“दुर्गे दुर्घट भारी”….

हल्ली वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. दुष्टांचा संहार करणा-या आदिमाया, अंबाबाई, आदिशक्तीचा जागर करणारा सण. या सणात नऊ दिवस अखंड आदिशक्तीची आराधना केली जाते. अशी हि आदिशक्ती अनेक गावात वसलेली आहे. या आदिमायेची अनेक रूपे अनेक ठिकाणी वसलेली आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये या आदिमायेची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरातील देवीची रूपे, त्यांची वैशिष्टे याची माहिती “रूपे मातेची ” या सदरातून..

• मुंबादेवी मंदिर:-

मुंबईला ज्या देवीच्या नावाने नाव पडले ती हि मुंबादेवी. मुंबईची ग्रामदेवता आणि कोळ्यांची कुळदेवता असलेले मंदिर १७ व्या शतकात कोळी बांधवानी बांधले. ब्रिटीशकाळातील हे मंदिर सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तेथे होते. स्थानक उभारण्यासाठी मंदिर १९१८ साली काळबादेवी या परिसरात हलवण्यात आले. ४०० वर्षे जुने मंदिरातील देवीची मूर्ती वालुकामय स्वरुपाची आहे. दगडी बांधकाम आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या मंदिरात प्रथम प्रवेश केल्यावर दर्शन घडते ते स्वयंभू मुंबादेवीचे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभा-यात मुंबादेवी आणि दुस-या गाभा-यात अन्नपूर्णा आणि जगदंबा मातेची मूर्ती आहे. देवीची वर्षभरात विविध रुपात पूजा बांधली जाते. सात दिवस सात वाहनावर अनुक्रमे नंदी, हत्ती, कोंबडा, गरुड, हंस, शार्दुल पूजा केली जाते. मंदिरात अखंड नंदादीप आहे. मंदिराच्या परिसरात हनुमान, जगदीश, साईबाबा, गणपती आदि देव-देवितांची मंदिरे आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. नवरात्रोत्सवात देवीच्या पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते. भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने क्लोज सर्किट कॅमे-यांची सोय करण्यात आली आहे तसेच अनेक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.

• महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी:-
मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. १७८५ साली स्थापन करण्यात आली. १७८५ साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर रामजी शिवाजी प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. मुंबईची धनलक्ष्मी म्हणून ख्याती असलेल्या मंदिरात महालक्ष्मी, कालिका, महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहे. मंदिरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता मुख्य आरती तसेच ६.३० धूप आरती आणि रात्री १० वाजता शेजारती असा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम असून मूर्तीवर अभिषेकासाठी ४ ते ११ या वेळेत मंदिर सुरु असते.नवरात्रीच्या दिवसात पहिल्या दिवशी घटस्थापना करून मंदिर पूर्ण दिवस सुरु असते. देवीच्या दर्शनासाठी भविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल सोपवण्यात आले असून ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तसेच भाविकांसाठी मंदिरापासून हाजीअलीपर्यंत मंडपाची सोय करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनास जाताना ओटी आणि फुलांच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्टी नेण्यास बंदी आहे.

• शितलादेवी मंदिर, माहीम:-

मुंबईतील सात बेटांपैकी माहीम या बेटावर वसलेले हे सुंदर मंदिर. कोळी लोकांची कुलदैवत असलेल्या शितलादेवीचे मंदिर साडेतीनशे वर्ष जुने आहे. मंदिरातील देवीची मूर्ती हि पाषाणात घडवलेली असून तिच्यावर चांदीचा मुखवटा चढवला आहे. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवात अष्टमीला हवन केले जात असून माघ नवरात्रोत्सवात देवीला सोन्याचा मुखवटा चढवून नवचंडिका यज्ञ, अभिषेक इत्यादी कार्यक्रम केले जातात. मंदिराच्या आवारात महाकाली, हरिहर, पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर, साईबाबा तसेच खोकला बरा करणारी खोकलाई देवीचे मंदिर आहे. तसेच मंदिरासमोर सारस्वत समाजाची कुलदेवता असलेल्या शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे. मंदिर पूर्वी कौलारू होते गेल्या दोन वर्षापूर्वी मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. मंदिरात दररोज सकाळी ८.३० व रात्री ७.३० वाजता ट्रस्टतर्फे आरती केली जाते. नवरात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.

 

• सातआसरा मनमालादेवी मंदिर, माहीम:-
माहीमची ग्रामदेवता असलेले हे मंदिर. मंदिर १५०-२०० वर्षे पुरातन आहे. मंदिरात प्रथम प्रवेश केल्यावर नजरेस पडते ते गावदेवीचे मंदिर. सध्या मनमाला देवीचे मंदिर आहे तिथे तलाव होते. त्या तलावातून मनमाला देवीची मूर्ती प्रकट झाल्याचे सांगितले जाते. या देवाबरोबर खोकलादेवी, शितलादेवी, जरीमरी, केवडावती, चंपावती, दादा कान्हू गवळी, कान्होपात्रा देवी मनमाला देवी बरोबर प्रकट झाली आहे. अनेक कित्येक वर्षी या मूर्ती तलावाबाहेर होत्या. आता या तलावाला विहिरीचे रूप देण्यात आले आहे. विहिरीच्या बाजूला मंदिर बांधून त्या मंदिरात आता या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारील विहिरीतील पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग नाहीसे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मंदिरातील खोकलादेवीचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या खोकला असल्यास खोकला दूर होण्यासाठी साकडे घातल्यास खोकला बरा होतो आणि खोकला बरा झाल्यास देवीला मीठ आणि पीठ व फरसाण म्हणून नैवेद्य दिला जातो. चैत्र नवरात्री आणि नवरात्री मध्ये देवीला चांदीची छत्री घातली जाते. तसेच नवरात्रोत्सवात अष्टमीला हवन केले जाते व दररोज महिला भजन असते. मंदिराचे सर्व कार्य प्रकाशराव माधवराव सावंत पाहत आहे.

• जाखादेवी मंदिर, दादर:-

प्रभादेवी मंदिरापासून जवळ असलेले मंदिर. गोखले रोड स्थित देवीचे मंदिराचे मूळ रत्नागिरी गावातील गणपतीपुळे येथील आहे. मंदिराची स्थापना अनंत विठ्ठल कवळी यांनी १०० वर्षापूर्वी केली. ते राहत असलेल्या एका तलावात जाखादेवीची पुरातन मूर्ती सापडली. मूर्ती हि भग्नावस्थेत असल्याने त्यांनी संगमरवरी मूर्तीची स्थापना केली. कवळीना सापडलेली पुरातन देवीची मूर्ती आजही मंदिरात पाह्यला मिळते. कवळी कुटुंबांकडे देवीचा आरतीचा मान असून देवीला वस्त्र आणि अलंकार करण्याचा मान हि त्यांचा आहे. नवरात्रीला अष्टमीला होमहवन असून सायंकाळी आरती केली जाते. जाखादेवी नवसाला पावणारी देवी असल्याने नवरात्रोत्सवात महिला साड्या अर्पण केल्या जातात. मंदिरात गणपती, दत्त महाराजांची मूर्ती आहे. देवीचे मंदिर दादर विभागात असल्याने नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंदिरात पौष महिन्यातील “पौष पौर्णिमेला” मोठा उत्सव असतो.

 

• गोलफादेवी मंदिर, वरळी:-

वरळी येथील प्रसिद्ध कोळी बांधवांचे मंदिर. मंदिराची बांधणी बिंब राजाने केल्याची आख्यायिका आहे. मंदिर उंच टेकडीवर वसलेले असून मंदिरात साकबादेवी, गोलफादेवी, आणि हरबादेवीच्या मूर्ती आहेत. काळ्या पाषाणातील मूर्तीकडे एक टक पाहिल्यास सुंदर लेणीमधील मूर्ती पाहिल्याचा आभास होतो. मंदिरातील देवीची पूजाअर्चा करण्याचे काम सदानंद कोळी करतात. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रोत्सवात मंदिर भाविकांसाठी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले असते. मंदिरात देवीला कौल लावण्याची प्रथा अजूनही सुरु आहे. कोळीबांधव मासेमारीस जाताना देवीला कौल लावतात. तसेच लग्नकार्य असल्यास, तीर्थक्षेत्रास भेट देयायला जाताना प्रवास सुखरूप होण्यासाठी कौल लावले जातात. देवीचा शाकंबरी पौर्णिमेला जन्म दिवस असल्याने मोठा उत्सव असतो तसेच चैत्र पौर्णिमेला वाशी, गोरेगाव भागातून भक्त मोठे झेंडे घेऊन येत्तात. नवरात्रीत मंदिराच्या परिसरात गरबा खेळला जातो. तसेच मुंबईबरोबरच गावाहूनही भक्त नवस फेडण्यास येतात.

 • काळबादेवी मंदिर, काळबादेवी:-
मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. काळबादेवी परिसरातील कापड मार्केट, झवेरी बाजार अशा अने मुख्य बाजारपेठेत असलेले सुमारे २२५ वर्षापूर्वीची देवी. हि देवी “महाकालीमाता” या नावाने ओळखली जाते. मुंबईतील आझाद मैदान परिसरात ३०० वर्षापूर्वीच श्री रघुनाथ कृष्ण जोशी यांनी प्रतिस्थापना केली. परंतु, त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे हे मंदिर काळबादेवी परिसरात हलवण्यात आले. मंदिरातील देवीची आणि मंदिराची व्यवस्था जोशी घराण्याची सातवी पिढी पाहत आहे. देवीच्या मंदिरात महालक्ष्मी आणि श्रीसरस्वती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुंबईतील हि एकमेव देवी आहे तिला मांसाहार नैवेद्य चालत नाही. नवरात्रोत्सवात मोठा गाजावाजा नसला तरी धार्मिक विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीत नवमीला कोहळा कापण्याची प्रथा ऑन या दिवशी हवन केले जाते. नवरात्रोत्सवात मुंबादेवी, महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणारे भाविक न चुकता कालबादेवीचे दर्शन घेतात. काळबादेवी काही समाजाची देवी असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येतात.


• हरबादेवी, विरार;-

मुंबई उपनगरातील पश्चिम रेल्वे स्थानकातील शेवटचे स्थानक विरार स्थानक जवळच मंदिर आहे. विरार येथील टाटोळे तलावाच्या परिसरात असलेली देवी जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. १९६० साली स्थापना करण्यात आलेल्या मंदिरात ब्रिटीश सरकारने नियुक्त केलेल्या बैरागी कुटुंबाची सातवी पिढी मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे. लहान मुलांना होणा-या कांजण्या, देवी असे रोग देवी बरे करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. राउत, पाटील आणि जावळे या कुळांची हि कुलदेवता आहे. ब्रिटीशकाळात विरार स्थानकाचे बांधकाम चालू असताना देवीच्या मूर्तीचा कामात अडथळा येत होता. देवी हलवण्याचे प्रयत्न सुरु झाले. क्रेनही देवीची मूर्ती हलवता येत नव्हती, तेव्हा बैरागी कुटुंबातील हनुमंतदास बैरागी यांनी दैवी शक्तीने स्थलांतरीत केली. देवीचा वरण-भात आणि मेथीची भाजी हा आवडता नैवेद्य आहे. नवरात्रोत्सव दिवशी घटस्थापना करून हरबा देवीची आरती आणि अष्टमीला होमहवन, गरबा असे कार्यक्रम केले जाणार आहे.

 

• श्री सप्तशृंगी मंदिर, नाशिक:-

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी मंदिर. प्रसिद्ध असलेल्या या शक्तीपीठाची महंती खूप मोठी आहे. १८ हाताची हि महिषासुरमर्दिनी. हि देवी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या नावाने ओळखले जाते. सप्तश्रुंग गडावर आल्यावर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मंदिरात जाण्यासाठी ५०० पाय-या आहे. ५०० पाय-या चढून वर गेल्यावर शेंदूरचर्चित ८ फुट उंच १८ हातांची देवी नजरेस पडते. देवीच्या प्रत्येक हातात ३ आयुध धारण केली आहे. ८ फुट उंच देवीला ११ वार साडी आणि तीन खण भरले जातात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, पायात तोडे असे अलंकार देवीला घातले जातात. मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० ते १० महापूजा, दुपारी १२ वाजता आरती आणि सायंकाळी ७.३० वाजता आरती असते. मंदिरात नवरात्रोत्सव पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सकाळी पंचामृत महापूजा, सायंकाळी रसायन आरती केली जाते. देवीला पुरणपोळीचा नैवैद्य दिला जातो. नवरात्रीत देवीच्या कुंकवाचा आकारामध्ये बदल केला जातो. नवमीला देवीसमोर शतचंडी पूजा, दस-याला शतचंडी याग, पूर्णाहुती तसेच कोजागिरी पौर्णिमेला विविध ठिकाणाहून कावडीतून आणलेल्या तीर्थाचा अभिषेक केला जातो व आरती केली जाते अशी माहिती मंदिराचे पुजारी नारायण देशमुख यांनी दिली.

• श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर:-

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी प्रचलित आहे. शिवाजी महाराज यांची हि कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्र निवारण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची हि कुलदेवता असून रामदास स्वामी हेदेखील यांचे उपासक आहे. मंदिराच्या गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची आहे. देवीने एका हातात महिषासुर राक्षसाची शेंडी धरली आहे. तर दुस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसला आहे. देवीच्या उजव्या पायाखाली महिसासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्केडेय ऋषींची मूर्ती आहे. देवी व्यतिरिक्त कालभैरव, पापनाथ तीर्थ, मकावती तीर्थ आदि मंदिरे आहे. मंदिरात नवरात्रीत देवीला महिषासुरमर्दिनी रूप, रथ अलंकार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा भवानी तलवार असे अनेक रूप दिले जाऊन होम हवन केले जाते. तसेच अश्विन वद्य १ ला सोलापूरच्या काठ्यासह छबिना असतो अशी माहिती गुरुजी गजानन लसणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी http://www.tuljabhavani.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मातेचे मंदिर तुळजापूर पासून १९ कि.मी अंतरावर तसेच सोलापूर येथून ४५ कि.मी अंतरावर आहे.

– प्रसाद प्रभाकर शिंदे
thinkmarathi@gmail.com

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu