सलाम, विनोदवीर हो सलाम
सर्व वाहिन्यांवरील विनोदवीरांना सलाम
सर्व स्त्री-पुरुष कलाकारांना सलाम
पडद्यावरील…..पडद्यामागील
सर्व हास्य कलाकारांना सलाम
आजच्या या चिंताग्रस्त वातावरणात
क्षणभर चिंतामुक्त करणा-या
कलाकारांनो सलाम
चहुकडे दाटलेल्या या
भीतीच्या सावटावर
हास्याची लकेर छेडणा-या
बहुरुप्यांनो, सलाम
भेदरवणा-या माध्यमांना,
भेडसावणा-या विवंचनांना
काही काळ विसरायला लावणा-या
विदुषकांनो, सलाम
धकाधकीच्या आयुष्यात तुमची
हास्यजत्रा जेव्हढी सुखावत होती
तेव्हढीच, हवा येऊ द्या…म्हणत
घातलेली साद, आजही
मनावर फुंकर घालते आहे
आजच्या काळाची बिकट वाट
किंचित सुखद करते आहे,
आशा जिवंत ठेवते आहे
मन प्रसन्न करते आहे,
लढायला बळ देते आहे
जगायची जिद्द देते आहे,
म्हणूनच,
कितीही संकटे आली तरी
उमेद आमची सरणार नाही
आजचे वादळ सरले तरी
तुमचे स्थान ढळणार नाही
– अशोक कुळकर्णी