महाराष्ट्राची ” साठी ” !
१ मे १९६० रोजी, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अर्धी यशस्वी होऊन हे राज्य अस्तित्वात आले. अर्धेच यश म्हणायचे कारण म्हणजे बेळगाव, खानापूर, सुपे, हल्याळ, कारवार यासह हे राज्य अस्तित्वात यायला हवे होते. पण केंद्रीय नेतृत्व, विशेषतः पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई हे महाराष्ट्राचा द्वेष करीत असत. नेहरूंच्या या मराठी द्वेषामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्री. चिंतामणराव देशमुख या दोन अत्यंत विद्वान मराठी नेत्यांनी नेहरुंना तसे परखडपणे सुनावून राजीनामे देऊन त्यांच्या मंत्रिमंडळामधून हे दोघे बाहेर पडले. त्यानंतर मग ” राष्ट्रापेक्षा नेहरू मोठे ” असे म्हणणारे मराठी नेते तेथे राहिले. डांग हा आदिवासी बहुल भाग खरेतर मराठी मुलुख, पण तो गुजरातने बळकावला. आणि मग उरलेल्या महाराष्ट्राचा ” मंगल कलश ” घेऊन मराठी नेते महाराष्ट्रात आले. यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती या काँग्रेस सोडून अन्य सर्व महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या समितीने केलेल्या तीव्र चळवळीला यश मिळाले. या सत्याग्रहात भाग घेतलेल्यांपैकी १०५ माणसांना, मोरारजी सरकारने महाराष्ट्रात गोळ्या घालून ठार मारले होते. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले पण जो भाग कायदेशीरपणे महाराष्ट्राला मिळायला हवा होता तो मिळू शकला नाही आणि १०५ निरपराध्यांचे नाहक गेलेले बळी यामुळे ” गड आला पण सिंह गेला ” अशी भावना, श्री. एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे अशा बहुतेक सर्व नेत्यांची झाली होती.
३० एप्रिल १९६० च्या मध्यरात्री दादरच्या शिवाजी पार्कमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येकाला आपले राज्य आले याचा आनंदही होता आणि गरीब मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील १०५ निरपराध माणसे बळी गेल्याची खंतही होती. आनंदाला एक दुःखाची काळी किनार होती. मनात एक शल्य होते. यावेळी मी शाळेत ६ वी — ७ वीत होतो. दादरमध्ये होणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभा, आंदोलने, आचार्य अत्र्यांचा थेट ” नरराक्षस मोरारजी ” असा उल्लेख करण्याचे धाडस असलेला दैनिक ” मराठा “, गोळीबारात पडलेले मुडदे अशा गोष्टी जवळून पहिल्यामुळे या सर्व परिस्थितीचे आकलन, माझ्या वयाच्या मुलांनासुद्धा बऱ्यापैकी होते. शिवाजी पार्कला मीही गेलो होतो. शिवाजी पार्कवर त्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे चित्र असलेली, टपाल तिकिटांसारखी तिकिटे सर्वांना वाटण्यात आली होती. ही तिकिटे, २७ एप्रिल ते १ मे १९६० पर्यंत साजऱ्या केल्या गेलेल्या ३३३ व्य शिवजयंती निमित्ताने प्रसिद्ध केली गेली होती. तिकिटाखाली शिवराज लिथो वर्क्स असे अस्पष्ट छापलेले दिसते. मला १० तिकिटांची एक पट्टी मिळाली होती. नंतरच्या पत्रव्यवहारात ही तिकिटे अन्य टपाल तिकिटांबरोबर वापरून संपली. सुदैवाने यातील एकच तिकीट माझ्याकडे शिल्लक राहिले. एक दुर्मीळ आठवण म्हणून त्याचे चित्र सोबत देत आहे.
१ मे १९६० रोजी पंडित नेहेरूंनी राजभवनामध्ये महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले. पण सामान्य माणसांनी मात्र हा सण शिवाजी पार्कमध्येच साजरा केला. साहजिकच शिवाजी पार्कला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र सरकारतर्फे शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. पण दुर्दैव असे की या राज्याचा रौप्य महोत्सवी सोहोळा म्हणावा तितका दणक्यात साजरा झाला नाही. सुवर्ण महात्सवी वर्षात सरकारने, वर्ष संपायच्या शेवटी शेवटी घाईघाईने काही कार्यक्रम उरकले. आता १ मे २०२० रोजी या राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. पण या वर्षी तर कोरोनाने अभूतपूर्व हाहा:कार माजविला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ” साठी ” साठी तरी, हे संकट लवकरात लवकर नष्ट होऊ दे ! या राज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवर दिवे उजळून, रांगोळ्या काढून, सनई चौघड्याच्या सुरांमध्ये हा
सोहोळा साजरा होऊ दे. या निमित्ताने एक मोठा आणि खास पर्यटन महोत्सव आयोजित करून महाराष्ट्राला भरपूर महसूलही मिळविता येईल.
कोरोनासुराचा अंत होऊदे । आई उदे ग अंबे उदे ।।
– मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com


