किशोरकुमार ©मुकुंद कुलकर्णी

सदाबहार देव आनंद , सुपरस्टार राजेश खन्ना , महानायक अमिताभ यांचा आपला आवाज म्हणजेच किशोरकुमार . विक्षिप्त , कलंदर किशोरकुमार . मनमौजी , मस्तमौला किशोरकुमार विनोदाची उत्तम जाण असलेला अभिनेता किशोरकुमार . इ.स.1940 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आपल्या जादूभऱ्या आवाजाने चित्रपट रसिकांना वेड लावणाऱ्या किशोरकुमारचा आज जन्मदिवस . प्रसन्न मूडमधील गाणी म्हणजे किशोरकुमार . तेवढ्याच उत्कटतेने दर्दभरी गाणी गाणाराही किशोरकुमार . हिंदी गाण्यांमध्ये यॉडलिंगचा प्रभावीपणे वापर करणारा गायक म्हणजे किशोरकुमार . पार्श्वगायक , अभिनेता , संगीत दिग्दर्शक , गीतकार , लेखक , दिग्दर्शक , निर्माता आणि पटकथा लेखक सर्व आघाड्यांवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे किशोरकुमार . किशोरकुमार बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक होता . हलकी फुलकी , रोमँटिक , दर्दभरी सर्व मूडमधील गाणी किशोरकुमार तेवढ्याच उत्कटतेने गायचा .

दि.4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा येथे बंगाली कुटुंबात किशोरकुमारचा जन्म झाला . त्याचे वडील कुंजलाल गांगुली ( गंगोपाध्याय ) प्रसिद्ध वकील होते . आई गौरीदेवी सधन बंगाली कुटुंबातून आल्या होत्या . किशोरकुमारचं खरं नाव आभासकुमार गांगुली . चित्रपटसृष्टीसाठी अशोककुमारने त्याचे नामकरण किशोरकुमार असे केले . चार भावंडात किशोर शेंडेफळ . अशोककुमार , सतीदेवी , अनुपकुमार ही त्याची मोठी भावंडे . किशोर बाल्यावस्थेत असतानाच त्याचा मोठा भाऊ अशोककुमार याने बॉलिवूड मध्ये आपला जम बसवला होता . अशोकच्या पाठोपाठ अनुप आणि आभास उर्फ किशोर यांनीही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली . ख्रिश्चन कॉलेज इंदूर येथून किशोरकुमारने ग्रॅज्युएशन पूर्ण केले .

बाँबे टॉकीज साठी कोरस सिंगर म्हणून किशोरकुमारची कारकीर्द सुरू झाली . अशोककुमार बाँबे टॉकीज साठीच काम करत होता .इ.स.1946 च्या बाँबे टॉकीजच्या ‘ शिकारी ‘ मधे किशोरकुमारला पहिली संधी मिळाली . अशोककुमार त्या चित्रपटाचा नायक होता . इ.स.1948 च्या
‘ जिद्दी ‘ चित्रपटात संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांनी त्याला गाण्याची पहिली संधी दिली . त्यानंतर किशोरकुमारला अनेक ऑफर्स मिळाल्या पण , किशोरकुमारने फिल्मी करियरचा विचार फारसा गांभीर्याने केला नव्हता . इ. स.1949 साली किशोरकुमार मुंबईत सेटल झाला .

इ.स.1951 साली फणी मुजुमदार दिग्दर्शित ‘ आंदोलन ‘ चित्रपटात त्याला पहिली नायकाची भुमिका मिळाली . अशोककुमारच्या शिफारसीमुळे त्याला ॲक्टिंगसाठी काही आॉफर्स मिळाल्या . पण , स्वतः किशोरकुमारला ॲक्टिंगपेक्षा गायक होण्यात जास्त रस होता . अशोककुमारची मात्र किशोरने आपल्या सारखेच अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवावे अशी इच्छा होती . पुढे दोन्ही क्षेत्रात किशोरने नाव कमावले . इ.स.1946 ते इ.स.1955 या दरम्यान किशोरला बावीस चित्रपट मिळाले त्यापैकी सोळा चित्रपट फ्लॉप गेले . अभिनयात करिअर करण्यास किशोर फारसा उत्सुक नव्हता . त्यामुळे तो निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या ‘ बॅड बुक्स ‘ मध्ये होता . लडकी , नौकरी , मिस मलेशिया , चार पैसे आणि बाप रे बाप अशा चित्रपटांच्या यशानंतर किशोर अभिनयात रस घेऊ लागला . इ.स.1955 ते इ.स.1966 दरम्यान किशोरकुमार एक यशस्वी नायक म्हणून ओळखला जाऊ लागला . पण गाणे हेच त्याचे पहिले प्रेम होते .
किशोरकुमार के.एल.सैगल यांचा निस्सीम चाहता होता . सुरुवातीच्या काळात किशोरकुमारवर के.एल.सैगल यांचा पगडा होता . रविंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल किशोरकुमारला अतीव आदर होता . हॉलिवूड अभिनेता , गायक डॅनी के याचा किशोरकुमार कट्टर चाहता होता . किशोरच्या गौरी कुंज या निवासस्थानात या तिघांची तैलचित्रे टांगली होती . या तिघांना वंदन करून त्याच्या दिवसाची सुरूवात होत असे .

जिमी रॉजर्स आणि टेक्स मॉर्टन यांच्यापासून प्रेरणा घेऊन किशोरने आपल्या गाण्यामध्ये ‘ यॉडलिंगचा ‘ समावेश केला होता . तुम बिन जाऊं कहाँ ,जिंदगी एक सफर है सुहाना , चला जाता हूं अशा गाण्यांमध्ये त्याने यॉडलिंगचा प्रभावी वापर केला ,यॉडलिंग हे त्याच्या गायकीचे ठळक वैशिष्ट्य होते .

किशोरकुमारने गाण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नव्हते , म्हणून प्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांनी त्याला गायक म्हणून नाकारले होते . पण किशोरचा आवाज ऐकल्यावर त्यांनी किशोरला ‘ छोटासा घर होगा ‘ हे गाणे गाण्याची संधी दिली . आधी हे गाणे हेमंतकुमार गाणार होता . इ.स.1954 ते इ.स.1966 हा किशोरचा अभिनेता म्हणून सुवर्णकाळ होता . त्या दरम्यान त्याची भूमिका असलेले अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले . माला सिन्हा , वैजयंतीमाला , नूतन , मधुबाला , कुमकुम यांच्याबरोबर त्याची जोडी चांगलीच गाजली . बापरे बाप , पैसा ही पैसा , न्यू देहली , भागम भाग , आशा , चलती का नाम गाडी , दिल्ली का ठग , बंबईका चोर , चाचा जिंदाबाद मनमौजी , झुमरु , हाफ टीकट , मि.एक्स ईन बाँबे , श्रीमान फंटूश , गंगा की लहरे , हम सब उस्ताद है , प्यार किये जा आणि पडोसन हे त्याचे अत्यंत गाजलेले काही चित्रपट . चलती का नाम गाडी या होम प्रॉडक्शन मधे आख्खे गांगुली खानदान होते . अशोक , अनुप , किशोर हे तिघे भाऊ आणि नायिका मधुबाला या चित्रपटात होते .

हाफ टिकट या चित्रपटात ‘आके सिधी लगी दिल पे ‘ हे गाणे सलील चौधरी यांना किशोर आणि लता यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते . पण त्या दरम्यान लता उपलब्ध नसल्याने किशोरने ते गाणे दोन्ही आवाजात गायले . प्राण आणि स्त्री वेषातील किशोर यांच्यावर ते पडद्यावर चित्रित झाले आणि ते लोकांना प्रचंड आवडले .

किशोरकुमारच्या आवाजातील जादू ओळखण्याचे श्रेय सचिनदाना जाते . इ.स.1950 च्या मशाल या चित्रपट निर्मिती दरम्यान सचिन देव बर्मन अशोककुमार यांच्या घरी गेले असता , त्यांनी किशोरकुमारला के.एल.सैगल यांची नक्कल करत गात असताना ऐकले . त्यांनी किशोरला सैगल यांची नक्कल न करता स्वतःच्या स्टाईलने गाण्याचा सल्ला दिला . किशोरकुमारने आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केली . पुढे यॉडलिंग हे किशोरच्या गाण्याचे वैशिष्ट्यपूर्ण अंग झाले . इ.स.1950 ते इ.स.1970 च्या दरम्यान सचिनदानी किशोरकुमार कडून देवआनंद साठी अनेक गाणी गाऊन घेतली . किशोरकुमार साठी तो प्रशिक्षणाचा काळ होता , असे म्हणायला हरकत नाही . त्या मेहनतीवर किशोरकुमारचे पुढील करिअर घडले . किशोर , पंचमदा आणि राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतले अद्भुत त्रिकुट होते . मुनिमजी , टॅक्सी ड्रायव्हर , मकान नं 44 , फंटूश , नौ दो ग्यारा , पेईंग गेस्ट , गाईड , ज्वेल थीफ , प्रेमपुजारी , तेरे मेरे सपने हे किशोर , देव जोडीचे निखळ आनंद देणारे अप्रतिम चित्रपट होते .

पेईंग गेस्ट मधील माना जनाबने , नौ दो ग्यारा मधील हम है राही प्यार के , फंटूश मधले ए मेरी टोपी पलटके आ , चलती का नाम गाडी मधील एक लडकी भिगी भागीसी आणि हाल कैसा है जनाबका , तसेच बर्मनदानी संगीतबद्ध केलेली आशा किशोर जोडीने गायलेली छोड दो आँचल , आखों मे क्या जी , हाल कैसा है जनाबका , पाच रुपय्या बारा आना , अरे यार मेरे ही अजरामर गाणी केवळ अप्रतिम होती .
वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांबरोबर या काळात किशोरने एकाहून एक अप्रतिम गाणी सादर केली . ये राते ये मौसम , हम तो मोहब्बत करेगा , पिया पिया पीया मोरा जिया पुकारे , ए हसीनो नाजनीनो , जरुरत है जरुरत है , लिखा है तेरी आँखो में , प्यार बाट के चलो , खुबसूरत हसिना ,गाता रहे मेरा दिल , मचलती हुवी हवा , ये दिल न होता बेचारा ……. अशी न संपणारी यादी आहे ती .

सी रामचंद्र यांनी ही किशोरचे टॅलंट ओळखले होते . इना मिना डिका हे आशा चित्रपटातील या जोडीचे गाणे , शंकर जयकिसन यांच्या न्यू दिल्ली मधील नखरेवाली , रवी यांच्या दिल्ली का ठग मधील सीएटी कॅट आणि हम तो मोहब्बत करेगा , चित्रगुप्त यांच्या गंगा की लहरे मधील छेडो ना मेरी जुल्फे अशी अनेक सुरेल गाणी आठवतात . झुमरु चित्रपटात किशोरने अभिनय , गायक , गीतकार सर्व आघाड्या संभाळल्या . स्वनिर्मित आणि दिग्दर्शित दूर गगनकी छाँव में मध्ये पटकथा , संगीत दिग्दर्शन , अभिनय सबकुछ किशोर होते .
इ.स.1966 नंतर एक अभिनेता म्हणून किशोरचा नावलौकिक खराब झाला . सेटवर उशीरा येणे , आजिबातच न येणे असे त्याचे नखरे सुरू झाले . इ.स.1965 नंतर त्याचे बरेच चित्रपट आपटले . त्या दरम्यान तो इन्कम टॅक्स च्या कचाट्यातही सापडला .

इ.स.1968 मध्ये राहुल देव बर्मन आणि किशोरकुमार यांनी पडोसन हा सुपरहिट सिनेमा केला . मेरे सामनेवाली खिडकीमे , केहना है …. ही किशोरची गाणी जबरदस्त गाजली . किशोरकुमार आणि मेहमूद यांच्या अभिनयातील जुगलबंदीने हा धमाल विनोदी चित्रपट विलक्षण गाजला . किशोर , मेहमूद आणि सुनील दत्त यांच्यावर चित्रित केलेले एक चतुर नार हे गाणे हा या चित्रपटाचा परमोच्च बिंदू होता .
इ.स.1969 च्या शक्ती सामंता यांचा आराधना किशोरच्या कारकीर्दीला नवे वळण देऊन गेला . मेरे सपनोंकी रानी , कोरा कागज था , रुप तेरा मस्ताना ही किशोरची आराधना मधली गाणी सुपरहिट ठरली . पार्श्वगायक म्हणून किशोर टॉपला पोचला . पुढील काळात किशोर , पंचमदा आणि काका चित्रपटसृष्टीवर आपले अधिराज्य गाजवणार याचे संकेत या चित्रपटातून दिले गेले . रुप तेरा मस्ताना या गाण्यासाठी किशोरकुमारला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला .

इ.स.1970 आणि इ.स. 1980 च्या दशकात किशोरने बॉलिवूडच्या बहुतेक सर्व अभिनेत्यांना आपला आवाज दिला .आपल्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त गाणी किशोरकुमार राजेश खन्ना साठी गायला . एकूण 92 सिनेमात किशोरकुमार राजेश खन्ना साठी 245 गाणी गायला , जितेंद्र साठी 202 देव आनंद साठी 119 आणि अमिताभ साठी 131 गाणी गायला .

इ.स.1970 ते इ.स.1980 च्या दशकात एस डी बर्मन आणि किशोरकुमार यांनी प्रेमपुजारी , शर्मिली , अभिमान , तेरे मेरे सपने , मिली असे अनेक चित्रपट आपल्या गाण्यांनी सजवले . मिली मधील बडी सुनी सुनी है , हे सचिनदानी किशोरकुमार कडून गाऊन घेतलेलं अखेरचं गाणं .
इ.स.1970 नंतर किशोर पंचमदा ही जोडी बहराला आली . खुशबू , कटी पतंग , बुढ्ढा मिल गया , अमर प्रेम आपकी कसम , गोलमाल , अगर तुम न होते , नमकीन , शौकीन , कुदरत , मेहबुबा या चित्रपटांसाठी एकापेक्षा एक सरस गाणी या जोडीने दिली . किशोर आशा , किशोर लता यांची अनेक द्वंद्वगीतं पंचमदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाजली .

बर्मन पिता पुत्रांशिवाय किशोर लक्ष्मी प्यारे या जोडीनेही अनेक सुंदर गाणी दिली . कल्याणजी आनंदजी , सलील चौधरी , रविंद्र जैन , श्यामल मित्रा , हृदयनाथ मंगेशकर , राजेश रोशन , सपन चक्रवर्ती , बप्पी लाहिरी , खैयाम अशा अनेक संगीत दिग्दर्शकांबरोबर किशोरकुमार ने अनेक सुरेल गाणी बॉलिवूडला दिली .

आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी किशोरकुमारला मुंबईतील काँग्रेसच्या रॅलीत गाण्याचे आमंत्रण दिले . कलंदर किशोरने हे आमंत्रण धुडकावले . परिणामस्वरूप तेंव्हाचे माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन वरून किशोर कुमारची गाणी प्रसारित करणे बंद केले . आणिबाणी संपेपर्यंत किशोरची गाणी रेडिओ , दूरदर्शनवर ऐकू येत नव्हती .

इ.स.1969 पासून इन्कम टॅक्सची थकबाकी चुकवण्यासाठी किशोरकुमार स्टेज शो करत असे . इ.स.1981 साली किशोर निर्मित एका चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्यास नकार दिला म्हणून अमिताभ साठी काही काळ किशोरकुमार गात नव्हता . योगिता बालीने घटस्फोट घेऊन मिथुन चक्रवर्तीशी लग्न केल्यानंतर काही काळासाठी किशोर मिथुनसाठीही गात नव्हता .

इ.स.1887 साली किशोरकुमारने निवृत्तीचा निर्णय घेतला होता . संगीत दिग्दर्शक ज्या पद्धतीने गीतांना चाली देत त्यावर तो नाराज होता . निवृत्ती घेऊन खांडवा या आपल्या जन्मस्थानी उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करण्याची त्याची इच्छा होती . पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते . दि.13 ऑक्टोबर 1987 रोजी अशोककुमारच्या 76 व्या वाढदिवशी किशोरकुमारचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले . खांडवा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत किशोरकुमार कार्यरत होता . हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कलंदर अवलिया काळाच्या पडद्याआड गेला .

किशोर चार वेळा बोहल्यावर चढला . रुमा गुहा , मधुबाला ….. मधुबाला बरोबरचे लग्न दोन्ही बाजूंनी मान्य नव्हते . मधुबालाच्या मृत्यूनंतर किशोरने योगिता बाली बरोबर लग्न केले . तेही असफल ठरले , त्यांचा घटस्फोट झाला . त्यानंतर किशोरकुमारने लीना चंदावरकर बरोबर विवाह केला . किशोरकुमारचा मुलगा अमितकुमार हाही चांगला पार्श्वगायक आहे , पण तो वडिलांएवढी प्रसिद्धी मिळवू शकला नाही .
किशोरकुमारच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत . आपल्याला मिळणाऱ्या मानधनाबाबत किशोरकुमार कमालीचा संशयी ( paranoid ) होता . सेक्रेटरी कडून बिदागीची रक्कम पूर्ण वसूल झाल्याची खात्री झाल्यावरच तो रेकॉर्डिंग करत असे . मानधनाची रक्कम पूर्ण दिली नाही म्हणून एकदा तो अर्ध्या चेहऱ्यावरच मेकअप करून सेटवर आला होता . दिग्दर्शकाने विचारल्यावर , ” आधा पैसा आधा मेकअप ” हे त्याचे उत्तर होते . भाईभाईच्या सेटवर डायरेक्टर रामनने पाच हजार रुपये दिले नाहीत म्हणून त्याने काम करण्यास नकार दिला . शुटिंग सुरू झाल्यावर सेटवर किशोरकुमार काही पावले चालला , त्यानंतर पाच हजार रुपये असे म्हणत तो कोलांटी उडी मारत सेटच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि खाली उतरून सेट सोडून सरळ निघून गेला . दुसऱ्या एका प्रसंगात निर्माते आर.सी.तलवार यांनी किशोरचे काही देणे थकवले . वेळोवेळी मागून सुद्धा पैसे मिळत नाहीत तेंव्हा किशोरकुमार तलवारच्या घरी पोचला आणि , ” हे तलवार दे दे मेरे आठ हजार ” असे ओरडू लागला . पैसे मिळेपर्यंत रोज सकाळी हा कार्यक्रम चालू होता .

आनंद हा सिनेमा किशोरकुमारला प्रमुख भूमिकेत ठेवून करायचा असा हृषिकेश मुखर्जी यांचा मानस होता . दुसऱ्या रोलसाठी त्यांच्या डोळ्यासमोर मेहमूद होता . त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुखर्जी किशोरकुमारच्या घरी गेले . पण गेटकीपरने त्यांना प्रवेश नाकारला , कारण असं झालं होतं की , स्वतः बंगाली असलेल्या किशोरकुमारला दुसऱ्या एका बंगाल्याने एका स्टेज शो चे पैसे दिले नव्हते . तेंव्हा त्याने गेटमनला सांगून ठेवले होते , तो बंगाली जर दरवाज्यावर आला तर त्याला हुसकावून लावायचे , घरात प्रवेश द्यायचा नाही . या गैरसमजातून हृषिकेश मुखर्जी यांना घरात प्रवेश मिळाला नाही आणि चित्रपट राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे गेला . पुढे या चित्रपटाने इतिहास घडवला .

अनेक पत्रकारांनी किशोरकुमारच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से लिहिले . वॉर्डन रोडवरील घराबाहेर किशोरने बिवेअर ऑफ किशोर अशी पाटी लावली होती . निर्माता दिग्दर्शक रावेल त्याच्याकडे मानधन देण्यासाठी आले होते . किशोरकुमारने पैसे स्वीकारले आणि हस्तांदोलनासाठी पुढे केलेल्या त्यांच्या हाताचा चावा घेतला आणि त्यांना विचारले , दारावरची पाटी वाचली नाही काय ? हा प्रसंग हसण्यावारी नेऊन रावेल लगेचच तिथून सटकले . जि.पी.सिप्पी यांनाही किशोरच्या विक्षिप्तपणाचा फटका बसला . त्यांच्या चित्रपटातील एका गाण्याचे ध्वनीमुद्रण बाकी होते , त्यासंदर्भात सिप्पी किशोरच्या बंगल्यावर गेले . तेंव्हा किशोरकुमार कारमधून बाहेर पडत होता , सिप्पींनी त्याला कार थांबवण्यासाठी सांगितले . पण वेग वाढवून किशोरकुमार पुढे निघून गेला ते थेट मढ आयलंडपर्यंत त्या पाठोपाठ सिप्पी ही तिथे पोचले आणि या विक्षिप्त वागण्याचा जाब विचारला असता त्याने ओळखही दर्शवली नाही , आणि पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली . दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे किशोर रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत गेला , संतापलेल्या सिप्पी यांनी विचारल्यावर काल मी मुंबईत नव्हतोच खांडव्याला होतो असे उत्तर किशोरने दिले .

दुसऱ्या एका प्रसंगात एका निर्मात्याने किशोरकुमारवर , त्याने दिग्दर्शकाच्या सूचना पाळायलाच हव्यात , अशी कोर्टाकडून डिक्री आणली . किशोरकुमार कारमधून येतो असे दृश्य होते . किशोरने गाडी थांबवलीच नाही , तो कार थेट खंडाळ्यापर्यंत घेऊन गेला का , तर सीन संपल्यावर दिग्दर्शक कट म्हणाला नाही म्हणून . एका फायनान्सरने किशोर विरुध्द इन्कम टॅक्स  विभागात तक्रार केली , किशोरने त्याला घरी बोलावून घेतले आणि कपाटात दोन तास डांबून ठेवले .

पडद्यावर विनोदी भुमिका साकारणारा किशोरकुमार प्रत्यक्ष आयुष्यात एकाकी होता . त्याला कोणी जवळचे मित्र नव्हते . त्यापेक्षा तो बंगल्याच्या बागेतील झाडांबरोबर संवाद साधणे पसंत करत असे .
असा हा कलंदर , विक्षिप्त पण महान कलाकार किशोरकुमार आपल्यातून जाऊन आज 34 वर्षे होतील . पण तो आपल्यासाठी अनेक सुरेल अजरामर गाण्यांचा खजिना मागे ठेवून गेला . आज जन्मदिनी किशोरकुमारला भावपूर्ण श्रद्धांजली !

मुकुंद कुलकर्णी©
pc: google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu