एकाच या जन्मी जणू ..!

बऱ्याच दिवसांनी आज मॉर्निंग वॉकला गेले . मस्त वाटत होतं ..खूप फ्रेश . आज जरा रोजच्या पेक्षा थोडी पुढे चालत गेले . आजुबाजुला असणारी फुलझाडं ,पाखरांचा चिवचिवाट , हिरवंगार गवत आणि हवेत असणारा सुखद गारवा ! मन प्रसन्न होण्यासाठी एवढं पुरेसं होतं . खरं तर मॉर्निंग वॉकला गेल्यावर मी कधी बसत नाही पण आज थोडं रेंगाळावं वाटलं . कानात येसुदास गात होता .. सकाळची सुखद हवा , डोलणारी फुलं पानं , उडणारे चीवचिवणारे पक्षी आणि येसूदासचा स्वर ! एक परफेक्ट सकाळ होती . चला बास झालं रेंगाळणं म्हणून उठणार तितक्यात समोरून एक आजी चालत येताना दिसल्या .बरोबर एक विशीची मुलगी होती .कदाचित केअर टेकर असावी त्यांची . काठी टेकवत त्या आजी आल्या आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या . सत्तरीच्या सहज असतील असं वाटलं . फिकट गुलाबी रंगाची कॉटन ची साडी , हातात दोन दोन सोन्याच्या बांगड्या ,कानात कुड्या पण सगळ्यात लक्षात राहिलेलं आणि ठळकपणे जाणवलेलं म्हणजे पांढऱ्या शुभ्र आणि इवलुशा बुचड्यावर छोटंस पिवळं रानफूल खोवलेलं . पांढऱ्या स्वच्छ रुमालाची घडी खोचलेली .काही माणसं पहाता क्षणी आवडतात . हे आवडणं कसल्याही कारणाशिवाय आणि हेतूंपलीकडचं असतं .माझ्याजवळ बसताच प्रसन्न हसल्या ..जणू खूप वर्षांची आमची ओळख आहे . किती निर्व्याज हसणं .. मी माझ्याही नकळत हसले .आता मला पटकन उठून निघावंस वाटेना . ती मुलगी म्हणाली ‘ आजी .. बसता ना इथे ..मी तोपर्यंत फुलं तोडते ‘ 

 
‘ हो हो .. जा ..ही आहे की सोबत माझ्या ..लवकर ये पण ‘ 
 
मला आश्चर्यच वाटलं .. ओळख ना पाळख .. या बाई इतक्या विश्वासाने माझी सोबत कसं म्हणू शकतात . माझ्याकडे खालपासून वरपर्यंत पहात विचारलं ‘ रोज येतेस का ग फिरायला ..’ 
 
‘ अं .. हो .. जमेल तसं येते ..’ 
 
‘ जमेल तसं म्हणजे काय .. जमवायचंच ..स्वतःकडे लक्ष देत जावं आपण .मी बघ ..सांग बरं माझं वय काय असेल ?’
 लहान मुलीच्या उत्सुकतेने त्या माझ्याकडे बघत होत्या . त्यांचे डोळे लकाकत होते . अनुभवांनी तावून सुलाखून निघाल्यावर , अनेक उन्हाळे पावसाळे झेलून, टक्के टोणपे खाऊन, परिस्थितीशी झगडूनही ही निरागसता कशी राहिली असेल .मी पन्नाशीतच किती पोक्त झाले आहे . पटकन कशाचा आनंद होत नाही ..हसणं , रडणं कुठलीही भावना सहजी व्यक्त होत नाही . मी कुतुहलाने आजीकडे पहात म्हणाले ‘ नक्कीच सत्तरी च्या असाल ..’ 
एक हात तोंडावर धरत हसत म्हणाल्या ‘ बघ ..फसलीस ना तू पण .. अगं यावर्षी ऐंशी पूर्ण झाले की ‘ त्यांच्या डोळ्यात चांदण्या लकाकल्या .आता मात्र मला खरंच आश्चर्य वाटलं .मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावर खोडकर हसू होतं .
‘ कसं जमवलंत ..आयुष्य खूप सुखात मनासारखं जगायला मिळालं ना ..’ 
 
‘ मनासारखं झालं सगळं तर आयुष्य कसं म्हणता येईल ..मनासारखं नसतं गं काही .जे जसं येईल तसं सहजतेने फक्त स्वीकारता आलं पाहिजे .भोग कुणाला चुकले आहेत ..प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या भोगाची तीव्रता कमी अधिक! पण आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा .माझी सासू स्वभावाने खूप कडक..घरात लोकांचा राबता , सोवळं ओवळं ..आर्थिक परिस्थिती पण बेताची .मग शाळेत नोकरी पण केली .घरातलं सगळं केलं पण करताना सतत गाणं गुणगुणत रहायचे . हे कौतुकाने म्हणायचे तू वेडी आहेस ..काहीच कसं मनाला लावून घेत नाहीस .पण वेड असणं महत्त्वाचं . त्यातून जगण्यात सहजता येत जाते . अट्टाहास कमी होतो .मी म्हणेन तेच बरोबर , मलाच कसं सगळं कळतं , मी कधी चुकणार नाही , हा सगळा अट्टाहास सोडून देणं सोपं जातं . सहजता आली जगण्यात की आपल्यातलं मूल जिवंत रहातं .. त्या निरागसतेने जग पहाताना सुंदर भासतं .कुठल्याही नवीन गोष्टीचा अनुभव घेण्याची उत्सुकता टिकून रहाते .आज पण नातवंडांबरोबर पिझा खायला शिकले .. पतवंडाबरोबर जॉनी जॉनी पण म्हणते आणि शुभं करोती पण शिकवते .सगळ्यांशी हसून खेळून बोलते . मस्त रहाते .कळलं ..सहजता असावी जगण्यात .. बाकी सगळं सोपं होतं मग ! ‘ 
 
‘ आजी .. चला .. निघायचं का ..’ 
 
‘हो .. चल .. चल ..
अगं .. नाव काय गं तुझं .. एवढ्या गप्पा मारल्या पण नावच विचारलं नाही तुझं ..’ 
 
‘ मानसी ..’ 
 
‘ छान नाव आहे ..आणि तू पण आवडलीस मला ..’
 
 ‘ मानसी चा चित्रकार तो तुझे अलौकिक चित्र काढतो ..’ त्या सहज गुणगुणत निघाल्या . किती किती गोड वाटलं ते गुणगुणनं ! किती सहजता ..पहिल्याच भेटीत अगदी ओळख ही नसताना तू मला आवडलीस हे सांगणं . आपल्याला जमेल असं सहज वागणं ..जमेल म्हणजे काय जमवयलाच हवं .मी ही गुणगुणत निघाले ‘ एकाच या जन्मी जणू .. फिरुनी नवी जन्मेन मी !’ 
 
घरी आल्यावरही गुणगुणत होते .. हसत होते .नवरा म्हणाला ‘ आज काय ..एकदम खुश आहेस ‘ 
 
हसतच म्हणाले ‘ जगण्यात सहजता हवी रे .. आयुष्य सुंदर होतं ..कसलाही अट्टाहास नको .आज जेवणाला सुट्टी .. बाहेरून मागवूया..’ 
 
तो माझ्याकडे ‘ हिला काय झालं ‘ अशा नजरेने पहातोय हे जाणवलं .त्याकडे दुर्लक्ष करत मी गिरकी घेतली ..
‘ लहरेन मी .. बहरेन मी …
 शिशिरातुनी उमलेन मी….’
 
सौ मानसी मंगेश सावर्डेकर
नौपाडा ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu