महाराष्ट्र दिन ©मुकुंद कुलकर्णी
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इ.स. 2012 साली मंत्रालयाला लागलेल्या आगी पासून मंत्रालयातून महाराष्ट्राचा मंगल कलश गायब आहे .
महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दात महात्मा गांधीनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे . ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मा यांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे , अशा शब्दात गौरव केला . महाराष्ट्र ही संत – महंत , ऋषी – मुनींची जशी भूमी आहे तशीच शूर वीरांचीही आहे . शिवरायांनी इथेच हिंदवी स्वराज्य स्थापन केले . शिवरायांपासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके , गोपाळ कृष्ण गोखले , लोकमान्य टिळक , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , सेनापती बापट , राजगुरू , नाना पाटील , उमाजी नाईक यांसारख्या अनेक देशभक्तांनी प्राणांचीही पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला . अगणित संतांच्या मांदियाळीत असंख्य समाज सुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले .
देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते , बुद्धीवादी , लेखक , पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली . एस एम जोशी , आचार्य अत्रे , कॉ. श्रीपाद अमृत डांगे , सेनापती बापट , प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेकजण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले , आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले .
राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा ….. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी बहु असोत सुंदर संपन्न की महा ….. कुसुमाग्रजांचे माझ्या मराठी मातीचा ललाटास लावा टिळा ….. वसंत बापटांचे भव्य हिमालय तुमचा ….. राजा बढेंचे जय जय महाराष्ट्र माझा ….. माधव ज्यूलियन यांचे मराठी असे आमुची मायबोली ….. अशा अनेक प्रतिभावंत कवींनी महाराष्ट्राचे गुणगान गायिले आहे .
चक्रधर स्वामी , महानुभावांनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे . समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले आहे . संत ज्ञानदेवांनी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन या शब्दात मराठीचे माधुर्य मांडले आहे .
साहित्य , कला , शिक्षण , क्रिडा , संस्कृती , नाटक , चित्रपट , संगीत , सहकार , विज्ञान सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतली आहे , आणि महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात कायम अग्रेसरच राहिल .
1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो . युरोपात दि.1 मे रोजी मे पोल हा काठी महोत्सव साजरा केला जातो .
गेली दोन वर्षे करोनच्या कोपामुळे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस सार्वजनिक रित्या साजरा करण्याची संधी मिळाली नव्हती , यावर्षी परिस्थिती थोडीशी अनुकूल असल्याने हा सोहळा सार्वजनिक रित्या साजरा करण्याची संधी मिळाली आहे . आज महाराष्ट्रच काय पण तमाम विश्व पॅनडॅमिकच्या या संकटातून हळूहळू बाहेर पडत आहे . लवकरात लवकर या संकटातून समस्त मानवजात मुक्त होऊ दे हीच या निमित्ताने परमेश्वराला कळकळीची विनंती !
मुकुंद कुलकर्णी ©
pc: google , pinterest


