कवितेचे पान
पाऊस मनातला
आला पाऊस, पाऊस,
भवताल सुखावला.
तृप्त, अधीर जमीन,
धुंद गंध दरवळला.
लाज लाजली धराही,
पावसाची दांडगाई.
होता मीलन दोघांचे
कोंब नवा जन्म घेई.
निळी निळाई नभाची,
कृष्ण रंगाने झाकली.
मखमली ती हिरवाई
जिथे तिथे अंथरली.
ऊन पावसाशी खेळे,
इन्द्रधनू , डोकावते.
खेळ पाहून तो खुळा,
सप्त रंगात नहाते.
पंख मिटून इवला,
पक्षी घरट्यात राही.
चोच चोचीत घालून,
कुजबुजे हळू काही.
मोर मस्तीत तो येता,
नाचे होऊन बेभान.
येई लांडोर लाडात,
पाही मान वेळावून.
जसा बाहेर पाऊस,
माझ्या मनी अेक तसा.
नाही साजण घरात,
बरसावा तरी कसा!
ती सर काळी भोर,
जशी नागीण भासते.
विरहात मी झूरता,
माझ्या डोळा कोसळते.
चांदण्याच्या पावसात
चिंब नाहला चकोर.
‘तू’ पाऊस मनीचा,
मी भिजण्या आतुर.
चारुलता काळे
पाऊस
लागे आभाळाला वेड,
उठे पावसाची झोड,
कोसळत काळी भोर,
बने नागीण ती सर.
पाय वाटा, रस्ते शेते,
जिथे तिथे पाणी साचे.
चिंब भिजुनीया पुरा,
बाळ गोपाळ तो नाचे.
एक पक्षी चिमुकला,
पंख मिटुन बसतो,
भान हरपून वेडा,
मोर बेभान नाचतो.
एक झोपडे बिचारे,
होई हळवे उदास,
कसे सावरावे त्याला,
जीव होई कासाविस.
चारुलता काळे
PC:google


