पहिली अविस्मरणीय घटना
हा अनुभव आहे १० डिसेंबर २०१६ चा. आम्ही मैत्रिणी ९ डिसेंबर २०१६ ला लोणावळ्याला सहलीला गेलो होतो. १० डिसेंबर ला अंदाजे ४ वाजता घरी परतलो . घरी आल्यावर मी जरा फ्रेश झाले. आणि थोडावेळ झोपू या हिशोबात आडवी झाले तेवढ्यात माझा फोन खणखणला मी फोन उचलल्यावर समोरची व्यक्ती बोलू लागली मानसी बोलताय का? मी हो म्हंटल त्या म्हणाल्या मी ZEE मराठीतून बोलत आहे मला वाटलं माझी कोणीतरी थट्टा करत आहे मी फोन कट केला पुन्हा तोच फोन आला मी फोन नाही उचलला.
आता इतक्या प्रकारचे अँप आले आहेत कि आपल्याला लगेच समजते कि फोन कोणी आणि कुठून केलाय माझ्या मुलाने तो अँप लगेच डाउन लोड केला आणि त्याने मला सांगितले आई तो कॉल ZEE मराठी मधूनच होता. मी त्या फोनवर परत कॉल केला परंतु तो व्यस्त आला मग मात्र माझी मलाच खंत वाटू लागली अरे आपल्याला वाटलं कि आपली कुणीतरी थट्टा करतंय माझं मन जरा खट्टू झालं परत नाही आला फोन तर. पण ५ मिनिटातच परत मला ZEE मराठीतून कॉल आला मी त्या मॅडम शी बोलू लागले आधी मी त्यांची माफी मागितली आणि आमचे संवाद सुरु झाले. त्यांनी मला सांगितले १४ डिसेंबर ला तुमचं “आम्ही सारे खवय्ये ” या कार्यक्रमाचे चित्रिकरण सकाळी ८ वाजता आहे.तुम्ही कोणते पदार्थ करू शकता मी ३/४ पदार्थांची नावे सांगितली पण त्यांच्या कार्यक्रमात ते पदार्थ आधीच झाले होते मग त्यांनी मला सांगितलं कि तुम्ही रात्री ९ वाजेपर्यंत मला सांगा कि तुम्ही कोणते ३ पदार्थ करणार आहात ते . जर ते पदार्थ आमच्या कार्यक्रमात झाले नसतील तर ते आपण ते पदार्थ घेऊ नाहीतर नंतर कधीतरी तुमचं चित्रिकरण करू मला आलेली संधी गमवायची नव्हती .
त्यांना मी सांगितलं रात्री ९ पर्यंत मी तुम्हाला कोणते ३ पदार्थ करणार आहे ते सांगते. फोन ठेवला माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी घरातल्यांना सांगितलं की मला किती मोठी संधी मिळाली आहे ते . पण खरी कसोटी तर पुढेच होती मला असे ३ पदार्थ बनवायचे होते की ते त्यांच्या कार्यक्रमात झालेले नाहीत. मग मी माझ्या आईला ,वहिनीला, सासूबाई ,नणंदयांना कामाला लावले आणि विविध पदार्थ त्यांना विचारले आम्ही सगळ्यांनी खूप पदार्थ शोधले पण मला हवे तसे पदार्थ मिळत नव्हते . मी दादा वहिनीला माझ्या घरी बोलावून घेतलं माझ्या कडे खूप कमी वेळ होता आम्ही खूप विचार करून इकडचे तिकडचे पदार्थ बघून ३ पदार्थ ठरवले एका कागदावर त्याचे साहित्य आणि कृती लिहिली त्या पदार्थाना काय नाव द्यायची ते ठरवले. आमच्या कागदावर ३ डिश तयार झाल्या.
१) सॅगो पराठा २) सरप्राईज बॉल आणि ३) हॉट अँड सोर व्हेजिटेबल्स .
मी ZEE मराठी ला फोन केला आणि पदार्थांची नावे सांगितली त्या मॅडम पण खुश झाल्या आमच्यायेथे हे पदार्थ झालेले नाहीत तुम्ही थोडे वेगळे पदार्थ करत आहात असे त्यांनी मला सांगितले चित्रींरणासाठी १४ डिसेंबर २०१६ ला सकाळी ८ वाजता या मी तुम्हाला पत्ता पाठवते असे बोलून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.
मी त्यांना पदार्थ तर सांगितले पण ते पदार्थ मी कधीच केले नव्हते ते पदार्थ करून तर बघायला हवे असं माझं व वहिनीचा ठरलं माझ्या वहिनीच्या मदतीने दुसऱ्यादिवशी ते पदार्थ करायचे ठरवले व साहित्याची यादी मिस्टरांच्या हातात ठेऊन त्यांना साहित्य आणायला सांगितले . ते पदार्थ आम्ही करून बघितले खूपच छान झाले मग थोडा धीर आला .
चित्रीकरण होत तो दिवस (१४ डिसेंबर २०१६ ) जरा लवकरच उजाडला. माझं चित्रीकरण मीरारोडला होत आम्ही वेळे आधीच पोहोचले माझ्याबरोबर माझी वहिनी आली होती आम्हाला तिथे चहा व नाश्ता दिला सोय खूप छान होती सगळीच पहिलंच चित्रीकरण असल्यामुळे थोडी भीती होती माझ्या आधी एका मुलाचं चित्रीकरण होत त्याच चित्रीकरण बघून थोडा धीर आला आणि खरं तर तिथे काम करणारे (चित्रीकरण करणारे) आपल्याला खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे आणि निवेदकाच्या दिलखुलास गप्पांमुळे माझी भीती केव्हाच पळाली होती.
दुपारी मस्त गरमगरम आणि स्वादिष्ट भोजन होत माझं चित्रीकरण ५ वाजता संपल . चित्रीकरण खूप छान झालं. तिथले लोक किती मेहेनत घेतात तेव्हा आपल्याला चागले कार्यक्रम बघत येतात . खूप बरं वाटलं. माझा एपिसोड १० जानेवारी २०१७ ला दुपारी १,३० वाजता ZEE मराठी वर “आम्ही सारे खवय्ये” या कार्यक्रमात दाखवण्यात आला . त्या दिवशी आणि पुढचे काही दिवस मला अभिनंदनाचे फोन येत होते जो भेटेल तो सांगत होता खूप छान झाला तुझा एपिसोड ,आम्ही बघितला. माझ्या एपिसोडचा नंबर २५३२ हा आहे . अनुभव खूप वेगळा होता आपल्या आयुष्यात असे क्षण खूप कमी असतात कि ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही असा माझा ZEE मराठी वरील “आम्ही सारे खवय्ये”चा ही अविस्मरणीय घटना आहे. . अजूनही खूप जण हा माझा एपिसोड बघतात. त्यातील रेसिपी करून बघतात खूप बर वाटत.


