31 डिसेंबर © मुकुंद कुलकर्णी

31 डिसेंबर 2020, अप्रिय घटनांनी भरलेल्या या अविस्मरणीय वर्षाचा हा सरता दिवस , नवीन वर्षात घडणाऱ्या शुभ , मंगल घटनांचे संकेत देत सरावा ही सदिच्छा आणि प्रार्थना . खडतर गेलं गतवर्ष . पहिलं महायुद्ध , दुसरं महायुद्ध , शीतयुद्ध ,जागतिक महामंदी , स्पॅनिश फ्लू , ब्युबोनिक प्लेग अशा साथी , महाभयंकर दुष्काळ , महापूर , धरणीकंप अशी नैसर्गिक संकटं या गोष्टींची दाहकता आपण वाचून अथवा चित्रपटांतून पाहिली होती . आपल्या आयुष्यकाळात असं काही संकट आपल्यालाही अनुभवावं लागेल , असं स्वप्नातही वाटलं नव्हतं . ई.स. 2020 ने तो अनुभव ही आपल्याला याची देही याची डोळा कोविड 19 या रुपात दिला . मास्क , सॅनिटायझर , पल्स ऑक्सिमिटर , थर्मामीटर ही आपली आयुधं बनली . सोशल डिस्टन्सिंग ही जीवनशैली झाली . मेडिकल सायन्स अत्यंत प्रगत असतानाही सर्व काही त्या उपरवाल्याच्या हातातच आहे , याची प्रचिती देणारा हा काळ होता .
मात्र या काळाने दुर्दम्य आशावाद ही शिकवला . ” There is some eternal power which governs the destiny of each and every human being . ” याची प्रचिती देणारा हा काळ होता . हा कठीण काळ लवकरच संपेल आणि पुन्हा पूर्वीचे सुखाचे दिवस अवतरतील या उमेदीने नववर्षाचे स्वागत करूया !
तर मंडळी …..
तसे आपण सगळे भारतीय उत्सवप्रिय , सगळे म्हणजे सगळेच , सगळ्या जाती धर्मातले सगळ्या आर्थिक स्तरातले . कुठलं तरी निमित्तच पाहिजे आपल्याला मजा करायला . तर अशा निमित्तातलं एक आवडतं निमित्त म्हणजे 31 डिसेंबर . मला जसं आठवतंय तस आमच्या लहानपणी हे 31 डिसेंबर वगैरे काही नसायचं . फार कशाला वाढदिवस सुद्धा यायचा आणि जायचा . आई वडील लाड करायचे पण तेवढंच . आता मिळेल त्या संधीचा आपण ईव्हेंट करतो .
इडियट बॉक्सचा जेंव्हा आपल्या रोजच्या दिनक्रमात प्रवेश झाला तेंव्हापासून नववर्ष स्वागताचा महोत्सव होण्याची सुरूवात झाली . तेंव्हा दूरदर्शनवर रात्री बारा वाजेपर्यंत रंगारंग कार्यक्रम व्हायचे आणि सिरियल्स टीआरपीचा सावळा गोंधळ नसल्यामुळे हे कार्यक्रम मनोरंजक वाटायचे . मग ऑस्ट्रेलिया जपान अतीपूर्वेकडून नव वर्षाच्या स्वागतासाठी केलेली आतिषबाजी हे सगळं ठरलेलं असायचं .
खरं तर काही वर्षांपूर्वी आजचा जो मध्यमवर्ग आहे तो कनिष्ठ मध्यमवर्ग असायचा , कशीबशी महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी व्हायची . पहिला गोल्डन वीक ते अखेरचा पेपर वीक असे दिवस होते ते अखेरचा पेपर वीक म्हणजे अक्षरशः पेपर विकच असायचा ! हॉटेलिंग सुद्धा फार क्वचितच व्हायचं . पुण्या मुंबईकडे , कशाला बहुतेक सगळीकडेच आजकाल वीकेंडला घरी जेवणारा प्राणी दुर्मिळ होत चाललाय .
दारू पिणे हे थोडंस वेगळच प्रकरण होतं , दारूला दारूच म्हणायचे ड्रिंक्स असं त्याचं नामकरण झालं नव्हतं ते अलीकडे झालं . 31 ची पार्टी ड्रिंकशिवाय हे समीकरण आता आजिबात जुळत नाही .
पण थोडासा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून या सगळ्याकडे गम्मत म्हणून पहायला काय हरकत आहे , आपल्या जिवलग माणसांसोबत जिवलग मित्रमंडळींच्या बरोबर क्वचित प्रसंगी चित्तवृत्ती उल्हसित होतील इतपत माफक पेयपान करून आपल्याला आवडेल ते सामिष , निरामिष चापायला काय हरकत आहे ! अर्थात तब्येत सांभाळून . स्टीलच्या ग्लासमध्ये व्हिस्की , बीयर तत्सम काहीतरी लपवून घ्यायचं आणि शहाजोगपणाचा आव आणायचा . मी नाही त्यातली कडी लावा आतली ! त्यापेक्षा थोडी गम्मत करून पहायला काही हरकत नसावी . तसं आजकाल सगळ्याच क्षेत्रात मग नोकरी असो अथवा व्यवसाय स्ट्रेस प्रचंड वाढलाय . आवडत्या काही लोकांसमवेत सुखाचे काही क्षण घालवणे या सारखा स्ट्रेसबस्टर नाही .अर्थात तसा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न .
1 जानेवारी पासून सुरू होणारे नववर्ष आपले नाही , हिंदू नववर्ष गुढी पाडव्या पासून सुरू होते . नववर्षाच्या शुभेच्छा आता देऊ नयेत असा मेसेज सोमिवर सध्या प्रचलित आहे . हिंदू नववर्ष तर आपण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरे करतोच मग नूतन कॕलेंडर वर्षाचा पहिला दिवस नववर्षदिन म्हणून साजरा करण्यात काय हरकत आहे . तसेही आपले सर्व व्यवहार आपण ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे करतो कुठल्याही करार मदारांवर , बँकेच्या चेकवर आपण इंग्रजी तारीखच वापरतो . शालिवाहन शक 1942 शार्वरी नाम संवत्सर मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा असे लिहित नाही . सर्वसमावेशक व्यापक दृष्टीकोनाची शिकवण आहे आपली , जेथे जे काही चांगले ते आपण उदार मनाने स्वीकारतोच त्यामुळेच आज प्रगती पथावर आहोत .
गेलं वर्ष खडतरच गेलं पण सगळं काही वाईटच नव्हतं हे ही खरंच . संवाद साधला गेला हे नक्की , अगदी आपल्या स्वतःशी सुद्धा . परिवर्तनशील बदलले . मुर्खांच्या नंदनवनात राहणारे आणखीनच मूर्ख राहिले ! हे ही तितकंच खरं . संवेदनशील लोक मात्र आणखीन अंतर्मुख होऊन विचार करायला लागले . कुठलीही वाईट गोष्ट सर्वस्वी वाईट कधीच नसते . वाईटातूनही काहीतरी चांगलं निर्माण होतोच , ते शोधण्याचा संकल्प नववर्षात करू या ! HAPPY NEW YEAR 
तर मंडळी , नववर्षाचे स्वागत आपापल्या आवडी प्रमाणे करू या . आनंदयात्री होऊ या यद् रोचते तद् ग्राह्यम यत् न रोचते तद् त्याज्यम .
सर्वांनाच नव वर्ष सुख समृद्धीचे , भरभराटीचे , आरोग्यसंपन्न , इच्छित मनोरथ प्राप्तीचे जावो . शुभं भवतु . तथास्तु !
सांगता ….. शांताबाईंच्या समर्पक कवितेने
कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागुन पाने अविरत
गतसालचे स्मरण जागता
दाटून येते मनामध्ये भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
स्वतः स्वतः ला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
– शांता शेळके

मुकुंद कुलकर्णी ©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu