कोंडवाडा©चारुलता काळे
महिला दिनाचा कार्यक्रम आटपुन घरी आले. कार्यक्रम फारच सुन्दर झाला होता. विषेश कतृत्व गाजवलेल्या महिलांचे सत्कार आणि नंतर रंगलेल्या त्यांच्या मुलाखती. प्रत्येकीचा वेगळा संघर्ष, अनुभव ऐकताना श्रोते रंगून गेले होते. शेवटच्या वक्त्या ग्रामीण भागातून आलेल्या लक्ष्मी बाई त्यांच्या भाषणाच्या शेवटी ठसक्यात म्हणाल्या “ढोरावानी न्हवं, मानसावानी जगा!” टाळ्यांच्या गडगडाटाने सर्वांनी त्यांच कौतूक केलं.
कार्यक्रमा नंतर जेवण होतं. जेऊन घरी पोहचायला बराच उशीर झाला होता. माझ्या डोअर बेलच्या आवाजाने किशोरने, माझ्या नव-याने दार उघडलं. “मी तुझीच वाट पहात होतो. कार्यक्रम छान झाला ना? जेवलीस की नाही?” त्याच्या प्रश्नाला मी “हो” असं उत्तर देत तो जेवला की नाही ते विचारलं. तो हो म्हणाल्यावर मी मला खूप झोप येतेय असं म्हणत बेडरूम मधे घुसले.
अंगावरची साडी पटकन सोडून कॉटनचा मऊ गाऊन घातला आणि एसी लाऊन स्वतःला बेडवर झोकून दिलं. खूप दगदग झाली होती. मी डोळे मिटले. झोपून किती वेळ झाला होता कुणास ठाऊक मी अचानक दचकून उठले. लाईट न लावता जवळच ठेवलेल्या मोबाईल मधे वेळ पाहिली, रात्रीचे दोन!
गाढ झोपेतून माझं दचकून उठण्याचं कारण म्हणजे स्वप्नात समोर ‘ती’ दिसली. काळी सावळी, धष्टपुष्ट, काहीशी फुगलेली. तिची चमकदार तुकतुकीत कांती मोहक होती पण चेहरा केवीलवाणा. मान झटकून तिनं माझ्याकडे पाहिलं आणि काय आश्चर्य तिचे डोळे पाण्याने भरले होते, ती रडत होती…, हंबरणारी ती गाय चक्क माणसा सारखं बोलायला लागली. तिच्या तोंडून “हे मी काय करून घेतलं स्वतःचं, मरे पर्यन्तचा हा बंदिवास भोगणं आलं नशिबात! नशिब म्हणायचं की मीच कोंडवाडा करून घेतला माझ्या जगण्याचा?” हे ऐकलं आणि मी चमकले. “अरे! तिचा तो आवाज थेट त्या मंदाताईं सारखा होता. महिला दिनाच्या भाषणातील ती वाक्य आणि ते स्वप्न याचा काही संबंध होता का! माझी झोप उडाली. ते विचित्र स्वप्न आणि ती मंदा ताईंच्या आवाजात बोलणारी गाय, मला अस्वस्थ करत होती.
ती गाय आणि मंदा ताई दोघीही मला वाराणसीला भेटल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी वाराणसीला जायचा योग आला. कारण होतं माझ्या नात्यातील मला माझा मित्र किंवा मोठा भाऊ अशी जवळीक असलेल्या अेका व्यक्तीचं वर्षश्राद्ध. त्यांच्या कुटुम्बाने वाराणसीत जाऊन ते करायचं ठरवलं होतं. कोविड काळात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं मला त्यांचे अंत्य दर्शनही घेता आलं नव्हतं. श्राध्दाला जाऊन आमचा, त्यांच्या विषयीचा, त्या कुटुम्बा विषयीचा आदर, प्रेम व्यक्त करावं म्हणून मी आणि किशोर गेलो होतो.
वाराणसीत जीर्णोध्दार झालेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं. होडीत बसून निरनिराळे घाट पाहिले आणि हो, ती प्रसिध्द अशी गंगेची महाआरती सुध्दा! भारताच्या प्राचीन काळाची साक्ष म्हणजे ही अशी ऐतिहासिक पौराणिक शहरं! त्यांच्या विषयीच्या गोष्टी, कहाण्या ऐकायला मजा येते. त्या जुन्या पण अजुनही टिकून राहिलेल्या परंपरा थक्क करतात. निरर्थक वाटाणा-या अनेक गोष्टी श्रध्दा, भावना व्यक्त करण्यासाठीचा अेक मार्ग म्हणून योग्य वाटू लागतात.
वाराणसीच्या आजुबाजूचा भाग खूप चांगल्या पध्दतीने बदलला आहे. जुनं वाराणसी शहर मात्र फारसं बदललेलं नाही. श्राध्दाच्या निमित्ताने वाराणसीतल्या त्या कमालीच्या चिंचोळ्या गल्ल्यां मधून गेलो कारण श्राध्दाचा विधी करणारे गुरुजी (भटजी) तिथे रहात होते. त्या गल्ल्यामधून, तिथे पडून असलेली कुत्री, कशाबशा भिंतींना अंग घासत फिरणा-या गायी, खेळणारी मुलं, येणारे जाणारे, चालणंही अवघड अशा गल्लीत स्वतःचा देह आणी स्कूटर वाकडी तिकडी करत जाणारी स्कूटरवाली तरूण पोरं, कचरा, शेण यांना चुकवत आम्ही अेका मागून दुसरा असे जीव सांभाळत चालत होतो. तिथलं प्रत्येक घर हे प्राचीन म्हणावं इतकं जुनं आहे. जागे अभावी प्रत्येक घर दुमजली क्वचित तीन मजली सुध्दा आहे.
आम्ही गुरुजिंच्या घरी आलो. आत जाताच गोमूत्र आणि शेण याचा ऊग्र दर्प नाकात गेला. प्रचंड गरम होत होतं. वारा या गल्ल्यांमधे येणं निव्वळ अशक्य! पाय धुण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं. पाय धुतले आणि शिडी सारखा दिसणारा जिना पाहून आणखी घाम फुटला. त्या जिन्याला बाजूने गिर्यारोहक पर्वतावर चढायला जसा आधार म्हणून दोरीचा उपयोग करतात तशी दोरी होती. कसेबसे वर पोहोचलो. वरती छताला लावलेल्या काचांमधून सूर्य प्रकाश येत होता. जुनाट दिसणारे पंखे मात्र बंद होते कारण हवन कुंड पेटले होते. कमालीचा गरम होत होतं. विधींना सुरवात झाली. आता अधून मधून खाली जावं लागणार होतं याची गुरुजिंनी कल्पना दिली कारण विधींना बसलेल्या मुलाला, गंगेवर जाऊन गंगेला काही अर्पण करायचं होतं. मी स्वतःला फिट समजते त्यामुळे मनात विचार केला, “अेवढा कसला त्रास, इथे आलोय तर आपणही गंगेवर जाऊया त्याच्या सोबत.” तसं काही विशेष त्रासाचं नाही असं म्हटलं आणि उसनं अवसान आणून दोन तीनदा त्या गल्ल्या पार करत, गंगेच्या घाटाच्या पाय-या उतरत गंगेवर गेले.
गंगेवर जाण्यासाठी खाली उतरले तेंव्हा पहिल्यांदा दिसली नव्हती पण जिच्या मल-मुत्राच्या तीव्र वासाने जिच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती त्ती गाय आणि गाईचा गोठा आत्ता दिसला. गोठा कसला ती तर चक्क अेक बंदिस्त खोलीच होती. त्या खोलीला प्रकाशासाठी फक्त अेक छोटा झरोका होता. दरवाजा सुध्दा अगदी लहान. त्यातून तिचं जे दर्शन झालं ते आधी म्हटलं आहे तसं. “काळी सावळी, धष्टपुष्ट, काहीशी फुगलेली. तिची चमकदार कांती मोहक होती पण चेहरा केवीलवाणा.” गंगेवरून परत आले, परत तो जिना चढून वर येताना पुन्हा मला ती दिसली, तिचं ते कोंडलेपण मला अस्वस्थ करून गेलं. आता गुरुजींच्या आवाजातही मी त्या गायीचा विचार करत होते. “ ही इतकी धष्टपुष्ट गाय त्या दरवाजातून बाहेर कशी येत असेल? येत असेल की येतच नसेल? बापरे! वर्षानु वर्ष असं कोंडून रहाणं! माणसांनी पुण्य कमवण्यासाठी समोर ठेवलेलं फक्त माणसांच अन्न खाणं! हिला हिरवा चारा मोकळं आकाश माहित तरी असेल का?
विधी संपले जेवणाची तयारी सुरू झाली. काही मदत करावी म्हणून मी स्वैपाक घरात गेले. तिथे अधिकच गरम होत होतं. मगाच पासून आत बाहेर करणा-या हसतमुख रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या गुरुजिंच्या पत्नी मंदाताईंना जवळून पाहून त्या किती कृष आहेत अशक्त, आजारी आहेत याची जाणीव झाली. जेवणं झाली आता थोडा निवांत वेळ मिळाला. स्वैपाक घराच्या बाजूच्या अेका लहानशा खोलीत आम्हाला नेत मंदाताई म्हणाल्या इथे बसा जरा, पंखा लावते थोड़ा आराम करा.” घर घर आवाज करत तो पंखा फिरायला लागला आणि त्याच बरोबर माझ्या मनात त्या गायीचा विचार.
मी बोलता बेलता तिचा विषय काढला. खिन्नपणे हसत मंदा ताईंनी मला त्यांच्या अगदी जवळ बसवलं. जवळच्या तांब्यातलं पाणी पिऊन पदराने तोंड पुसलं आणि सांगायला लागल्या.
“माझं माहेर नाशिकचं, श्राध्दाचे विधी करणं हेच काम. मध्यमवर्गी आणि जुन्या परंपरा आवर्जून जपणारं घर. आजी -आजोबा, आई- वडील, काका-काकू, भावंड असं गोकुळ. मी अभ्यासात मात्र हुशार! अगदी अेक पाठी. रूपने मात्र बेताची!”ह्या त्यांच्या वाक्यावर “ काही तरीच काय ताई! तुम्ही अजुनही छान दिसताय!” मी म्हटलं. त्या किंचित हसल्या.
पुन्हा अेकदा पाणी पिऊन बोलायला लागल्या. “माझे सासरे माझ्या बाबांच्या दूरच्या नात्यातले. त्यांनी विचारलं बाबांनी हो म्हटलं आणि लग्न होऊन मी काशीला म्हणजेच बनारसला आले. गोदावरी सुटली आणि गंगा भेटली. इथे आले नवं शहर, नवी माणसं आणि हिंन्दी भाषा, ह्या चिंचोळ्या गल्ल्या आणि हेच घर बरं का!” क्षणभर थांबून आजूबाजूला पाहिलं आणि त्या सांगायला लागल्या.
मी लग्न होऊन आले ना तेंव्हा जी गाय होती तिचं नाव गोदा! मीच मोठ्या प्रेमाने तिला गोदा म्हणायला लागले. माझ्या नाशिकची गोदावरी आणि तिची आठवण म्हणून गोदा! नाशिकमधे असताना शाळा सुटली की हुंदडायचो. मैत्रिणींच्या गप्पा चालत, कुणाला शिक्षिका व्हायचं होतं तर कुणाला डॉक्टर. नाशिकला पोलीस शिक्षण संस्था असल्याने मला वाटे मी पोलीस व्हावं. मैत्रिणींना त्याचं कौतूक वाटायचं. मी अेकदा माझ्या आईलाही तसं म्हटलं होतं, ते ऐकून माझ्या तोंडावर हात फिरवून माझा मुका घेत ती फक्त हसली होती. ते जुने दिवस, ते हुंदडणं, मैत्रिणी, आई सर्व आठवून नाशिकच्या आठवणींनी जीव गलबलायचा आणि मी गुपचुप गोदाला मिठी मारून रडायची. ती मला प्रेमाने चाटायची मनात यायचं आईच प्रेमाने मला कुरवाळतेय!
मी शिडशिडीत बारीक. पण कामाचा भारी उरक मला! सगळे म्हणायचे हिच्या हाताला चव आहे, अन्नपूर्णा झाले मी पहाता पहाता! संपूर्ण घराची, श्राद्ध पक्षाच्या विधींच्या तयारीची जबाबदारी मी सहज सांभाळली. आला गेला, घरकाम यात मी आनन्दाने रममाण. “ आमची मंदा अगदी गुणाची हो! कामाला वाघीण. उगाच कुठे उनाडक्या नाहीत.” घरचे माझं कौतूक करायचे.
गंगेचा घाट इतक्या जवळ पण कामा शिवाय फारशी तिथे गेले नाही. लग्न कार्याच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने बाहेर जायची पण अगदी क्वचितच. गोदाला मात्र अधून मधून फिरवून आणत असे तेवढंच माझं फिरणं. फिरणं कसले म्हणा या गल्ल्यांच्या चक्रव्यूहाचं दर्शन!” मंदाताई काहीसं उदास होऊन म्हणाल्या. काही वर्षांनी गोदाला विकलं. तिच्या जागी दुसरी आली आणि ती गेल्यावर ही तिसरी. नाव मात्र गोदाच हो! गोदाताई हसून म्हणाल्या.
ह्या तिस-या गोदाला मात्र मी नाही बाहेर नेऊ शकत आणि मी नेत नाही म्हटल्यावर ती तशीच तिथे दावं बांधलेलं नसुनही अेका जागी अडकलेली. माझं शरीर थकत गेलं, त्यात हा जिना. मीच तो उतरत नाही सहसा. जमत नाही म्हणून उतरत नाही आणि उतरत नाही म्हणून जमत नाही. कुणाला काय फरक पडतोय? अहो ती गंगंची आरती पहायला हीऽऽ गर्दी होते म्हणतात! आता काशी विश्वेश्वराचं मंदीरही छान झालंय. आज जाईन उद्या जाईन म्हणायचं फक्त. जाणं होत नाही माझं पण मी ते टेलिव्हिजनवर पाहिलंय हो!”
मंदा ताईंचा आवाज गहिवरला “बाहेर जायला मला सवड नाही असं म्हणताना, मला त्याची आवडच नाही असंच सगळ्याना वाटायला लागलं आणि मग मी ही ते तसंच आहे असं समजायला लागले. हौसमौज नाही, कुठे जाणं नाही, काही पहाणं नाही. चारी ठाव रांधायचं, मर मर राबायचं. हे स्वैपाक घर आणि मी! जशी मी तशी माझी गोदा. ती त्या गल्ल्यांमुळे आणि मी या जिन्यामुळे कितीतरी वर्षात बाहेर पडलोच नाही!”
मंदा ताईंच्या बोलण्यात बाहेरचं जग पहिलच नाही त्याची खंत होती की आपण तसा प्रयत्नाच केला नाही त्याचा पश्चात्ताप? त्यांचा तो कोंडमारा, ती घुसमट मला जाणवत होती. त्यांना थोडं बरं वाटेल या अपेक्षेने, मी त्यांचा हात हातात घेतला.
मंदा ताईंच्या डोळ्यात पाणी होतं, त्या थरथरत होत्या. विषण्ण होऊन म्हणत होत्या “ हे मी काय करून घेतलं स्वतःचं, मरे पर्यन्तचा हा बंदिवास भोगणं आलं नशिबात! नशिब म्हणायचं की मीच कोंडवाडा करून घेतला माझ्या जगण्याचा?”
अगदी हेच वाक्य माझ्या स्वप्नातली ती गाय मंदा ताईंच्या आवाजात म्हणाली होती. ती व्यथा त्या दोघिंची होती. कालच्या महिला दिनाच्या कार्यक्रमातलं “ढोरावानी न्हवं, मानसावानी जगा!” हे लक्ष्मी बाईंच वाक्य पुन्हा आठवलं. महिला दिनाचा आणि त्या वाक्याचा खरा अर्थ लक्षात आला. नवी पहाट झाली होती, आकाशात आणि माझ्या मनात!
चारुलता काळे


