ll गौरी तृतीया ll
।।श्री शंकर।।
हल्ली सकाळ जरा अंमळ लवकरच सुरु होते. पहाटे पांच वाजताच. बिघडलेल्या परिस्थितीचे सावट मनावर असताना झोप तरी कशी येणार ? रोज सकाळी फिरायला बाहेर जायची सवय, पण त्याला मोडता घालावा लागलाय. विषाणूच्या प्रभावाने रोजची जीवनशैली पूर्ण बदलून गेली आहे.
चहा पाणी झाल्यावर आजच्या दिवसाचे planning . घरात काय सामान उपलब्ध आहे त्यावरच नाश्ता आणि जेवणाचा मेन्यू ठरवायचा. शक्यतो बाहेर न जाण्याची काळजी घेतली आहे.
सहज कॅलेंडर कडे नजर गेली. सध्या आला दिवस पार पाडायचा, अश्या वातावरणामुळे, आज गौरी तृतीया आहे , ह्याकडे लक्ष्य गेलेच नव्हते. चैत्रा गौर आज माहेरपणाला येणार आणि एक महिनाभर राहणार ना इथे. मग काय तिचे कोड कौतुक नको का करायला ? पदर बांधून मी सरसावले. आज तिच्यासाठी सुवासिक मोगरीचा गजरा नव्हता माझ्याकडे. कैरी, हरभरे, ह्यातले काहीच नव्हते आज. काय करू ग गौरी, सध्या घराबाहेर पडायची बंदी आहे ना ? तुझं आदरातिथ्य करायला काहीच नाही घरात.

आज वातावरण ही काहीसे ढगाळ, धुंद – कुंद. सूर्य ही जरा रुसलेलाच. वारे वाहत होते. बाहेर गच्चीत डोकावले. कुंडीतली फुले वाऱ्यावर डोलत होती. केशरी अबोली, गुलाबी – पांढरी सदाफुली , लाल चाफा, कण्हेरी. फुले काढण्यासाठी मी बाहेर गेले, कोकिळेचे कूजन चालू होते. वसंत ऋतू खरा तर किती आनंद घेऊन येतो. सर्व सृष्टीला, चराचराला आनंदी करतो. पण आज मनात नेहेमीचा आनंद, उत्साह नव्हता.
पूजेसाठी फुले, पाने घेऊन मी घरात आले. सडासंमार्जन करून त्यावर ” चैत्रांगण ” रेखाटले. माहेरी आलेली धाकटी लेक, गाड्या बंद असल्यामुळे सासरी जाऊ न शकलेली, साखर झोपेत होती. लांबूनच तिला साद घातली, गौरी , ए गौरी. सध्या आराम चालू असल्यामुळे , आईने हांक मारून झोपेतून उठवल्यामुळे ती माझ्यावर रागावलीच.
“अगं आज माहेरी जेवायला यायचं हं “. मी तिला आमंत्रण दिले. ती जरा गोंधळलीच. आता मात्र मी जोरदार तयारीला लागले. चालती बोलती गौर यायची होती ना माहेरी जेवायला ?

देवपूजा करताना मखरांत अन्नपूर्णेची स्थापना केली. तिला आवाहन केले. हे गौरी महिन्याभरासाठी तू आपल्या माहेरी आलीयेस. आनंदाने राहा ग इथे. जमेल तसं कोडकौतुक करीन. छान पाहुणचार करीन. आर्ततेने तिची प्रार्थना केली.
स्वैपाकाला लागले. देवीसाठी नैवेद्य करायचा होता . वरण भात, डाळिंबी उसळ, गवल्याची खीर, पुरण, भजी आहे त्यातच छान बेत जमून आला. देवीला नेवेद्य अर्पण केला. तिची मनापासून प्रार्थना केली. “हे दुर्गार्तिनाशिनी” आमच्या सगळ्या बांधवांवर आलेले हे संकट, लवकरात लवकर दूर कर, आमच्या दुःखाचे हरण कर आई.
दूरदेशी असलेल्या मोठ्या लेकी आणि जावयांचे क्षेमकुशल असावे म्हणून तिला पुन्हा हात जोडले.
जेवणानंतर सगळे तृप्त झाले. वामकुक्षी नंतर संध्याकाळचा बेत. डाळ – पन्हे. आज आंब्याची नाही तर वाटली डाळ आणि तय्यार बाटलीतले पन्हे, खोबऱ्याची खिरापत.
समईच्या मंद प्रकाशात देवीच्या चेहेऱ्यावर एक आगळे समाधान दिसत होते आणि आहे त्या कठीण परिस्थितीत आजचा दिवस आनंदाने साजरा करता आला त्याचे समाधान माझ्या अंतःकरणात होते.
चला श्रीराम आता वाट पाहत असेल आपली. सायंप्रार्थना करायची आहे. रामोपासनेचा संकल्प पुरा करायचाय. सलग गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस. इतक्या वर्षात न जमलेली साधना आता हातून घडतेय. आम्ही दोघे , मुलगी आणि बरोबरीने ८०+ आई आणि सासूबाई ह्यांना बरोबर घेऊन तीन पिढ्या एकत्र बसून उपासना करतोय. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण आणि उत्साह आहे .
इच्छा असूनही एरवी न साधला जाणारा संवाद साधला जातोय. बाहेर बरंच काही बिघडलंय , पण घरा- घरांत बरंच काही घडतंय, हेही नसे थोडके ….
बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्यात सुद्धा आपले रीतिरिवाज जसे जमेल त्याप्रमाणे पण मनापासून आणि सर्वांबरोबर साजरे करण्यातच आपली संस्कृती, परंपरा ह्यांची ठेव जपली जाते नाही का?
- सौ.स्नेहा हेमंत भाटवडेकर Email : sneha8562@gmail.com
शब्दस्नेह


