दिवाळीची सुट्टी संपली की सर्वांच्याच अंगावर मायेचे उबदार पांघरूण घालायला ,अगदी हळुवार पावलांनी येते ती आपली सर्वांची लाडकी ‘थंडी राणी’ या थंडी राणीचे आगमन होते शिशिर ऋतूमध्ये.
साधारणत पौष व माघ मध्ये येणाऱ्या या ऋतूमध्ये वाढत जाणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळे त्वचा कोरडी होते त्यामुळे विशेषतः तीळ तेलाचा किंवा इतरही औषधी तेलाचा मसाज व पिण्यासाठी गरम पाणी व तेल, तूप, सुंठ, आले ,लसूण, काळी मिरी, लवंग, गूळ ,तीळ यासारख्या उष्ण पदार्थांचे भरपूर सेवन, या सर्व गोष्टी या काळात उत्तम आरोग्य राखण्यास उपयोगी पडतात. या काळात पालेभाज्या, गाजर, बीट, सुका मेवा ,च्यवनप्राश, ज्वारी- बाजरीची भाकरी, तिळाचे लाडू, गुळाची पोळी ,जवस ,कारळे यांची चटणी या पदार्थांचे सेवन भरपूर प्रमाणात केल्यास व भरपूर व्यायाम केल्यास आरोग्य ठणठणीत राहून कफ, वात, पित्त यासारख्या अनेक आजारांपासून आपले रक्षण होते .
या काळात केस गळण्याचे प्रमाणही वाढते या त्रासापासून वाचण्यासाठी रोज केसांच्या मुळाशी तेल मालिश करावी, त्याचप्रमाणे या काळात भरपूर पालेभाज्या खाव्यात कारण पालेभाज्या भरपूर प्रमाणात आणि स्वस्त दरातही उपलब्ध असतात आणि या काळात रोज पालेभाज्या खाल्ल्या की अंगावर आलेले पांढरे डागही निघून जातात पुन्हा किमान वर्षभर तरी हे डाग येत नाहीत असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे शिवाय तरुण वयात जर केस पांढरे झाले असतील तर पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्याने केस काळे होण्याची शक्यताही असते .
या काळात सर्दी खोकला, घसा व श्वसनाचे विकार होऊ नयेत म्हणून स्वेटर, कानटोपी ,मोजे ,शाल, मफलर, ब्लँकेट आणि विशेष म्हणजे पायात चप्पल या सर्वांचा आवर्जून वापर करावा. थंड हवेत जास्त फिरू नये, व्यायाम मात्र नियमित व झेपेल तो आणि झेपेल तेवढा करावा. शरीर आणि विशेषतः पाय ऊबदार राहिले पाहिजेत तर सर्व आजारांपासून सुरक्षित राहण्यास नक्कीच मदत होते.
हा ऋतू अतिशय प्रेमळ ऋतू आहे. शिशिर ऋतूत मकरसंक्रांत येते जी आपल्याला प्रेमाचा, स्नेहाचा संदेश देते. संक्रांत म्हणजे तिळगुळाच्या लाडूंची व गुळाच्या पोळ्यांची जंगी मेजवानी! तिळामुळें शरीरातील कोरडेपणा नाहीसा होतो व गुळामुळे शरीर उबदार राहून साचलेल्या कफाचे विलयन होते. “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हणत तुटलेले किंवा दुरावलेले, तडे गेलेले नातेसंबंध पुन्हा जोडले जाऊन स्नेहपूर्ण बनवता येतात . संक्रांतीच्या वेळी काळ्या वस्त्राचा मान असतो, इतर वेळी निषिद्ध मानलेल्या काळ्या रंगाचा इथे मान का ? असा विचार केल्यास लक्षात येते की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि या थंडीच्या दिवसात उबदारपणासाठी या काळ्या वस्त्राचा मान !
उदासवाणा शिशिर ऋतू ये पाने पिवळी पडती…
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळती…
असेच केविलवाणे चित्र आपल्याला या ऋतूमध्ये पाहायला मिळते, या ऋतूमध्ये पानझडी होते ती वसंत ऋतूमध्ये नवीन कोवळ्या हिरव्यागार पानांचा साज झाडांना ल्यायचा असतो म्हणूनच !
असा हा प्रेमळ स्नेहपूर्ण, बोचरा पण गुलाबी थंडीचा शिशिर ऋतू ,सुखद व सर्वांचा लाडका तर आहेच पण धैर्याने आशावादी वृत्तीने जगायचे कसे कोणताही बदल सहज व संपूर्णपणे स्वीकारून त्याचा सामना आनंदाने करून आपले आयुष्य सुसह्य व आनंदी कसे बनवावे, हे आपल्याला त्या शिशिर ऋतूकडून खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळतं आपल्या डोळ्यासमोर बहरलेल्या झाडांची पानगळती बघूनसुद्धा शांतपणे व संयमाने येणाऱ्या वसंत ऋतूची व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवीन कोवळ्या हिरव्यागार पानांच्या साज ल्यालेल्या झाडांची आनंदाने वाट पाहणारा व प्रसन्न चित्ताने त्याचे स्वागत करणारा शिशिर ऋतू हा देव, आईवडील, शिक्षक आणि जन्मभूमी या पाच गुरु नंतर येणारा माणसाचा सहावा गुरु आहे असे म्हणायला हरकत नाही .
– रश्मी मावळंकर