कथा-श्राध्द

मी कामावरून शेवटचा हात फिरवला . टेबल आवरलं , उद्याच्या कामाची नोंद करून ठेवली . उद्या काही अपाॅइंटमेंट , मिटींग आहेत काय ? अवलोकन करण्यासाठी डायरी उघडली .सर्कल आँफिसला सकाळी 11 वाजता शाखा व्यवस्थापकांची मिटींग होती . मुद्रा लोन अंतर्गत गेलेल्या प्रपोजल्सवर चर्चा करायची होती .सकाळी लवकरच निघावं लागणार होतं .

चला आता तरी निघूया . मी पर्स खांद्याला अडकविली.तितक्यात बालाणी आँटो डिलर्स चे मॅनेजर निलकंठ शेडगे आले .  “बरं झालं मॅडम तुम्ही आहात . मला या तीन महिन्यांचं स्टेटमेंट अर्जंट द्या .आॅडीट चालू आहे उद्यापासुन” .” शेडगेजी आँफिसलाही काही टायमिंग आहे हो . सगळा स्टाफ घरी गेलाय . मी ही निघण्याच्या तयारीत .” ” नाही म्हणू नका मॅडम , अर्जन्सी आहे म्हणून विनंती करतोय .” ” ओ . के . पण माझा डे एंड झालाय सर , पुन्हा काॅम्युटर सुरु नाही होणार . ” ” तुम्ही प्ले स्टोअरमधून पासबुक अँप डाऊनलोड करा . स्टेटमेंट मिळून जाईल . ” “नाही मॅडम , माझी मदत करा हो “” ओ. के. बघते , माझा तर डे एंड झालाय , पण दुसर्‍या शाखेला विचारते ,” मी बेलापूर शाखेला माझी मैत्रीण निधी गुप्ताला फोन केला .निधी तुम्हारा सोल चालु है क्या ? डे एंड तो नही हुआ ना ? ” ” अरे साॅरी यार , तुम्हारा उठानेसे पहलेही हो गया है , कोई खास काम ” नही , एक ग्राहक को स्टेटमेंट चाहिए था , उसे कहा सबमीट करना है ” ” ओह , कल सर्कल आॅफीस आ रही हो ना मिटिंग के लिए , नेरूल रास्ते मे ही है , मै आती हूॅ , अपनी व्हेईकल लेकर साथ मे ही जाएंगे । ” ओ. के . मिलते है फिर कल ”  ” शेडगे जी साॅरी ” 

ओ .के. मॅडम ,चलतो मी ”

 मी एक निःश्वास सोडला .

चला निघूया , मी आँफीसला टाळा लावला . माझ्या आँफिससमोरच भाजी मंडई होती . थोडी भाजी घेतली . उद्या माझ्या बाबांचा स्मृृृृतिदिन होता . त्यांचं पुण्यस्मरण माझं बलस्थान होतं .श्राध्द , तर्पणादी विधींवर माझा फारसा विश्वास नव्हता .व्यक्ती जीवंत असेपर्यंत तिला हवं ते सगळं खाऊ पिऊ घालून द्यायचं , सेवा करायची हा माझा दृृष्टीकोन . मग नंतर श्राध्द , तर्पण नाही झाले तरी चालते . त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांच्या नावे गरजवंताची मदत करणं मला आवडतं , म्हणून दरवर्षी अनाथालय किंवा वृृृध्दाश्रम मध्ये तर मी मदत करतेच करते पण कोणा गरजू विद्यार्थ्याला पुस्तके , गणवेष , परीक्षा फी इ . कर्म मी करीत असते .

उद्या बाबांचा पुण्यस्मरण दिन .पण आँफिसला लवकरच जायचे होते .मला रजाही मिळू शकणार नव्हती . ” बाबा फक्त तुमचं स्मरणचं करू शकतेय हो ” माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं

बघू या रविवारी वेळ मिळेल ” मी स्वतःचीच समजूत घातली .

आज सकाळपासूनच आभाळ भरून आलेलं. सर्वत्र अंधार दाटलेला .पावसाच्या सरी ढगांचा गडगडाट व वीजेच्या कडकडाटांसह सुरु झालेल्या . रविवार सुटीचा दिवस असल्याने आठवडाभराची सगळी कामे मी उरकली .दुपारची जेवणं आटोपली आणि मी थोडीशी वामकुक्षी घेण्यासाठी विसावले .सगळं अंग ठणकत होतं . डोळ्यांवर झोपेचा अंमल चढला आणि बाबांची आठवण येताच डोळे खाडकन उघडले .त्यांच्या एकएक आठवणी मनात रूंजी घालू लागल्या .माझ्या प्रत्येक कविता , कथा वाचणारे बाबा .मला कोणताही पुरस्कार मिळाला की  आनंदीत होणारे बाबा,मला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित करणारे बाबा , मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहाणं केव्हाही चांगलं हा विचार माझ्या मनावर बिंबवणारे बाबा एक ना अनेक आठवणी फेर धरू लागल्या .

मी उठले , चूळ भरली , चेहरा धुतला , दातही ब्रश केले. थोडं बरं वाटू लागलं . बाहेर आता पावसाने बराच जोर धरला होता .चला गरमागरम भजी चहासमवेत घेऊ या . मी तयारी केली .किचनमधून घमघमाट सुटला तशी माझी दोन्ही पाखरं डोकावून गेली .आई फ्लाॅवरही घे ग , मला आवडतात फुलकोबीची भजी “माझा धाकटा उत्कर्षची फर्माइश .” जो आज्ञा मेरे आका ” मी उद्गारले , तशी मी ,उत्कर्ष व माझी लेक सोनाली खळखळून हसलो . 

माझ्या बाबांनाही भजी खूप आवडायची. गरमागरम चहासोबत भजी आणि कोसळणारा पाऊस हे समीकरणच होतं त्यांचं.

बाल्कनीत बसून आम्ही तिघंही भजीचा आस्वाद घेत होतो . पावसाने जोर धरलेला . आणि एवढ्या पावसातही एक भाजी विक्रेता भाजी विकत होता . पावसानं चिंब भिजला होता . हातगाडीवरील भाजीवर  प्लास्टिक कव्हर त्याने झाकलेलं . वय असेल अंदाजे पन्नासच्या आसपास .पण एवढ्या पावसातही तो भाजी विकतोय . मला नवल वाटलं असेल बिचार्‍याची अडचण , विक्री झाली नसेल .मी मनाशीच विचार करीत होते . त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं ” ताई भाजी घ्या ना ” ” आण इकडे ” माझी संमती मिळताच तो आला मोठ्या आशेनं . ” काय घेणार ताई , भेंडी , गवार , गिलके , कोथिंबीर , कढीपत्ता , हिरवी मिरची ,भोपळा , वांगी काय देऊ .” ” इतकी भाजी आणलीत ” ” होय , ताई , पण सकाळपासून काही विक्री झाली नाही . पाऊसही थांबण्याचं नाव घेत नाही आहे .या कोरोनामुळे धंदाही मंदावला आहे . पोलीस लोकही मागे लागतात .रोजचा खर्चही निघत नाही . अर्धपोटी राहातो आम्ही . जवळची सगळी शिल्लक ही संपलीय .काय करू ,”

माझ्या बाबांचा चष्मा आठ दिवस झाले फुटलाय , नवीन घ्यायला पैसेही नाही . पोलिसांची नजर चुकवत मी गल्ली गल्लीतून  भाजी विकतोय .चार पैसे मिळतील , बाबांचा चष्मा घेता येईल . पण अजून तसं जमलंच नाही ताई .”

 “बरं तुझ्याकडे असतील त्या सगळ्या भाज्या मला अर्धा अर्धा किलो दे .” त्याने भाज्या मोजल्या . कोथिंबीर जुडी व कढीपत्ताही दिला . ” किती झाले पैसे .” त्याने हिशोब केला . २६० रुपये  झाले ताई . मी पर्समधून १००० रुपयांची  नोट काढली . ” ताई , सुट्टे पैसे द्या . माझ्या कडे इतकी मोड नाही आहे .”

एव्हाना माझी सोनालीही माझ्याजवळ आली होती .” आई , इतकी भाजी घेतलीस , आठदहा दिवसाची खरेदी एकदमच .” ” असू दे बेटा , माझं रोज बाजारात जाणं होतंच नाही . बाजारातही दोनचार विक्रेते तर असतात . कोणी फारसं येत नाही कोरोनाच्या भितीपोटी .”

” ताई ! सुटे पैसे ” भाजी विक्रेत्याने माझे लक्ष वेधले . राहू दे , नको देऊस परत . तुझ्या बाबांच्या चष्म्यासाठी दिले असं समज .” ” असं कसं ताई , इतके पैसे मी कसे घेऊ ” ” घे रे , संकोच नको करुस .” त्याची द्विधा मनस्थिती झाली . त्याने अजून एक किलो तांबडा भोपळा व पाचसहा लिंबू दिले . ” राहू देत ताई , नाही म्हणू नका .” ” बरं , सकाळपासून फिरतो आहेस , काही खाल्लंही नसेल . थांब जरा . गरमागरम भजी केलीत खाऊन जा .” 

त्याने भजी संपविली . गरम चहाही घेतला . पाणी पिऊन तृप्तीची  ढेकर ही दिली  आणि मला बाबांचं चांगल्याप्रकारे श्राध्द केल्याचं समाधान लाभलं. कृृृृतकृृृृत्य वाटलं . घरात आले . आज बाबांचा फोटो मला खूपच हसरा वाटत होता . 

डाॅ. शैलजा करोडे ©®

नेरुळ नवी मुंबई
karodeshailaja@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu