माझी अल्मा मेटर© श्री.अनीश दाते

सन १९८९ आणि १५ फेब्रुवारीची तारीख.
सर ज. जी.उपयोजित कला महाविद्यालयाचे तळमजल्यावरील प्रदर्शन सभागृह.
विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींसाठी दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या वार्षिक प्रदर्शनाची गडबड उडाली होती. वार्षिक कला प्रदर्शनाचे धडाक्यात उद्घाटन होऊन सर्वांसाठी खुले झाले होते. सुरु असलेल्या उपयोजित कलाशिक्षणाचे नेमके शेवटचे पाचवे वर्ष असल्याने माझ्या प्रकल्पाचा समावेश प्रदर्शनात झाला होता. प्रदर्शन सभागृहात एक संपूर्ण पॅनलभर माझ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. वर्तमानपत्र, मासिक, दिनदर्शिका, खांबावरील जाहिरात फलक, बसस्थानकावरचे पॅनल आणि सिनेमा स्लाइड अशी ठळक डिझाइन माध्यमे यात मांडली होती आणि मुख्यत्वे चित्रांकन म्हणजे इलस्ट्रेशन हा विशेष विषय घेतला होता.
गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या कलाशिक्षणाचा लेखाजोगा या सर्व माध्यमांतून सादर केला होता.
प्रकल्पाचा विषय होता – अली यावर जंग श्रवण विकलांग संस्था, मुंबई.
वास्तविक अली यावर श्रवण विकलांग संस्थेच्या आणि कर्णबधिर शाळांच्या जगात माझा शिरकाव देखील झाला नसल्याने साधा परिचय पण नव्हता.
हा आगळावेगळा सामाजिक आशयाचा विषय सुचल्यावर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात संस्थेची सविस्तर माहिती घेतली.
प्रकल्पाचा भाग म्हणून मुंबईतील नामांकित कर्णबधिर शाळांना भेट दिली. या कर्णबधिर शाळांचे संचालक, विशेष शिक्षक वर्ग , कर्णबधिर विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या मुलाखती घेऊन महत्वाचा माहितीवजा डेटा तयार केला होता.
सोबतीला छायाचित्रण करून ठेवले होते आणि या सर्व माहितीच्या आधारे तयार झालेला सामाजिक प्रकल्प शेवटी प्रदर्शनात मांडला होता.
प्रदर्शनात लागलेल्या पॅनलवरील स्वतःच्या कामांवरून नजर फिरवत असताना सहज मनाशी विचार करता करता पूर्वस्मृतींच्या गतकाळात नकळत जाऊ लागलो.
यातून एकेक प्रश्न उभा राहू लागला आणि विचारांचा मागोवा सुरू झाला.
नेमके आपण कोण होतो?
नेमके येथपर्यंत कसे आणि कोणामुळे आलो ?
आपले पायाभूत भाषाकौशल्य आणि ज्ञानविकास कसा झाला ?
एकेका प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेताना तत्क्षणीच पंधरा वर्षे मागे भूतकाळात गेलो आणि हळूहळू तो स्मृतींचा सुरेख चित्रपट उलगडत गेला.
“बाळ ये माझ्याजवळ.”
“ अं…”
” अरे ये, घाबरू नकोस.”
” अ … अ.. त, … प…..”
” जा बाळ, बाई तुला बोलावत आहेत, मी येतो बरोबर, मग तर झालं !” दाराजवळ गोंधळून बावचळून उभ्या असलेल्या एका छोट्या मुलाला ती व्यक्ती बोलावणाऱ्या बाईंजवळ सोपवून स्वत: परत बाहेर जाऊन उभी राहिली.
“बाळ, नाव काय बरं तुझं?”
” अं…”
“अरे हे काय, बोलत नाही हा , याला बहुतेक…? ”
इकडे दाराजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाची घालमेल झाली आणि तडक आपल्या मुलाजवळ येऊन उभी राहिली.
” आपल्या मुलाला विचारलेले समजणं कठीण जातं का ?” इती प्रश्न विचारणाऱ्या बाई.
” खरं आहे, जरा समजायला बरेचदा कठीण जाते, पण…”
“ पण म्हणजे, तो मंदगतीने शिकणारा आहे का की आपलं ते…..”
“ नाही हो, तसं काही नाही, पण…” इती गडबडलेली मुलाजवळची मोठी व्यक्ती.
“ अहो, पण नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि याची आई बरोबर दिसत नाही आहे. नी आपण याचे कोण ? ”
तत्क्षणी मनाचा कोसळणारा बांध सावरून, पण निश्चयाने ही मुलाजवळची व्यक्ती कटू ते सत्य बोलून गेली.
“ याची आई आता या जगात नाही आणि मी याचा बाबा आहे.”
“अरे देवा, पण प्रॉब्लेम काय आहे ? घाबरू नका, पण सांगा.”
“ माझ्या मुलाला दीड वर्षांचा असताना व्हर्टिगो आजारामुळे आलेले कर्णबधीरत्व आहे. पण तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या मायेचा शिक्षिकेने समजून घेतलं तर…”
व्यक्तीला हुंदका फुटायचा शिल्लक असतो, पण निर्धाराने ती सावरते.
“अरे बापरे…! काही हरकत नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे, असं समजा आणि निश्चिंत राहा ! ”
” आपले उपकार कधीही न फेडता येण्यासारखे आहेत. आभारी आहे मी तुमचा.”
“अहो, आभार कसले ? उलट माझ्यातल्या शिक्षिकेला हे मुळी आव्हान आहे. याला मी शिकवणार आणि घासून – पुसून या जगात ठामपणे वावरायला पाठवणार. याला माझ्या वर्गात प्रवेश दिला आहे.”
“ त्याच्या कानावर काही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. श्रवणयंत्राच्या मदतीने तो बराचसा सावरू शकेल असं कानाच्या डॉक्टरांचं आणि ऑडियोलॉजिस्टचं मत आहे. आम्ही घरी सदैव त्याच्यावर आमचे परीने मेहेनत घेत असतो. याची आई याच शाळेची माजी विद्यार्थिनी होती. आत्ता या क्षणी येथे ती असावयास हवी होती. असो ,देवाची इच्छा, दुसरं काय !”
“आपण जरूर ते सर्व प्रयत्न करू. ही शाळा आपल्या मुलाच्या पाठीशी उभी राहील याची खात्री बाळगा आणि निश्चिंत राहा. लवकरच आपण छान छान गोष्टी शिकायच्या बरं का, बाळ ! ” माझ्या प्रेमाने पाठीवरून हात फिरवत मुलाखत घेणाऱ्या बाई म्हणाल्या.
“ माझ्या मुलाला चित्रकलेची जबर ओढ आणि आवड आहे. जे शब्दांत सांगता येत नाही, ते तो चित्रांद्वारे सांगायचा धडपडी प्रयत्न करतो.”
“ म्हणता काय ? मग हा नक्कीच शिकेल ! ”
” बरंय, येतो आम्ही. आपल्यासारख्या बाई आणि ही शाळा आहे, म्हणून तर आशावादी आहे.”
“ या. हा फॉर्म लवकर भरून द्या. अच्छा !”
बरोब्बर ५७ वर्षे होऊन गेली या गोष्टीला.
सहज मोजून पाहिल्यावर माझे मलाच अचंबित व्हायला झाले. आज पार्ले टिळक विद्यालयाचा निरोप घेऊन ३७ वर्षे झाली. पण तरीही हे शाळेत प्रवेश घ्यायच्या वेळचे  चित्र मला जसंच्या तसं अजूनही आठवतं , बेचैन करतं आणि शाळेच्या कधीही न फेडल्या जाणाऱ्या अनंत अशा उपकाराचं ओझं जाणवत राहातं !


पुढे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर यथावकाश मीही एका मुलाचा बाप झालो. याच माझ्या शाळेत मुलासाठी प्रवेश घेण्याच्या दिवशी मी अगदी निश्चिंत होतो. खरं तर हल्लीच्या जमान्यात बोलायचं झाल्यास लग्न न जमणाऱ्या उपवर वधूच कशाला वराच्या बापासारखा कसोटी पाहाणारा हा क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येतो, तसा तोही माझ्या आयुष्यात आला. जरी मी निश्चिंत असलो, तरी या वेळी मला दारात सचिंत चेहेऱ्याने उभ्या राहिलेल्या व्यक्तीची- म्हणजे वडिलांची फार आठवण आली.आज मी जो काही आहे त्याबद्दल केलेल्या त्यांच्या अथक मेहेनतींच्या आठवणीने गहिवरायला झालं.  
श्रीमती सुशीला अभ्यंकर या माझ्या पहिलीच्या वर्गातील केवळ शिक्षिकाच नव्हेत तर माझ्या केवळ शालेयच नव्हे पुढील भावी यशस्वी जीवनाचा शैक्षणिक पाया मजबूत करणाऱ्या प्रेमळ आणि तितक्याच कडक स्वभावाच्या बाई होत्या. हूड स्वभावाच्या माझ्यासारख्या नाठाळ मुलाला शिकवणे हे अतिशय अवघड होते. नाठाळ घोड्याला वठणीवर आणायला आवश्यक असणारा लगाम, पण तितक्याच पक्क्या कसबी अश्वशिक्षकाच्या हाती असावा लागतो. तसाच मला चाप लावणारा लगाम श्रीमती अभ्यंकर बाईंच्या हातात सदोदित राहिल्यामुळे मी बराचसा शाळेत छानपैकी रुळलो व चार शब्द शिकू शकलो. मला सुधारून मुलांत आणण्याचे काम अभ्यंकर बाईंनी वर्षभर कसे काय तेव्हा केले असेल ते केवळ देवच जाणे. सामान्य विज्ञान, भाषा, गणित इत्यादी सुरुवातीचे विषय अभ्यंकर बाईंनी मला वाटतं केवळ नुसत्या अंगच्या अचाट, चिवट कोकणस्थी चिकाटीमुळे मला शिकवले असावेत. काही काही पेपर्स तर त्यांनी माझ्याकडून तब्बल चार चार वेळा सोडवून घेतल्याचे आठवते. बरेचदा वर्गात शिकवलेले मला न समजल्याचे पाहून त्यांना रडू कोसळे आणि मला फळ्याजवळ उभा करून कानावर पडेल एवढ्या मोठ्याने शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. माझ्या राहत्या घराच्या पाठीमागे रामानंद सहनिवासात त्या राहत होत्या. त्यामुळे बरेचदा त्या मला त्यांच्याकडे सुट्टीच्या दिवशी घेऊन जात आणि काही विषय घोटून घेत. मला शाळेतून न्यायला – आणायला येणाऱ्या माझ्या आजीकडे त्या खूपच काळजी व्यक्त करत. ‘ हा मुलगा पुढे किती शिकणार ? ‘ असे सतत काळजीपोटी वाटणाऱ्या ममतेच्या मायेने म्हणत.
तसे पाहिल्यास माझ्या पहिली इयत्तेच्या वेळी म्हणजे साधारण १९७४-७५ च्या आसपास कर्णबधिरांच्या विशेष शाळा मुंबईत खूपच कमी होत्या.
त्या सर्वच्या सर्व दादर, मुंबई सेंट्रल, भायखळा या मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे पार्ल्यापासून लांब होत्या. आजच्या व्यापक संख्येने कर्णबधिरांना शिकवून आत्मविश्वासाने उभ्या करायला लावणाऱ्या विशेष कर्णबधिर शाळा तयार व्हायला १९७५ पासून पुढे तब्बल २५ वर्षे जावी लागली. अशा परिस्थितीत माझ्यासारख्याला नेटाने शिकवणाऱ्या अभ्यंकर बाईंना दहावी पास झाल्यावर पेढे द्यायला गेलो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. हे अश्रू आनंदाचे, यशस्वी झाल्याच्या सार्थकपणाचे होते.

माझे वडील मला कर्णबधिरत्व आहे हे तपासणीअंती सिध्द झाल्यावरदेखील हा दोष स्वीकारायला तयार नव्हते. त्यांचे २ सख्खे मावसभाऊ पूर्णत: मूकबधीर होते. हे दोघे जण दादरला ‘ विकास विद्यालयाचे ‘ विद्यार्थी होते. त्यांचे विशेष शिक्षण जवळून पाहिले असल्याने, पुढे प्रत्यक्ष आपल्याच मुलामध्ये असे व्यंग आल्याचे लक्षात आल्यावर वडील पूर्णपणे हादरून गेले होते. शेवटी पार्ले टिळक विद्यालयाच्या मदतीने मला यशस्वीपणे तयार करायचेच हे त्यांनी मनावर घेतले आणि त्यांच्या मनाने घेतलेले हे निश्चयीपण आपल्या शिंगावर घेऊन श्रीमती अभ्यंकर बाईंनी व पर्यायाने पार्ले टिळक विद्यालय या माझ्या शाळेने केलेले माझ्यावरचे उपकार कशानेच फिटणारे नाहीत याची मला सदोदित जाणीव राहील.

सायन्स पदवीधर झाल्यावर पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीविषयक कारकिर्दीसाठी माझे वडील रत्नागिरीहून मुंबईला आले. पार्ले टिळक विद्यालयाच्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती नलिनी गाडगीळ बाई या आमच्या दाते परिवाराच्या चांगल्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या आधारामुळे माझे वडील हळूहळू पार्ल्यात स्थिरावले. श्रीमती नलिनी गाडगीळ आणि श्रीमती सुशीला अभ्यंकर यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत प्रवेश मिळाला.    

थोडक्यात चांगल्या घरातला जन्म, सुशिक्षित पालक, पार्ले गावाचा सुसंकृत परिसर , सुजाण शेजारी , उत्तम शिक्षक, समजून घेणारा सहाध्यायी विद्यार्थीवर्ग आणि समजूतदार मित्रवर्ग या सर्वांप्रमाणे पार्ले टिळक विद्यालयामुळे मी घडलो, यशस्वीपणे शिकू शकलो व सरतेशेवटी आपल्या पायांवर उभा राहिलो.

या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आणि सदैव ही आठवण मला राहील.
पहिलीची परीक्षा मी अगदी काठावरच पास होऊन दुसरीत श्रीमती सुशिला वझेबाईंच्या वर्गात आलो.या दरम्यान माझ्या दोन्ही सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या आणि इएनटी डॉक्टर तसेच ऑडीयोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार श्रवणयंत्राची शिफारस करण्यात आली.
यथावकाश मला श्रवणयंत्राची सवय हळूहळू झाली. श्रवणयंत्राच्या मदतीने आणि वझेबाईंच्या अतिशय चाणाक्ष सावध नजरेखालून गेल्याने, माझी तिसरीत जाईपर्यंतची प्रगती चांगली झाली. वझेबाईंमुळे गणिताचा पाया माझा बराचसा पक्का झाला.
तिसरीत गेल्यावर विषयांची वाढ होणे ओघानेच आले. सुरुवातीला ६ महिने खुपच त्रास झाला, पण नंतर सावरलो. तिसरीतील श्रीमती प्रभू या माझ्या वर्गशिक्षिका होत्या.चवथीमध्ये मी श्रीमती आंबर्डेकरांच्या वर्गात होतो.
या वेळपर्यंत वयानुसार लक्षपूर्वक ऐकण्याची माझी एकाग्रता आणि क्षमता वाढत होती. चिकाटीने प्रयत्न करत गेल्यानंतर पार दहावीपर्यंत जाताना कर्णबधिरत्वाचा काही प्रसंगी अपवाद वगळता म्हणावा तसा मला विशेष त्रास जाणवला नाही.

प्राथमिक शाळेतील चित्रकलेच्या शिक्षिका श्रीमती प्रतिभा साळवी यांनी माझ्याकडे खास लक्ष पुरवल्याचे स्मरते. प्राथमिक शाळेत असताना निरनिराळ्या चित्रकला स्पर्धांसाठी श्रीमती साळवी बाईंनी खास लक्ष देऊन खूप उत्तेजन दिले होते. त्यामुळे चांगला स्पर्धात्मक सराव घडत होता. चित्रकला विषयाच्या नियमित सरावामळे पुढे हा विषय खूप वाढवता आला. खास आवडीच्या विषयासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे योग्य त्या वयात आणि अचूक वेळी शिक्षक लाभणे हे फार महत्वाचे आहे.

प्राथमिक शाळेच्या डबा खाण्याच्या मोठया सुट्टीत कसोटी क्रिकेट सामन्यांचा मोसम जोरात असेल तर श्रीमती अभ्यंकर बाई हाती छोटा रेडिओ ट्रान्झिस्टर घेऊन भोवताली मुलांच्या जमलेल्या गोतावळयाला खाली बसवून उत्साहाने रनिंग कॉमेंट्रीसकट स्कोअर सांगत. भारताची मॅचमधील परिस्थिती जर जिंकण्यासारखी असेल तर अभ्यंकर बाईंच्या उत्साहाला भारतीय संघापेक्षाही उधाण येत असे आणि उलट प्रसंगी मार खायची परिस्थिती असेल तर अभ्यंकर बाई हातात ट्रांझिस्टर घेऊन सुन्नपणे बसून राहात.

प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमती सुळे यांचं नुसतं नाव घेतलं तरी आख्ख्या शाळेत नुसता अंगावर काटा उभा राहात असे. सुळे बाई दिसायला एकदम कडक होत्या आणि त्यांच्या शिस्तीच्या दराऱ्यापुढे शिक्षक वर्गच कशाला, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक वर्ग आणि निदान मला तरी असे वाटते की शाळेचा संचालक वर्ग देखील वचकून होता. प्राथमिक मराठी शाळेत आम्हांला श्री. दत्तात्रय म्हात्रे नावाचे एकमेव मस्त मजेत शिकवणारे शिक्षक होते. म्हात्रे सर त्यावेळी पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याबरोबर इतिहास – भूगोल आणि ते अत्यंत रटाळ असे नागरिकशास्त्र यांची छान ओळख त्यांनी करुन दिल्याचे आठवते.

प्राथमिक मराठी शाळेमधून पुढील १० वर्षे पाटिविच्या माध्यामिक मराठी शाळेच्या भल्या मोठया आवारात काढली. या मोठया शाळेच्या आवारात कितीही निर्ढावल्यासारखे ल्यासारखे वावरलो तरी पाचवीतला पहिला – दुसरा दिवस विसरणे शक्य नाही. शाळेच्या भल्या मोठया पटांगणावर आलो तेव्हा बोटीतून जाताना खाडीतून एकदम अथांग समुद्राला मिळाल्यासारखे वाटले आणि मला वाटते अभ्यासापेक्षाही खेळाची आवड जास्त असल्याने शाळेतील बराचसा काळ या मैदानावर गेला. शाळेच्या मैदानाने एवढी आवड दिली की पुढे तर मी एका स्थानिक टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या टीममधून खेळत असे. तसे पाहिले तर इतर अनेक ठिकाणी, बऱ्याच गावांमध्ये मैदाने, समुद्राकाठचा वाळूचा किनारा येथे मजबूत क्रिकेट खेळलो, तरी पाटिवि माध्यामिक शाळेच्या मैदानावर खेळत असताना अगदी आपल्या होम ग्राऊंडवर खेळत असल्याचा फील येत असे. क्रिकेट व्यतिरिक्त व्हॉलीबॉल, खोखो, कबड्डी असे बरेच खेळ या मैदानावर खेळलो तरी त्या खेळांत जीव रमल्याचे तितकेसे आठवत नाही.

पाचवीमध्ये श्रीमती अलका देसाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. मराठी या विषयाची गोडी या वेळेपासून सुरु झाली व ती उत्तरोत्तर वाढत गेली. बालकवींची ‘ श्रावण मानसी हर्ष मानसी ‘ या कवितेमुळे पाचवीचे वर्ष कायम लक्षात राहिले आहे. राष्ट्रभाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजीची ओळख येथूनच झाली. पुढे या दोन्ही भाषांनी सुरुवातीला खुपच पिडले तरी या दोन भाषांबरोबर मराठी भाषा धरुन कायमचं असं त्रैभाषिक भाषा सूत्र जीवनावश्यक बनलं हा भाग निराळा.
दुसरी आठवण म्हणजे इतिहास भूगोल आम्हांला मजेत हसत खेळत शिकवणारे श्री. विजय नारायण राव सर. मोहेंजोदरो – हडप्पा, चंद्रगुप्त मौर्य, यादवकालीन राजवट असले अत्यंत रुक्ष विषय त्यांनी सहजच नेहमी नकाशे, तक्ते यांच्या साह्याने शिकवले. शारिरीक शिक्षणाच्या तासाला ते आमच्यात मुलांमधील मुल होऊन खेळत. शाळेच्या ग्रंथालयाची ओळख राव सरांनी आम्हांला प्रत्यक्ष तेथे नेऊन दिली. क्रीडा महोत्सव, सहल, वार्षिकोत्सव या प्रसंगी राव सर उत्साहाने स्वयंस्फुर्तीने स्वयंसेवकगिरी करत. शाळेच्या सर्व मुलांमध्ये आणि समस्त शिक्षक वर्गामध्ये राव सर खुपच लोकप्रिय होते.

इयत्ता सहावी लक्षात राहिली ती आमच्या इंग्रजी भाषेचा पाया अजून मजबूत करणाऱ्या श्रीमती शारदा गोखले बाईंमुळे.
एकदम लख्ख गोऱ्या गोऱ्यापान, सडपातळ, कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र केसांचा बॉब कट असणाऱ्या या गोखलेबाई साहेबाची इंग्रजी शिकवायला उभ्या राहिल्या की एखादी गोरी छोरी इंग्रजी मड्डम चुकून साडीत शिरून आमच्यासमोर उभी असल्याचा भास व्हायचा. त्यांचा तो इंग्रजीचा रंगलेला तास कधीही संपू नये असं वाटायचं. पण इंग्रजीच्या तासानंतर जर शास्त्र विषयाचा तास असेल तर त्यावेळी नुकत्याच शिक्षकी पेशामध्ये शिरलेल्या अमिता दिघे बाईंची आमचा वर्ग आतुरतेने वाट पाहात असे. अस्सल कायस्थी अंगाच्या आणि गोखले बाईंच्या एकदम उजळ गोरेपणाशी स्पर्धा करणाऱ्या वर्णाच्या तेव्हाच्या विशीतल्या अमिता दिघेबाई शास्त्र विषय अप्रतिम शिकवत. प्युअर कॉटन किंवा सिल्क साडीवर सेंटचा घमघमाट असलेल्या दिघेबाई वर्गात शिरल्या की का कोण जाणे एखादया लग्नाच्या स्वागत समारंभाला गेल्याचा भास होई. तसं पाहिलं तर शास्त्र हा अत्यंत किचकट विषय. पण प्रसन्न चेहेऱ्याच्या, सुहास्य वदनी दिघेबाई एकदा शिकवायला उभ्या राहिल्या की जीव घेणाऱ्या त्या शास्त्र विषयातील हाडांचा सापळा, प्लीहा, यकृत, स्वादूपिंड, वगैरे वगैरे भयंकर शब्दांची धास्ती वाटत नसे आणि कमाल म्हणजे शास्त्र विषयातील अवघड अशा आकृत्या त्या अधिक सोप्यारितीने स्वत: फळयावर न कंटाळता काढून दाखवत. तास संपून दिघेबाई जायला निघाल्या की त्यांच्या फॅशनेबल साडीच्या पदराला त्यांच्या रुपावर लट्ट झालेल्या वर्गभगिनींची स्पर्श करण्याची चढाओढ लागे. दिघेबाईंना पण मला वाटतं आमचा ६-४ चा वर्ग विशेष पसंत असावा. आमिर खान त्या वेळी असता तर कुणी सांगावं पण ‘ तारे जमीं पर ‘ मधील टीचरचा मेन रोल या अमिता दिघेबाईंना पाहिल्यावर नक्कीच ऑफर केला असता !

माझ्या शालेय जीवनातील सर्वांत त्रासदायककाळ म्हणजे इयत्ता सातवीचे वर्ष.
ते वर्ष अजुनही आठवलं की अंगावर काटा शब्द अपुरा पडेल एवढे काटे उभे राहातात. इयत्ता सातवीमधील तो गौरी- गणपती, दिवाळी, नाताळ आणि सरतेशेवटी उन्हाळी सुट्टी हा सुखद काळ सोडल्यास उरलेले साडेसात महिने साडेसातीसारखे का भोगले हे काही कळावयास मार्ग नाही.
नैसर्गिक श्रवणशक्ती मुळात कमी असल्याने माझा मुख्यत्वे भर समोरील व्यक्तीच्या ओष्ठवाचनावर असे. कर्णबधिरांना ओष्ठवाचनाच्या साह्याने बरेचसे शब्द समजतात आणि शिकवलेले समजायला सोपे जावे म्हणून मी कायम शाळेत पहिल्या बाकावर बसत आलो होतो. शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या ओठांकडे पाहत ओष्ठवाचनाने आटोकाट प्रामाणिक शिकण्याचा प्रयत्न मी करत असे. बरे ओठांवरचे लक्ष चेहेऱ्यावर दुसरीकडे वळवले की शब्द नीट समजायचा नाहीआणि शब्दाच्या जोडीला येणारे कर्ता, कर्म, क्रियापद हे समजले नाही की सबंध वाक्य समजायची बोंब व्हायची आणि अशी बरीच वाक्ये नाही समजली की सगळाच धडा डोक्यावरुन विमानासारखा जायचा.
मुळात कर्णबधिर हे कमी श्रवणशक्तीमुळे काहीसे स्लो लर्नर असतात. शिकून आकलन होण्याचा वेग कर्णबधिरांमध्ये कमी असतो. कानावर पडले तरच इतर सर्वसाधारण मुलांना शिकायला सोपे जाते तसे कर्णबधिरांच्या बाबतीत नसते. त्यात पुन्हा तेव्हाच्या दुष्काळात धोंडा महिना म्हणून त्या साडेसात महिन्यांच्या कालावधीत माझे ३,४ वेळा श्रवणयंत्र बिघडले होते. हल्लीसारखी तेव्हा कर्णबधिर सध्या ठेवतात तशी स्पेअरला दुसरे श्रवणयंत्र ठेवायची सोय नव्हती. पुन्हा एकदा बिघडलेले यंत्र दुरुस्त होऊन हाती यायला तेव्हाच्या म्हणजे ऐशीच्या दशकात आठ दहा दिवस अगदी सहज लागत. श्रवणयंत्र नसण्याच्या काळात निदान ओष्ठवाचनाचा बुडत्याला काडीचा असतो तसा आधार असे. नेमकी ही अवघड बाब समजून घेऊन मला कळेल अशा पद्धतीने सर्व शिक्षिकांनी या अडचणीच्या काळात समजावून घेत शिकवले.
ओष्ठवाचन , निरीक्षण आणि मुख्य म्हणजे आवडीच्या वाढीव अवांतर वाचनाच्या जोरावर या कठीण काळातून यशस्वीपणे पुढे जात राहिलो.

सातवीच्या वर्गात शिकत असताना माझी चित्रकलेची आवड पुष्कळ सुधारली होती. त्यावेळी आमच्या शाळेचे सर्वांचे आवडते श्री. हरिदत्त चोणकर सर चित्रकला शिकवायला होते व पुढील ३ वर्षे चोणकर सर सलगपणे लाभले. सातवीमध्ये असताना एलिमेंटरी ड्रॉईंगची परीक्षा दिल्याचे आठवते.
एलिमेंटरी परीक्षेला शाळेचे चित्रकलेचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. श्रीधर पांडुरंग गावडे सर होते. ते अतिशय समजून उमजून चित्रकलेचे अवघड विषय समजावून देत असत. प्राथमिक शाळेत असताना साळवी बाईंनी उत्तेजन दिले होते. माध्यमिक शाळेत चोणकर तसेच गावडे सरांनी कितीतरी मोलाच्या सुचना करत चित्रकलेच्या स्पर्धा परीक्षांना पाठवून अधिकाधिक उत्तेजन दिले. हे दोघे चित्रकला शिक्षक उत्कृष्ट छायाचित्रकार होते. शाळेतील महत्वाच्या कार्यक्रमप्रसंगी हे दोघे चित्रकला शिक्षक त्या काळातले लोकप्रिय ट्वीन लेन्सवाले बॉक्स कॅमेरे आणि खांदयावर फ्लॅश बॅटरी  घेऊन जय्यत तयारीत असत.

पुढे कालांतराने उपयोजित कला शिक्षण घेताना मी जेव्हा छायाचित्रण कला शिकलो तेव्हा सुरुवातीला याच ट्वीन लेन्स बॉक्स कॅमेऱ्यावर शिकलो. शिकताना या दोन्ही सरांच्या बॉक्स कॅमेऱ्यांची खूप आठवण आली होती. गावडे सर सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांनी खास आठवण म्हणून मोठ्या प्रेमाने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तैलचित्रे शाळेला दिली होती. तळमजल्यावरील लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्याजवळ वरील दर्शनी भिंतीवर लावलेली ही दोन्ही तैलचित्रे बरेचदा निरखून पाहत असे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक भारताचे एक मोठे सुंदर तैलचित्र गावडे सरांनी शाळेला खास भेट म्हणून दिले होते. चोणकर सर आणि श्री.पां.गावडे या दोन्ही सरांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हां विदयार्थ्यांना असे लाभले की ज्यामुळे पुढे करियरसाठी कलाशाखेकडे जायचा विचार मी करु शकलो. सातवीची एक आठवण म्हणजे शाळेतील एक उत्साही शिक्षिका श्रीमती मृण्मयी बारपांडे यांचे आंतरशालेय नाटयस्पर्धेतील विजेते नाटक – कृष्णाचा दादा. नाटक अतिशय सुरेख झालं होतं व चोणकर सरांनी बसवलेले नाटकाचे रंगीत नेपथ्याचे सेटस अजुनही स्मरणात आहेत. सातवीला मराठी विषयाला मला श्रीमती मंगला कोल्हटकर बाई देवासारख्या लाभल्या होत्या. कविता हा त्यांचा खास आवडीचा प्रांत होता. कवितेच्या प्रांतात शिरल्यावर त्या खुपच खुलत आणि आम्हांलाही त्या एव्हीतेव्ही डोक्यावरून जाणाऱ्या कविता समजल्याने आनंद होई. प्रा. इंदिरा संतांची गवतफुलाची कविता या प्रसंगी अजूनही स्मरते. कोल्हटकरबाईंना कलेची आवड होती आणि विदयार्थ्यांची आवडलेली निवडक चित्रे त्या आपल्या टेबलावर काचेखाली शोपीस म्हणून प्रेमाने ठेवून जपत.  

इयत्ता आठवीच्या वर्गाला आम्हाला श्री. सुभाष घेवारे वर्गशिक्षक होते. हवेत उडणाऱ्या बटरफ्लाय कॉलरस्टाइलचा फुलशर्ट, जमिनीवरची पायधुळ झाडणारी फॅशनेबल बेलबॉटम पँट आणि डाव्या हातात त्या काळातले स्टेटस सिंबल असणारे सैलसर स्टीलबेल्टवाले एच्.एम्.टी.चे मनगटी घडयाळ अशा अपटुडेट ड्रेसमध्ये असणारे घेवारे सर आम्हांला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र शिकवत.

आठवीमध्ये आम्हांला हिंदी विषयासाठी श्री.रमण सबनीस सर होते. संस्कृत हा आणखी नवीन विषय आठवीपासून सुरु झाला आणि तो का सुरु झाला यापेक्षा त्याचा अभ्यास आम्ही कशावरता केला ते आजही समजत नाही. त्याच त्या सुभाषितमाला , ती वृत्ते, ते व्याकरण, त्याचा व्यवस्थित लावायचा अर्थ, ती तत्सम प्रथमा, द्वितीया, तृतीया चरणे हे सगळं आम्ही का केलं हे देवा परमेश्वराला आणि शिक्षण खात्यालाच ठाऊक !
देव:देवौ देवाः, देवेन् देवाभ्याम् देवभिः ही रुपे पाठ करताना ‘ देवा सोडव  रे बाबा या पाठांतर यातनेपासून ‘ असा धावा करावसा वाटे. केवळ प्रगती पुस्तकावरील नोंदवल्या जाणाऱ्या गुणांच्या धास्तीपायी संस्कृतचा अभ्यास करावा लागला हेच याचे कारण !

तीच गोष्ट हिंदीची आय मीन आपल्या राष्ट्रभाषेची. मराठी शाळेत हिंदी छानपैकी शिकलो, लहानपणापासून इतके हिंदी चित्रपट पाहिले, अमुक तमुक मालिका बघितल्या, पण तोंडात असली घी वाली शुध्द हिंदी कधी नीट बसेल तर शप्पथ. मुंबईमें पैदा होनेवाल्या जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाची हिंदी बंबैय्या स्टाइल तेरेको मेरेकोच राहते याला माझाही नाइलाज आहे. सबनीस सरांनी हिंदी विषय आम्हांला व्यवस्थित शिकवला. त्यांचे इतर अवांतर वाचन चांगल्यापैकी होते, त्यामुळे ते शिकवताना काही पुस्तकांचे संदर्भ आवर्जुन देत असत.

आठवीत संस्कृत विषयाला श्रीमती  कमलिनी गीते बाई होत्या. कठीण वाटणाऱ्या संस्कृत विषयाची त्यांनी छान ओळख करून दिली होती. श्रीमती गीतेंच्या एका मोठया आजारपणाच्या काळात संस्कृत शिकवायला श्रीमती रजनी वेलणकर होत्या. रसाळ प्रासादिक आणि स्पष्ट सानुनासिक आवाजी शैलीतले त्यांचे शिकवणे असे. भाषांतराचे मराठी प्रतिशब्द निवडक असत. मुळच्या त्या रंगभुमी व तेव्हाच्या मुंबई दुरदर्शनवरील मराठी नाटक , मालिकांमधून काम करणाऱ्या एक कलाकार असल्याने वर्गात त्यांचे वावरणे फेऱ्या मारत चालायचे आणि चेहेऱ्यावर आत्मविश्वास दिसत असे. शिवाय अभिनयाच्या प्रांतातून आल्या असल्याने आवाजातील चढउतारासकट संस्कृत शिकवणे चालायचे. वेलणकर बाईंच्या संस्कृत विषयाच्या तासाला वेळ छान जायचा.

आठवीच्या वर्गात असताना घेवारे सर काही काळाकरता रजेवर होते. तेव्हा श्री.अनंत कालेलकर सरांनी इतिहास – भूगोलाचे काही धडे दिले होते. कालेलकर सरांच्या शिकवण्यात काहीशी गंभीर छटा जाणवायची. शिकवण्याव्यतिरिक्त कालेलकर सर अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ कौतुक ‘ नावाचे एक टेबलावर मांडण्याचे प्रदर्शनात्मक व्यासपीठ चालवत. कालेलकर सरांचे हस्ताक्षर अतिशय सुरेख होते. फलक लेखन असो, ‘ कौतुक ‘ व्यासपीठाच्या पेपरवरील अक्षरलेखन असो,अक्षरांकन काना, मात्रा, वेलांट्यासकट सुबक असायचे. हस्ताक्षर स्पर्धा विजेत्यांना त्यांनी शाळेतील फलक लेखनासाठी उद्युक्त केले व फलक लेखन मुलांकरवी सुरु असताना स्वत: जातीने उभे राहून प्रोत्साहन दिले. त्यांच्यासारखा भला, कामसू, विद्यार्थीप्रिय शिक्षक मुख्याध्यापक व्हायला हवा होता असे आता मला आता मागे वळून पाहाताना वाटते. पुढे त्यांचे द.ना.सिरुर बालकाश्रमाचे रेक्टर म्हणून अनुभवकथन केलेले ‘ माझे होम – माझी मुलं ‘ हे पुस्तक वाचनात आल्यावर त्यांच्याबद्दल वाटणारा आदर अधिकच उंचावला.

नववीत असताना आम्हांला श्रीमती सुमन चितळे बाई वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी भुमिती – बीजगणित शिकवले. हसतमुख आणि तब्येतीने अत्यंत सुदृढ अशा श्रीमती नंदिनी भागवत बाई आम्हांला इंग्रजी शिकवायला होत्या. इंग्रजी शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढायची चांगली सवय त्यांच्यामुळे लागली. मिनी पॉकेट डिक्शनरीचा परिचय त्यांनी करुन दिला. इंग्रजी धडयाचे मराठीत रुपांतर देण्यापेक्षा अधिक सहजसोप्या इंग्रजीत त्या विवेचन करत. बरेचसे समानार्थी नवनवीन शब्द शोधून काढायची सवय त्यांच्यामुळे लागली. भागवत बाई शाळेच्या माजी विदयार्थिनी होत्या. त्यामुळे कदाचित शाळेतच कशाला मैदानावर पण सहज वावरत आणि विशेषत: मुलींमध्ये थ्रोबॉल खेळत. क्रीडामहोत्सवप्रसंगी खास शिक्षक वर्गाच्या क्रीडास्पर्धेत आणि त्यातुन थ्रोबॉलमधील त्यांच्या सहभागाने खुप धमाल येत असे.

श्री. सुधीर कुलकर्णी सर आम्हांला भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र शिकवत. या तिन्ही विषयांव्यतिरिक्त भुमिती- बीजगणितातल्या चितळे बाईंच्या तासाला आमच्या न सुटलेल्या शंका आम्हांला सहज सोप्या स्टाईलमध्ये सोडवून सांगत. यावरुन एक दोनदा चितळे बाईंना राग आला होता आणि आम्हां विदयार्थ्यांबरोबर भर वर्गात त्यांचा छोटासा खटका उडाला होता. स्टाईलवरुन आठवण्याचे कारण म्हणजे कुलकर्णीसर तेव्हा नुकत्याच रुढ झालेल्या जीन्स -टी शर्टमध्ये वावरत. पुन्हा आख्ख्या शिक्षकवर्गात फक्त त्यांची ती लँब्रेटा – विजय सुपर स्कुटर असल्याने एकदम रुबाबात असत. अपटुडेटपणाची कमाल मर्यादा म्हणजे कुलकर्णी सर असं समीकरणच तेव्हा बनलं होतं. विजय स्कुटरप्रमाणेच त्यांची शिकवण्याची पध्दत डायरेक्ट टॉप गिअरवर फास्ट असे.

मराठी विषय श्रीमती रजनी परांजपे बाई शिकवत. तोपर्यंत भाषा विषय माझा बराचसा सुधारला होता आणि जोडीला अवांतर वाचनाचा खूप नाद लागला होता. मराठा विषयासाठी झेंडूची फुले काव्यसंग्रहातील ‘आम्ही कोण ‘ ही आचार्य अत्र्यांची विडंबनपर एक कविता होती. नववीच्या मराठी पुस्तकातील डांबरी रस्ते- अनंत काणेकर, कॅशिया भरारला- वि.द. घाटे, भ्रमणमंडळ – पु.ल. देशपांडे हे धडे अजुनही स्मरणात आहेत. नववीला भुमिती – बीजगणित शिकवायला शिकवायला श्रीमती श्यामला केळकर  बाई होत्या. केळकर बाई एकदम खेळकर स्वभावाच्या होत्या. आणखी दुसऱ्या एक गोखले बाई होत्या. त्यांना क्रिकेटची अतिशय आवड होती. वर्ग सुरु असताना हळू आवाजात ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकायला परवानगी देत असत हे विशेष. एक बीजगणित सोडल्यास भुमिती हा धास्तीचा विषय होता तरी गोखलेबाई तो न कंटाळता हसत खेळत समजावून दिला होता. तीच गोष्ट परीक्षेतील गणिताचे पेपर्स त्यांच्याकडे तपासायला आले की आम्ही निश्चिंत असू. कारण गोखले बाई सढळ हाताने गुण वाटत. निष्ठूर अशी गुणतोड पेपर तपासत नसत. नववीला इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा दिली होती आणि सर्वांच्या आवडत्या चोणकर सरांचे मार्गदर्शन तेव्हा झाले हे सांगणे नकोच !

सरते शेवटी दहावीच्या महत्वाच्या वर्षाला श्रीमती  उज्ज्वला चुरी या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्या भुमिती बीजगणित शिकवत. दहावीच्या वेळी वर्षभर ताण असल्याने विशेष नोंद करण्यासारखे पराक्रम आमच्या हातून घडले नाहीत. वर्षभर मुख्यत्वे भर दहावीचे पेपर्स सोडवण्यावर होता. अभ्यासात आणि पेपर सोडवण्याच्या सरावात हा हा म्हणता सगळे वर्ष गेल्याने प्रिलिमनरी परीक्षा जानेवारी अखेरपर्यंत जवळ येऊन ठेपल्याचे समजलंच नाही. दहावीच्या वेळी श्रीमती लीलावती फळणीकरबाई आम्हांला इतिहास -भुगोल शिकवण्यासाठी होत्या. फळणीकरबाईंचं वाचन, मनन आणि निरीक्षण जबरदस्त होतं. मुख्य म्हणजे विषयाला धरून विषयाबाहेरचे कितीतरी संदर्भ त्या द्यायच्या. ते ऐकून चाट पडायला व्हायचं. दुसरं असं की फळणीकरबाईंना उत्तमोत्तम इंग्लिश चित्रपट पाहाण्याची आवड होती आणि या गाजलेल्या चित्रपटांच्या कथानकाचं त्या रसाळपणे वर्गात निरुपण करत. अशा काही उत्तम इंग्लिश चित्रपटांचा रसास्वाद त्यांनी दिला. पुढे मी पण कितीतरी उत्तमोत्तम हॉलिवुड क्लासिक्स पाहू लागलो, तेव्हा त्यांची आठवण हटकून येत असे.

मराठी विषयावरून प्रकर्षाने मुख्याध्यापक कै.नी.र. सहस्त्रबुध्दे सरांची आठवण येते. सहस्त्रबुध्दे सर मराठी अप्रतिम शिकवत. मोठी बहीण अपर्णा आणि लहान भाऊ अमित या दोघांना  मराठी विषयासाठी सहस्त्रबुध्दे सर होते. हे दोघंही जण त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीची प्रशंसा करत.
खरे तर कित्येक जणांवर मराठी किंवा भाषा विषयातील गुणांमध्ये भले मोठे खड्डे येण्याचा प्रसंग येतो. सदैव हसतमुख अशा आणि निळ्या-करड्या रंग छटेतील सफारी सुटा – बूटात वावरणाऱ्या सहस्त्रबुध्दे सरांनी माजी मुख्याध्यापक गुरुवर्य मा. सी. पेंढारकरांनी रचलेल्या शाळेच्या मजबूत पायावर गुणवत्ता यादीच्या यशस्वीततेचा मजला चढवला व उत्तरोत्तर तो मजला वाढवत नेला. आमची शाळा खऱ्या अर्थाने लोकप्रियतेच्या राजमान्यतेवर सहस्त्रबुध्दे सरांनी नेली. कितीतरी मुलांमधील सुप्त गुण हेरून, त्यांना कठोर परिश्रम करायला लावून गुणवत्ता यादीमध्ये झळकवलं व पर्यायाने शाळेला मोठं नाव तसेच वलय मिळवून दिलं.

दरवर्षी जुनमध्ये शाळा उघडल्यावर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यातल्या एखादया दिवशी दसरा-दिवाळीसारखं वातावरण असे. त्या दिवशी सहस्त्रबुध्दे सरांच्या चेहऱ्यावरचे झळकणारे हास्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या मुलांपेक्षाही जास्त आढळे. आख्ख्या शाळेच्या इमारतीला दिव्यांची रोषणाई असे. मेरिटमध्ये जी गुणवंत मुलं सहस्त्रबुध्दे सरांच्या काळात झळकली . ती सगळी मुलं आयुष्यातील हा सोनेरी क्षणांचा दिवस कधीही विसरणार नाहीत आणि मला वाटतं सरांच्या आवडत्या मराठी विषयात गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या कोणीही जर सर्वोच्च गुण मिळवले की सरांच्या चेहऱ्यावरील आनंद ‘ धबाबा तोय आदळे ‘ असा असे.
सहस्त्रबुध्दे सर ज्या वर्षी सेवानिवृत्त होणार होते , त्या वर्षी तर तब्बल १५ मुले मेरिटमध्ये आली होती आणि आतापर्यंतच्या आनंदाचा रेकॉर्ड ब्रेक साजरा झाला होता.थोड्याच काळात सर सेवानिवृत्त होणार होते. सरांसाठी पा टि वि असोसिएशनचा निरोप समारंभाचा मोठा बेत आखला जाणार होता, पण प्रत्यक्षात तसा काही समारंभ होऊ शकला नाही.
सहस्रबुद्धे सरांच्या आकस्मिक निधनाची बातमी आली आणि अशी बातमी येईल याची पुसटशी शंकाही कोणाला आली नसती. सहस्त्रबुध्दे सरांचे पार्थिव शव शाळेत दर्शनासाठी आणले तेव्हा सहस्रबुद्धे सरांना शाळेने अखेरचा निरोप दिला. निरोप देतानाचा तेव्हाचा तो सुनसाट सन्नाटा आठवला की आजही बेचैन व्हायला होतं आणि त्याहूनही सरांचा एखादा मराठी विषयाचा तास न लाभल्याचं फार वाईट वाटतं.

दहावीला असताना साधारण जानेवारी संपेपर्यंत विशेष काही जाणवत नव्हतं. फेब्रुवारीमध्ये मात्र धीरे धीरे शाळा तिचा परिसर वगैरे गोष्टींना मुकणार म्हणून काही वेळा मला नॉस्टल्जिक व्हायला झालं होतं. पाहाता पाहाता शाळेचा निरोप घेण्याचा तो भावनावश क्षण येऊन कधी ठेपला आणि आवडीच्या ड्रेसमध्ये शाळेत मिरवत ‘ सेंड ऑफ डे ‘ कधी साजरा झाला ते समजलंच नाही.

निरोपसमारंभाचा सेंड ऑफ डे साजरा झाला. दहावी पास झालो. पुढे करियरपायी सर्वांचे रस्ते बदलले. महाविद्यालयीन शिक्षण , नोकरी, व्यवसाय, लग्न ,संसार अशा रितीने पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. कितीतरी प्रसंग आले गेले. पण वेळप्रसंगी शाळेने शिकवलेल्या शिस्त, संयमी वृत्ती आणि वेळेचे महत्व या गोष्टींमुळे बरेचदा तरून गेलो.

आज शाळा सोडून तब्बल ३७ वर्षे झाली.पाठीमागे वळून पाहाताना मात्र असलेल्यांपेक्षा नसलेल्या, गमावलेल्या गोष्टींमुळे व्याकुळ होण्याचे दिवस आले आहेत आणि यापुढेही येत राहातील.

पार्ले गावी राहावयास आलेल्या सुरुवातीच्या सुखवस्तू, मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातील काही धडपड्या मंडळींनी लोकमान्यांच्या निधनाचे वेळी शपथ घेतली व लोकमान्यांच्या नावे शाळेचे रोपटे रुजवले. आज या रोपट्याचा झालेला गेल्या ९९ वर्षातला भला मोठा वृक्ष आपण पाहात आहोत. श्रीमंत चांदीवाल्या परांजपेंनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या आर्थिक जबाबदारीच्या या शाळेमधून कितीतरी जण शिक्षण घेऊन बाहेर पडले.
त्या सर्वांच्या जीवनाची चांदीच काय तर लख्ख झळाळतं सोनं झालं. तसं ते माझ्याही आयुष्याचं झालं. शालेय शैक्षणिक जीवनाचा पाया पा टि वि मध्ये झाला आहे असं नुसतं कळल्यावर बऱ्याच जणांनी शाळेबद्दल काढलेले आदरार्थी उद्गार ऐकून आमची छाती फुगून येते आणि त्याच वेळी शाळेला खाली पाहायला लागेल अशी कोणतीही अप्रिय कृती आपल्या हातून पडणार नाही या जबाबदारीच्या जाणिवेतून छातीत धस्संही व्हायला होतं.

एका कृतज्ञतेच्या क्षणी आज शाळेकडे पाहातो तेव्हा काय आठवत नाही.
तो शाळेचा पहिला दिवस, पहिली घंटा, पहिला दिवस या बरोबर शेवटचा दिवस आणि शेवटची घंटा आठवते.
पुढे इलेक्ट्रीक बेलचा जमाना आला तरी देवाच्या मंदिरात असते त्यापेक्षाही प्रिय अशी घणघणारी घंटा आणि ती बडवणारे सर्व शिपाई गडी आठवतात.
नोटीस घेऊन येणारा तो कुरळ्या केसांचा बुटुक बैंगण शिपाईमामा आठवतो.
शाळेच्या विहिरीत मारलेला पहिला सूर आठवतो. पोहायला शिकवताना धीर देणारे सर्वांचे आवडते श्री. रवींद्र धीराजी नाईक सर आठवतात.


मधली डबा खाण्याची सुट्टी सुरु होण्याच्या आधी चाललेली बाबू वडेवाल्याची धावपळ आठवते व कँटीनमधला चर्र करणारा तेलाचा घाणा आठवतो.
सा रे ग म घोकायला लावणाऱ्या सुरेल स्वराच्या श्रीमती वर्षा आंबेकर बाई आठवतात. सुट्टीची घंटा वाजली रे वाजली पळा पळा पुढे कोण आधी पकडे तो अशी क्रिकेटसाठीची दिव्यांच्या खांबांची पकड स्पर्धा आठवते व ‘ हौज टॅट ‘ च्या अपिलांची मैदानभर उठलेली नुसती बोंबाबोंब ऐकू येते. एमआरआयच्या लाल कडक रबरी चेंडूसाठी जमवलेली चार आण्याची वर्गणी आठवते. मॅच हरल्यावर दयावा लागणारा तो एमआरआयचा रबरी चेंडू रडवतो.
वाऱ्याची दिशा बदलल्यावर शाळेच्या डोक्यावरुन जाणारे विमानांचे ट्रॅफिक आठवते व ती जमवलेली तमाम विमान कंपन्यांची फोटो कार्डस, कॅटलॉगस् आठवतात. पोष्टाच्या तिकिटांचे संग्रह आणि त्याच्याकरता केलेल्या अनंत लटपटी – खटपटी डोळ्यांपुढे येतात.
चित्रकला विषयात १० पैकी तब्बल ९ मार्क मिळाले रे की तो सगळा दिवस चित्रंच चित्रं रेखाटण्यात गेल्याचा आठवतो. ते नवनवीन ताजे, मऊ पोस्टर कलर्स, त्या जमलेल्या मनपसंत रंगछटा कागदावर दिसायला लागतात.
कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली प्रुडेंशियल वर्ल्ड कप जिंकला तेव्हाचा जल्लोष आठवतो आणि नंतर मारे आपणच संदीप पाटील, श्रीकांतसारखे खेळतोय याचा भास आठवून हसू येते.  
हिरो मॅजेस्टिक मोपेडवरुन येणाऱ्या आणि दीपमाळेसारखी उंची असणाऱ्या श्रीमती नीला शुक्लबाई समोर दिसायला लागतात. चुरीबाईंनी स्वत:च्या वाढदिवसाला वर्गात वाटलेल्या कॅडबरी इक्लेअर्स चॉकलेटसची  गोडी जिभेवर रेंगाळते.
कंपासपेटीचे झाकण फँटम, बहादूर, मँड्रेक, ब्रुस ली सारखे हिरो, गाजलेले हिंदी पिक्चर्सच्या  नाना सुगंधी स्टिकर्सनी भरलेले आठवते. वर्गात रेकॉर्ड लागल्यावर बाकावर धरलेला उस्ताद तिरखवाँ, झाकीर हसेनसारखा उडता ताल आठवतो व तबलजी व्हायची नसती स्वप्ने दिसायला लागतात. बाकावर कंपास, करकटरने खरडलेले तथाकथित तबले-डग्गे तसेच फुली गोळा खेळण्याचे चौकोन आठवतात.
फाउंटन पेनाच्या शाईपायी गणवेशाच्या सफेद शर्टवर पडलेल्या डागांमुळे खाल्लेली घरची बोलणी आठवतात. दुसऱ्याच्या सायकलमधील हवा काढण्याची खोडी आठवते व आपल्या सायकलमधील पंक्चर काढण्याविषयी हनुमान रस्त्यावरील देविदास सायकलवाल्याकडे केलेली उधारीची कळकळ आठवून हसू येते.
प्रयोगशाळेतला शवविच्छेदनासाठी घेतलेला तो गलेलठ्ठ बेडूक धरताना उडालेली धांदल आठवते.


प्रार्थना संपतानाची ती ‘ नि:शेष जाड्याऽ पहा ‘ ही ओळ आल्यावर वर्गातील लठ्ठंभारती बंधू किंवा भगिनीकडे टाकलेली तिरकी नजर हसवून जाते.
असली घी वाली आणि शिकायला वर सोपी वाटली तरी तेवढीच कठीण वाटणारी हिंदी साभिनय शिकवणारे ते नीळकंठ हर्डीकर सर आँखों के सामने येतात.
‘ऑफ ‘ तासाला गुपचुप वर्गात येऊन सर्वांना उगाचच आपलं सारखे खोटे खोटे दटावत तोंडी पुटपुटते मंत्रपठण करत बसणारे महामिष्किल  प्रभाकर घैसास सर समोर दिसायला लागतात.

तसे पाहिले तर माझ्या घरातील तीन पिढ्या या शाळेत शिकून सावरून बाहेर पडल्या. माझी दिवंगत आई या शाळेची माजी विद्यार्थिनी होती. ती माहेरची मालाड गावची होती. त्या काळात सातवी इयत्तेपुढील माध्यमिक शिक्षण देण्यासाठी मालाड गावात शाळाच नव्हती. मालाड गावात चांगली माध्यमिक शाळा काढायचे प्रयत्न जोमाने सुरु होते. फक्त मालाड नव्हे तर त्या काळात पार्ल्यापुढील अंधेरी – जोगेश्वरी ते विरारपर्यंतच्या भागात मॅटिकपर्यंत उत्तम शिक्षण देणाऱ्या चांगल्या शाळा विशेष नव्हत्या. एकतर तेव्हाचा ग्रामीण भाग १९५५ नंतर मुंबई शहराचा उपनगरी जिल्ह्याचा भाग बनला असला तरी त्या बदलत्या काळानुसार वाढत्या बांधकाम विकासकामांमधून जात होता. पार्ल्याबाहेरील कितीतरी मुलं त्या काळात लोकल ट्रेनने ये जा करत शिकत होती आणि यात माझी आई होती.

पुढे मी आणि दोन्ही भावंडे शाळेच्या मराठी माध्यमात शिकलो.
पाच वर्षांपूर्वी कुमार आदित्य हा माझा मुलगा शाळेच्या इंग्रजी माध्यमामधून शिकून बाहेर पडला. जेव्हा माझा मुलगा या शाळेत शिकायला लागला तेव्हा बालकाच्या भुमिकेतून जबाबदार पालकाच्या भुमिकेत कधी आलो ते समजलेच नाही. मुलाबरोबर शाळेत सातत्याने जेव्हा येत होतो तेव्हा शाळेकडे पाहाताना माझे ते हरवलेले शालेय बालपण आठवण्याचा प्रयत्न करत होतो. या आठवणींमुळे हसू येते आणि डोळे पाणावतात.

शाळेच्या स्थापनेपासूनच्या ज्या नव्या जुन्या इमारतींमध्ये आम्ही शिकलो त्या सगळ्या इमारती फक्त प्राथमिक शाळेची इमारत सोडल्यास आता हयात नाहीत. पाहता पाहता काळाच्या उदरात या सर्व जुन्या इमारती विस्मृतींमध्ये कधी गडप झाल्या अगा तेचि कळलेच नाही. काळाच्या उदरात गडप झालेल्या आठवणींत मुख्याध्यापक आदरणीय सहस्त्रबुध्दे सर येतात. ज्यांचे बोट धरून शाळेत आलो ते माझे दिवंगत वडील येतात. श्रीमती अभ्यंकर बाई येतात. प्राथमिक शाळेत ज्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मला प्रवेश मिळाला त्या श्रीमती नलिनी गाडगीळ बाई येतात. तसेच इतरही अनेक जण येतात.

प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत म्हणा की नशिबात म्हणा की जडणघडणीत म्हणा , काही अत्यंत शुभदायक ग्रह येतात.
तसे ते ग्रह पार्ले टिळक असोसिएशनच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जीवनपत्रिकेत आले आहेत.
पार्ले नामक गाव आणि पार्ले टिळक विद्यालय ही शाळा असे दुर्मिळ योग ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आले असतील ती व्यक्ती नक्कीच भाग्यवान म्हणायला लागेल. माझ्या नशिबात मुंबईतील पार्ले गाव आणि पार्ले टिळक विद्यालय हे असे दोन रवी गुरु युतीसारखे अभेद्य ग्रह लाभले. केवळ पार्ले टिळक शाळेमुळेच माझ्यासारख्या कर्णबधिर व्यक्तीला भाषा आणि ज्ञानविकासाचे पायाभूत स्थैर्य मिळाले. शाळेमुळे माझी भाषा , कला फुलत गेली आणि १९८४ साली दहावीनंतर  सर ज जी उपयोजित कला महाविद्यालयाची सुयोग्य दिशा लाभली.
या दोन भक्कम शैक्षणिक सुकाणूंमुळे माझ्या जीवनाची नौका अनेक संकटे , वादळे पेलत शांत समुद्रात स्थिर होत गेली.

सर ज जी उपयोजित कला महाविद्यालयात शेवटच्या वर्षी अली यावर जंग श्रवण विकलांग संस्थेवरील प्रकल्प तयार करताना मुंबईतील नामांकित कर्णबधिर मुलांच्या शाळांच्या जगात वावरलो. या कर्णबधिर शाळांची विशेष शिक्षण पद्धत जवळून पाहत असताना नेमक्या त्या वेळी माझ्यासारख्या मुलावर पार्ले टिळक शाळेने जिद्दीने केलेले संस्कार आठवले आणि शाळेच्या आठवणीने मन सद्गदित होऊन गेले.
खरोखर पार्ले टिळक विद्यालय ही शाळा माझ्या जीवनात आली नसती तर माझ्या पुढील आयुष्याचं नक्की काय झालं असतं हा विचार आजही अस्वस्थ करून सोडतो.

तशी बऱ्याच अडीअडचणींमधून तावूनसुलाखून निघालेली ही माझी शाळा आहे आणि आता पाहाता पाहाता येत्या जून २०२१ च्या महिन्यातील ९ तारखेला शाळेचा शतक महोत्सव जवळ येऊन ठेपला आहे.
इंग्रजीत थोरल्या आईला ‘अल्मा मेटर ‘ असे म्हणतात. विदयार्थ्यांवर माया केलेल्या अनेक गुरुतुल्य शिक्षकांनी, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शाळेला अतिशय परिश्रमपुर्वक मोठे केले आहे आणि शाळेमुळे विदयार्थी त्यांच्या त्या त्या क्षेत्रात मोठे झाले आहेत याची नुसती एक जाणिव माझ्याप्रमाणे सर्व माजी विदयार्थी सदोदित ठेवतील अशी आशा आहे.
या आशेला कधीही तडा न जावो, ती तशीच चिरंतन स्वरुपी राहो ही सदिच्छा दुसरे काय !

श्री. अनीश दाते ,
माजी विदयार्थी ,
इयत्ता १० तुकडी ७ ,
१९८४ बॅच – मैत्रेय ग्रुप
भ्रमणध्वनी – ९३२४६२३६३०
इ मेल – dateaneesh@gmail.com

2 thoughts on “माझी अल्मा मेटर© श्री.अनीश दाते

 • May 4, 2021 at 10:38 am
  Permalink

  आपला केलेलं कथन आपल्या पार्ले पासून ते ज जी महाविद्यालय तील प्रत्येक शिक्षक व त्याचे शिकवण आपण त्याचे नावे व आठवणी एवढे नाव आठवनित असणे, खूप आचार्यांचकीत करणारे आहे, खूप सुंदर शब्दात आमच्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभे केले ,
  आपण शिकण्याची जिद्द व आपला प्रवास माझ्या साठी खूप प्रेरणादायी आहे , माझा मुलगा कैवल्य याला मी आपल्यात पाहतो .

  Reply
 • May 4, 2021 at 5:02 pm
  Permalink

  कित्ती सुरेख लिहिलं आहेस. तुझ्या आठवणीतून माझापण शाळेत संचार झाला. डोळे पाणावले सुध्दा.
  माझा लेक पार्ले टिळक इंग्रजी माध्यमातूम शिकला. त्यामुळे लेख जास्त भावला कदाचित.
  अभिनंदन!!!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu