पालकांचं काही चुकत नाहीये ना…?
शुभमचा इंजिनीअरिंगचा रिझल्ट लागला आणि तो पाहून त्याच्या आई-बाबांना मोठा धक्काच बसला. नेहमी पहिल्या दहात झळकणारा, कायम ८५ ते ९० टक्के गुण मिळवणारा शुभम इंजिनीअरिंगमध्ये नापास झाला होता. त्याचे तीन-चार विषय राहिले होते. तो निकाल घेऊन घरी आला आणि एका क्षणात घरातलं चित्र पालटून गेलं. आई-वडिलांना खात्री होती, की या परीक्षेत त्याला नक्की ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळणार. कारण अंतिम परीक्षा असल्यामुळे त्या दोघांनीही शुभमचा अभ्यास, तब्येत, जेवण या साऱ्यांमध्ये जातीने लक्ष घातलं होतं. प्रसंगी ऑफिसमध्ये रजा टाकून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं होतं. त्याला हवं-नको सारं पुरवलं होतं; पण त्याच्या अशा निकालामुळे या साऱ्यावर पाणी पडलं.
शुभमचा निकाल पाहून त्याचे वडील प्रचंड चिडले. इतके, की त्यांना राग अनावर झाला आणि ते शुभमला नको नको ते बोलले. आईच्या निष्काळजीपणावरही रागाच्या भरात ताशेरे ओढले गेले. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शुभम कसा अपयशी ठरला याचं मोठं ओझं त्याच्या डोक्यावर लादलं गेलं आणि बाबा तिथून निघून गेले. त्याची आई, वडिलांएवढी चिडली नसली, तरी तिच्या बोलण्याचा रोखदेखील अपेक्षाभंगाकडेच होता. या साऱ्या प्रसंगामुळे शुभम काहीसा गडबडून गेला. तो एकदम शांत झाला; पण त्याचा हा गोंधळ, ताण, शांतता अपयशाचं वैफल्य केवळ त्या एका दिवसापुरतं टिकलं. दुसऱ्या दिवशी तो अगदी नॉर्मल होता. मस्त टीव्ही पाहत, गाणी ऐकत, गेम खेळत, मित्रांबरोबर गप्पा मारत त्याने आपला वेळ घालवला. पुढचे तीन-चार दिवसही त्याने असेच घालवले. आई-वडिलांना त्याचं हे वागणं अगदीच अनपेक्षित आणि विचित्र वाटलं. त्यामुळे पुन्हा ते दोघं त्याला खूप रागावले. ताबडतोब अभ्यास सुरू करायला सांगितलं आणि या परीक्षेत चांगलेच मार्क्स मिळायला हवेत, अशी सक्त ताकीदही दिली.
शुभमने त्यावर केवळ होकारार्थी मान हालवली आणि काहीही न बोलता तो स्वतःच्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने आई त्याच्या खोलीत गेली, तर शुभम झोपला होता. हे पाहून आईला पुन्हा त्याचा राग आला. तिने त्याला रागारागाने उठवलं आणि हातात पुस्तक आणून दिलं. हे सारं घडेपर्यंत शुभम अगदी शांत होता; पण आईने हातात पुस्तक दिल्यावर तो प्रचंड चिडला. त्याने ते पुस्तक फेकून दिलं आणि आईवर ओरडला, ‘मला आता काही शिकायचं नाही. मी अभ्यास करणार नाही,’ असं म्हणून तो घरातून रागारागाने बाहेर पडला तो थेट रात्रीच परत आला. आई-वडिलांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण ते बोलायला लागले, की तो उठून घराबाहेर निघून जायचा. त्याच्या या वागण्याने आई-बाबा घाबरून गेले. काय करावं हे न समजल्याने ते मला भेटायला आले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं.
बोलताना आईला रडू कोसळलं. आपल्या मुलाला हे काय झालंय, हा कोणता मानसिक आजार तर नाही ना, या चिंतेने आईला रडू येत होतं. त्यांना शांत करून शुभमला भेटायला पाठवायला सांगितलं. त्याप्रमाणे तो दोन दिवसांनी भेटायला आला. आल्यावर त्याने स्वतःची ओळख करून दिली. ओळख झाल्यावर व थोडा संवाद साधल्यावर त्याला भेटीमागील उद्देश सांगितला. त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तोदेखील अतिशय मोकळेपणाने बोलत होता. संवाद साधताना असं लक्षात आलं, की शुभमच्या वडिलांचा स्वभाव तापट आणि हुकुमशाही स्वरूपाचा म्हणजेच अधिकारवादी आहे. त्यांनी आतापर्यंत नेहमीच शुभमला स्वतःच्या मतांप्रमाणे व अपेक्षांप्रमाणे वागायला लावलं होतं. छोट्या छोट्या गोष्टीही ते नेहमी शुभमला व त्याच्या आईलाही स्वतःच्या मतांप्रमाणेच करायला लावतात आणि त्यांचं ऐकलं नाही, की आईशी वाद घालतात किंवा शुभमला सतत ओरडतात. प्रत्येक लहान-मोठी गोष्ट त्यांच्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे हा त्यांचा हट्ट असतो.
शुभमला खरं तर फोटोग्राफी आणि संगीतामध्ये खूप रस होता. त्याला त्यात करिअर करायचं होतं; पण वडिलांनी त्याचं काही न ऐकता त्याला इंजिनीअरिंगला घातलं आणि ते करायला लावलं. हा सारा राग मनात धरून शुभमने परीक्षेदरम्यान जाणीवपूर्वक अभ्यास न करता नापास व्हायचं हा उपाय शोधून काढला व तसंच केलं. हे लक्षात आल्यावर या संदर्भात त्याला आवश्यक मार्गदर्शन करून वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रोत्साहित केलं.
त्याच्या आई-वडिलांची पुन्हा भेट घेतली व त्यांना सत्य परिस्थितीची, तसेच त्याच्या परिणामांची जाणीव करून दिली. अर्थात त्याच्या वडिलांच्या स्वभावदोषामुळे, त्याच्या वडिलांना आपले वर्तन मान्य करणे व त्यात बदल करणे यासाठी वेळ लागला. सुरुवातीला काहीसा विरोधही झाला; पण समुपदेशन सत्रांनंतर त्यात हळूहळू बदल घडत गेला. त्यामुळे घरातलं वातावरण, नातेसंबंध यात आपोआपच सुधारणा झाली. पुढे व्यवस्थित अभ्यास करून शुभमने इंजिनीअरिंग पूर्ण केलं आणि सध्या तो फोटोग्राफीचंही शिक्षण घेतो आहे.
– मानसी तांबे – चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com


