मराठीचा आस्वाद लेखांक सात ७ ©विद्या पेठे

आतापर्यंत झालेल्या पाच भागात आपण मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली ते पाहिले त्याचबरोबर मराठी भाषेतील विविध लेखक
आणि तात्कालीन मराठी कशी होती ते दाखवणारे उतारे पाहिले. गेल्या अंकात आपण संत कवी भानुदास आणि दासोपंत यांची माहिती व त्यांची मराठीतील काव्यरचना पाहिली. यावेळी त्याच काळातील संत एकनाथ यांची माहिती व लेखन कार्य पाहणार आहोत. 

संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा.  वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणी बाई होते. एकनाथांचा जन्म पैठण येथे ८ नोव्हेंबर १९३३ मध्ये झाला. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु.  एकनाथांना साक्षात दत्तात्रेयाने दर्शन दिले होते.  तीर्थयात्रेनंतर त्यांनी विवाह केला.  गोदावरी व गंगा या दोन मुली आणि हरी हा मुलगा.  एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा हरीपंडित याने नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरास न्यायला सुरुवात केली .
संत एकनाथ हे नेहमी आपल्या काव्याच्या, भजनाच्या शेवटी ‘एका जनार्दनी’ असा उल्लेख करून गुरुचे ऋण मानतात.

संत एकनाथांनी भरपूर साहित्य निर्मिती केली आहे.  भावार्थरामायणाच्या ४० हजार ओव्या, रुक्मिणी स्वयंवर, स्वत्मानुभव, आनंद लहरी, भारुडे, गीता सार, मुद्रा प्रकाश इत्यादी ग्रंथ लेखन केले.

आपण सध्याची ज्ञानेश्वरीची प्रत वापरतो ती एकनाथांनी शुद्ध केली आहे.  मूळ प्रतीतील ओव्या म्हणताना लोकांकडून चुकीचे उच्चार केले गेले आणि ओव्यांचे अर्थ समजेनासे झाले.

तेव्हा संत एकनाथांनी पुन्हा ज्ञानेश्वरीचे वाचन व परीक्षण करून त्यात सुधारणा केल्या तीच आजची ज्ञानेश्वरी.  अर्थात विद्वानांच्या मते या संस्कारात एकनाथांच्या भाषेचे वळण आहे.

संत एकनाथ म्हणतात. 
शके पंधराशे सरोत्तरी । तारणनाम संवत्सरी। 
एका जनार्दने अत्यादरी। गीता ज्ञानेश्वरी इति शुद्ध केली ।
ग्रंथ पूर्वी अतिशुद्ध । परि पाठांतरे शुद्धबद्ध। 
ते शोधूनी एवंविध। प्रतिशुध्द शुद्ध ज्ञानेश्वरी। 

या काळात मराठी भाषेवर बहमनीकालीन भाषेचा प्रभाव दिसतो. ते पुढील उदाहरणात स्पष्ट होईल. 

यादवकालीन भाषा –                                                बहामनीकालीन भाषा 

रुतु                                                                    ऋतु 
रिणिया                                                                ऋणिया
गाजति                                                                गर्जती 

कैसिकैसीं                                                            कसेकसे 

सांधैन                                                                सांगेन 

तोखे                                                                  तोषे 

साचचि                                                               सत्यचि 

वोइरणा                                                              वैराणा 

उपेगु                                                                  उपयोग 

नोहे                                                                    नव्हे 

याप्रमाणे  प्रतिक्रियेतही बदल झाले. आख्याते, काळाचे पदे यातही बदल झाले.  १६५६  ते १६८७ पर्यंत दक्षिणेत बरीदशाही, रामदशाही ,निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही अस्तित्वात आल्या . फारशी भाषा बोलणाऱ्यांची कारकीर्द सुरू झाली.  त्यामुळे मराठीचे शुद्ध स्वरूप गढूळ झाले.  संत एकनाथ यांनी लिहिलेल्या अर्जदास्तांमध्ये मराठीमध्ये फारशी शब्दांचे प्राबल्य दिसते.
“अर्जदास्त अर्जदार बंदगी बंदेनवाज आलेकं सलाम साहेब .
सेवेसी बंदे शरीराकार जीवाजी रोखदार बुधाजी कारकून प्रगणे (परगणे) शरीराबाद किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालो.
या उताऱ्यात मराठी शब्द अत्यल्प आहेत.  जे त्यांच्या भाषेपुढे जितांची भाषा जास्त काळ टॅग धरू शकत नाही. हे यातून सिद्ध होते.  

सरकार दरबारी फारशी भाषेत भाषेचे महत्व वाढले हळूहळू व्यवसायातही फारसी शब्द येऊ लागले. उदाहरणार्थ अर्जदाराच्या फिर्यादी काजी पुढे जाऊन त्याचा फैसला होऊ लागला.  पत्रा ऐवजी कागद शब्द आला.  मोकादमाचे अधिकारी झाले. वार्षिक वेतनाला सालिना मुशाहिरा म्हणू लागले. बापाचे नाव पिता म्हणून न लिहिता बिन शब्द वापरला जाऊ लागला.  राईक,पाईक, मांडालिक, राऊत इत्यादी शब्द वापरातून जाऊन जमादार,  हवालदार, शिलेदार या नव्या पदव्या अस्तित्वात आल्या. थोडक्यात या काळात मराठीवर फारशी भाषेचा जबरदस्त परिणाम झाला आहे हे दिसून येते. 

         

 

लेखिका – ©विद्या पेठे 
                           मुंबई

 pc: google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu