जेव्हा काळ गोठतो © स्वानंद गोगटे

कथा :- जेव्हा काळ गोठतो

लेखक :- स्वानंद गोगटे

21 मे 2020

दक्षिण ध्रुव हा माणसाला कायमच आश्चर्यचकित करत असतो. जगातील सर्वात जास्त बर्फ हा दक्षिण ध्रुवावर म्हणजेच अंटार्क्टिका या खंडावर आहे. जगातील सर्व प्रगत देश या खंडाचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम या खंडावर पाठवत असतात. भारताने सुद्धा या खंडाच्या अभ्यासासाठी वेळोवेळी टीम पाठवल्या आहेत, लेफ्टनंट हरी चरण जे एक हवामान शास्त्रज्ञ होते आणि भारतीय नौदलाचे लेफ्टनंट देखील होते, ते पहिले भारतीय होते या विशाल खंडावर पाय ठेवणारे. एका ऑस्ट्रेलियन मोहिमेबरोबर त्यांनी या मोहिमेवर भाग घेतला होता. अंटार्क्टिका वर जाऊन तेथील हवामानाचा अभ्यास करणे हे मुख्य काम त्यांना दिले गेले होते. जरी ते ऑस्ट्रेलियन मोहिमेबरोबर गेले असले तरी भारतीय शास्त्रज्ञांसाठी अंटार्क्टिका वर कुठे बेस उभारता येईल याची चाचपणी करण्याचे काम देखील हरी चरण यांना दिले होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावरच आज भारताने अंटार्क्टिका वर मैत्री व भारती असे दोन बेस तयार केले होते.

असे म्हणतात लेफ्टनंट हरी चरण यांनी अजून एक जागा निवडली होती आणि ती जागा बेस म्हणून सर्वोत्तम होती, आणि त्या जागेबद्दल हरी चरण यांनी आपल्या डायरी मध्ये नोंद देखील केली होती पण ह्या नोंदी भारत सरकार पर्यंत पोहचवण्या आधीच १९६२ मध्ये अचानक अंटार्क्टिका मध्ये लेफ्टनंट हरी चरण यांचा अपघाती मृत्यू झाला. एका अत्यंत अवघड अश्या ठिकाणी अभ्यास करायला गेले असताना, अचानक आलेल्या हिमवादळामुळे ते रस्ता भरकटले आणि अचानक पायाखाली निर्माण झालेल्या दरीत ते कोसळले, त्यांचे शव सुद्धा कुणाला सापडले नाही.

पण आज 21 मी 2020 रोजी एक विचित्र घटना घडली होती. मैत्री स्टेशन ला एक सिग्नल मिळायला लागला होता. मैत्री स्टेशन वरच्या लोकांनी या सिग्नल चे रेकॉर्ड चेक केले तेव्हा ते १९६२ मध्ये बेपत्ता झालेल्या लेफ्टनंट हरी चरण यांच्या कम्युनिकेशन डिव्हाईस चे होते. आज अचानक ५८ वर्षांच्या कलखंडानंतर हे सिग्नल येत होते. आणि त्याच बरोबर एक अंधुकशी आशा निर्माण झाली होती की लेफ्टनंट हरी चरण हे जिवंत असतील याची.

भारत सरकार तर्फे प्रधानमंत्री कार्यालयातून लेफ्टनंट हरी चरण यांच्या घरी संपर्क साधला गेला. स्वतः पंतप्रधानांच्या सचिवाने कॉल केला होता. हरी चरण यांच्या नातवाने कॉल उचलला आणि त्याला सचिवांनी सर्व हकीकत सांगितली. हरी चरण यांच्या मुलाला आणि बायकोला दिल्ली ला यावे लागेल असे कळवले. पण हरी चरण यांची बायको 4 वर्षांपूर्वीच वारली असल्यामुळे, हरी चरण यांचा मुलगा, व नातू असे दिल्लीला येतील हे ठरले. फोन ठेवता ठेवता, सचिवांनी हरी चरण यांच्या नातवाला त्याचे नाव विचारले, तेव्हा नातवाने सांगितले, ,”मी कॅप्टन राजवीर, INS सातपुडा, भारतीय नौदल”

राजवीर आणि त्याचे वडील दिल्लीला गेले, तिथे त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगण्यात आली. आणि भारतीय नौदल या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मोहीम आखत आहे आणि लवकरच या प्रकरणाचा आम्ही छडा लावू असे सांगण्यात आले.

तिथून परतल्यावर राजवीर ने आपली ड्युटी जॉईन केली आणि सरळ नौदल प्रमुखांना संपर्क केला. लेफ्टनंट हरी चरण यांच्या शोधात निघणाऱ्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्याने नौदल प्रमुखांजवळ व्यक्त केली. लेफ्टनंट हरी चरण हे राजवीर चे आजोबा होते आणि त्याच मुळे राजवीर ची ही विनंती मान्य करण्यात आली. फक्त या वेळी राजवीर ला INS सातपुडा वरून या मोहिमेत सामील होता येणार नव्हते. INS सातपुडा ही ध्रुवीय प्रदेशात संचालनासाठी उपयुक्त नव्हती. भारत सरकार ने या मोहिमेसाठी एका विशेष जहाजाची सोय दक्षिण अमेरिकेतील केप ऑफ गुड होप येथून केली होती.

राजवीर च्या मागणीनुसार, हर्षल, पराग आणि हरीश हे तिघेही राजवीर बरोबर या मोहिमेत सहभागी झाले होते. राजवीर ने हरिशला या मोहिमेसाठी अंटार्क्टिका चा नकाशा उपग्रहाद्वारे तपासायचे काम दिले होते तसेच ज्या भागातून हे रेडिओ सिग्नल येत आहेत त्या भागाचा सुद्धा उपग्रहाद्वारे काही तपास करता येतो का हे बघायला सांगितले होते.

राजवीर ने मोहिमेवर निघण्याआधी मॅम्बो ने दिलेला कॉम्पॅक्ट टेलिपोर्टर आपल्या खिशात ठेवला होता. तसेच मॅम्बो ला कॉल करून या मोहिमे ची माहिती देखील दिली होती. मॅम्बो ने त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता आणि तो त्याच्या बाजूने काही मदत करता येईल का ते पाहणार होता.

राजवीर आणि त्याची टीम दिल्लीहून अर्जेंटिना च्या दिशेने विमानाने निघाली. तिथे पोहचल्यावर त्यांनी दुसऱ्या विमानाने चिली या देशात प्रवेश केला आणि शेवटी उशिआईया नावाच्या शहरात ते पोहचले. या ठिकाणाहून दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी बोट तयार होती.

या मोहिमेवर जाण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी झाली होती आणि राजवीर आणि त्याची टीम आल्यावर खऱ्या मोहिमेला सुरवात झाली. आता त्यांना वातावरणात झालेला बदल सुद्धा जाणवायला लागला होता. एकूण दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते ध्रुवीय प्रदेशात पोहचले. आता त्यांना सगळीकडे तरंगते हिमनग, काही हिमनगांवर असलेले पेंग्विन पक्षांचे थवे, मधूनच पाण्यात दिसणारे व्हेल मासे असे सर्व दिसत होते.

त्यांचे जहाज आता अंटार्क्टिका वर बांधलेल्या एका कॉमन बंदरावर पोहचले. हे बंदर कोणा एका देशाचे नव्हते तर संयुक्त राष्ट्रांतर्फे त्याचे संचालन होत असे. या बंदरापासून मैत्री स्टेशन पर्यंतचा प्रवास हा पूर्णपणे बर्फावरून होता. त्या साठी खास स्नो वेईकल तयार होत्या. एकूण दीड दिवसाच्या प्रवासानंतर ते मैत्री स्टेशन वर पोहचले.

या प्रवासाचा त्यांना जास्त त्रास झाला. जरी ते नौसैनिक असले तरी समुद्रपेक्षा बर्फ़ातील वातावरण वेगळे असते. अति थंड वातावरणात श्वास घ्यायला देखील त्रास होतो. त्याचमुळे संपूर्ण टीम ला एक दिवसाची सक्तीची विश्रांती देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी हर्षल, पराग आणि हरीश तिघेही फ्रेश झाले तेव्हा त्यांना मैत्री स्टेशन वरील मिटिंग रूम मध्ये यायला सांगण्यात आले. राजवीर आधीच तिथे पोहचला होता. मैत्री स्टेशन चे प्रमुख डॉ चंद्र यांनी टीम ला या मोहिमे विषयी सगळी कल्पना दिली. नकाशावर ज्या जागेतून रेडिओ सिग्नल येत होते ती जागा पण दाखवली.

राजवीर ने विचारले, “नकाशात ही जागा एक पठार दिसत आहे, मग तुम्ही अजून पर्यंत का तुमची टीम पाठवली नाही. ”

डॉ चंद्र म्हणाले, “ही जागा नकाशात तुम्हाला सर्वसाधारण पठार वाटत आहे पण प्रत्यक्षात या जागेवर एक विस्तीर्ण बर्फाचे पठार आहे, आणि या ठिकाणी बर्फाची जाडी ही अंदाजे 400 मीटर आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे गेल्या 10000 वर्षांपासून या ठिकाणच्या बर्फात बदल झाला नाहीये. आणि आम्हाला जे सिग्नल मिळत आहेत ते शोधण्यासाठी आमची टीम या ठिकाणी गेली होती पण प्रत्यक्ष सिंग्णाल हे अंदाजे 450 मीटर खोलातून येत आहेत.”

राजवीर म्हणाला, “एवढ्या खोलातून, आणि तेही वर अंदाजे 400 मीटर बर्फ असताना, रेडिओ सिग्नल येऊच कसे शकतात”

डॉ चंद्र म्हणाले, “ते आम्हालाही पडलेलं एक कोड आहे. असो उद्या तुम्हाला आम्ही या जागेवर घेऊन जाऊ, तो पर्यंत तुम्ही तयारी करा.”

अस बोलून डॉ चंद्र निघून गेले. आता हरीश बोलला, “कॅप्टन, मला तरी वाटत आहे की या लोकांच्या हातून चूक झाली आहे, असा कोणताच सिग्नल नसेल मिळत आणि समजा असेल तर तो जमिनीत एवढ्या खोलीवर नसेल. कारण जमिनीत म्हणजेच बर्फात एवढ्या खोलीवर, यंत्र सुद्धा गोठून जातील.”

राजवीर म्हणाला, “हरीश, एक काम कर, आपल्या छोट्या पाणबुडी ला या ठिकाणच्या बाजूच्या समुद्रातून एक फेरी मारायला लाव. बघूया काही हाती लागतंय का ते”

हरीश म्हणाला, “कॅप्टन, आपली पाणबुडी एवढ्या थंड वातावरणासाठी नाहीये, ती नाही पोहू शकणार”

शेवटी जे होईल ते बघूया अस ठरवून सर्व जण आपापल्या तयारीला लागले.

राजवीर ने आपल्या खोलीत आल्यावर दार लावून घेतले. आपल्या मनगटावर टेलिपोर्टर बांधला आणि सरळ भूतीया टापू चे लोकेशन टाकून बटन दाबले. क्षणार्धात राजवीर भूतीया टापू वर पोहचला. तिथे आल्या आल्या त्याने टॅम्बो आणि मॅम्बो ला सर्व परिस्थिती सांगितली.

मॅम्बो ने लगेच त्याच्या कपाटातून एक मोठी बंदुकसदृश्य वस्तू काढून दिली. टॅम्बो म्हणाला, “ही जी बंदूक मॅम्बो ने तुला दिली आहे ती एक लेझर गन आहे आणि कोणत्याही वस्तू ला भेदून, त्या वस्तूला वितळवून  हे लेझर आरपार जाऊ शकतात. आमही जमिनीखाली याच्याच मदतीने बंकर बनवले आहेत, जर का मोठे मोठे दगड या लेझर मुळे वितळू शकतात तर बर्फ नक्की वितळेल. फक्त काम झालं की लगेच ही गन या टापू वर परत आणून दे”

परत एकदा मनापासून धन्यवाद म्हणून राजवीर ने ती गन उचलली आणि टेलिपोर्टर चे बटन दाबून परत आपल्या खोलीत आला. आता त्याला दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा होती.

दक्षिण ध्रुवावर मे महिन्यात सूर्य दिसतच नाही, त्या मुळे अंदाजाने आणि घड्याळाच्या मदतीने सर्व काम होत असतात. घड्याळात पहाटेचे 4 वाजले असताना सर्व टीम निघाली. मैत्री पासून पुन्हा अंदाजे 2 दिवसाचा प्रवास होता. वाटेत असंख्य अडथळे असण्याची शक्यता होती. ज्या ठिकाणी टीम जाणार होती त्या ठिकाणी बर्फात ड्रिल करण्यासाठी क्रेन हेलिकॉप्टर ला जोडून पाठवण्यात आले होती पण त्याचा उपयोग कितपत होईल ही शंकाच होती कारण सुमारे 400 मीटर जाड बर्फाचा थर होता. पण आता टीम बरोबर टॅम्बो ने दिलेली गन देखील होती.

दोन दिवसांच्या खडतर प्रवासानंतर सर्व जण नियोजित स्थळी पोहचले. पुन्हा एकदा रेडिओ सिग्नल येत आहेत ना याची खात्री करून ड्रिल मशीन ने ड्रिल करायला सुरुवात केली. पण ज्याची भीती होती तेच झाले. ड्रिल मशीन ने फक्त 2 मीटर खोल खड्डा खणला गेला आणि मशीन बंद पडले. शेवटी राजवीर ने आपल्या सामानातून टॅम्बो ची लेझर गन काढली आणि सर्वांना बाजूला होण्यास सांगितले.

ड्रिल मशीनच्या साहाय्याने जमिनीत साधारण 1 मीटर व्यासाचे भोक पाडले जातात होते. तेवढाच आकार गन मध्ये सेट करून राजवीर ने गन सुरू केली. गन मधून एक वेगळाच पिवळा प्रकाश बाहेर पडला आणि क्षणार्धात तो प्रकाश ज्या बर्फावर पडत होता तो बर्फ वितळायला लागला. बर्फ वितळून तयार झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावला होता. अंदाजे 2 तास झाल्यावर बघितले तर 100 मीटर अंतरावर हे पोहचले होते. हरीश ने आपल्याकडील एक ड्रोन या भोकात खाली सोडला आणि निरीक्षण केले. त्याला विशेष असे काही आढळले नाही.

थोडी विश्रांती झाल्यावर राजवीर ने पुन्हा काम सुरू केले, आता परत 2 तास काम केले आणि अंदाजे अजून 100 मीटर वर गेल्यावर काम थांबवले. हरीश चे ड्रोन लगेच त्या भोकात उतरले. जसे ड्रोन अंदाजे 180 मीटर खोल गेले तसे त्याला अचानक मधूनच वेगवेगळे प्रकाशाचे झोत दिसू लागले, अंदाजे मिनिटभर ते झोत होते पण नंतर परत ते बंद झाले.

टीम ने त्या दिवसाचे काम थांबवले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा काम सुरु करून ते चार तासांनंतर 400 मीटर खोलीवर पोहचले. अजूनही खाली बर्फ दिसत होता आणि लेफ्टनंट हरी चरण यांचा काहीच पत्ता नव्हता. जसे त्यांनी 410 मीटर चा मार्क क्रॉस केला तसा अचानक बर्फ संपला आणि खाली त्यांना एक पोकळी लागली. राजवीर ने ताबडतोब काम थांबवून, हरीश चे ड्रोन खाली पाठवले. पण ते ड्रोन देखील फक्त 300 मीटर अंतरावरच जाऊ शकले आणि त्या नंतर ते अचानक खाली कोसळले. आता तर त्यांच्याकडे तपासणी करायला ड्रोन चा पर्याय देखील नव्हता.

शेवटी राजवीर ने दोराच्या साहाय्याने खाली उतरायचे ठरवले. त्या प्रमाणे राजवीर, हर्षल, पराग आणि अजून 3 जण असे कमरेला दोर लावून खाली उतरले. हरीश त्यांच्याशी संपर्क साधून अपडेट घेण्याचे काम करणार होता.

एक मीटर व्यासाचे भोक असल्याने सर्वजण एकामागोमाग एक खाली उतरले. पाठीवर ऑक्सिजन चा सिलेंडर देखील होता. साधारण 300 मीटर नंतर त्यांना ऑक्सिजन ची गरज लागली. तापमान आता उणे 58 होते पण अंगावरील विशेष ध्रुवीय प्रदेशासाठीच्या कापड्यांमुळे त्यांना जास्त जाणवत नव्हते.

410 मीटर नंतर ते चौघेही एका विशाल पोकळीत उतरले. अजूनही ते दोराला लटकत होते. पण आता आजूबाजूला बर्फ नव्हता. ते बर्फाचा एका विशाल गुहेच्या छतामधून त्यांनी पाडलेल्या भोकातून खाली येऊन लटकत होते. आणि खाली अंदाजे अजून 50 मीटर वर त्यांना काळ्या रंगाची जमीन दिसत होती. दगड होता बहुतेक तो.

तेव्हढ्यात त्यांना अचानक एक बारीक पण सतत येणारा रेडिओ चा बीप ऐकू येऊ लागला. दोरीच्या साहाय्याने सर्व जण खाली त्या काळ्या पृष्ठभागावर उतरले. राजवीर ने बघितले तर बाहेरचे तापमान 12 डिग्री दाखवत होते म्हणजेच बर्फाच्या अंदाजे 450 मीटर खाली येऊन देखील त्यांच्या आजू बाजूला तापमान 12 डिग्री होते.

राजवीर आणि टीम ने आपल्या आजू बाजूला पाहायला सुरवात केली आणि त्यांच्या लक्षात आले की ते ज्या पृष्ठभागावर उभे आहेत तो बर्फ नसून कुठला तरी धातू आहे. राजवीर ने हर्षल ला अजून 2 जणांसोबत एका दिशेने पाठवले. आणि स्वतः राजवीर, पराग आणि अजून एक असे तिघे एका दिशेने निघाले.

थोडं अंतर गेल्यावर अचानक राजवीर ला हर्षल ची हाक ऐकायला आली. राजवीर आणि टीम लगेच हर्षलच्या दिशेने गेली तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या समोर एक धातूचा दरवाजा होता आणि त्या वर इंग्रजी आद्याक्षर होती P.A.T.A.L.

राजवीर ने तो दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तो काही सफल झाला नाही. अचानक त्यांना दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूने आवाज यायला लागले. राजवीर आणि त्याच्या टीम ने बाजूला असलेल्या एका खड्ड्याचा आसरा घेतला आणि बघू लागले.

तो दरवाजा उघडला गेला आणि त्या मधून एक माणूस आणि एक डोक्यावर शिंग असलेली दुसरी व्यक्ती बाहेर आली. त्या शिंग असलेल्या व्यक्ती ने पहिल्या माणसाला  सांगितले, “हरी चरण, आज परत एकदा तुझ्या दुनियेतून आपल्या या बेस मध्ये यायचा प्रयत्न झालाय, आम्ही तुला आमच्या या बेस मध्ये येऊन दिले कारण तुझी महत्वाकांक्षा वेगळी होती आणि आमच्या साठी तू एक सुयोग्य असा मानव होतास जो S.W.A.R.G. मधून आलेल्या आमच्या भावंडांना अजिबात मानत नव्हतास. तुझा देव या संकल्पनेवर च विश्वास नव्हता पण तू असुर या संकल्पनेला मानत होतास.”

“तू आमचे हे यान दुरुस्त करून देण्याच्या अटी वरच आम्ही तुला हे चिरतारुण्याचे वरदान दिले”

“आम्ही आणि तुमचे म्हणजे मनुष्य ज्यांना देव मानतात ते S.W.A.R.G. मधून आलेले आमचे भाऊ हे प्रत्यक्षात एकच. पण आमच्या ग्रहावर म्हणजेच Peta Alpha Terra A Lomiuam ( P.A.T.A.L.) या ग्रहावर आम्ही केलेल्या सततच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आमच्या मध्ये हे असे शिंग उगवणे, किंवा काहींना जास्तीचे हात असणे किंवा अजून काही असे प्रकार उद्भवले. आम्ही ताकदीने देवांपेक्षा जास्त होतो पण आमची इच्छाशक्ती कमी पडली आणि आम्ही इथे अडकून पडलो.”

“आमच्या साठी 2 वर्ष म्हणजेच तुम्हा मानवांची 10000 वर्षांपूर्वी आमच्यात आणि तुमच्या देवांमध्ये खूप प्रचंड युद्ध झाले पण त्या युद्धात आमचा पराजय झाला. आम्ही पळून जायचा प्रयत्न केला पण आमच्या भावंडांनी आमच्या जहाजावर हल्ला करून आम्हाला पाडले. जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा आम्ही इथे अडकून पडलो होतो.”

असे म्हणून ते दोघे त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणाहून राजवीर आणि त्याचे साथीदार खाली उतरले होते. तिथे असलेला दोर पाहून त्या असुरचे पित्त खवळले. त्याने रागाने तो दोर खेचून काढून टाकला आणि आपल्या जवळील एक छोटी गन काढून त्याने ते 410 मीटर जाडीचे भोक क्षणार्धात बर्फाने भरून टाकले. जणू त्या ठिकाणी कोणते भोक नव्हतेच असे वाटू लागले.

तो असुर, हरी चरण ला म्हणाला, “जर का या भोकातून कोणी खाली असेल तर त्यांची खैर नाही, त्यांना आम्ही जिवंत सोडणार नाही. आणि हरीचरण एक लक्षात ठेव, तुला दिलेली 60 वर्षांची मुदत देखील आता लवकरच संपेल, तेव्हा तू हे जहाज लवकर ठीक कर नाहीतर तू पण मरणाला तयार राहा”

हरी चरण च्या चेहऱ्यावर आता मरणाची भीती दिसत होती. आणि त्याला खात्री होती की हे असुर लोक त्याला खरच मारून टाकतील म्हणूनच त्याने एवढ्या वर्षांनी बनवलेल्या यंत्राद्वारे रेडिओ सिग्नल पाठवले होते कारण त्याला आशा होती की कोणीतरी त्याला वाचवायला येईल अशी.

इकडे राजवीर स्तब्ध पणे त्या खड्ड्यात बसून त्याचे आजोबा हरी चरण आणि तो असुर यांचे संभाषण ऐकत होता. आता परत जायचा रस्ता तर बंद झाला होता पण त्याने हार मानली नव्हती. आपल्या आजोबांना मदत करून या असुरांच्या तावडीतून सोडवायचेच हा निश्चय त्याने केला होता.

तो असुर आणि हरी चरण परत आल्या वाटेने जाऊन त्या दरवाज्यामधून आत गेले. आत जाताना, त्यांनी दरवाज्याच्या की पॅड वर टाकलेला पासवर्ड, पराग ने हळूच पहिला होता. ते दोघे आत गेल्यावर राजवीर आणि इतर बाहेर आले. पराग ने धावत जाऊन पासवर्ड टाकला आणि तो दरवाजा उघडला गेला.

राजवीर आणि इतरांनी त्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर त्यांच्या समोर एक लांब कॉरिडॉर होता. आणि त्या कॉरिडॉर मध्ये वेगवेगळी दार होती.

राजवीर ने परत एकदा टीम वेगवेगळी केली आणि सगळी दार चेक करायला लागला. साधारण तीन ते चार दार गेल्यावर राजवीर आणि टीम एका खोलीत आले, ती खोली म्हणजे त्यांचे शस्त्रागार होते. विविध आकाराच्या गन तिथे ठेवल्या होत्या. राजवीर आणि टीम ने तिथून हत्यारे घेतली आणि ते पुढे निघाले.

शस्त्रागारातून ते सर्व बाहेर आले तर बाहेर त्यांच्या स्वागतासाठी असुर सुरक्षारक्षक उभे होते. त्यांनी सर्वांना पकडले आणि मगाशी जो असुर बाहेर आला होता त्याच्या समोर उभे केले. राजवीर ने पाहिलं की हरीचरण त्या असुराच्या बरोबरच बसला होता.

राजवीर ला त्या असुराने काहीही विचारले नाही, सरळ म्हणाला, “हरिचरण तुझा नातू खूप हुशार निघाला. आपला प्लॅनचा पहिला टप्पा सफल झाला. आता दुसरा टप्पा सुरू करूया.”

हरी चरण बोलला, “होय मकरासुर, आता आपण आपल्या प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करूया.”

हरी चरण राजवीर कडे बघून बोलला, “तुझ्या आता पर्यंतच्या मोहिमांबाबत आम्ही देखील ऐकून आहोत राजवीर. मग ती द्वारकेची मोहीम असो किंवा त्या बेटावरची. आम्ही कायमच तुझ्यावर नजर ठेवून आहोत. प्रत्येकवेळी आमचा एक माणूस तुझ्या बरोबर होता जो आम्हाला कायम तुझ्या बद्दल सर्व माहिती देत असे.”

आता राजवीर हादरला, तो विचार करू लागला, की असा कोण आहे जो आपल्या बरोबर राहून या असुरांचा खबरी आहे.

हरी चरण बोलला, ” राजवीर, तू पराग ला ओळखतोस, पण पराग हा या मकरासुराचा धाकटा भाऊ नरकासुर आहे. आता पर्यंतच्या तुझ्या प्रत्येक मोहिमेत तो तुझ्या बरोबर होता.”

हरी चरण चे हे बोलणे संपतेच तो पराग हसत हसत राजवीर पासून देऊ गेला आणि मकरासुराच्या जवळ जाऊन उभा राहिला. एका क्षणात त्याने स्वतःचे रूप पालटले, आणि आता त्याच्या कपाळावर एक शिंग दिसू लागले होते. तो हसत हसत राजवीर ला बोलला, ” सॉरी राजवीर, पण माझ्या भावासाठी मला हे करावे लागले, आम्हाला असा एक माणूस हवा होता की जो हरिचरण साठी आमच्या बेस पर्यंत येऊ शकेल पण त्याच बरोबर त्याची कोणत्याही कठीण परिस्थिती मध्ये तग धरायची तयारी असेल”

राजवीर खूप मोठया शॉक मध्ये होता. त्याने हरी चरण ला विचारले, “पण अशी काय गरज पडली तुम्हाला या असुरांची मदत करण्याची?”

हरी चरण बोलला, “मी पहिल्यापासून सांगतो. तुला माहीत असेलच की 1962 मध्ये एका मोहिमेदरम्यान मला अपघात झाला आणि माझा मृत्यू झाला अशी बातमी सगळीकडे पसरली. पण प्रत्यक्षात मी मेलो नव्हतो. मला अपघात झाला हे खरे आणि त्याचमुळे मी या असुरांच्या संपर्कात आलो.”

“मी आपल्या देशाच्या बेस साठी जागा शोधत होतो, आणि मी एक अशी जागा शोधली होती की त्या जागेवर बेस उभारला तर आपल्या देशाला खूप फायदा झाला असता. आता आपण त्याच जागेवर आहोत. या जागेची खासियत म्हणजे ही जागा जमिनीखाली 450 फूट खोल आहे पण इथून रेडिओ सिग्नल पाठवता येतात, आणि दुसऱ्यांचे रेडिओ सिग्नल रिसीव देखील करता येतात. तरी सुद्धा रडार वर किंवा कोणत्याही सोनार उपकरणात ही जागा catch होत नाही. या जागेबद्दल मी अर्जेंटिना मधील लोककथांमध्ये ऐकलं होत की एक अशी जागा आहे जिथे असुर झोपतात वगैरे. बाकी कोणी त्या लोक कथांकडे लक्ष दिले नाही पण माझ्या मधला शास्त्रज्ञ जागा झाला होता आणि मी ही जागा शोधायचे ठरवले”

“आम्ही भूपृष्ठावर आलो आणि जागा निश्चित केली. पण त्याच वेळी माझ्या पायाखालची बर्फाची भेग रुंदावली आणि मी आत कोसळलो. खूप जखमी झालो होतो. जवळ जवळ मेल्यात जमा होतो. पण या नरकासुराने मला वाचवले आणि मकरासुराकडे नेले. माझ्यावर यांनी उपचार केले आणि मला हे चिरतारुण्य दिले. शुद्धीवर आल्यावर मी पहिल्यांदा घाबरूनच गेलो होतो. पण यांनी मला यांच्याकडील औषधे दिली आणि बरे केले.”

“जेव्हा यांना मी कोण आहे ते आणि काय करतो ते समजले तेव्हा त्यांनी मला या इथल्या भूभागाचा अभ्यास करून बाहेर पडण्यासाठीचा योग्य मार्ग शोधायला सांगितला. आणि त्यासाठी मला 60 वर्षांची मुदत दिली. मी या 60 वर्षांच्या कैदेसाठी मानसिक रित्या तयार नव्हतो पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”

“मी इथे वास्तविक कोणत्याच कैदेत नव्हतो. मला फक्त यांची भाषा समजून घ्यायला आणि यांचे तंत्रज्ञान समजून घ्यायला वेळ लागला. पण जसा जसा काळ गेला तसे मला वाटणारे यांच्या बद्दलचे मत बदलत गेले. मी असुर म्हणजे दुष्ट आणि दुराचारी असेच समजत होतो पण हा समज या मकरासुराने आणि नरकासुराने खोटा ठरवला.”

“आम्ही खूप प्रयत्नांनंतर भु भागावर जाण्यामध्ये यशस्वी देखील झालो पण हे जे यान आहे ते बाहेर काढणे जमत नव्हते. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान होते पण उष्णता निर्माण करण्याचे कोणतेच साधन नव्हते. मग आम्ही आमचा प्लॅन बदलला. आम्ही ते साधन पृथ्वीवरून आणायचे ठरवले. या साठी आम्ही आमचे विविध साथीदार बाहेरच्या जगात रूप बदलून पाठवले.”

“आमचा नरकासुर म्हणजेच तुझा पराग देखील असाच एक रूप पालटलेला असुर. त्याने नौदलात प्रवेश घेतला तो नौदलातील काही गोपनीय माहिती हाती लागते आहे का ते बघायला. पण योगायोग बघ, तो नेमका तुझ्या जहाजावर आला. मग तुमची ती द्वारकेची मोहीम, त्या नंतर तुझं सुट्टीवर जाणं आणि एका गुप्त मोहिमेवर जाणे, नंतर ती भूतीया टापू ची मोहीम, वगैरे ची सर्व इत्यंभूत माहिती आम्हाला मिळत होती या पराग मुळे”

“तुला शंका असेल की मी हे असे आमचा नरकासुर अस का म्हणतो आहे कारण मी तर एक माणूस आहे, बरोबर?”

राजवीर ने होकारार्थी मान हलवली..!!

यावर मकरासुर बोलला, “आमच्या कडे जे तंत्रज्ञान आहे त्यामुळे आम्ही कोणाही सामान्य माणसाला असुर बनवू शकतो. आणि त्याच्याच जोरावर आज तुझा हरिचरण एक असुर बनला आहे.”

“जेव्हा त्याने आमचा विश्वास कमावला आणि संधी असूनही तो पळून गेला नाही उलट आमच्या बरोबर राहून मनापासून हे जहाज बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत राहिला तेव्हाच त्याला दिलेली 60 वर्षांची मुदत वगैरे अटी आम्ही काढून टाकल्या होत्या आणि त्याला असुर बनवायची प्रक्रिया सुरू केली”

“आता तुझ्या जवळ असलेल्या या लेझर गन च्या जोरावर आम्ही आमच यान इथून बाहेर काढू शकू आणि त्या S.W.A.R.G. मधील लोकांना धडा शिकवू.”

राजवीर ने त्याचा कम्युनिकेटर चालू ठेवला होता, त्यामुळे इकडे हरीश ला सर्व ऐकू येत होते. हे सर्व ऐकल्यावर हरीश ने ताबडतोब नौदल मुख्यालयाला संपर्क साधून मदत पाठवायची विनंती केली.

इकडे राजवीर ने हरीचरण ला सांगितले ,” ठीक आहे, मी तुम्हाला ही गन देतो पण माझ्या सर्व साथीदारांना सोडा आणि त्यांना परत बाहेर जाऊदे ”

नरकासुर बोलला, ” राजवीर , तुझा तुझ्या साथीदारांवर किती जीव आहे ते मला माहित आहे पण इथून तुम्ही कोणीच बाहेर जाऊ शकणार नाही कारण आता तुम्ही आमचं रहस्य जाणलं आहे, आणि आम्ही काही ते टॅम्बो आणि मॅम्बो नाही की जे तुझ्या लोकांना सोडतील.”

टॅम्बो आणि मॅम्बो च नाव ऐकल्यावर राजवीर ला एक कल्पना सुचली. त्याने त्याच्या हातावरील टेलिपोर्टर मध्ये असलेल्या कम्युनिकेटर चे बटन दाबले आणि इकडे मॅम्बो च्या हातातील टेलिपोर्टर मधून आवाज आला, राजवीर चा, तो बोलत होता, पण मॅम्बो शी नाही तर दुसऱ्या कोणाशी तरी, मॅम्बो लक्ष देऊन ऐकू लागला, राजवीर म्हणत होता, “हे बघ नरकासुर, तू मला आणि माझ्या साथीदारांना हे असे अंटार्क्टिका वर आणि ते ही 450 फूट बर्फाच्या खाली किती वेळ बंदी बनवून ठेऊ शकणार, माझी टीम माझ्या शोधार्थ येईलच लवकरच आणि मग तुमचा विनाश अटळ आहे. तुला काय वाटलं , माझी टीम मदत नाही करू शकणार, एव्हाना त्यांनी माझ्या दोस्त मंडळींकडे मदत मागितली देखील असेल”

हे राजवीर चे बोलणे, मॅम्बो टापूवर बसून आणि हरीश 450 फूट वर ऐकत होता. मॅम्बो ने ताबडतोब टॅम्बो च्या कानावर हे सर्व घातले. आणि राजवीर च्या मदतीला आपण गेले पाहिजे हे सांगितले.

हे सर्व ऐकल्यावर टॅम्बो ची खात्री पटली की हे प्रकरण वाटते तेवढे साधे नाही, त्याने ताबडतोब त्याच्या S.W.A.R.G. हॉट लाईन वर संपर्क साधून मदत मागितली.

इकडे द्वारकेच्या कंट्रोल पॅनल वर मेसेज आला. तिथल्या स्टाफ ने लगेच अकृराला बोलावून तो दाखवला. अकृराने तो मेसेज वाचून स्वतःच्या हातावरील टेलिपोर्टर चे संपर्क करण्याचे बटन दाबून टॅम्बो आणि मॅम्बो शी संपर्क साधला आणि परिस्थिती जाणून घेतली. राजवीर संकटात आहे हे कळल्यावर अकृराने ताबडतोब द्वारकेचा मार्ग बदलून अंटार्क्टिका कडे मोर्चा वळवला.

इकडे मॅम्बो आणि टॅम्बो ने आपली निवडक 25 माणसे घेतली आणि टेलिपोर्टर च्या साहाय्याने अंटार्क्टिका वर जिथे हरीश होता त्या ठिकाणी दाखल झाले.

हरीश ला त्यांचे येणे अपेक्षित होतेच. त्याने ताबडतोब ज्या ठिकाणी राजवीर बर्फात उतरला ती जागा दाखवली. मॅम्बो आणि टॅम्बो ने त्याच्या टीम ला कुठले लोकेशन टेलिपोर्टर मध्ये टाकायचे ते सांगितले आणि क्षणार्धात ते सर्व जण गायब झाले.

इकडे राजवीर आणि त्याच्या साथीदारांना एका प्रयोगशाळेत नेण्यात आले होते आणि लवकरच त्यांना असुर बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती.

मॅम्बो आणि टॅम्बो ची टीम 450 फूट खोल त्या गुहेत प्रकट झाली आणि त्यांनी त्या यानाच्या दरवाज्यावर लेझर ने मारा सुरू केला. काही क्षणातच तो दरवाजा नष्ट झाला. एव्हाना असुरांना या हल्ल्याची कल्पना आली होती, ते देखील शस्त्र घेऊन तयार झाले होते. जसे दरवाजा फोडून टॅम्बो आणि मॅम्बो ची टीम आतमध्ये आली तसा त्यांच्यावर मारा असुरांना सुरू केला.

इकडे बाहेर चालू झालेला गोंधळ पाहून राजवीर च्या टीम वर नजर ठेवायला असलेले असुर बाहेर गेले आणि एकच असुर राजवीर आणि टीम वर लक्ष ठेवायला ठेवला. जसे ते सर्व बाहेर गेले तसे राजवीर ने इशारा करताच हर्षल ने मागून त्या असुरावर हल्ला केला आणि त्याला बेशुद्ध केले. त्याच्याकडील चावीने त्यांनी त्यांच्या हातकड्या सोडवल्या.

राजवीर ने ताबडतोब आपल्या मनगटावरील टेलिपोर्टर चे बटन दाबले आणि या यानात आत आधी आत शिरले तेव्हा बघितलेल्या शस्त्रागारामध्ये तो पोहचला. हातात मावतील तेवढी शस्त्रे घेऊन तो परत लॅब मध्ये आला. स्वतःच्या टीम ला त्याने शस्त्रे दिली आणि स्वतः देखील एक गन घेऊन सज्ज झाला.

ते सर्व जण बाहेर आले तेव्हा बाहेर धुमश्चक्री सुरू होती.  असुरांच्या बाजूचे बरेच जण जखमी झाले होते पण ते लगेच बरे देखील होत होते. त्या असुरांच्या शरीरात अशी शक्ती होती की कोणतीही जखम लगेच भरून येत असे. फक्त जीवानिशी ठार केल्यावर तो असुर परत उठत नसे.

राजवीर च्या हे सर्व लक्षात आले आणि त्याने स्वतःच्या टीम ला या सूचना दिल्या. तेवढ्यात त्याला असुरांच्या पलीकडे टॅम्बो आणि मॅम्बो दिसले. राजवीर च्या जीवात जीव आला. त्याने पाठीमागून बेसावध असलेल्या असुरांच्या अंगावर मारा सुरू केला. आता असुर कात्रीमध्ये सापडले होते. पण त्याच वेळी एक मोठा आवाज झाला.

सर्वजण त्या आवाजाकडे पाहू लागले. एक दरवाजा उघडला गेला आणि त्यातून तीन महाकाय आकार बाहेर आले. ते तीन आकार म्हणजे एक लढाऊ कवच घातलेले मकरासुर, नरकासुर आणि हरी चरण होते.

त्या पैकी नरकासुराचा हातात मॅम्बो ने दिलेली लेझर गन होती, बाकी दोघंही हातात मोठ्या गन घेऊन होते. आल्या आल्या त्यांनी टॅम्बो आणि मॅम्बो च्या दिशेने मारा केला. टॅम्बो या माऱ्यामध्ये जखमी झाला. त्याने ताबडतोब टेलिपोर्टर च्या साहाय्याने स्वतःला हरीश च्या इथे आणले आणि हरीश ने त्याच्यावर उपचार सुरू केले.

इकडे राजवीर ने आणि मॅम्बो ने एकत्र येऊन हल्ला सुरू केला. राजवीर ने असुरांची कमजोरी मॅम्बो ला देखील सांगितली, आणि त्या नंतर त्यांनी नेम धरून एक एक असुर टिपायला सुरवात केली. स्वतः राजवीर थोडा जखमी झाला होता पण तरी देखील तो लढत होता.

पण आता जरी असुरांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही नरकासुर, मकरासुर आणि हरी चरण यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.

हरीचरण च्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने अजून जोरात मारा सुरू केला. पण त्याच वेळी त्याच्या त्या कवचामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला बहुतेक, त्याने मागे जाऊन स्वतःचे हेल्मेट काढले आणि कवच चेक करायला लागला. हीच संधी साधून मॅम्बो ने हरिचरण वर हल्ला केला आणि त्याला बेशुद्ध केले. हरिचरण राजवीर चे आजोबा असल्यामुळेच टॅम्बो ने त्याला ठार न करता फक्त बेशुद्ध केले.

इकडे मकरासुर आणि नरकासुर दोघेही जोर लावून लढत होते.

अचानक एक मोठा आवाज झाला आणि सर्वांना काही कळायच्या आत त्या यानाला फोडून एक टोक आत शिरले. ते टोक दिसायला एखाद्या शंखाचे टोक वाटत होते, आणि त्या नंतर तयार झालेल्या भगदाडातुन अक्रूर आणि त्याची सेना आत आली, अकृराने आल्या आल्या मकरासुरावर हल्ला चढवला. S.W.A.R.G. आणि P.A.T.A.L. यांच्यामधील जुन्या वैरामुळे ते दोघे जास्तच त्वेषाने एकमेकांशी लढत होते. आणि अचानक अकृराने एक घातक प्रहार करून मकरासुराचे डोके धडावेगळे केले. तो प्रहार एवढा जबरदस्त होता की मकरासुराच्या कवचाच्या हेल्मेट सकट त्याचे डोके वेगळे झाले.

हे बघून नरकासुर जास्तच चिडला आणि त्याने लेझर गन ने अकृरावर हल्ला चढवला. दोघंही तुल्यबळ असल्याप्रमाणे एकमेकांशी लढत होते. त्यातच एक वार नरकासुराकडून द्वारकेच्या त्या टोकदार भागावर झाला जो ते यान फोडून आत शिरला होता.

आणि त्याच बरोबर एक मोठा आवाज झाला आणि द्वारकेच्या शिरोभागातून सुदर्शनचक्र बाहेर आले आणि नरकासुराला काही कळायच्या आत त्याचे अनेक तुकडे करून परत आपल्या जागी जाऊन बसले.

आता सर्व शांत झाले होते. अकृराने जाऊन मॅम्बो आणि राजवीर ची भेट घेतली. राजवीर ला घट्ट मिठी मारून त्याने मॅम्बो ला पाठीवर शाबासकी दिली. त्यानंतर अक्रूर परत द्वारकेमध्ये गेला आणि द्वारका आल्या वाटेने निघून सुद्धा गेली.

त्या नंतर मॅम्बो आणि त्याच्या उरलेले साथीदार राजवीर सकट बाहेर आले. हर्षल आणि राजवीर ला जखमा झाल्या होत्या पण त्या एवढ्या विशेष नव्हत्या. टॅम्बो मात्र खूपच जास्त जखमी झाला होता. त्याला घेऊन मॅम्बो ताबडतोब भूतीया टापू वर निघून गेला.

इकडे राजवीर ने मैत्री स्थानकावर संपर्क साधला आणि मोहीम पूर्ण झाल्याचे सांगितले. वर येताना मॅम्बो ने हरी चरण यांनी देखील बेशुद्धावस्थेत वर आणले होते. राजवीर, हर्षल आणि हरीश ने मैत्री स्थानकाकडे प्रवास सुरु केला. पराग कसा अचानक अपघातात नाहीसा झाला याची कथा राजवीर ने स्वतःच्या मनात रचायला सुरू केली होती.

या जगात देव आहेत तसेच असुर देखील आहेत यावर आता राजवीर चा विश्वास बसला होताच पण त्याच बरोबर कोणताही सामान्य माणूस स्वतःच्या कर्माने देव किंवा असुर बनू शकतो हे देखील त्याने अनुभवले होते. हरिचरण चे पुढे काय करायचे आणि त्यापासून या जगाला धोका असेल का हे बघणे आता गरजेचे होते. म्हणूनच हरी चरण ला सद्यस्थितीत भूतीया टापू वर कैदेत ठेवायचा निर्णय घेण्यात आला होता आणि मॅम्बो बरोबर हरिचरण ला पाठवण्यात आले होते.

राजवीर ने मोहीम यशस्वी झाली हे सांगण्यासाठी हरी चरण चा रेडिओ सिग्नल प्रक्षेपक बरोबर घेतला होता.

आता त्याला प्रतीक्षा होती त्याच्यासमोर वाढून ठेवलेल्या पुढच्या कामगिरीची…..

समाप्त
लेखक :- स्वानंद गोगटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu