तृतीय पारितोषिक | पहाट -सौ. वैशाली भागवत
पहाट
पहाटवेळी आकाशाच्या पटलावरती
पूर्व दिशेला उषा जागली उधळत मोती
रवीकिरणांना लेउन सजली सारी सृष्टी
क्षितिजावरती दवबिंदूंची पानोपानी मोहक वृष्टी …..१
उंच कड्यांवर फुलाफुलांवर रस ओघळला
पांघरला जणू कुणी धरतीला सुवर्णशेला
लज्जित यौवन हळूच खुलले तरु लतांचे
परिसर सारा वस्त्र ओढतो हिरवाईचे …..२
शीळ घालतो सुखावणारा शीतल वारा
प्राजक्ताचे सडे शिंपतो उनाड वारा
उठली चंचल लहर सुखाची पाण्यावरती
गोड शहारा उमटत गेला तीरावरती…..३
थव्याथव्यांनी विहरत जाती इवले पक्षी
क्षितिजावर शोभे त्यांची सुंदर नक्षी
साद तयांची तार मनीची छेडत जाते
गीत मनोहर ऐकत त्यांचे गाली हसते.. .४
सहा ऋतूंचा होय अनोखा रम्य सोहळा
प्रसवत जातो सौंदर्याचा खेळ आगळा
तिच्याच गर्भी बीज अंकुरे नव आशेचे
स्वप्न लोचनी मानव पाहे भव्य उद्याचे. . . ५
सौ. वैशाली भागवत
बडोदे
तृतीय पारितोषिक (कविता)


