लठ्ठपणा टाळण्यासाठी योग्य आहार .

लठ्ठपणा या शारीरिक स्थितीला स्थूलता किंवा रूढ भाषेत त्या व्यक्तीला आपण जाड असे म्हणतो . प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्रात लठ्ठपणा हा मानसिक आजार तर आपल्या भारतीय आयुर्वेदात सुश्रुताने या स्थितीला विकार म्हणून संबोधलं आहे .
लठ्ठपणाची अनेक कारणं आहेत बहुतेक  वंशिक वैशिष्ट्ये,  मेदयुक्त किंवा शर्करायुक्त किंवा कार्बोहायड्रेट अधिक असलेला  आहार ,आरामाची जीवनशैली, व्यायामाचा अभाव हे प्रमुख कारण असून जंक फूड आणि शरीरातील काही जैवरासायनिक बिघाड ,मानसिक आजार, औषधांचा अतिवापर हीसुद्धा स्थूलपणाची कारणे असू शकतात.स्त्रियांमध्ये उशिरा गर्भधारणा हेही स्थूलपणाचे कारण असू शकते. आणि बरेचदा वाईट सवयी म्हणजे धूम्रपान , अनियमीत झोप , चुकीची जीवनशैली या सगळ्या गोष्टी स्थूलता येण्यास कारणीभूत ठरतात.
 स्थूल माणसाला शारीरिक,  मानसिक आणि सामाजिक अशा तीनही स्तरांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. शारीरिक परिणामांमध्ये त्वचा, पचनसंस्था, हृदय, श्वसनसंस्था मज्जासंस्था, उत्सर्जन संस्था अशा अनेक भागांवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तसेच वाढलेल्या वजनामुळे सांधेदुखी, कर्करोग ,मनोविकार या सगळ्या गोष्टींची ही शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच स्थूलपणा कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील याची काही माहिती येथे दिली आहे.
जाडेपणा कमी करण्यासाठी हानीकारक जीवनशैलीत बदल, आहारात सुधारणा, नियमित व्यायाम, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया असे अनेक उपाय आहेत.
पण त्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आहारनियमन आणि संतुलित आणि सकस आहार. आहारातील स्निग्ध पदार्थांचे म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचे ,साखरेचे प्रमाण कमी करणे ,प्रथिनांचे म्हणजे प्रोटिन्सचे प्रमाण वाढवणे आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थांचा जेवणात समावेश करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
आपण जे अन्न खातो त्या अन्नामुळे  शरीराची ऊर्जा निर्माण होते तिच  चरबीत रूपांतर होतं आणि ही चरबी पचनाच्या आणि इतर शरीराच्या कार्यांसाठी मंद ज्वलनासाठी उपलब्ध होते . पण शरीराची हालचाल कमी असेल तर अशी ही ऊर्जा वापरली न जाता ती चरबीच्या रुपात त्वचेखाली साठत राहते. त्यामुळे स्थूलता निर्माण होते. अशावेळी जंक फूड टाळणे , व्यसनांपासून दूर राहणे, नियमित सकस आहार घेणे ,नियमित व्यायाम करणे आणि योग्य झोप घेणे ही स्थूलता टाळण्याची किंवा कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.  
खूप एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये  सर्जरीचा विचारही करता येतो. बॅरिएट्रिक सर्जरी ,लायपोप्लास्टी किंवा लाइपोलायसिस अशा काही शस्त्रक्रिया शरीरातील चरबी कमी करण्यासाठी केल्या जातात.
लायपोप्लास्टि सर्जरी मध्ये उच्च कंपनांच्या  ध्वनिलहरींना शरीरात सोडून  शरीराच्या विशिष्ट भागातील मेदक कोशिका द्रवरूप केल्या जातात आणि नंतर मंद सक्शनने  शरीराबाहेर खेचून घेतल्या जातात. चेहरा ,मान ,डबल हनुवटी, मांडय़ा, पोट ,नितंब अशा भागातील चरबी कमी करण्याकरिता या शल्यक्रियेचा उपयोग करण्यात येतो. बॅरिएट्रिक   सर्जरी म्हणजे आहार कमी व्हावा या उद्देशाने जठर आणि आतडे या अवयवांवर जी शल्यक्रिया केली जाते तिला बॅरिएट्रिक सर्जरी  म्हणतात. या सर्जरीमुळे  जठराच्या पिशवीचा आकार कमी होतो आणि थोडेसे अन्न खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण  होते त्यामुळे शरीरात कमी अन्न मिळतं.त्यामुळे अधिक मेद तयार होत नाही. पण अशा कुठच्याही सर्जरी किंवा शल्य क्रियेपेक्षा आपली जीवनशैली उत्तम ठेवली ,संतुलित आणि नियमित आहाराचे पालन केलं, व्यवस्थित व्यायाम केला,जंकफूड टाळले, घरी बनलेले अन्न सेवन केले,योग्य प्रमाणात झोप घेतली तर आपले वजन नक्कीच कमी होऊन स्थूलपणा टाळण्यासाठी नक्कीच मदत होईल. 

thinkmarathi@gmail.com

pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu