धुंडिराज गोविंद फाळके © मुकुंद कुलकर्णी

दादासाहेब फाळके

भारतातला सर्वात मोठा उद्योग म्हणजे चित्रपट निर्मितीचा उद्योग . चित्रपट निर्मिती करणारे भारतातील पहिले निर्माते दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते . भारतीय चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली इ.स.1913 साली ‘ राजा हरिश्चंद्र ‘ या दादासाहेबांच्या पहिल्या मूकपटापासून .

धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे दि. 30 एप्रिल 1870 रोजी झाला . मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक  पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले . इ.स.1885 मध्ये त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला . वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परिक्षा ते उत्तीर्ण झाले . त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात त्यांनी ड्रॉइंग , पेंटिंग , मॉडेलिंग तसेच फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं . खऱ्या अर्थानं बहुआयामी व्यक्तीमत्व होतं दादासाहेबांच . फोटोग्राफी , हाफस्टोन ब्लॉक तयार करणे यासारखे छंद त्यांनी जोपसले . मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी फोटोग्राफीसाठी स्टील कॅमेरा खरेदी केला .

इ.स.1937 पर्यंतच्या आपल्या 31 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 95 चित्रपट व 26 लघु चित्रपटांची निर्मिती केली . त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो .

त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला , पण गोध्र्यात झालेल्या प्लेगच्या साथीत प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांनी ते गाव सोडले . जर्मनीच्या कार्ल हर्ट्झ या जादूगाराबरोबर त्यांचा परिचय झाला .प्रोफेसर केळफा या नावाने जादूचे प्रयोग दाखवून दादासाहेब सर्वांचे मनोरंजन करीत असत . चौकटी बाहेरची निर्मिती करून दाखवण्याचा फाळके यांचा ध्यास होता .

इ.स.1911 मध्ये येशूच्या जन्मावर आधारित ‘ लाईफ ऑफ ख्राईस्ट ‘ या चित्रपटापासून प्रेरणा घेत भारतातही चित्रपट बनवण्याचा त्यांनी निश्चय केला . चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी ते लंडनला गेले . तिथून त्यांनी कॅमेरा , कच्ची फिल्म सारखे साहित्य खरेदी केले , आणि दि.1 एप्रिल 1912 रोजी ‘ फाळके फिल्म्स ‘ ची स्थापना केली .

‘ राजा हरिश्चंद्र ‘ यांच्यावर आधारित मूकपटाची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य दादासाहेबांनी यशस्वीरित्या पेललं खऱ्या अर्थानं हे सिनेसृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल होतं . ‘ राजा हरिश्चंद्र ‘ या मूकपटाचं लेखन , संवाद , दिग्दर्शन हे ‘ दादासाहेब फाळक्यांचच होतं . या पहिल्याच चित्रपटातने अनेक विक्रम प्रस्थापित केले .

त्यानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर , सत्यवान सावित्री , लंकादहन सारख्या आशयपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली . पुढे पाच भागीदारांसोबत ‘ हिंदूस्थान सिनेमा कंपनी ‘ स्थापन करून एकंदरीत 47 चित्रपटांची निर्मिती केली . ‘ गंगावतरण ‘ हा फाळकेंनी निर्मित केलेला पहिला बोलपट . असे भारतीय चित्रपटांचे आद्य जनक दादासाहेब फाळके यांचे निधन दि.16 फेब्रुवारी 1944 रोजी नाशिक येथे झाले .
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ हा चित्रपट इ.स. 2010 साली प्रदर्शित झाला . या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला त्यांची बऱ्यापैकी माहिती झाली .
 
मुकुंद कुलकर्णी ©
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu