कथा-‘भूक’
“दोन दिवस झाले पोटात अन्नाचा एक कण नाही. किती हिंडलो फिरलो, तरी कोणी खायला का देत नाही? अचानक गल्लीत एवढा कसा बदल झाला?” असा विचार करत टाॅमी इकडून तिकडे नुसता धावत होता. स्वच्छ फुटपाथ, कचऱ्याच्या जागेवर कसलीतरी पांढरी पावडर पसरलेली होती. जवळ जाऊन त्याने त्याचा वास घेतला तर त्याला किंचीतसं गरगरल्यासारखं झालं.तो तिथून बाजूला झाला आणि एका झाडाच्या सावलीत जाऊन पुढच्या दोन पायांवर तोंड टेकवून एकदाचा बसला… रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. नेमकं काय झालंय हेच त्याला कळेना. ह्याच विचारात पोटातली भूक तो विसरून गेला. रस्ता ओळखीचा असून अनोळखी वाटत होता. येताना कोपर्यावर काही माणसं हातात काठी घेऊन उभी असलेली दिसली होती. ‘ह्या आपल्या गल्लीत मारामारी तर झाली नसेल ना?’ असा विचार मनात येताच टाॅमी काहीसा घाबरला.
“आपण आता पोटात अन्न घालायचं कसं? शोधायचं कुठे?” हा प्रश्नही सतत उफाळून येत होता. आजूबाजूला नजर फिरवली असता त्याला फुटपाथवरच्या एका खड्डयात पाणी साठलेलं दिसलं. आहो, मग काय विचारता… तोंडातून जीभ बाहेर येऊन लाळ गळू लागली आणि एकलव्याप्रमाणे ते पाणी पिणं हेच लक्ष, असं मनी धरून दमलेल्या पायांनीशी अंगी असलेली सारी शक्ती एकवटून तो त्या खड्डयाजवळ गेला आणि खालची माती लागेपर्यंत मनसोक्त पाणी प्यायला. पाण्यानी काही अंशी पोट भरल्यासारखं झालं पण भूकेपेक्षा झोप जास्त महत्वाची वाटली. तसा तो परत झाडाच्या सावलीत आला आणि झाडाच्या मागे जाऊन मुटकुळं करून झोपी गेला.
उन जरा उतरू लागलं होतं. माणसांची ये जा सुरू झाली होती. काही गाड्याही रस्त्यावरून जात शांतता भंग करत होत्या. कानावरच्या माशा झटकत टाॅमी डोळे मिटून झोपी जात होता. त्याच्यासाठी काही वेळापूर्वी बदललेली त्याची गल्ली केव्हाच पूर्ववत झाली होती. पण ती बघायला त्याच्या अंगात अजिबात ताकद नव्हती. तो काहीश्या झोपेच्या सुखात लोळत होता. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. कारण ‘पकडा…पकडा… तो बघा चावला एकाला… मारा त्याच्यामायला… हाणा रे पोरांनो…’ असे आवाज त्याच्या त्याच्या कानांवर पडताच तो खडबडून जागा झाला आणि झाडामागूनच काय घडतंय हे बघण्याचा प्रयत्न करू लागला…
लोकांच्या हातातल्या काठ्या, दगड बघून टाॅमी जाम हादरला होता. नुसतीच लोकांची पळापळ बघून नेमके कोणाला मारण्यासाठी इतका आटापिटा चालू आहे याचा शोध भेदरलेल्या नजरेतून घ्यायचा तो प्रयत्न करत होता… अन् अचानक त्या या सगळ्या मारामारीचं कारण दिसलं. ते कारण होतं एक रानटी पिसाळलेलं कुत्र. जे माणसांच्या अंगावर जात होतं , चावत होतं, लचके तोडत होतं, आणि बोचकारूनही जखमी करत होतं. लोकांच्या हातावर तुरी देऊन ते कुत्र सारखं निसटत होतं. लोकं आता त्याला मारण्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हे जाणवत होतं. कोणितरी तेवढ्यात म्हणालं ‘ए सगळीकडे लक्ष ठेवा. रानटी कुत्र दिसलं की मारून टाका. ह्या गल्लीतली सगळी कुत्री कायमची नष्ट करू. जा लागा कामाला.’ हे कानी पडताच त्याच्या पायाखालची जमीन हादरली…
‘माझी काय चूक? मला का शिक्षा?’ असे नानाविध विचार त्याच्या डोक्यात घोळू लागले. दोन दिवस अन्न नजरेसही पडलेलं नाही आणि आता जगण्याचीच शाश्वती नाही मग करायचं काय? हा प्रश्न सारखा मनात घोळत होता. आणि आपण कोणाला दिसता कामा नये म्हणून तो संपूर्ण शरीर गोळा करून झाडामागे लपून बसला होता. टाॅमी जिथे बसला होता, त्या फुटपाथच्या एका बाजूला रस्ता आणि दुसर्या बाजूला मोकळी जमीन होती. जिथे माणसाच्या गुढघ्याएवढं गवत साठलं होतं. त्या गवताकडे बघत आता पुढे काय? या विचारात तो असताना त्याला एका कावळ्याच्या तोंडी हाडूक दिसलं, तत्क्षणी या सगळ्याप्रकरणाचा विसर पडून पोटातल्या भुकेने एकदम तोंडात झेप घेतली ‘भाॅ… भाॅ… भाॅ…’ असे शब्द बाहेर पडताच रस्त्यावरची लोकं थांबली आणि एकदम त्यांचं लक्ष गेलं ते झाडामागे लपलेल्या ‘टाॅमीवर’.
वादळापूर्वीची शांतताही अशांत वाटत होती. टाॅमीचं लक्ष त्या कावळ्यावर होतं आणि लोकांचं लक्ष टाॅमीवर होतं. नक्की भूक कोणाची भागणार हे बघण्यासाठी काहीजणं रस्त्यावर आले होते. टाॅमीचं लक्ष केंद्रित झालं होतं ते त्या मांसाच्या तुकड्यावर.. बाकी जगाचा त्याला विसरच पडला होता. जसा कावळा उडाला तसा टाॅमी त्याच्यामागे धावू लागला अन् जसा टाॅमी लोकांच्या नजरेच्या टप्प्यात आला तशी दोन – तीन माणसं काठ्या दगड घेऊन त्याच्या मागे धावू लागली. पण टाॅमी इतका चपळ होता की, तो माणसांच्या हाताला लागेल असं वाटत नव्हतं. शेवटी वैतागलेल्या माणसांपैकी एकाने एक दगड उचलला आणि टाॅम्याच्या दिशेने असा काही भिरकवला की तो दगड रापकन त्याच्या उजव्या पायाला असा काही बसला की तो काही अंतर उलटा पालटा झाला आणि एका झुडपात बेशुद्ध होऊन पडला. लोकांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण ‘तो काही फारकाळ जगणार नाही’ म्हणत तिथून काढता पाय घेतला.
इकडे काही वेळाने टाॅम्याला जाग आली आणि पायातून वाहणार्या रक्तावर स्वतःचीच जीभ चाटत, बसलेल्या माशांना हाकलवत तो तसाच पडून राहिला. पोटातील भूक केव्हाच मेली होती. आता जिवंत राहण्याची धडपड डोकं वर काढत होती.
‘माझं काय चूकलं?’ याच विचारात तो पायातून येणार्या रक्तावर जगण्याची इच्छा आणि भूक दोन्ही भागवत निपचित पडून होता.
आता ही शांतता खूप काही बोलून गेली.
…©️onlyvish
नाव – विशाखा बेके.
vishakha2689@gmail.com


