सांगावा – भयकथा © विद्याधर सुळे

सांगावा
( ही  भयकथा व त्यातील पात्रे संपूर्णपणे काल्पनिक असून तिचा व त्यांचा प्रत्यक्षपणे कोणाही हयात व्यक्तीशी वा प्रसंगाशी काहीही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा🙏)

आशिष शेलारने परत एकदा घड्याळात पाहिले. रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. गेले दोन तास तो खेड बस स्थानकावर, चिपळूणला त्याच्या घरी जाण्यासाठी, बसची वाट बघत उभा होता. अर्ध्या तासापूर्वी ध्वनिक्षेपकावरून केलेल्या घोषणेमुळे त्यास कळले की परशुराम घाटात एक तेलाचा टँकर व बस यांचा मोठा अपघात झाला आहे व तेल सर्वत्र पसरल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे ;तो परत कधी चालू होणार ह्याचा काहीच तपशिल नव्हता. एकही बस चिपळूणच्या दिशेने गेल्या दोन तासात गेली नव्हती व त्यामुळे स्टँडवर चांगलीच गर्दी झाली होती. दापोली,मंडणगडकडे जाणाऱ्या बसेस मात्र व्यवस्थित येत जात होत्या. आशिष मोठ्या विचारात पडला होता आणि इतक्यात घोषणा झाली की रात्रीत बंद झालेला रस्ता चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले तरीही उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तरी चिपळूणच्या दिशेने एकही बस जाणार नाही.आता काय करायचे असा विचार करत असतानाच आशिषला अचानक आपल्या मावशीची आठवण आली,इतकेच नाही तर ती जणू हाक मारून आपल्याला तिच्याकडे बोलावते आहे असा भास झाला. तशी मावशीची आठवण त्याला नेहमीच येत असे. तो दहावीत असताना त्याच्या मावशीने म्हणजे सुमंत सावंत ने पळून जाऊन कॉलेजातील आपल्या मुसलमान मित्राशी लग्न केले होते.

सुमन सावंत ची चक्क फातिमा रफिक शेख झाली होती. त्यावेळी घरीच नाही तर चिपळूणमधील त्यांच्या वस्तीत झालेला हलकल्लोळ,गोंधळ आशिष ला चांगलाच आठवत होता. घरातील सर्वांनीच सुमनचे नाव टाकले होते व तिला घरी येण्याची बंदी केली होती. ती गेल्यानंतर तिच्या वडलांनी म्हणजे आशिषच्या आजोबांनी जे अंथरुण धरले ते मग त्यातून उठलेच नाहीत. सहा महिन्याच्या आत त्यांचे निधन झाले.त्यांच्या दिवसासाठी तरी सुमनला घरी येऊ द्यावे अशी आशिषच्या आजीची व आईची फार इच्छा होती परंतु मोठ्या दोन भावांच्या म्हणजेच आशिषच्या मामांच्या त्या घरात असलेल्या धाकामुळे व दराऱ्यामुळे त्या काहीच बोलू शकल्या नव्हत्या व त्यांची इच्छा मनातल्या मनातच राहिली होती. त्यानंतर मात्र गेल्या चौदा पंधरा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. भावांचा विरोध जरी कायम होता तरीही सुमनची सख्खी मोठी बहीण,वसुधा म्हणजेच आशिषची आई त्याला घेऊनच तिच्या सुकदरच्या घरी जाऊन भेटून आली होती. शेख कुटुंबाचा सुक्या मासळीचा व्यवसाय होता व त्यामुळे दहा-बारा किलोमीटरवरील दापोली त्यांच्यासाठी अगदी सोयीस्कर होते. खेड- दापोली रस्त्यावर १० किलोमीटरवर फुरुस गेल्यावर एक फाटा डावीकडे आत जातो व तेथून तीन-चार किलोमीटरवर सुकदर हे जवळजवळ संपूर्ण मुस्लिम वस्तीचे गाव वसलेले होते.आशिषला घेऊन प्रथम जेव्हा त्याची आई वसुधा, सुमन मावशीकडे गेली तेव्हा आशिष चांगला वीस वर्षांचा झाला होता. सुमन तिच्या भावंडांमध्ये सर्वात लहान असल्याने आशिषपेक्षा सात-आठ वर्षेच मोठी होती व त्या दोघांच्यात मैत्रीचे नाते होते. सुमनचाही आपल्या भाच्यावर खूप जीव होता व त्यामुळे त्या दोघांची चांगलीच गट्टी जमलेली होती. सुमन मावशीचे लांब केस असलेला शेपटा ओढायचा व ती किंचाळून त्याच्या पाठी धावली की जोरात धावत सुटायचे हा आशिषचा आवडता उद्योग!! त्याचे व त्याच्या आजोबांचे घर एकाच गल्लीत असल्यामुळे सुमनचे आपल्या वसुताईकडे नेहमीच येणे-जाणे असायचे. त्यामुळेच आशिषच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आईने मनाचा हिय्या करून सुमनला भेटायचे असे ठरवले व तो बेत त्याला सांगितला.

आशिषला हा बेत फारच आवडला व तो ताबडतोब तयार झाला. खेड डेपोतून सुकदर साठी थेट बस होती.गाव तसे लहानच परंतु चांगले श्रीमंत होते. प्रत्येक घरामध्ये एखादा तरी पुरुष दुबईला वा मस्कतला नोकरीत असल्याने ,त्या तेलाच्या अरबी पैशाने सुकदर मधील प्रत्येक घर चांगले सुखवस्तू झाले होते.रफीकचा एक भाऊसुद्धा दुबईला नोकरीसाठी गेला होता. साधारण दहा वर्षांपूर्वी प्रथमच जेव्हा आशिष आपल्या आईसोबत मावशीकडे गेला तेव्हा त्यांना कळले की घरात पैसा असूनही शांतता व आनंद नव्हता. भावाभावांच्यात वडिलोपार्जित इस्टेटी वरून वितंडवाद होते.एकाच घरात असूनही तीन भावांची कुटुंबे स्वतंत्रपणे राहत होती. रफिक व सुमनला मोठ्या हवेलीचा तळमजल्यावरील उजव्या बाजूकडील हिस्सा मिळाला होता.घराला मोठे आवार होते. पाठच्या बाजूला सुद्धा भरपूर जागा होती परंतु ती बाजू जास्त वापरात नव्हती. संपूर्ण घराला पक्के भिंतीचे कुंपण होते.आंब्याचे एक मोठे झाड सुमन मावशीच्याच बाजूला होते व त्याखाली रफिकने सुमनला आवडतो म्हणून मोठा झोपाळा बसवून घेतला होता. मुलबाळ झालेले नसल्याने त्या झोपाळ्यावर सुमन मावशीचाच नेहमी वावर असे. त्यांची प्रथम भेट झाली तेव्हाही मावशी त्यांना भेटली ती त्या झोपाळ्यावरच! तिथेच बसून त्यांनी गप्पा मारल्या होत्या परंतु मावशी त्यावेळी काही फारशी आनंदी दिसली नव्हती.एकमेकींना भेटल्यावर दोन्ही बहिणींचा अश्रूंचा बांध फुटला होता, तोही त्या झोपाळ्यावरच! साहजिकच आहे कारण दोन बहिणींची भेट तब्बल पाच सहा वर्षानंतर झाली होती व तीही वडिलांच्या निधनानंतर प्रथमच!

आशिषला ती हवेली,ते आंब्याचे प्रशस्त झाड त्याखाली असलेला झोपाळा व एकंदरच हवेलीचा परिसर खूप आवडला होता ( फक्त गावाकडून हवेलीच्या रस्त्यावर असलेले व पहिल्याच भेटीत लक्षात आलेले मुस्लिम कब्रस्थान मात्र त्याला आवडले नव्हते.)रफिक त्यांच्याशी बोलला पण जरा हातचे राखूनच!त्यानंतरही जेव्हा जेव्हा दापोलीला काम निघाले तेव्हा तेव्हा आशिष वाकडी वाट करून आपल्या सुमन मावशीला भेटून आला होता.गेल्यावर्षी रफिकच्या अपघाती निधनाची बातमी कळल्यावर आई व तो तिला भेटून आले होते पण त्यानंतर मात्र त्यांच्यात काहीच संपर्क झाला नव्हता. हे इतके सर्व आशिषला त्याक्षणी आठवले कारण त्यावेळी आपण दापोलीच्या बसने रात्रीच्या मुक्कामासाठी मावशीकडे जावे का असा विचार तो करत होता.तिथे तो राहण्यासाठी मात्र यापूर्वी कधीच केला नव्हता व त्यामुळे काय करावे ह्या विचारात असतानाच अचानक सुकदरला जाणाऱ्या शेवटच्या बसची घोषणा झाली.मग मात्र मावशीला भेटायचा हा दैवी सांगावा असावा अशी खूणगाठ मनाशी बांधून तो पटकन त्या बसमध्ये जाऊन बसला. ही शेवटची बस तशी जवळजवळ रिकामीच होती.सुकदरच्या स्टॉपवर तो उतरला तेव्हा रात्रीचे साडे दहा वाजले होते. सर्वत्र नीरव शांतता होती व त्याचा भंग फक्त मध्येच ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या ओरडण्याने होत होता. रस्ता संपूर्ण निर्मनुष्य होता. वाटेतच असणाऱ्या छोट्या पोलीस चौकीतच काय ते दिव्यांचे अस्तित्व दिसत होते. शेख हवेली तशी त्या छोट्या गावाच्या अगदीच टोकाला होती. वाटेत डाव्या बाजूला असणारे मुस्लिम कब्रस्तान आशिष ला माहित होते व नकळत त्याची एक दहशत मनात असल्याने ते ओलांडून पटकन पुढे जाण्यासाठी आशिष घाईने चालत असताना अचानक त्याच्या उजव्या बाजूला दोन माणसे समोरून आलेली त्याला दिसली. त्यांनी त्याच्याकडे पाहिले व ते काही बोलणार असा त्यांचा अविर्भाव होता परंतु आशिषने मात्र मनात दाटलेल्या भीतीमुळे ते पाहीलेच नाही व तो पटकन पुढे सटकला. नशिब त्याने मागे वळून पाहिले नाही; कारण क्षणात गायब झालेल्या त्या जोडीने आशिषच्या हृदयाचे ठोके नक्कीच थांबवले असते.दहा मिनिटात तो जेव्हा सुमन मावशीच्या हवेलीपाशी पोचला तेव्हा ती संपूर्ण हवेली अंधारात बुडालेली त्याला दिसली. दिव्याची वा वस्तीची काहीच खूण तिथे दिसत नव्हती.

आता मात्र आशिषला आपण अचानक घेतलेल्या धाडसी निर्णयाची शंका व त्याबरोबरच भीतीही वाटू लागली. आश्विन पौर्णिमेची आदली रात्र असल्याने त्या हवेलीचा परिसर त्या पिठूळ चांदण्यात चांगलाच उजळून निघाला होता. हवेलीची दर्शनी बाजू पूर्वेला असावी कारण चंद्रप्रकाशात तो भाग चांगलाच उजळलेला दिसत होता. सुमन मावशीच्या ताब्यातील उजवी बाजू मात्र अंधारातच होती कारण समोरच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या सावल्या तेथे पडल्या होत्या. फाटक उघडावे का असा विचार करता करता त्याने फाटकावरची आडवी पट्टी उचलली व किंचित ढकलून आत पाहिले तर त्याला आंब्याच्या झाडाखाली असलेला झोपाळा अस्पष्ट असा दिसला व आश्चर्य म्हणजे त्यावर कोणीतरी बसले आहे असेही त्याला वाटले. झोपाळ्यावर बसले आहे म्हणजे ती सुमनमावशीच असणार हे समीकरण आशिषच्या डोक्यात इतके पक्के बसले होते की इतक्या रात्री सुमन मावशी एकटीच कशी बरे झोपाळ्यावर येऊन बसेल हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. फाटक परत बंद करून तो थेट झोपाळ्यापाशी गेला. त्याचा अंदाज अगदी बरोबर होता. झोपाळ्यावर बसून झोके घेणारी ती सुमनमावशीच होती. त्याला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य मात्र अजिबात उमटले नाही उलट ती आशिषला म्हणाली “अरे आलास का तू? बरे झाले! मी तुझीच वाट बघत होते. ये ये बस बाजूला” असे म्हणून मावशीने तिच्या उजव्या हाताला स्वतः सरकून डाव्या बाजूला आशिषसाठी जागा करून दिली. आशिष भारल्यासारखा तिच्या बाजूला जाऊन बसला. संमोहन झाल्यासारखी त्याची अवस्था झाली असल्याने त्याची विचारशक्ती नीट काम करत नसावी ; नाहीतर इतक्या रात्री केस मोकळे सोडून व पांढरी स्वच्छ साडी घालून मावशी झोपाळ्यावर कशी बसली आहे हा विचार खचितच त्याच्या मनात डोकावला असता.

झोपाळा हलत असल्याने उजव्या बाजूला बसलेल्या मावशीच्या चेहऱ्यावर झाडाची सावली सतत वरखाली होत होती व त्यामुळे मावशीचा पांढराफटक चेहरा आशिष ला भितीदायक वाटत होता. तिचे मुक्तपणे उडणारे मोकळे केस तर अमानवी वाटत होते. तो तर अचानक तिथे आला होता परंतु मावशी तर म्हणाली की मी तुझी वाटच पाहत होते! हे कसे काय? हा विचार मात्र त्या संमोहित अवस्थेतही आशिषच्या मनात डोकावला. त्याने त्याप्रमाणे मावशीला विचारलेही! मावशीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले व ती विचित्रपणे खी खी करून जोरात हसत त्याला म्हणाली “अरे राजा, पाच दिवसांपूर्वी ईद-ए-मिलादचा सण झाला व मी त्यासाठी खीर बनवली होती.तुला खीर खूप आवडते व म्हणून तू येशील असा विचार करून मी ती खाल्लीच नाही व तुझी वाट पाहत ह्या झोपाळ्यावर बसले आहे. आज शेवटी आलासच तू पण ते सांगावा धाडल्यावर!!रात्रीची नीरव शांतता, भारलेले वातावरण, स्वच्छ चांदण्यात वेड्यावाकड्या हलणार्‍या सावल्यामुळे सुमन मावशीची आपल्या बाजूला बसलेली आकृती आशिषला काहीतरी विचित्र व भीतीदायक वाटत होती. त्या अवस्थेतही मावशीच्या विचित्र बोलण्याचा अर्थ त्याला नीट उलगडत नव्हता. मावशी अचानक झोपाळा थांबवून उठली व त्याला म्हणाली “चल मी तुला माझी हवेली व नवे घर दाखवते! “नवे घर”? आशिषला मावशी काय म्हणतेय ते कळत नव्हते पण तरीही आज्ञाधारकपणे तो उठला व मावशीच्या पाठोपाठ हवेलीच्या पाठच्या बाजूला आला. ह्या भागात हवेलीची सावली पडलेली असल्याने दृश्यमानता फारच कमी झाली होती. मावशी त्याला घेऊन तेथे चालत आली.चालत कसली ती हवेत लहरत आहे असा भास आशिषला सतत होत होता. हा भाग वापरात नसल्याने सर्वत्र दाट गवत व झुडपे होती. मावशी हे असले जंगल दाखवायला आपल्याला कशाला इथे रात्रीच्या वेळी घेऊन आली हे मात्र काही केल्या त्याला कळेना. इतक्यात मावशी अचानक थांबली. एका झाडापाशी थोडीशी मोकळी जागा व मातीचा एक उंचवटा होता तिथे ती उभी राहिली व आशिषला तिथे येण्याची खूण केली. त्यावेळी तिचे डोळे इतके विस्फारले होते की ते खोबणीतून बाहेर येतील की काय असे वाटावे!! भयचकीत झालेला आशिष पुढील पाऊल टाकणार इतक्यात अचानक एक वावटळ उठली व मावशी त्या जागेवर उभ्या उभ्या एकदम अंतर्धान पावली.

मावशी जशी गायब झाली तशी आशिषला एकदम प्रचंड भीतीची जाणीव झाली अन त्याच्या तोंडून नकळत एक किंकाळी बाहेर पडली. बुद्धी थोडे काम करू लागली, त्याच्यावरचे संमोहन भंग पावले व त्याला अचानक त्या घटनेचा काहीतरी भयानक असा अर्थ लक्षात आला. त्याने तेथून मागे येत येत थेट प्रवेशद्वाराकडे अक्षरशः धूम ठोकली.क्षणभर आपला शर्ट कोणीतरी धरून ओढल्याने त्याचे पाऊल लटपटले पण मनाचा हिय्या करून तो तसाच फटकाकडे धावला व तेथे पोचून लटपटत्या हाताने कसेबसे त्याने ते फाटक उघडले व तो निर्मनुष्य रस्त्यावर गावाच्या दिशेने धावत सुटला. ह्या सर्व अचानक घडलेल्या भयंकर घटनांचा त्याच्या मनावर चांगलाच खोल परिणाम झाला होता. त्यामुळे व प्रचंड वेगाने धावल्यामुळे तो रस्त्यातच कोसळला आणि एका क्षणात त्याची शुद्ध पूर्णपणे हरपली…….

सकाळी तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला दिसले की तो पोलिस चौकीत आहे. दोन हवालदार आणि दोन अनोळखी व्यक्ती त्याच्या बाजूस उभ्या आहेत.त्या दोन अनोळखी व्यक्तीनीच पहाटे रस्त्यात पडलेल्या आशिषला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची जेव्हा काहीच हालचाल दिसेना तेव्हा त्यांनी त्याला सरळ उचलून पोलीस चौकीत आणले होते. छोट्याशा गावातील माणुसकीचा आशिषला लगेच प्रत्यय आला. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी आधी काहीही चवकशी न करता त्याला प्रथम चहा पाजला व थोडा वेळ शांतपणे बसू दिले.मग मात्र आशिषचा मेंदू बरोबर काम करू लागला.

आशिषने आपल्यावर ओढवलेला रात्रीचा सर्व भयानक प्रसंग नीट वर्णन करून सर्वांना सांगितला. हेच जर शहरातील पोलिस ठाण्यात झाले असते तर तेथील पोलिसांनी त्याला वेड्यातच काढून हाकलून दिले असते. परंतु गावातील दोन हवालदार आपली माणुसकी विसरले नव्हते.गावात लोकांना येणाऱ्या विचित्र पैशाच्चीक अनुभवांची त्यांना माहिती होती व त्यामुळेच ते त्याच्याबरोबर प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी, त्याला घेऊन शेख हवेलीत आले. रफिकचा भाऊ अहमद याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी फातिमाने अनेकदा करूनही पुराव्याअभावी त्यांना अहमद विरुद्ध काहीच कारवाई करता आली नव्हती. परंतु आजची ही हकीकत ऐकून त्यांना यात काहीतरी भलेमोठे षड् यंत्र आहे याचा अंदाज आला. कारण चार दिवसांपूर्वी झालेल्या ईदच्या सणानंतर अहमद व त्याचे कुटुंब गावातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. फातिमाचाही काही वावर दिसत नव्हता. सकाळच्या वेळी ते हवेलीत पोचले तेव्हा हवेली कोवळ्या उन्हात शांत उभी होती व रात्री जाणवलेला भारलेपणा गायब झाला होता. आशिषने दाखविलेल्या हवेली मागच्या स्थानी ते आले.रात्री आशिषला भासलेली ती मोकळी जागा एका नुकत्याच उकरून परत भरलेल्या खड्ड्याच्या सारखी आता स्पष्ट दिसत होती. आता मात्र दोन्ही हवालदारांच्या मनात काही शंका उरली नाही. त्यांनी ताबडतोब गावातील पंच बोलावले व त्यांच्या समक्ष तो खड्डा उकरुन काढला. त्यांची भीती खरी ठरली.

फातिमाचे प्रेत,अर्धवट सडलेल्या अवस्थेत ,आतमध्ये सापडले. यथावकाश अहमदला व त्याच्या पत्नीला रत्नागिरीहुन पकडून आणण्यात आले व मग सर्व उलगडा आपसूक झाला. रफिकच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती हडप करण्यासाठी आसुरी इच्छेने पछाडलेल्या अहमदने फातिमा चा काटा काढण्याचे ठरवले.आधीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या अहमदला रफिकच्या मृत्यूनंतर सर्व रान मोकळे मिळाले होते व अडथळा होता तो फक्त फातिमाचा!!तिचा काटा काढला ही सर्व हवेली त्याच्या ताब्यात येणार होती. फातिमाचा अडथळा दूर करायचाच हे त्या पती-पत्नीने ठरविले,. ईद-ए-मिलाद च्या दिवशी प्रेमाचे नाटक करत अहमद व त्याच्या पत्नीने विष कालवलेली खीर फातिमाला खाऊ घातली व ती मेल्यावर त्याच दिवशी रात्री हवेलीच्या पाठी एक मोठा खड्डा खणून तिचे प्रेत त्यात पुरून टाकले. पण खुनाला वाचा ही फुटतेच!! सुमनने भरकटत असलेल्या आपल्या अतृप्त आत्म्याद्वारे स्वतःच्या लाडक्या भाच्याला मनोमन “सांगावा” धाडला व तो हवेलीत आल्यावर त्याच्याकरवी स्वतःच्या खुनाला वाचा फोडवली…

 

 

 

 

 

 

 

 

© विद्याधर सुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu