विड्याच्या पानाला एवढे महत्व का आहे ? 

▪भारतीय संस्कृतीत विडय़ाच्या पानाचे महत्त्व आहे. मंगल प्रसंगी पानाचा उपयोग केला जातो. पूजा, अर्चा, विवाह प्रसंग किंवा करमणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रथम पानसुपारी वाटली जाते. ही पाने ज्या वेलीवर येतात तिला नागवेली म्हणतात. त्यांना चुना लावून त्यात सुपारी, कात, बडीशेप, खोबरे, विलायची, जायफळ टाकले की पानाचा विडा तयार होतो. तो खाल्ल्यानंतर जीभ व ओठ लाल होतात. शिवाय तो वातहारक, जंतुनाशक, कफनाशक असून मुखदुर्गंधी दूर करतो. विडय़ाला तांबूल असेही म्हणतात. विडय़ाचे तेरा गुण आहेत. त्यावरून त्याला त्रयोदश गुणी तांबूल असेही म्हणतात. पैजेचा विडा, प्रेयसीचा विडा, गोविंद विडा, बाळंत विडा वगैरे प्रकार आहेत. विडा शृंगारप्रधान असल्यामुळे तो ब्रह्मचारी किंवा विरक्त लोक सेवन करीत नाहीत. नागवेलीला फळे येत नाहीत, तरीही ज्ञानेश्वरीनी तिला सफळ म्हटले आहे.

▪पान-सुपारीला मांगल्य व समृद्धीचे प्रतीक मानतात. म्हणून मंगल कार्यात पान-सुपारी वाटतात. पान-सुपारीला पती-पत्नीचे प्रतीक समजले जाते. पुरुष विधुर असेल तर तो उजव्या कनवटीला सुपारी ठेवून मंगलकार्य करू शकतो. अशा प्रसंगी सुपारीला ही त्याची प्रातिनिधिक स्वरूपातील पत्नी समजली जाते. साहित्यकारांमध्ये व कलाकारांमध्ये विडय़ाचा उपयोग आवडीने केला जातो. कारण विडा खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते असे समजतात. विडय़ात औषधी गुणधर्मही आहेत. तोंड आल्यानंतर, खोकला, त्वचारोगावर याचा हमखास उपयोग होतो. गायक लोक तर विडा नेहमी खातात त्यामुळे घसा साफ होतो असे सांगतात. विडय़ामुळे पचनशक्तीही वाढते. चुन्यामध्ये कॅलशियम असल्यामुळे दात बळकट होतात.

▪विडय़ात प्रमुख सहा घटक असतात. ते सर्व औषधी आहेत. त्यातील

▪पहिला घटक म्हणजे नागवेलीचे पान, हे पचनास उपयुक्त असते, कफनाशक असते, शरीरातील जंतूंचा नाश करते.

▪दुसरा घटक म्हणजे चुना, याला अग्नीचा प्रतीक मानतात. तो वाताबरोबर कफाचाही नाश करतो. तो शरीरातील अतिरिक्त अग्नी दूर करतो. रक्तातील कॅल्शियम वाढवतो.

▪तिसरा घटक म्हणजे कात. हाही कफनाशक आहे, कफ झाला तर घसा खवखवतो. मुखशुद्धीही होते. अशा प्रकारे पान, कात व चुना ही त्रिगुणी कफनाशक मानले जाते.

▪चौथा घटक बडीशेप. ही पाचक असते, पोटाचा जडपणा कमी करते, त्यामुळे मन प्रसन्न राहते.

▪पाचवा घटक सुपारी. ही मुख शुद्धी करते, हिच्यामुळे तोंडात लाळ तयार होते, ती पचनाला मदत करते, त्यात जेष्ठमधाचे प्रमाण असते, हा घसा स्वच्छ करतो, लाळेत टायलीन हा पाचक रस असतो.

▪सहावा घटक म्हणजे लवंग. वरील पाच घटकांनी विडा बनवल्यानंतर तो लवंग लावून बंद करतात व नंतर तो सेवन करतात. लवंग ही चवीला तिखट, चवदार व पाचक असते. ती मुखशुद्धीही करते. असा पानाचा विडा खाल्ल्यानंतर त्यातील सहा रस यकृतातील स्वादुपिंड रसात मिसळतात, ते अन्नाचे पचन करतात. यकृत चांगले तर प्रकृती चांगली असे म्हटले जाते.

▪पान खाणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पान खाणं किंवा विडा खाणं हा कौटुंबिक सोपस्कार समजला जातो. जुन्या काळी ओसरीवर बसून एकत्र पान खायचे. पुरुष मंडळीचं पान खाऊन संपलं की ते पानाचे ताट माजघरात नेलं जायचं. तेथे स्त्रिया या ताटाची वाट पाहात बसलेल्या असायच्या. पूर्वीच्या काळी पान-सुपारी देणं हा सोपस्कार होता. पाहुणे किंवा मित्रमंडळी जमली की पूर्वी त्यांचे पुढय़ात पानपुडा किंवा चंची ठेवली जायची. पान खाल्ल्यानंतर गप्पांना सुरुवात व्हायची.

▪धार्मिक दृष्ट्या पानाचा तांबूल हा देवीला आवडणारा पदार्थ मानला जातो. कुलदेवीच्या कुलाचारांमध्ये तांबुल हा आवर्जून ठेवण्यात येतो.

▪बऱ्याच देवीच्या मंदिरामध्ये तांबुल हा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

▪अनेक संतांचा आवडीचा पदार्थ म्हणून तांबूल या पदार्थाचा अनेक ग्रंथांमध्ये उच्चार करण्यात आला आहे.

▪थोडक्यात सांगायचे म्हणजे पान व तांबूल हे पुरातन काळापासून आजपर्यंत पिढी दरपिढी चालत आलेला हा एक मुख्य खाद्यपदार्थ मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu