“आस्वाद मराठीचा”

“आस्वाद मराठीचा” ©विद्या पेठे 

मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून आज पासून थिन्कमराठी .कॉम वर  “आस्वाद मराठीचा”  हे नवे सदर आपण सुरू करत आहोत. या सदरात आपण दर महिन्याला एखाद्या मराठी कवितेचा, लेखांशाचा  ,उताऱ्याचा, रसास्वाद घेणार आहोत.

माझा मराठाचि बोलू कौतुकें। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिकें। मेळवीन ॥१४॥
जिये कोवळिकेचेनि पाडें। दिसती नादींचे  रंग थोडे ।  वेध परिमळाचे बीक मोडे। जयाचेनि ॥ १५ ॥
ऐका रसाळपणाचिया लोभा की श्रवणीचि होति जिभा ।  बोले इंद्रियां लागे कळभा । एकमेकां ॥ १६ ॥
सहजे शब्द तरी विषो श्रवणाचा। परि रसना म्हणे रसु हा आमुचा। प्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥१७॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखता डोळयाही पुरो लागे धणी। ते म्हणती उघडली खाणी। रूपाची हे ॥ १८ ॥
जेथ संपूर्ण पद उभारे। तेथ मनचि धांवे बाहिरे। बोलु भुजाही आविष्करें। आलिंगावया ॥ १९ ॥
ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी ।  झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी। जैसा एकला जग चेववी सहस्त्रकरु ॥ २० ॥
तैसें शब्दाचें व्यापकपण। देखिजे असाधारण । पाहातया भावजा फावती गुण | चिंतामणीचे ॥ २१ ॥
है असोतु या बोलांची ताटें भली । वरी कैवल्यरसे वोगरिली ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥२२॥
आतां आत्मप्रभा नीच नवी। तेचि करूनि ठाणदिवी। जो इंद्रियात चोरूनि जेवी ।  तयासीचि फावे ॥ २३ ॥
येथ श्रवणाचेनि पांगे। वीण श्रोतयां होआवे लागे। हे मनाचेनि निजांगे। भोगिजे गा ॥२४॥

नमस्कार आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ , आज मराठी राजभाषा दिन.  ज्याची मातृभाषा मराठी आहे त्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान वाटतो. वर दिलेल्या ओव्यांत  संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे.

सार्थ ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील हा तेरावा श्लोक.
या श्लोकापासून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची महती गायला सुरुवात केली आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली त्याप्रमाणे सहावा अध्याय हे गीतार्थाचे सार आहे . यात योगसंपत्तीचा खजिना आहे. हे आदिमायेचे विश्रांतीस्थान असून येथे वेदांनाही मौन धारण करावे लागते. असा हा सर्व अलंकारांनी परिपूर्ण सहावा अध्याय तुम्ही चित्त देऊन ऐका अशी विनवणी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम केली आहे.
ते म्हणतात माझे बोल प्राकृत भाषेत आहेत पण ते प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकतील अशा गोड शब्दांत मी तत्त्वज्ञान सांगेन. हे बोल इतके मृदू असतील की सप्तसुरांनी  होणारा आनंदही त्यापुढे फिका ठरेल.
त्याचा छंद इतका सुगंधी असेल की त्यापुढे कोणत्याही सुगंधाला कमीपणा  वाटेल.
हे गोड शब्द ऐकण्यासाठी,  प्राशन करण्यासाठी कानाला जिव्हा फुटतील.जीभ म्हणेल रस हा आमचा विषय आहे.  नाक म्हणेल या भाषेचा सुगंध अनुभवणे हा आमचा विषय आहे. असे ते आपापसात भांडू लागतील ते पाहून डोळे तृप्त होतील.
हे सौंदर्यपूर्ण शब्द जुळून जेव्हा वाक्यांची निर्मिती होईल तेव्हा त्या अतिसुंदर शब्दांना जवळ घ्यायला मन आपले दोन्ही बाहू पसरून उभे राहील.
आत्मज्योतीची समयी लावली जाईल.  त्या उजेडात सर्व इंद्रियांना गीतार्थाची  मेजवानी मिळेल. या साऱ्यांचा श्रोत्यांनी मनाने उपभोग घ्यावा.” अशी विनवणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे .

लेखिका – ©विद्या पेठे 
 मुंबई

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu