आत्माराम रावजी देशपांडे -कवी अनिल

अनिल
सुप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचा जन्म दि.11सप्टेंबर 1901 रोजी मुर्तिजापूर येथे झाला . मुर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर इ.स.1919 साली ते पुण्यात आले . फर्गसन महाविद्यालयात कला शाखेचा अभ्यासक्रम करीत असताना त्यांचा कुसुम जयवंत या तरुणीशी परिचय झाला . त्याचे पुढे प्रेमात रुपांतर होऊन दि.6 ऑक्टोबर 1929 ला त्याची परिणती विवाहात झाली . कुसुमावती देशपांडे या सुद्धा उत्तम लेखिका व समीक्षक होत्या .
कुसुमाभोवती रुंजी घालणारा वारा म्हणजे ‘ अनिल ‘ म्हणून आत्माराम रावजी देशपांडे यांनी ‘ अनिल ‘ हे टोपणनाव घेतलं होतं . अनिल ब्राह्मण तर कुसुम सीकेपी इ.स. 1929 साली दोघांच्या ‘ आंतरजातीय ‘ विवाहाला प्रचंड विरोध झाला होता . पण लग्नानंतर दोघांचंही आयुष्य साहित्यिक आणि लौकिकार्थानं बहरत गेलं !

कवी अनिल दशपदी आणि मुक्तछंद या काव्यप्रकाराचे प्रवर्तक होते . मुक्तछंद हा काव्यप्रकार अनिलांनी मराठीत रुजवला . कविता मुक्तछंदात असली तरी त्यांनी कवितेचे व्याकरण आणि तालाचे भान त्यांनी कधी सोडले नाही . दहा चरणांची कविता दशपदी हा काव्यप्रकार त्यांनी सुरू केला . कवी अनिलांना इ.स.1979 ची साहित्य अकादमीची फेलेशिप प्रदान करण्यात आली होती . इ.स.1958 साली मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते . इ.स.1977 साली ‘ दशपदी ‘ साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता .
कवी अनिल आणि कुसुमावती या सुविद्य दंपतीच्या पत्रव्यवहाराचा संग्रह प्रसिद्ध आहे . सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या पत्रप्रपंचाचे पुनर्प्रकाशन नागपूर येथे दि.2 जुलै 2017 रोजी झाले . इ.स.1922 ते 1927 या काळातील ती पत्रं आहेत . पत्रातून माणूस जितका खरेपणाने कळतो तितका तो आत्मचरित्रातून किंवा चरित्रातूनही कळत नाही . चरित्रात अथवा आत्मचरित्रात फक्त भूतकाळ आपल्यासमोर चितारला जातो , पण पत्रातून भूतकाळ वर्तमानाची वस्त्र लेऊन आपल्या बरोबरीने चालत राहतो .
” संस्कृतीच्या काठावर फुललेलं कुसुमानिल हे एक सुंदर झाड आहे . या झाडाची सावली येणाऱ्या पिढ्यांना मिळावी , या झाडवरच्या पक्षांची किलबिल , त्याला लगडलेल्या फुलांचा सुगंध आपल्या मुलांना आणि नातवंडाना मिळावा अशा तीव्र इच्छेतून मी कुसुमानिल पुनःप्रकाशित करण्याचा निर्णय घेतला .” ही एलकुंचवारांची प्रस्तावना खूपच बोलकी आहे .
अजुनी रुसूनी आहे या अत्यंत तरल काव्याची जन्मकथा अशी सांगितली जाते , एका कार्यक्रमासाठी कवी अनिल गेले होते . परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही . अनिलाना वाटले आपली प्रिया रूसून बसली आहे . पण त्यांची अर्धांगिनी चिरनिद्रेत गेली होती . तिचा निष्प्राण देह बघून अनिल पूर्णपणे कोसळून गेले होते . तेव्हा मनाच्या उद्विग्न अवस्थेत अनिलांच्या लेखणीतून ही कविता उमटली . खरंतर ही कविता अनिलांनी कुसुमावती यांच्या निधनापूर्वी चौदा वर्षे आधी लिहिली होती . त्यामुळे या दाव्यात काही तथ्य असेल असे वाटत नाही ! ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरात गायली आणि अमर केली .
अजुनी रूसुनी आहे , खुलता खळी खुले ना
मिटले तसेची ओठ की पाकळी हले ना !
समजूत मी करावी म्हणूनीच तू रूसावे
मी हांस सांगताच रडतांहि तू हसावे
ते आज का नसावे ? समजावणी पटे ना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना !
की गूढ काही डाव ? वरचा न हा तरंग !
घेण्यास खोल ठाव , बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा , ज्या आपले कळे ना ?
अजुनी रुसुनी आहे , खुलता कळी खुले ना !
कुमार गंधर्वांच्या आवाजात रुसवा आणि गाठ या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या . अर्थातच त्या रसिकांना विलक्षण आवडल्या , अजरामर झाल्या . कवी अनिल यांची त्यावर प्रांजळ प्रतिक्रिया अशी होती , ” या कविता इतक्या सुंदर आहेत हे मला त्या कुमारांच्या आवाजात ऐकल्यानंतरच समजलं . ‘ कुसुमानील ‘ मधील एका पत्रात अनिलांनी कुसुमला लिहिलंय ,
” मी माझ्या कवितांना ‘ अनिलकूजन ‘ रसलिंग ऑफ विंड असं का म्हणतो माहित्येय ? कारण मी म्हणतो , ” वाऱ्याच्या शब्दासारखे माझे गाणे निरर्थक आहे , जो अर्थ काढाल तो तुमचाच ! ऐकणाऱ्यांनो , मला तो माहित नाही “
कवी अनिलांचे कुमार गंधर्वांच्या घरी सातत्याने येणे जाणे होते . कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वांच्या घरी मुक्कामाला असत . अशाच एका मुक्कामातली गोष्ट मुकुल तेव्हा बारा वर्षांचे होते . आई भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला सात वर्षे झाली होती . आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात रहातो , हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही . एका रात्री तुफान पाऊस पडत होता . धुवांधार पाऊस , छोट्या मुकुलच्या गाण्याचा आवाज ऐकू येत होता . धुवांधार पाऊस ….. बाहेरही होता ….. आणि आतही ….. कवी अनिल बेचैन झाले आणि एक सर्वांगसुंदर गीत जन्मले .
कुणी जाल का , सांगाल का , सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको , खुलवू नको अपुला गळा
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला
सांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

अत्यंत हृदयस्पर्शी व भावविभोर कविता लिहिणाऱ्या या महान कवीला  भावपूर्ण श्रद्धांजली !

मुकुंद कुलकर्णी ©
pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu