मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने…

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
                      -​संत ज्ञानेश्वर​

27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिन…
आपल्या मातृभाषेचा गौरव दिन. मराठी, जवळपास 1000 वर्षे जुनी भाषा.महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने बोलली जाते ती मराठी भाषा.

मराठी भाषेची जननी ही संस्कृतच आहे. आधी “भाषा” म्हणजे काय ते पाहूयात. ‘भाष्-भाषते’ – म्हणजे बोलणे – ह्या धातूपासून हा शब्द येतो. आपण जे बोलतो ती भाषा. आणि जे आईच्या पोटात असल्यापासून ऐकतो आणि मग बोलतो ती आपली – “मातृभाषा”. त्यामुळे जरी कितीही इंग्लिश medium मध्ये शिकले आणि कितीही शेक्सपिअर चे वाङ्मय वाचले तरी ठेच लागली की तोंडातून – “आई गं”च बाहेर येणार. ☺

मराठी भाषेमध्येही अनेक बोलीभाषा आहेत – चित्पावनी, सामवेदी, कोकणी, मालवणी, आगरी, कोळी इत्यादी. आता मराठी भाषेत अनेक फारसी शब्द आहेत, हिंदी व इंग्रजी शब्द पण जसेच्या तसे वापरले जातात. कालानुरूप होणारे हे बदल आपण स्वीकारत आलो आहोत. आणि मराठी माणूस हा तेवढा मोकळ्या मनाचा आहेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पंजाबी आणि राजस्थानी भाषेतही अनेक मराठी शब्द आहेत.

चपखलपणे एखादी गोष्ट वर्णन करणे हे मराठी भाषेतच आहे. तेलात हात तेलकट होतो आणि तूपाने ओशट… हात खरकटा असतो तर कधी उष्टा असतो… आपल्याला ताप भरतो नाहीतर कणकण असते… आपण काम करून दमतो आणि कधी शिणतो… मुलगी कधी रुसते तर कधी हिरमुसते… अशा भाषेच्या गमतीजमती आपल्या सर्व संत साहित्यात दिसतात, वामन पंडितांच्या आर्या असोत किंवा पुलं चे साहित्य असो…

ह्या मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना – मराठी माणसे असे म्हणले जाते… ह्या मराठी लोकांचा पिंडच वेगळा. “साधी राहणी व उच्च विचारसरणी” ह्या वाक्यात बरोबर बसणारी संपूर्ण भारतात फक्त मराठी माणसे. आणि ह्याच साध्या रहाणीमुळे प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त प्रभाव जर कोणाचा असेल तर तो मराठी माणसाचा. काही उदाहरणे पाहू: भारतातील पहिली महिला डॉक्टर – डॉ. आनंदीबाई जोशी, भारतातील पहिला चित्रपट बनवणारा माणूस – दादासाहेब फाळके, भारतातील स्त्रियांची पहिली शाळा उघडली गेली ती उघडणारी व्यक्ती – सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळक, वीर सावरकर… अनेक नावे…

देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा |
मुलुख बडवावा की बुडवावा | स्वराज्यकारणे ||

— समर्थ रामदास

हिंदु स्वराज्य स्थापन करणारे आपले राजे – छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मराठी भूमीतलेच. त्यांचे गुरू – श्री रामदास स्वामी ह्यांचे मोलाचे साहित्य आपल्या मराठी भाषेतीलच आहे. मराठी भाषेत लिहिला गेलेला “दासबोध” ग्रंथ जागतिक पातळीवर “Best management study” म्हणून ओळखला जातो. मनाचे श्लोक हे मनावर ताबा मिळवण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि “मनाचे श्लोक” ह्याचे भाषांतर उर्दू मध्येही करण्यात आलेले आहे.

मराठी भाषा, त्या भाषेतील साहित्य आणि ही भाषा जोपासणारी, धार्मिक प्रवृत्तीची श्रद्धाळू माणसे हा अनमोल ठेवा आहे. आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतील वाङमय ओळख करून देणे हे आपले कर्तव्यच आहे.
कितीही परदेश वाऱ्या केल्या तरी गरमागरम वरण भात तूप मीठ लिंबू जे समाधान देऊन जाते ते ह्या मातीचे प्रेम आहे.
ते प्रेम, तो ओलावा जपूया…

सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

  • सौ. मृदुला बर्वे.
    “ओपंडित संस्थापक”

      +91-9167968204

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu