मराठीचा आस्वाद (लेखांक ५)©विद्या पेठे
गेल्या भागात आपण पूर्ववैदिक भाषेपासून मराठीपर्यंत भाषेमध्ये कोणते बदल झाले हे काही वाक्यांच्या सहाय्याने पाहिले.
तसेच त्या काळातील नरसिंह सरस्वती आणि जनार्दन स्वामींची माहिती आणि काही ओव्या पाहिल्या. त्या ओव्यांतील मराठी आपल्याला सहज समजत होते.
आज त्याच काळात झालेले आणखी काही संत व त्यांचे लेखन याचा अभ्यास करणार आहोत.त्यापैकी एक संत होते. संत भानुदास. हे नाथपंथीय असले तरी विठ्ठलाचे भक्त होते. विजयनगरच्या राजा कृष्णदेवरायकडून त्यांनी विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रात आणली आणि पंढरपूर येथे स्थापना केली.आता संत भानुदासांचा एक अभंग पाहू.
धन्य धन्य हे नगर | भूवैकुठे पंढरपूर ||१||
धन्य धन्य चंद्रभागा। मध्ये पुंडलिक उभा ||२||
धन्य धन्य वेणूनाद | क्रीडा करीतो गोविंद ||३||
धन्य धन्य पंढरीचा वास | देवा गाये भानुदास॥४||
ही मराठी आजच्या मराठी भाषेत अगदी जवळची आहे.पण त्यांच्या काही इतर काव्यांमध्ये वेगळी शब्दयोजना आहे. उदा.नवल ऐवजी नवलाद , देखिका ऐवजी देखियेला, अवघ्या ऐवजी अवघिया, हर्षे ऐवजी हरुते . अशा रूपांचा वापर इतरत्र दिसतो.
याच १६ व्या -१७ व्या शतकातील दुसरा महान लेखक म्हणजे मराठी दासोपंत. दासोपंताचे पूर्ण नाव म्हणजे दासो दिगंबरपंत देशपांडे. मराठीत सर्वाधिक लेखन करणारे हे कवि. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत जाते.
दासोपंताबद्दल पुढील अख्यायिका सांगितली जाते.त्यांचे वडील दिगंबरपंत हे बेदरच्या अलीच्या दरबारात नोकरीला होते. त्यांचा मुलगा दासोपंत. लहानपणापासून अतिशय हुशार १६ व्या वर्षी लग्न झाले. बायकोचे नाव जानकी.
पुढे राज्यात दुष्काळ पडला. दिगंबरपंतांनी कोठारातील अन्न गोरगरिबांना काढून टाकले. सारा पण भरला नाही. बादशहाला हे ऐकून राग आला. एका महिन्याच्या आत ५ लाख सुवर्णमुद्रा सरकारी खजिन्यात जमा करण्याचे फर्मान त्याने काढले. पण तोपर्यंत दासोला बादशाहच्या नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा सुनावली.दासो स्नान संध्या करी, बादशाहने भोजनासाठी दिलेले पैसे गरिबांना देई, हा तेजस्वी मुलगा मुसलमान व्हावा असे बादशाहला वाटे, दासो रोज श्रीगुरुदत्ताला विनवत होता.एक महिना संपत आला. शेवटच्या दिवशी संध्याकाळी डोक्याला मुंडासे, खांद्यावर घोंगडी घेऊन-दत्ताजी पाडेकर नावाचा माणूस बादशहाकडे आला. मी दिगंबरपंताचा पूर्वीपासूनचा सेवक आहे. त्याने ५ लक्ष मुद्रा असलेली चंची बादशाहपुढे ओतली आणि पावती मागितली.बादशाहने दासोजींची पालखीतून पाठवणी केली. सर्वांना आनंद झाला पण दासो मनातून दु:खी झाला.तो आलेला माणूस नक्की दत्तगुरु असणार आणि त्यांचे आपल्याला दर्शन झाले नाही याचे त्याला वाईट वाटले. पुढे दासोपंत अंबाजोगाई येथे राहू लागले. त्यांनी २० ते २५ वर्षे अखंड लेखन केले. त्यांना रोज एक ढब्बू पैसा किंमतीची शाई लिहिण्यासाठी लागे असे सांगतात.
दासोपंतांची पासोडी 40 फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा कापडावर त्यांनी पंचीकरण हा अध्यात्म ज्ञानाचा विषय चित्राकृतीतून मांडला. ही पासोडी एकमेवद्वितीय आहे. यावर वेदान्ताचे आकृतीसह स्पष्टीकरण आहे. अनेक कागद वापरण्यापेक्षा कापड हे माध्यम दासोपंतानी वापरले. यात.त्यांनी अश्र्वत्थवृक्ष, सूर्य , भावचक्र, पंचकोशचक्र, स्थूलादिदेहचक्र, श्री दत्तमूर्ती, माळा , शंख, डमरू, त्रिशूळ इ. चित्राचे रेखाटन केले आहे. यावरून ते उत्तम चित्रकार होते हे सिद्ध होते. मजकूर योजनाबद्ध लिहिला आहे.
अक्षरांची दाटी नाही, खाडाखोड नाही, नेटके चित्रमय वाड्.मय आहे. चित्रे दाखवताना योग्य अश्या रंगांचा वापर केला आहे. या पासोडी चे १३ विभाग आहेत. दासोपंतानी गीतेच्या १८व्या अध्यायावर आधारित १८००० ओव्या लिहिल्या. गीतेच्या श्लोकांवर स्वंयप्रज्ञेने भाष्य व निरूपण केले. यालाच गीर्ताजन असे म्हणतात. अर्णव म्हणजे महासागर.
सार्वभौम गा श्रीपती ।
ते माते तारक अंती । ऐसे नव्हे ।। २२४१ ।। आता तेचि विवंचना । सांगेन हृदयस्थ कल्पना ।
राज्य येणे श्रीकृष्णा । होईल दुःख।। २२४२ ।।
त्यांनी विशिष्ट प्रसंगांचे वर्णन नाट्यमयरित्या केले आहे. इकदुली, प्रीतीकळ हो, नामनिर्देशु, गूज इ. दासोपंताचे ललित मह्णजे रूपके, कूट, खेळिया, नवल, कोडे इ. अनेक विषयांना स्पर्श करणारा लोकनाट्याचा आविष्कार आहे असे म्हणावेसे वाटते.
त्यांच्या सव्वालक्ष अर्णवात विविध भाषांची पदे आहेत. संस्कृत, प्रकृत, वैदर्भी, व्राज , फार्सी, कन्नड इ. दासोपंताच्या पदनिर्मितीत दक्षिण व उत्तर या दोन्ही संगीत पद्धती आढळतात. त्यामुळे यातील पदे सुगम संगीतावर, लोकसंगीतावर, रागांवर आढळतात. विविध तासांचा उल्लेख आहे. सुमारे ८० ते ८५ रागांचा व १० ते १२ तासांचा विविध बंदिशींचा उल्लेख आहे.त्यांचे गौडीमिश्रित कल्याण रागातील पद –
आजिमेरो मन आनंद भायो-
कानन कुंडल मुगुट सिरायो
ध्यान मो देखो षडकुज धारी
ताल मृदुंग धिमि धिमी धिमिता
धिमि धिमि धिमिता
ताधिक थै, तधिक थै कहत पुकारे सुत दिगंबर||
एकूण राग, ताल, नृत्य , वाद्य यासर्व गुणांनी संपन्न असे दासोपंत होते. आज अंबाजोगाई येथे त्यांची पासोडी बंदिस्त करून ठेवली आहे .कारण ती जीर्ण झाली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जर ती सुस्थितीत असली तर लोकांपुढे लेखन भांडार उघड होईल.
दासोपंतानी मराठी भाषेला वैविध्य दिले, सालंकृत केले, तिचे सौंदर्य वाढवले. दासोपंतानी शके १५३७ मध्ये माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली, अंबाजोगाई येथे नृसिंहतीर्थावर ही प्रशस्त समाधी आहे.
लेखिका – ©विद्या पेठे
मुंबई