अर्थपूर्ण विवाह विधी- मीनाक्षी सरदेसाई
‘ एका लग्नाची दुसरी गोष्ट,’ ‘ एका लग्नाची पुढची गोष्ट‘ अशा, लग्नाबद्दल च्या वेगवेगळ्या गोष्टी आपण दूरदर्शन मालिका, नाटकं, सिनेमे यातून बघत आलोत.पारंपरिक लग्नविधी हे निरर्थक आहेत असं काही तरुण मंडळीना वाटतं , पण काहीना थाटामाटात केलेलं लग्न आवडतही.जन्मल्यापासून म्हातारपणापर्यतच्या अनेक संंस्कारातला अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह. हा एक आनंदाचा सोहळा. लग्न हे दोन जीवांच मीलन तर असतंच,शिवाय दोन कुटुंबाचाही तो मिलाफ असतो.कुटुंब, परिवार, समाज अशा तीन पायऱ्या त्या ऐक्याशी निगडित असतात.म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये लग्नातील काही विधी रचले गेले आहेत. काहीना ते निरर्थक वाटतात,पण ते नीट समजून घेतले तर त्यांचं महत्त्व आपल्याला पटेल.
आपल्या विवाह विधीतील सर्वात घातक आणि वधूला अपमानास्पद रुढी म्हणजे हुंडा.सर्वसामान्य माणूस हा पैशाचा लोभी असतो.हुंडा घेण्याची पध्दत ही वरपक्षाला विनाकष्टाने मिळवण्याची सोन्याची कोंबडीच झाली. कोणताही विधिनिषेध न बाळगता वेगवेगळ्या स्वरूपात हुंडा मागणे, ऐनवेळी हटून बसणे, लग्न झाल्यावरही मुलीचा छळ करणे, तिला मारणे, भाजणे, उपाशी ठेवणे. असे प्रकार वरपक्षाकडून होऊ लागले. आजही काही ठिकाणी मुलीला असं सगळं भोगावं लागतं आहे. ही निष्ठुरता वधुपक्षाला अत्यंत क्लेशदायक असते आणि त्यातूनच मुलगी नको, तिला पोटातच मारून टाकणे, अशी अघोरी कामं प्रत्यक्ष मायमाउल्यासुध्दा करू लागल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे यात शंकाच नाही.
आपल्या काळजाचा तुकडा एका परक्या पुरुषाच्या हाती सोपवायचा म्हणजे त्यालाही खुश ठेवायचा, तो आपल्या मुलीला प्राणप्रिय म्हणून त्यालाही वरदक्षिणा द्यायची चाल पडली. दोघांचा नवा संसार सुरु होणार म्हणून त्यांना हातभार लावण्यासाठी वर्षभर सणांच्या निमित्त्याने काही देत रहाण्याची रुढी सुरू झाली. ह्यात खरंतर भावाबहिणीतली समानताच होती.
विवाहाची सुरुवात वाङ् निश्चययाने होते. त्यावेळचे मंत्र असे आहेत.
वधुपिता वरपित्याला म्हणतो, “वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुता त्वया ।
कन्यावलोकन विधी निश्चितस्त्ंवं सुखी भव॥“
अर्थ—-मी अंतःकरणपूर्वक तुम्हाला अर्पण केलेली कन्या तुम्ही मनःपूर्वक स्वीकारली आहे. तिचं यथायोग्य अवलोकन करून कोणताही दोष नाही याची खात्री करुन, सुखी व्हा.
वरपिता वधुपित्याला म्हणतो, “वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुत मया ।
वरावलोकनविधौ निश्चितंस्त्ंव सुखी भव ॥ह्या मंत्रामध्येही तुम्ही वराचं अवलोकन करून तुम्ही खात्री करून घ्या व सुखी व्हा.असं वचन दिलेलं आहे. वधुवरांना समान महत्व दिलेलं इथे दिसून येतं.
कन्यादान करतानाच्या मंत्राने तर वधुपित्या वराला शब्दाने बांधून घेतलेलं आहे.”ही कन्या तुला दिलेली आहे. तुम्ही दोघे नीतीने, सुखाने ग्रहस्थाश्रम साजरा करा.”वर आश्वासन देतो, म्हणतो,”मी हिचं पाणिग्रहण केलं आहे. मी तिला प्रेमाने, , सन्मानाने, आदराने आमच्या घरात सामावून घेईन.मी हे कबूलच करतो की.”
लग्न वधूच्या घरी करायची जुनी प्रथा आहे. हेही विचार पूर्वक ठरविलेलं आहे. मुलगी आता कायमची परग्रही जाणार. तिच्या प्रेमाचे आप्तेष्ट, शेजारी, मैत्रिणी, गायीगुरं, झाडं वेली आणि प्रत्यक्ष ते घर तिला प्रेमाने निरोप देणार. पुन्हां पुन्हां आलिंगन, प्रेमालाप, गुजगोष्टी होणार. मायबाप तिला मिठीत घेणार, तिला ही सर्वांना भेटायचय्, स्पर्शायचय,साऱ्यांना मनात साठवायचय,ह्यासाठी मायघरातला मोकळेपणाच हवा. हा घनव्याकूळ विधी माहेरीच होणं इष्ट.सीमांत पूजन,वराकडील मंडळींना अहेर करणं ह्यातही मुलीच्या हिताचाच विचार केलेला आहे. वरमायेला जरा जास्तच मान देण्याची पध्दत आहे हे खरं आहे, पण गौरिहराच्या वेळी वरमाय वधूच्या आईची ओटी भरून तिचा सन्मान करते. पोटची पोर तिने आपल्याला दिलीय् ,तिच्या पोटात दुःखाने खड्डा पडला असेल म्हणून वरमाय तिला साडी देऊन तिचं पोट झाकते नि दिलासा देते. हे किती काव्यमय आहे!
करुण वातावरणात थोडी हास्याची खसखस पिकावी म्हणून काही गमतीदार विधी समारंभात छान रंगत आणतात. ‘लाजाहोम’ च्या वेळी मुलीचा भाऊ मेहुण्याचा चक्क कान पिळतो.”माझ्या बहिणीला नीट संभाळ बरं, नाही तर मी आहे नि तू आहेस.”अशी तंभी देतो. वर त्याला कानपिळीचा मान देऊन शांत करतो.
सूनमुख पहाणे ह्या विधीत वरमाय मुलगा आणि सून यांच्या मध्ये बसते. तुम्ही दोघंही मला सारखीच हा भाव त्यात असतो.सुनेच्या तोंडात साखर घालून तिचा नि स्वतःचा चेहरा ती आरशात पहाते. आपण दोघी एकरुप होऊन आनंदाने राहू असं आश्वासन त्यात आहे. ऐरणीदान ह्या विधीच्या वेळी सुपं, वेळूची डाली, दिवे असा संभार मुलीचे मातापिता सासरच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतात.”आमच्या ह्या प्राणप्रिय कन्येची जबाबदारी आता तुमच्या शिरावर बरका.”अशी भाकच घातली जाते. मग काय बिशाद तिला कोणी सासुरवास करण्याची!
सप्तपदी ह्या महत्वाच्या विधीत अग्नीच्या साक्षीने समान पाउलं टाकतात.वधू अश्मारोहण करते व म्हणते”मी ह्या दगडाप्रमाणे तुझ्या संसारात स्थीर राहीन. नक्षत्रदर्शन ह्या विधीत वर वधूला ध्रुवतारा दाखवून म्हणतो,”मी ध्रुवाप्रमाणे स्थीर राहून तुझ्याशी संसार करीन. दोघांनी एकमेकांना दिलेलं प्रेमाचं अभिवचन म्हणजे ‘नातिचरामि.’
वधू वरांच्या सहजीवनाचा आरंभ कोर्टकचेऱ्यातल्या रुक्ष वातावरणात होण्यापेक्षा आनंदी, मंगल वातावरणात होणंच चांगलं नाही का?मंगलाक्षता टाकून आपण म्हणुया.”कुर्यात सदा मंगलम्।”
मीनाक्षी सरदेसाई
सांगली,
तृतीय पारितोषिक (लेख)