दीक्षित डाएट – नक्की आहे तरी काय ???

सध्या प्रसिद्ध असलेल्या “फक्त २ वेळाच  खा ,५५ मिनिटांत जेवा ” सध्या प्रसिद्ध असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास डाएट प्लॅन बद्दल विविध माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. काही वर्तमानपत्रे , इंटरनेट साईट्स , ब्लॉग्स इ. मध्ये बऱ्याच प्रमाणात याबद्दल लिहून येत आहे. त्यातीलच २ लेख जे हा प्लॅन नक्की काय आहे आणि आयुर्वेदानुसार याचा कसा विचार करता येईल याबद्दल इथे देण्यात आले आहे.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी स्थुलता आणि मधुमेहमुक्त हिंदुस्थान करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केली आहे एक आगळीवेगळी आहारपद्धती.

खाण्यावर प्रचंड प्रेम, पण सुटलेलं पोट या दोघांच्या कचाटय़ात तुम्हीही सापडला आहात का? वेळेत वजन कमी नाही केलं तर लवकरच डायबेटिस आणि इतर समस्या मागे लागतील या विचाराने अनेकांसारखी तुमचीही झोप उडाली आहे का? घाबरू नका. ही कुठल्याही वजन कमी करण्यासाठीच्या महागडय़ा उपायांची जाहिरात नाही.
हा आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा विनासायास वेटलॉस डाएट प्लॅन. प्रत्येक जाड माणसाची हीच इच्छा असते की फार कष्ट न करता आणि आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन वजन कमी झालं पाहिजे व फार व्यायामही करायला लागायला नको. आता या सगळ्या गोष्टी केल्यावर वजन कमी निश्चितच होणार नाही हे कोणताही सुजाण सांगू शकेल. पण थांबा! या सगळ्या गोष्टी सांभाळूनसुद्धा तुमचं वजन अगदी खात्रीशीर पद्धतीनं कमी होणं आता शक्य आहे. तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. डॉक्टर दीक्षित यांनी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि डायबेटीस म्हणजेच मधुमेह-मुक्त हिंदुस्थान आणि विश्व करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी विनासायास वेटलॉस हे अभियान राबवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आजपर्यंत हजारो लोकांना वजन कमी करण्यास आणि डायबेटीसपासून सुटका मिळवण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की, इतका खात्रीशीर उपाय असूनसुद्धा डॉक्टर दीक्षित आणि त्यांची टीम कोणत्याही व्यक्तीकडून एकही नवा पैसा आकारत नाही.

 

स्व. श्रीकांत जिचकार यांनी सांगितलेल्या ‘डाएट प्लॅन’मधून प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर संशोधन करून डॉक्टर दीक्षितांनी हा गुणकारी ‘डाएट प्लॅन’ तयार केला आहे. या अभियानांतर्गत आजवर त्यांनी बत्तीस देशांतल्या अठ्ठावीस हजार लोकांना जोडले आहे.

 

गेल्या २८ वर्षांपासून ते विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन औषध वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना आरोग्य शिक्षणातील भरीव कामासाठी ३ राष्ट्रीय व ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.ते स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक वेळा रक्तदान केले आहे.

 

त्यांनी डब्ल्यूएचओ, युनिसेफ अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.गुणकारी आहार नियोजन या डाएट प्लाननुसार तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळेलाच खाऊ शकता.या दोन वेळा नेमक्या कोणत्या हे तुम्ही तुमच्या भुकेच्या अनुषंगाने ठरवू शकता.या दोन वेळांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.या दोन्ही वेळी तुम्हाला तुमचे जेवण हे ५५ मिनिटे पूर्ण होण्याच्या आत संपवायचे आहे.

दोन जेवणांच्या मध्ये कोणताही नॉन डायबेटिक पेशंट हा पाणी, शहाळ्याचे पाणी, एक टोमॅटो, ७५ टक्के पाणी २५ टक्के दूध असा चहा, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी (कशातच साखर वा शुगर फ्री नाही.) इ. प्राशन करू शकतो. शक्यतो काहीही न खाणे उत्तम. जेवणात गोड पदार्थांचे प्रमाण कमीत कमी व प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्ती असावे.

कुठल्याही डायबेटिक (टाइप २- चाळिशीनंतर येणारे डायबेटिस) पेशंटने मधल्या दोन वेळी शक्यतो काहीही खाऊ नये. त्यातल्या त्यात पातळ ताक चालेल व गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.

डाएट प्लॅन फॉलो करण्याबरोबरच दररोज पंचेचाळीस मिनिटांत साडेचार किलोमीटर चालणे हेसुद्धा आवश्यक आहे.

वरील प्लान अठरा वर्षांखालील मुलांनी व टाइप १ डायबेटिक पेशंट्सनी करू नये.

प्लॅन यशस्वी होण्यामागचं विज्ञान

आपल्या शरीरात आपण कोणतीही गोष्ट खाल्ली की इन्सुलिनचे एक माप स्वादुपिंडातून स्रवले जाते.

मोठय़ा प्रमाणात अतिरिक्त इन्सुलिन निर्माण झाल्यावर त्याचा परिणाम डायबेटीस आणि लठ्ठपणा असा होतो.

एक इन्सुलिन माप निर्माण झाल्यानंतर ते ५५ मिनिटे कार्यरत असते व त्यानंतर दुसरे माप निर्माण होते.

खाण्याच्या वेळा कमी करून इन्सुलिन निर्माण होण्यावर आपण निर्बंध घालू शकतो ज्या योगे डायबेटिसवर व लठ्ठपणावर मात करता येऊ शकते.

वजन आणि मधुमेह कमी होण्याबरोबरच याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, हायपर ऍसिडिटी यांसारखे रोग हळूहळू कमी होऊन नंतर नाहीसे होतात. सांधेदुखी, पाठदुखी किंवा इतर अवयवांचं दुखणंही दूर पळतं. निद्रानाश दूर होतो व झोप नियमित आणि चांगली येते. मन प्रसन्न राहतं. काम करायला नवी ऊर्जा मिळते हे व यासारखे इतरही फायदे प्रत्येक माणसाला वेगवेगळे मिळतात.
वजन वाढवायला तुम्हाला अनेक वर्षे लागली आहेत. आता कमी करायला किमान 3 महिने ते एक वर्ष तरी देऊन बघा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल. ‘एफर्टलेस’ वजन कमी करणं अशक्य आहे. पण हा प्लॅन तुम्हाला ‘लेस’ एफर्ट्समध्ये वजन आणि डायबेटिस दोन्ही कमी करायला मदत करेल.

अभियानात सामील व्हायचंय

या अभियानात तुम्हालाही सामील होता येईल. त्यासाठी काय कराल?हा डायट प्लान सुरू करण्याआधी तुमचं फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी या घटकांची रक्तातली तपासणी करून घ्या. तपासणीच्या रिपोर्टचे फोटो दीक्षितांच्या अभियानातील व्हॉट्सऍप ऍडमिन्सना पाठवा. ऍडमिन तुम्हाला तुमच्या रिपोर्टप्रमाणे योग्य असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करतील. ज्याद्वारे तुम्ही डॉक्टर दीक्षितांशी थेट संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला दररोज मधुमेह आणि वजन कमी केलेल्या लोकांच्या यशस्वी गोष्टी (सक्सेस स्टोरीज) वाचायला मिळतील.

तुम्ही विनासायास वेटलॉस (एफर्टलेस वेटलॉस) हा फेसबुक ग्रुपसुद्धा जॉइन करू शकता.

 

व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनचे नंबर हे फेसबुक ग्रुप किंवा गुगलवर उपलब्ध आहेत. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉक्टर दीक्षितांचे ‘यू टय़ूब’वरचे व्हिडीओज्सुद्धा पाहू शकता.

डॉक्टर दीक्षित आणि त्यांची साठ लोकांची कुठलाही पैसा न घेता काम करणारी टिम यांचे अंतिम ध्येय हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मधुमेहापासून मुक्ती मिळणाऱया उपायांमध्ये हा ‘डाएट प्लॅन’ समाविष्ट होणे हे तसेच या डायट प्लानच्या मदतीने संपूर्ण हिंदुस्थान आणि संपूर्ण विश्व हे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त करणे हे आहे. या डाएटमुळे प्रत्येकालाच एक आयुष्य बदलून टाकणारा अनुभव मिळेल यात शंका नाही.

-सुजित पाटकर 
-Source

वरील लेखाप्रमाणेच या प्लॅन बद्दल  आयुर्वेदाच्या नियमांप्रमाणे कसे पाहता येईल हे हि एका लेखात आपल्याला आढळते. 

‘दोन वेळाच जेवा’चा ट्रेंड सध्या सुरु झाला आहे हे पाहून खरं तर खूप बरं वाटलं. हा ट्रेंड रूढ करणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना धन्यवाद द्यावे तितके कमीच. मुळात ही संकल्पना त्यांची नसून कै. डॉ. जिचकार यांची असल्याची ते अतिशय प्रांजळपणे मान्य करतात हा त्यांचा मोठेपणा आहे.

मात्र; ही संकल्पना मुळात आहे आयुर्वेदाची. हो; आयुर्वेदीय ग्रंथांत दोन वेळाच जेवण्याचा पुरस्कार आढळतो.

मात्र एखादी गोष्ट आपल्याकडची असल्यास तिला फारसे महत्व न देणे हे; किंबहुना तिला मोडीत काढणे हे आमच्या रक्तात भिनलेले असल्याने गेली कित्येक वर्षे कित्येक वैद्य कंठशोष करून हेच सांगत असताना त्यांची हेटाळणीच करण्यात आली.

सध्या डॉ. दीक्षित यांच्यामुळे किमान या विषयाच्या अनुषंगाने चर्चा तरी सुरु झाली याबाबत त्यांचे अभिनंदन!

या साऱ्या विषयावर लिहा अशी विचारणा बऱ्याच जणांनी आजवर केली होती; मात्र त्या आधी विषय नीट समजून घ्यावा असा विचार होता.

डॉ. दीक्षित यांची काही व्याख्याने पाहिली; परवा माझा कट्टा या कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांची मुलाखत पाहिली आणि या साऱ्या विषयावर सविस्तरपणे लिहिणे गरजेचे वाटले.

काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे;

१. ५५ मिनिटांत जेवणे याचा अर्थ ५५ मिनिटे जेवणे नव्हे हे आतापर्यंत बहुतेक जणांच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे त्यावर चर्चा करत नाही. मात्र एकदा जेवून झाल्यावर मग एखादा आवडीचा पदार्थ दिसला तर तो त्या ५५ मिनिटांतच खायला हरकत नाही असंही मत मांडले गेलं. आयुर्वेदानुसार मात्र तसे करणे योग्य नाही.

एकदा जेवलेलं पचायच्या आतंच पुन्हा काही खाणे याला अध्यशन असं म्हणतात. असं केल्याने पचनशक्तीला अपाय होतो असं आयुर्वेद सांगतो.

यासाठीच ‘हातावर पाणी पडलं की पुन्हा खायचं नाही’ ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे दिलेल्या ५५ मिनिटांत एकदा बसून जेवलात की त्यावर पुन्हा काही न खाणे हेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे.

 

२. दिलेल्या ५५ मिनिटांत तुम्हाला आवडेल ते खा; हा संदेशही योग्य नाही. प्रत्येक आहारीय पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. आरोग्याला वाईट असलेले पदार्थ जरी नेमून दिलेल्या ५५ मिनिटांत घेतले तरी त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत हे लक्षात घ्या.

शिवाय; पचायला जड आणि हलके असंही वर्गीकरण आयुर्वेदाने केलंय. जड पदार्थ आपल्या क्षमतेच्या निम्मेच खावे तर हलके पदार्थ जेमतेम क्षमतेपर्यंतच खावे असंही आयुर्वेद सांगतो.

३. ‘अग्नि’ ही अत्यंत महत्वपूर्ण संकल्पना आयुर्वेदाने आपल्याला दिली आहे. आहाराची मात्रा ही अग्निनुसार असावी असं आयुर्वेद सांगतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नि हा साधारणपणे तीक्ष्ण असतो. म्हणजेच त्या अन्न लवकर पचवू शकतात.यासाठीच त्यांना केवळ दोनवेळा आहार घेऊन चालत नाही.

आचार्य सुश्रुतांनी त्यांना ‘दन्दशूक’ म्हणजे ‘सतत खादाडी करणारे’ असा शब्द योजला आहे.

सध्याच्या काळात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किमान तीन वेळा खाणे संयुक्तिक आहे. अन्यथा आयुर्वेदीय सिद्धांतांचा विचार करता; त्यांचा तीक्ष्ण असलेला अग्नि हा त्यांच्या शरीरातील धातूंना पचवायला सुरुवात करेल!

४. आयुर्वेदानुसार; केवळ हेमंत ऋतूत नाश्ता करावा असं सांगितलं आहे. या ऋतूतल्या थंडीमुळे आपली भूक आणि पचनशक्ती एकंदरच वाढलेली असते हे आपण अनुभवतो. हाच नियम जिथे सतत थंड वातावरण असेल अशा प्रदेशांतही लावणे गरजेचे असते.

यासाठीच बऱ्याच पाश्चात्य देशांत ब्रेकफास्टचं अनन्यसाधारण महत्व आढळतं. आपल्याकडेही उत्तरांचलादि प्रदेशांत या नियमाचा विचार करावा लागेल.

५. मेदस्वी वा स्थूल किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्ती, काही ठराविक विकार यांमध्ये दोन वेळाच जेवण्याचा आग्रह (तेही आहाराचे गुणधर्म लक्षात घेऊन आणि अध्यशन न करता) करणं योग्य ठरेल. मात्र केवळ इन्शुलिनचं ‘माप’ इतक्याच एका घटकाकडे लक्ष देत हा डोलारा उभारणं हे शरीरातील एकंदर धातूव्युहनाला घातक ठरू शकतं.

धातूंचा क्षय झाला की वात वाढीला लागतो. आणि प्रमेही व्यक्तींत वातप्रकोप झाल्याने प्रमेहाचे रुपांतर मधुमेहात (इथे मधुमेह म्हणजे डायबेटीस नव्हे) होऊन तो असाध्य होतो; असं आयुर्वेद सांगतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.

हत्ती कसा असतो? तर शेपूट धरलेल्या व्यक्तीसाठी दोरखंडासारखा, पाय पकडलेल्यासाठी खांबासारखा; असा प्रकार होणे हे विषयाच्या समग्र ज्ञानापासून दूर नेणारे असते.

जसा हत्ती समजावून घेण्यासाठी तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण पहायला हवा; तसेच केवळ इन्शुलिनच्या मागे न लागता प्रकृती, बल, देश, काल, दोष-दुष्य अशा नैक मुद्द्यांचा सखोल विचार त्यामागे हवा.

आहारासारखा विषय हा सब घोडे बारा टके या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडीमेड असून उपयोगाचा नाही.

प्रत्येक नियमाला अपवाद असतात हे जगन्मान्य तत्व ध्यानी ठेवलं की; माझा मुद्दा सहज लक्षात येईल. या विषयाच्या निमित्ताने आयुर्वेदाचा एक नियम पाळायला सुरुवात होईल अशी आशा आहे.

पण आयुर्वेदच पाळायचा आहे तर तो सगळ्या पैलुंतून नीट समजावून घेऊन आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने पाळणे अधिक संयुक्तिक ठरेल; नाही का? एकदा जरूर विचार करून पहा!
Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu