं राहायचं असल्याचं लक्षात आलं आणि एका वेगळ्या प्रकारच्या प्रवासाची नांदी झाली. सामानासह आम्ही टेम्पोत शिरलो. आम्ही एकदम ‘गाववाले प्रवाशी’ असल्याचं भासू लागलं. हा असा प्रवासही कोकण सहलीत घडेल असं वाटलं नव्हतं. एव्हाना काळोख पडू लागला होता. टेम्पो प्रवास सुरू झाला. थोड्याच वेळात, अगदी डोळे मिटल्यावर होतो तसा मिट्ट काळोख झाला. अचानक आमच्यापैकी एकांच्या शर्टाच्या खिशावर बारीक दिवा चमकला. सुरुवातीला काहीतरी भास झाला असेल म्हणून दुर्लक्ष केलं पण ‘त्या’ खिशावरची ‘लुकलुक’ सतत होऊ लागली. हा प्रकार नवीनच होता. तेव्हढ्यात त्याच काकांच्या डोक्यावर, खांद्यावर देखील तसेच दिवे उघडझाप करू लागले. एक वेगळीच शंका येऊ लागली. कोकणात साप, विंचू आणि भुतं ह्यांचं भय असल्याचं, कोकण प्रवासाच्या आधी कोणीतरी डोक्यात घातलं होतं. कोकणप्रवासातल्या हया त्रयीची भीती प्रवासाच्या आधीपासूनच मनात घर करून होती. त्या कोकण प्रवासात साप, विंचू ह्यांचं दर्शन आधीच झालं होतं. भुतं तेव्हढी बाकी होती. हा त्यातलाच प्रकार वाटायला लागला. मी इतरांना त्याबद्दल सांगितल्यावर, त्या बाजूला न पाहण्याचा सल्ला देखील एकांकडून मिळाला. तेव्हढ्यात इतरांच्याही अंगाखांद्यांवर, डोक्यांवर तसेच दिवे चमकू लागले. सर्वच जण इतरांकडे बोट दाखवू लागले. तिथपर्यंत मनात जागृत झालेली भुतांबद्दलची भीती पळाली आणि तिची जागा कुतुहलाने घेतली. ज्यांच्या शर्टावर सर्वात आधी लुकलुक दिसली होती, त्या आमच्या काकांच्या एकंदर प्रकार लक्षात आला. त्यांनी ते काजवे असल्याचं सांगितल्यावर थोडं हायसं वाटलं पण ‘काजवे चावत तर नाहीत ना?’, असा एक नवा प्रश्न उपस्थित झाला. त्याचं निराकरण कोणीच करू शकलं नाही. मग सर्वजण त्या विवंचनेत गुंतले. ‘काजवा महोत्सव’ असा शब्दशः ‘अंगावर’ येईल असं वाटलं नव्हतं. खरंतर ‘काजवा महोत्सव’ ही संकल्पनाच जन्म घ्यायच्या बऱ्याच आधी आम्ही तो अनुभवला. दापोली जवळ आलं. थोडाफार प्रकाश दिसू लागला आणि अचानक काजवे गायब झाले. आमच्या बरोबर त्यांनाही थोडा प्रवास घडला होता. दापोली एसटी स्थानकावर पोहोचलो तेव्हा साडेआठ वाजले होते. एक चक्र पूर्ण झालं. आठ दिवसांपूर्वी असेच रात्री साडेआठच्या सुमारास दापोलीत पोहोचलो होतो.
त्यावेळेप्रमाणेच ह्यावेळी देखील दापोली मुक्कामाबद्दल अनभिज्ञता होती. सकाळी पाचाची बस असल्यामुळे, सकाळी लवकर वाहन मिळण्याची समस्या होती त्यामुळे दुसरीकडे राहण्याची शक्यता मावळली. एसटी स्थानाकावरच रात्र काढावी लागणार, ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईपर्यंत दहा वाजले. मग जवळच्याच तहानलाडू, भूकलाडूंवरच वेळ भागवली गेली. भरीला मुंबईला नेण्यासाठी आधी खरेदी केलेला आणि भेट मिळालेला ‘कोकण मेवा’ देखील हाताशी होता. त्यातला बराचसा तिथेच संपला आणि बरोबरचं सामान थोडं हलकं झालं. ती रात्र डुलक्या घेत एसटी स्थानकावर बसून काढली आणि सकाळी पाचच्या बसने निघून दुपारला मुंबईला परतलो.

डॉ. मिलिंद न. जोशी
Email : milindn_joshi@yahoo.com
pc:google


